Thursday, July 16, 2009

अर्थ.... नाही

काल केलेल्या चुकांच्या बोचण्याला अंत नाही
आज केल्या व्यक्त ज्या त्या भावनांना अर्थ नाही

डोलत्या फांदीतूनी सांडून झाला जो सडा हा
वेचलेल्या त्या फुलांच्या हासण्याला अर्थ नाही

कोण जाणे पाखरे येतात येथे खेळण्याला
संभ्रमी कोलाहलाच्या गायनाला अर्थ नाही

प्रेय माझे ध्येय माझे चार बाजू मांडलेले
भौतिकाशी गुंतलेल्या वासनेला अर्थ नाही

दाटुनी आभाळ येता प्राण डोळां आणलेले
मेघ जाता वाहुनी त्या दाटण्याला अर्थ नाही


....रसप....
१५ जुलै २००९

(दुसरा व तिसरा शेर: "स्वामी निश्चलानंद" ह्यांच्या लेखणीतून उतरला.. )

1 comment:

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...