Sunday, January 25, 2009

कॉलेज....गेले ते दिवस

सहा चोपन्नची चर्चगेट
सात सव्वीस बान्द्र्याला
'मॉर्निंग मीटिंग' टपरीवर
भेटत असू चहाला
ग्रुपमध्ये आल्याबरोबर
चढे मस्तीची झिंग
गेले ते दिवस जेव्हा
चहाला म्हणायचो 'कटिंग'

इकोनॉमिक्सच्या लेक्चरला
वर्ग रिकामा करायचो
चार मुलं मागे ठेवून
'मास बंक' पाळायचो
गप्पाष्टकांत रंगवायचो
कँटीन आणि कट्टा
गेले ते दिवस जेव्हा
सिगरेटला म्हणायचो 'सुट्टा'

'भाई' नव्हतो कुणी तरी
तसं वागायला जमत होतं ..
कॉलेजमध्ये आमचंच तेव्हढं
नाणं खपत होतं..
नजर कुणी दिलीच तर -
"देखता क्या हैं? चल फूट..!!"
गेले ते दिवस जेव्हा
बावळ्यांना म्हणायचो 'चिरकूट'

एका हाकेसरशी सारे
कुठेही पोहोचत होतो
दोस्तीखातर कुणालाही
बिनधास्त 'भिडत' होतो
कधी दिले, कधी घेतले
आम्ही 'पाहुणचार'
गेले ते दिवस जेव्हा
दोस्ताला म्हणायचो 'यार'

सुट्टा विझला, कटिंग निवला
सुटले-तुटले यार
गेले ते दिवस आता
चुकावायचेत उधार..


....रसप....
२५ जानेवारी २००८

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...