Sunday, November 16, 2008

पुन्हा रांगच पावली....


मेल्यानंतर यमदूताने
माझा खोळंबा केला
एअरपोर्टला उतरून
बावळा टॅक्सीने आला..
पाच मिनिटांच्या प्रवासाला
दोन तास लागले
जीवंतपणी प्राण गेले
मेल्यानंतर थांबले!!

घरापासून एअरपोर्टला
पुन्हा दोन तास लागले
क्षणभर मला ऑफीसचेच
दिवस येऊ भासले

विमानात पण त्याच्या
गर्दी 'लोकल'सारखीच
लटकायला दारापाशी
जागा माझ्यापुरतीच !

प्राण घेऊन हातावर
आयुष्यभर लटकलो
मेल्यानंतर भीती कसली
छपरावरतीच विसावलो

स्वच्छ मोकळी शुद्ध हवा
मनमुराद चाखली
चित्रगुप्तासमोर पटकन
उडी पहिली मारली

पाप-पुण्य हिशोब माझा
मांडला जात होता
छोट्या-छोट्या घटना सा-या
बराच व्याप होता

कसेबसे जुळून शेवटी
गणित मांडले गेले
स्वर्गात कमी, नरकामधले
दिवस जास्त ठरले

स्वर्गद्वारी गेलो तिथे
अनपेक्षित घडले!
पाय ठेवायला जागा नाही
बाहेरुनच कळले !

पाप-घडे उतू चालले
पृथ्वीवरती किती
कुठून केले ह्यांनी इतके
पुण्यकर्मी भरती??

विचारपूस करता थोडी
खरं काय ते कळलं
आरक्षणाचं लोण म्हणे
'वर'पर्यंत पसरलं..!!

पृथ्वीवरती जागा भरपूर
स्वर्गामध्ये इवली
इवल्यामधली अगदी थोडी
अनारक्षित राहिली

शाळेनंतर कॉलेजसाठी
बस-ट्रेन-रेशन साठी
लग्नाकरता मुलीसाठी
मेल्यानंतर जळण्यासाठी
छोट्या-मोठ्या सगळ्यासाठी
नेहमीच रांग लावली
सवयीचा गुलाम होतो
पुन्हा रांगच पावली....


....रसप....
१६ नोव्हेंबर २००८

3 comments:

  1. Verry good.
    Hasta hasta waastawach jaaNiw karun denaari..

    Very good

    ReplyDelete
  2. रांगेतून सुटका नाहीच तर ... आपल्यासारख्यांच जगण साधासुध आणि मरणही!!

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...