Friday, March 08, 2019

रुटीनात आहेस तू रोज माझ्या

इथे रोजचा ओढणे तोच गाडा
जरी कुरकुरे वंगणाच्या विना
दिवस आजचा कालची फक्त कॉपी
उजाडून येतो नव्याने जुना

परीघातली धाव कंटाळवाणी
तरी त्यातही एक आहे मजा
रुटीनात आहेस तू रोज माझ्या
तुला पाहणे, स्पर्श मलमल तुझा

तुला ओढ लावायचा छंद आहे
मला धावणे रोज आहे अटळ
तुझ्या क्यूट हातात मी बोट देता
स्वत:चे दिसे रुक्षपणही निखळ

तुझा कोवळा स्पर्श भासांत असतो
तुझा गंध श्वासांत रेंगाळतो
दिवसभर जरी दूर असलो तरीही
तुझ्या पास बाबा तुझा राहतो

व्यथांचा निखारा क्षणार्धात शमतो
लपेटून घेताक्षणी मी तुला
तुझ्या बोळक्या हासण्याने फुलवतो
सुखाच्या कळ्या मुग्ध, माझ्या मुला

....रसप....
७ मार्च २०१९

Tuesday, February 12, 2019

अंधाराच्या कुशीत शिरल्या भिंती

ह्या वाटेचे पाउल थकले आहे
वळणापाशी निवांत बसले आहे
पळून गेलेल्या दिवसाच्या मागे
धाव घेतली पण हिरमुसले आहे

क्षितिज विझवते एकेका रंगाला
झाड निजवते एकेका पक्ष्याला
गूढ शांततेचा कातरसा पुरिया
कुणी मुठीने मिटले आकाशाला

बंद घराच्या मूक उदासिन दारी
आगंतुक वाऱ्याची रोज हजेरी
हताश खिडकी कुरकुरते थोडीशी
अंगणातला वृक्ष सुन्न आजारी

थेंब थेंब ओघळते आहे रात्र
नीरवता ही यत्र तत्र सर्वत्र
मिणमिण करती विषण्णतेच्या वाती
अंधाराच्या कुशीत शिरल्या भिंती

....रसप....
१२ फेब्रुवारी २०१९

Saturday, February 02, 2019

स्वागतार्ह प्रयोग - एक लडकी तो देखा तो ऐसा लगा - (Movie Review - Ek Ladki Ko Dekha To Aisa Laga)

मुख्य धारेतला भारतीय चित्रपट हा नेहमीच पलायनवादी राहिला आहे. लोकांना त्यांच्या रोजच्या आयुष्यातून दोन घटिका मनोरंजन मिळावं, हाच त्याचा मुख्य हेतू राहिला आहे. चित्रपट बनवणारे आणि पाहणारे, दोघेही मुख्य धारेतल्या चित्रपटाकडे ह्याच विचाराने पाहात आले आहेत. ह्या मनोरंजनात नाट्याची बाजू सांभाळण्यासाठी सगळ्यात आवडता विषय 'प्रेम' आणि मग त्याच्या जोडीने देशभक्ती, कर्तव्यभावना, कौटुंबिक कलह वगैरे कथानकं असतात. 
मात्र चित्रपटाचा हा पारंपारिक चेहरा हळूहळू बदलत चालला आहे. (खरं तर, मुखवटाच. पण पिढ्यांनंतर पिढ्या जपलेला मुखवटा एक चेहराच बनल्यासारखा झाला असल्याने, 'चेहरा'.) आजचा मुख्य धारेतला चित्रपट वेगळे विषय हाताळायला पाहतो आहे. गेल्या काही वर्षांतले चित्रपट पाहिले, तर 'चित्रपटात उपकथानक म्हणून का होईना एक प्रेमकहाणी असलीच पाहिजे', ह्या आत्यंतिक उथळ, तरी प्राथमिक मताला अनेक चित्रपट सर्रास छेद देत आहेत. अनावश्यक गाण्यांना चित्रपटात स्थान राहिलेलं नाहीय आणि कथानकाची मांडणी मुख्य विषयाला अधिकाधिक धरून होताना दिसते आहे. 

