Tuesday, November 02, 2010

चित्रपट कविता क्र. ५: "दीवार" (भाग १)

"सुमित्रादेवी वर्मा" (निरूपा रॉय - 'दीवार' मधील आई) च्या नजरेतून:

तो दिवस आजही स्मरतो..

भर्तारा होता मान
अन्यायी लुटली शान
हो सज्जन तो बेभान
सोडून अम्हाला गेला
अन् अश्रू मम नेत्राला

करी जो तो छी थू हाय
जरी गरीब एकटी गाय
गळले ना हात न पाय
त्यागले राहत्या दारा
अन् अश्रू मम नेत्राला

पोरांसह शहरी येता
राहण्या-खाण्याची चिंता
दुनियेशी झगडा होता
निर्धार दांडगा केला
अन् अश्रू मम नेत्राला

निर्दोष कोवळा पोर
साहिले क्रौर्य जे घोर
कोरले मनावर खोल
दिस एक जाहला ज्वाला
न च अश्रू तव नेत्राला

खाऊन सारख्या खस्ता
जोखला वेगळा रस्ता
भरकटला पाऊल चुकता
अभिमन्यू फसता झाला
न च अश्रू तव नेत्राला

कर्तव्य आणि कर्माचा
संघर्ष एक रक्ताचा
हा खेळ दुष्ट दैवाचा
शोकांत व्हायचा, झाला
अन् अश्रू मम नेत्राला

मी जगले वादळ देवा
मज पचले कातळ देवा
तू जे जे दिलेस देवा
मी भोग पूर्ण तो केला
न च अश्रू मम नेत्राला..
न च अश्रू मम नेत्राला..


….रसप….
२७ ऑक्टोबर २०१०

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...