Wednesday, November 24, 2010

I m under scanner..? किल मी..!!

I m under scanner..
माहीत आहे मला
मी "सॉफ्ट टार्गेट" आहे ना
मला GODFATHER नाहीये ना..
सवय झालीय मला
असल्या "scannings"ची
झाडावर चढवून
पाडण्याच्या "plannings"ची

बुडाखाली खुर्ची अन्
डोक्यावरती तलवार
असंच काम करत आलोय
एकानंतर दुसरं बस्तान
नेहमीच बसवत आलोय

कळलंय मला
तुम्ही गुलदस्त्यात काय ठेवलंय
माझी तयारी आहे…
काढा बाहेर
मी सुद्धा शिंग परजलंय

..and yes…. please don’t empathise
समोरून वार करा..
let it be fatal..
Kill me
come on.. किल मी..!!


….रसप….
२३ नोव्हेंबर २०१०

फक्त दे तू हात ह्या हातात माझ्या

"मराठी कविता" ह्या ऑर्कुट समुहाच्या "ओळीवरून कविता" ह्या उपक्रमासाठी केलेली रचना

भास होणे मृगजळाचे व्यर्थ आहे
गूज माझे ऐकण्याला अर्थ आहे

नेहमीची साथ येथे कोण देतो?
आज माझ्या मागण्याला अर्थ आहे

फाटलेल्या अंबराला पेलताना
आपल्याशी जिंकण्याला अर्थ आहे

सुन्न झाल्या चेतनांना जाग येई
घाव ओले ठेवण्याला अर्थ आहे

मी मुळाशी घट्ट आहे रोवलेला
दर्शरूपी डोलण्याला अर्थ आहे

फक्त दे तू हात ह्या हातात माझ्या
वादळाशी झुंजण्याला अर्थ आहे


….रसप….
२२ नोव्हेंबर २०१०

Wednesday, November 17, 2010

अर्थ आहे....

आज येथे थांबण्याला अर्थ आहे
शब्द माझे मांडण्याला अर्थ आहे

निर्झराचा भाव माझ्या बोलण्याला
ओढ असता वाहण्याला अर्थ आहे

पावलांना बंध नाही उंब-याचा
चौकटीच्या रंगण्याला अर्थ आहे

मित्र नाही येथ कोणी साधकाचा
स्वप्नदेशी दंगण्याला अर्थ आहे

कोणता ना चेहरा खोटा समोरी
आरश्याला दावण्याला अर्थ आहे

रातराणी फक्त माझ्या एकट्याची
चांदण्याच्या सांडण्याला अर्थ आहे

वाट जाते नागमोडी दूर देशी
बेफिकीरी चालण्याला अर्थ आहे

जाम माझे घोट घेई तृप्त झाला
मी हताशा झिंगण्याला अर्थ आहे?

रत्न आणि माणके ना स्वस्त येथे
आसवांना रोखण्याला अर्थ आहे

पावसाने धार व्हावे मुक्त होता
का ढगाशी भांडण्याला अर्थ आहे?

खेळ सारे तूच केले जाणले मी
सर्व काही हारण्याला अर्थ आहे

घे उशाशी मल्मली ह्या शांततेला
एक घटका झोपण्याला अर्थ आहे

भावनेला बाज येता गेयतेचा
शायरीला वाचण्याला अर्थ आहे

पास येणे, दूर जाणे पाहिले मी
बंधनांना तोडण्याला अर्थ आहे

दर्द माझा जन्म देतो शायरीला
एकट्याने जाळण्याला अर्थ आहे

स्वार्थ ज्याने साधला तो थोर झाला
गुप्त माझ्या राहण्याला अर्थ आहे

एक छोटे विश्व माझे बांधले मी
ध्वस्त होता खंगण्याला अर्थ आहे

वेड ज्याला लागले ह्या आशिकीचे
तीर वर्मी लागण्याला अर्थ आहे

देव आहे मानतो मी सर्व दूरी
आस वेडी ठेवण्याला अर्थ आहे

तोच माझा राहिला वाटे मलाही
जीवनाला पोसण्याला अर्थ आहे

अंबराचे सांडणे बेबंदशाही
सागराच्या माजण्याला अर्थ आहे

सत्य आणि झूठ झाले एक तेथे  
कान-डोळे झाकण्याला अर्थ आहे

एक भूमी, सूर्य अन् तो एक चंदा
प्रेमकोनी गुंतण्याला अर्थ आहे!!