'समांतर चित्रपट' ही धारा कधीच लुप्त झाली असली, तरी अजूनही काही चित्रपट वेगळ्या विषयांची मांडणी करताना दिसतात किंवा वेगळ्या मांडणीने कथा सांगताना दिसतात. ते अगदी ठळकपणे मुख्य धारेला सोडूनच असतात. व्यावसायिक गणितं त्यांनी गृहीत धरलेली नसतात, हेही जाणवतं. 
एखादा चित्रपट मधूनच येतो, जो व्यावसायिक गणितं सांभाळण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतच वेगळं कथानक किंवा वेगळी मांडणी समोर आणतो. गेल्या काही वर्षांत चांगले/ वाईट, जमलेले/ फसलेले असे अनेक व्यावसायिक प्रयोगही झाले आहेत, ही एक खूप चांगली बाब आहे. 'एक लडकी तो देखा तो ऐसा लगा' असाच एक प्रयोग करतो. तो चांगला आहे की वाईट, जमला आहे की फसला आहे; हा भाग निराळा. मात्र एक व्यावसायिक चित्रपट काही तरी वेगळेपणा समोर घेऊन येण्याचं धाडस करतो आहे, हीच बाब मुळात खूप स्तुत्य वाटते. एक असा विषय ज्याला अगदी खाजगी गप्पांतही पद्धतशीरपणे फाटा दिला जातो, झटकलं जातं; त्याला एक व्यावसायिक चित्रपट लोकांसमोर खुलेआम घेऊन येतो, इतकीच गोष्ट 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' आवर्जून पाहण्यासाठी पुरेशी आहे, असं मला वाटतं.

चित्रपटाची कथा 'गजल धालीवाल' हिने लिहिली आहे. 'गजल' भारतातील मोजक्या ट्रान्स-वूमन्सपैकी एक आहे. स्वत:च्या लैंगिकतेच्या शारीरिक व मानसिक घडणीतली असमानता समजून घेऊन, स्वीकारून आणि मग प्रयत्नपूर्वक त्यांत समतोल साधून घेण्याचा मोठा संघर्ष तिने स्वत:शीही केला आहे आणि उर्वरित जगाशीही. चित्रपटातील 'एक लडकी' म्हणजेच 'स्वीटी' (सोनम कपूर) हाच संघर्ष अनुभवते आहे. तिचा हा संघर्ष चित्रपटाचा बहुतांश भाग खूप समर्थपणे मांडतो. हा विषय मांडणं म्हणजे एक कसरत होती. जर तो अगदी गंभीरपणे मांडला असता, तर पचायला अवघड होता. कडवट औषध शुगरकोट करून घ्यायचं असतं म्हणून हा विषय हलक्या-फुलक्या शैलीत मांडला आहे. पण असं करतानाही त्यातलं गांभीर्य जपणं अनिवार्य होतं, कुठलाही थिल्लरपणा येऊ न देणं महत्वाचं होतं. ही कसरत उत्तम निभावली गेली आहे. कथानकाची मांडणी, पात्रं, घटना, चित्रण खूप वास्तववादी वाटतं. अनेक प्रसंग पाहताना, हे आपण प्रत्यक्षातही पाहिलं असल्याचं जाणवत राहतं. अश्या मुलांचं वेगळं वागणं, एकटं पडणं, त्यांनी स्वत:च्या कोशात शिरणं, त्यांच्या आवडी-निवडी हे सगळं छोट्या छोट्या प्रसंगांतून प्रभावीपणे मांडलं आहे. स्वीटीच्या कपड्यांच्या रंगसंगतीतही हा विचार केलेला दिसतो.
शेवटच्या भागात मात्र कथानकातला हा वास्तववाद मागे पडत जातो आणि नेहमीचा फिल्मी उथळपणा त्याची जागा घेतो. आधी घेतलेल्या मेहनतीवर, जसजसं आपण शेवटाकडे सरकत जातो, तसतसा बोळा फिरायला लागतो, ही 'एक लडकी को..' ची मोठी उणीव आहे.


