Sunday, February 15, 2009

हे असेच येथे


हे असेच येथे पर्वतशिखरी उंच उंच पोहोचणे
क्षणभर लावून हात नभाला पुनरपि गडगडणे

हे असेच येथे वा-यावरती उडून हलके होणे
उधळून टाकून वसने सारी सर्वदूर भरकटणे

हे असेच येथे पाण्याभवती स्तब्ध तीरही बनणे
फुले फुलवणे, पूल पोसणे यत्किंचित ना ढळणे

हे असेच येथे खुरडत खुरडत गर्दीमधून जाणे
भवतालीच्या कल्लोळातही अपुल्या विश्वी रमणे

हे असेच येथे लाज सोडुनी व्यभिचारी वागणे
'सब करतें हैं' म्हणून खापर परमाथी फोडणे

हे असेच येथे सीमारेषा आखून झुंजविणे
दोन्हीकडचे खाऊन लोणी 'सम-वाटप' करणे

हे असेच येथे प्रेमदिनी प्रेमाला लाजविणे
संस्कृतीरक्षण करण्याकरता गुंडच माजविणे!!

हे असेच येथे पाहून-साहून दगडासम जगणे
येती लाटा, जाती लाटा शुष्क तीरी वसणे

हे असेच येथे आव आणूनी काही-बाही लिहिणे
अपुली मैफल अपुले गाणे स्वत:च टाळ्या पिटणे


....रसप....
१५ फेब्रुवारी २००८

1 comment:

  1. nothing but pure truth about life...wonderful...

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...