....रसप....
१७ नोव्हेंबर २०१०

Monday, November 15, 2010

पापण्यांना आसवांचा भार झाला

"मराठी कविता" ह्या ऑर्कुट समुहाच्या "ओळीवरून कविता" ह्या उपक्रमासाठी केलेली रचनाचांदण्याने चंद्र का बेजार झाला?
पापण्यांना आसवांचा भार झाला

मैफलीला रंग देता गान त्याचे
शायरी सोडून तो फनकार झाला!

पावले मोजून झाली थांब आता
वाट माझी वाहते का? भास झाला

तूच का तो मुक्तछंदी धावणारा?
तप्त होता द्राव का तो गार झाला?

ऐकवेना थोरवी गाता कुणीही
थोर होता सान होता, वाद झाला..!


....रसप....
१५ नोव्हेंबर २०१०

चित्रपट कविता क्र. ६: "दीवार" (भाग २)

विजय वर्मा (सिनेमात अमिताभ) च्या नजरेतून....

झालो कुबेर मोठा आतून रंक आहे
मी एकटाच येथे माझ्या जगात आहे

वा-यासवेच मीही वाटेवरी बहकलो
मागे फिरून येणे आता अशक्य आहे

आहेच पातकांचा माझा घडा भरूनी
भागी तयात नाही माझीच फक्त आहे

दगडात देव आहे म्हणतात लोक सारे
प्रत्येक घाव त्याचा माझाच भोग आहे

रक्तास, आसवांना, स्वेदास आटवूनी
माझी हयात गेली अंतास ओढ आहे

आलो तुझ्याच शरणी नाराज तू नसावे
तू सांग तेच आई करणार आज आहे


- ....रसप....
४ नोव्हेंबर २०१०

("मराठी कविता" ह्या ऑर्कुट समुहाच्या "ओळीवरून कविता" ह्या उपक्रमासाठी केलेली रचना)Tuesday, November 02, 2010

चित्रपट कविता क्र. ५: "दीवार" (भाग १)

"सुमित्रादेवी वर्मा" (निरूपा रॉय - 'दीवार' मधील आई) च्या नजरेतून:

तो दिवस आजही स्मरतो..

भर्तारा होता मान
अन्यायी लुटली शान
हो सज्जन तो बेभान
सोडून अम्हाला गेला
अन् अश्रू मम नेत्राला

करी जो तो छी थू हाय
जरी गरीब एकटी गाय
गळले ना हात न पाय
त्यागले राहत्या दारा
अन् अश्रू मम नेत्राला

पोरांसह शहरी येता
राहण्या-खाण्याची चिंता
दुनियेशी झगडा होता
निर्धार दांडगा केला
अन् अश्रू मम नेत्राला

निर्दोष कोवळा पोर
साहिले क्रौर्य जे घोर
कोरले मनावर खोल
दिस एक जाहला ज्वाला
न च अश्रू तव नेत्राला

खाऊन सारख्या खस्ता
जोखला वेगळा रस्ता
भरकटला पाऊल चुकता
अभिमन्यू फसता झाला
न च अश्रू तव नेत्राला

कर्तव्य आणि कर्माचा
संघर्ष एक रक्ताचा
हा खेळ दुष्ट दैवाचा
शोकांत व्हायचा, झाला
अन् अश्रू मम नेत्राला

मी जगले वादळ देवा
मज पचले कातळ देवा
तू जे जे दिलेस देवा
मी भोग पूर्ण तो केला
न च अश्रू मम नेत्राला..
न च अश्रू मम नेत्राला..


….रसप….
२७ ऑक्टोबर २०१०
Related Posts Plugin for WordPress, Blogger...