मात्र ही एकच उणीव नाही. ह्यापेक्षा मोठी उणीव आहे 'सोनम कपूर'. एका अतिशय प्रभावी व्यक्तिरेखेला साकारण्यासाठी आवश्यक ठहराव तिच्या क्षमतेबाहेरचा असावा, असं 'नीरजा'मध्ये वाटलं होतं, इथे त्यावर शिक्कामोर्तबच होतं. जिथे जिथे कथेची तिच्याकडून लक्षणीय सादरीकरणाची अपेक्षा होती, तिथे तिथे तिच्या मर्यादा उघड्या पडल्या आहेत. पण जिथे जिथे सोनम कपूर कमी पडते, तिथे तिथे सहाय्यक कलाकार सांभाळून घेतात असं चित्र पुन्हा पुन्हा दिसून येतं. तिचा एकटीचा असा कुठलाही प्रसंग चित्रपटात नाही किंवा तिला लांबलचक मोनोलॉगसुद्धा नाही. मुख्य व्यक्तिरेखा इतकी फुसकी झाल्यामुळे बाकीच्यांच्या मेहनतीचं चीज फक्त सांभाळून घेण्यातच होतं.

'राजकुमार राव सुंदर काम करतो', हे म्हणून (लिहून) आता कंटाळा यायला हवा ! पण त्याने साकारलेला स्ट्रगलिंग लेखक, निरपेक्ष प्रेमी, मित्र खूप कन्व्हीन्सिंग आहे. त्याला भावनिक उद्रेकाचे असे कुठले प्रसंग नाहीत. मात्र दारू पिऊन स्वीटीच्या खोलीत जाणं, किचनच्या खिडकीतून पत्र देणं व अजून काही साध्याश्या प्रसंगांतही तो मजा आणतो. स्वीटीचं सत्य ऐकतानाच्या प्रसंगात स्वत: स्वीटी (सोनम) जितकी उथळ वाटते तेव्हढाच साहिल (राजकुमार) मनाला पटतो. तो एक अतिशय महत्वाचा प्रसंग केवळ राजकुमारमुळे तरला तरी आहे.

अनिल कपूरने कॅरेक्टर रोल्स करायला सुरु करण्याचं कारकिर्दीतलं एक महत्वाचं वळण अगदी बेमालूमपणे घेतलं आहे. त्याचा भावनिक संघर्ष दाखवण्यासाठी कथानकात फारसा वाव त्याला मिळाला नाहीय, तरी जितका आहे त्यात त्याने छाप सोडली आहे. खरं तर अनिल कपूरने वाईट काम केलंय, असा एकही चित्रपट माझ्या तरी पाहण्यात आलेलाच नाही. त्या दृष्टीने तो खरोखरच (क्रिटीकल अक्लेमच्या बाबत) खूप अंडररेटेडही असावा.

जुही चावला चित्रपटात नसती, तरी चाललं असतं. मूळ कथानकाला तिचा काही फारसा हातभार नाहीय. मात्र तिच्या असण्याने अनेक हलके-फुलके प्रसंग दिले आहेत. खासकरून अनिल कपूर आणि ती एकत्र जेव्हा पडद्यावर येतात तेव्हा ते धमाल करतात !

तमिळ, तेलुगु चित्रपटातला लोकप्रिय चेहरा 'रेजिना कॅसेन्ड्रा' प्रथमच हिंदीत दिसला आहे. तिचा टवटवीत मिश्कीलपणा आणि सहजाभिनय मुख्य व्यक्तिरेखेसाठी साजेसा होता. येत्या काळात तिला चांगल्या भूमिका नक्कीच मिळायला हव्या.

'रोचक कोहली'च्या संगीताची बाजूही कमजोर वाटते. आरडीचं '१९४२ अ लव्ह स्टोरी'मधलं 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा..' रिक्रिएट केलं आहे. ते कम्पोजिशन आवडलं. मूळ मेलडीला हात लावलेला नाहीय आणि ओरिजिनलमध्ये जे म्युझिक पीसेस होते त्यांनाही शब्दांत बांधलंय. एरव्ही रिमेक/ रिक्रिएट करताना ऱ्हिदम आणि कम्पोजिशनमध्ये गोंधळ घातला जातो, तसं तरी नाहीय. पण कॉन्स्टीपेटेड आवाजात गायची फॅशन गलिच्छ आहे. असो. त्याबाबत बोलण्यात अर्थ नाही कारण सगळेच आजकाल कुंथत कुंथत गाताना दिसतात !

दिग्दर्शिका 'शेली चोप्रा' ह्यांचा (बहुतेक) हा पहिलाच चित्रपट आहे. त्यांच्या कामात अनुभवी सफाईदारपणा ठळकपणे जाणवतो. कथानकाने शेवटच्या भागात खाल्लेल्या गटांगळ्या आणि सोनम कपूरने टाकलेल्या पाट्या वगळल्या तर दिग्दर्शिकेचा एक पहिला प्रयत्न आणि वेगळ्या विषयाची हाताळणी म्हणून 'एक लडकी को..' आवडायला हरकत नसावी. 

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर

Friday, December 28, 2018

असामान्य माणसाची अविश्वसनीय कहाणी - झीरो (Zero - Movie Review)

२०१८ संपल्यात जमा आहे. ह्या वर्षीच्या यशस्वी-अयशस्वी सिनेमांचा विचार केला तर दोन ठळक बदल अगदी स्पष्टपणे जाणवतात. एक म्हणजे सिनेमा बनवणारे अधिकाधिक प्रयोगशील झाले आहेत आणि दुसरा म्हणजे प्रेक्षक ह्या प्रयोगशीलतेकडे पाहताना स्टारव्हॅल्यूचा विचार कमी करायला लागले आहेत. सामान्य माणूस - Layman - आणि त्याची कहाणी दाखवणारे सिनेमे प्रेक्षकांच्या जास्त पसंतीस पडले आहेत आणि असामान्य कहाण्या सांगणारे सिनेमे पाहताना प्रेक्षकांनी आपली सारासारविचारशक्ती परंपरागत सवयीनुसार थिएटरात येण्यापूर्वी मंदिराबाहेर चप्पल काढून ठेवल्यासारखी काढून ठेवायचं बऱ्याच अंशी बंद केलं आहे. त्यामुळेच रेस-३, ठग्स ऑफ हिंदोस्तान सारख्या मोठ्या स्टार्सच्या, बॅनर्सच्या सिनेमांना नेहमीप्रमाणे मिळणारं हमखास यश मिळालं नाही, तर बधाई हो, अंधाधून, स्त्रीसारखे 'लो प्रोफाईल' सिनेमे यशस्वी ठरले. 

सुपरस्टार्सच्या बाबतीत आजकाल बहुतांश प्रेक्षकांचा एक तक्रारीचा सूर ऐकू येतो की, इतकं नाव, पैसा कमवून झाल्यावर तरी हे लोक वेगळ्या वाटेचे प्रयोगशील सिनेमे का करत नाहीत. पण मला वाटतं, सलमान खान वगळता इतर स्टार लोक थोडेफार प्रयोग आताशा करायला नक्कीच लागले आहेत, असं मला वाटतं. सलमान खाननेही केले असते, पण त्याचा प्रॉब्लेम समज आणि कुवतीशी निगडीत असल्याने त्याच्याविषयीही एव्हढ्या बाबतीत सहानुभूती वाटायला हरकत नसावी. काही उदाहरणांचा विचार करायचा झाल्यास, अक्षय कुमारचा 'पॅडमॅन' हा एक खूप मोठा आणि वेगळ्याच वाटेवरचा यशस्वी प्रयोग होता. आमीरचा 'दंगल'ही तसाच खूप वेगळा आणि शाहरुखचा 'डिअर जिंदगी' एक हटके प्रयोग होता. हृतिकचे आशुतोष गोवारीकरसोबतचे दोन्ही सिनेमे प्रयोगशीलच मानायला हवे. शाहरुखच्या बाबतीत बोलायचं झालं तर 'रा-वन' आणि 'फॅन' हेसुद्धा प्रयोगच होते. 
मात्र ह्या सगळ्यांच्या बाबतीत एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते. हे लोक प्रयोग करतात पण त्यातही त्यांनी निवडलेलं पात्र हे 'लार्जर दॅन लाईफ'च असते. सामान्य माणसाच्या जवळ जाणारं पात्र साकारण्याचा प्रयत्न अजून तरी होताना दिसत नाही. प्रयोगशीलतेच्या नावाखाली अजूनही स्टार लोक असामान्य माणसांची सामान्य कहाणी किंवा सामान्य माणसाची असामान्य कहाणीच सादर करताना दिसतात आणि नेमकं असंच काहीसं 'झीरो'बाबतीतही आहे. किंबहुना, 'झीरो' अजून एक पाउल पुढे जाऊन 'असामान्य माणसाची असामान्य, नव्हे अविश्वसनीय कहाणी' सांगण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो. प्रेक्षक पुन्हा एकदा एका कुठूनही कुठेही पोहोचणाऱ्या सिनेमाबद्दल शाहरुखवर टीकेची झोड उठवू शकतात, उठवत आहेतही. मात्र, गंडला असला तरी प्रयोग करण्याचा प्रयत्न तर केला आहे, ह्याचा विसर पडायला नको. कारण हीच भूमिका शाहरुखऐवजी कुणा दुसऱ्या नटाने साकारली असती, तर फसलेला असला तरी प्रयोग केल्याबद्दल त्याला दाद, शाबासकी सगळं नक्कीच मिळालं असतं. असा विचार मनात आल्यावर, प्रस्थापितांवर टीका करत असताना बहुतेक वेळा आपण अभावितपणे वाहवत जात असतो, असा एक संशयही स्वत:विषयी निर्माण होतो. 
असो.मेरठच्या 'बौआ सिंग'ची ही कहाणी आहे. 'बौआ' ची शारीरिक रचना ठेंगणी आहे. घरच्या श्रीमंतीमुळे आणि (बहुतेक) शारीरक व्यंगामुळे लहानपणापासून मनात रुजलेल्या बंडखोर वृत्तीमुळे 'बौआ सिंग' एक बेदरकार, बेजबाबदार इसम आहे. 'झीरो' ही कहाणी 'बौआ सिंग'च्या 'मेरठ'च्या लहान-मोठ्या गल्ल्या, बाजारांपासून मुंबईच्या उच्चभ्रू सोसायटीपर्यंत, रस्त्यावरच्या टपोरीगिरीपासून बॉलीवूडमधल्या प्रसिद्ध व्यक्तींसोबत उठ-बस करण्यापर्यंत आणि जमिनीपासून ते अंतराळापर्यंतच्या प्रवासाची आहे. 
हा प्रवास 'तर्क' नावाच्या सिद्धांताचं बासन गुंडाळून पार अगदी मंगळ ग्रहापर्यंत भिरकावून देतो. 'बोटाने स्मार्टफोनला स्वाईप केल्यासारखं आकाशाच्या दिशेने हवेत स्वाईप करून आकाशातले तारे पाडणं', ही हिंदी सिनेमाच्या इतिहासात तर्काने मारलेल्या सर्वात खोल डुबक्यांपैकी एक डुबकी असावी. एका प्रसंगी तर आकाशातले तारे इतके सुदुरबुदूर होतात की त्या काळ्याभोर प्लॅटफॉर्मवर मुंबईतल्या ऐन ऑफिस अवर्सच्या वेळेची एखादी लोकल ट्रेन येऊन थांबली असावी आणि चहूदिशांनी सगळ्यांची धावपळ सुरु व्हावी, तसं काहीसं वाटतं.

मात्र असं असलं, तरी ही सगळी अतर्क्यता बऱ्यापैकी आत्मविश्वासाने सादर झालेली आहे.
शाहरुखचा चित्रपट म्हटला की चित्रपटभर शाहरुख आणि शाहरुखच असणं अपेक्षितच असतं. तसंच इथेही आहे. त्याचा वावर नेहमीप्रमाणे प्रचंड उत्साही आहे. मात्र ठेंगण्या व्यक्तींची देहबोली काही त्याला फारशी जमलेली नाही. नुसतीच वेगळी भूमिका करणं म्हणजे प्रयोगशीलता मानल्याप्रमाणे तो नेहमीच्याच देहबोलीने वावरला आहे. त्याचं ठेंगणेपण हे सर्वस्वी कॅमेऱ्याच्या करामती आणि स्पेशल इफेक्ट्सवर अवलंबून आहे. 'अप्पू-राजा'मध्ये कमल हसनने घेतलेली मेहनत (गुडघ्यावर चालणे, इ.) त्याने घेतल्याचे अजिबात जाणवत नाही. एरव्ही संवादफेक, मौखिक अभिनय, ऊर्जा इ. मध्ये शाहरुख नेहमीच दमदार असतोच. पण देहबोली अजिबातच न जमल्याने बौआ सिंग हा एक ठेंगणा आहे, ह्याचा आपल्यालाही काही वेळाने विसर पडतो. इथेच प्रयोग सपशेल फसतो.
अनुष्का शर्माने कमाल केली आहे. प्रत्येक चित्रपटात काही तरी वेगळं करण्यात अनुष्का शर्माचा हात कुणी धरू शकेल असं मला तरी वाटत नाही. चित्रपटभर शाहरुखच शाहरुख असला, चर्चासुद्धा त्याच्याविषयीच होत असली तरी प्रत्यक्षात हा चित्रपट अनुष्का शर्माने जिंकलेला आहे. तिने साकारलेली निग्रही 'आफिया' तिच्या आजवरच्या सर्वोत्तम कामांपैकी एक आहे.
'रईस'नंतर पुन्हा एकदा शाहरुखच्या पात्राचा 'साईड किक' म्हणून मोहम्मद झीशान अयुब सहाय्यक भूमिकेत जान ओततो. हा गुणी अभिनेता असल्या दुय्यम भूमिका करण्यातच गुंतत जातो आहे, ही हळहळ पुन्हा एकदा वाटते.
कतरिनाच्या भूमिकेची लांबी तिला जितका वेळ सहन केलं जाऊ शकतं, त्याच्याआत आहे. 
तिगमांशु धुलियासह बाकी सर्वांना अगदीच कमी काम आहे. त्यामुळे काही दखलपात्र असं जाणवत नाही.

'अजय-अतुल'कडे सध्या काही मोठ्या बॅनर्सचे सिनेमे आलेले आहेत. पैकी 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' फुसका बार ठरला. 'झीरो' त्या मानाने खूपच उजवा आहे. 'मेरे नाम तू..' हे गाणं तर मनाचं ठाव घेणारं आहे. त ऐकत असताना एक वेगळाच विचार मनात आला. प्रसिद्धीमध्ये ह्या गाण्याच्या तुकड्याला 'थीम'प्रमाणे वापरलं असतं तर ? एकंदरीतच संगीताच्या बाजूला अजून जास्त आक्रमकतेने सादर करायला हरकत नव्हती. त्यात तितकी कुवत आहे, असं वाटलं. 

'आनंद राय' हे काही दिग्दर्शकांपैकी खूप मोठं क्रिटीकली अक्लेम्ड नाव आहे, असं मला वाटत नाही. आनंद रायचे चित्रपट व्यावसायिक गणितं डोळ्यांसमोर ठेवूनच केलेले असतात, हे त्यांच्या फिल्मोग्राफीला पाहून लगेच लक्षात येतंच. त्यांनी इथेही दुसरं कुठलं गणित मांडलेलं नाही. मात्र आव मात्र तसा आणला असल्याने 'करायला गेले गणपती आणि झाला मारुती' अशीच गत झाली आहे ! 

शाहरुखच्या सुजाण चाहत्यांसाठी 'झीरो' म्हणजे पुन्हा एकदा एक अपेक्षाभंग आहे. मला मात्र ह्या अपेक्षाभंगाच्या दु:खापेक्षा त्याने प्रयोगशीलतेची कास सोडून पुन्हा एकदा 'हॅप्पी न्यू ईयर' किंवा 'दिलवाले' वगैरे टाईप आचरटपणा सुरु केला तर? - ही भीती जास्त सतावते आहे.

रेटिंग - * * १/२

- रणजित पराडकर
Related Posts Plugin for WordPress, Blogger...