Sunday, January 30, 2011

काळ (२ कविता)

काळ
म्हणजे?
पूर्णविराम?
की स्वल्पविराम?
एक अटळ फलश्रुती?
की एक नवी सुरुवात?
सर्व तत्त्वप्रणाली खुंटतात
अस्तित्त्वाचा शोध भरकटतो
भौतिकातील वासना संपल्यावर
फक्त एक शून्यरूप सत्य कळून येतं
की इथून पुढे काहीच माझं नाही
ज्यावर माझं अनंत प्रेम होतं
ज्याची नेहमीच हाव होती
जे अत्यंत नावडतं होतं
जे क्लेशकारक होतं
आता नवा आरंभ
शून्यातून पुढे
कारण मी
शून्य


....रसप....
३० जानेवारी २०१०


ब्रम्हाजींच्या (श्री. घन:श्याम पोटभरे) अनेक अप्रतिम रचनांपैकी एक - "एक" - ह्या रचनेवरून प्रेरणा घेऊन लिहिले.
ही अर्थातच फक्त एक प्रेरणाच आहे, मूळ रचनेच्या जवळपासही जात नाही.
अजरामर
.
एकच सत्य "काळ" - अजरामर आहे
एकेक क्षण आला-गेला त्याचाच हिशोब आहे
सावलीचे पाय थकतील
तेव्हा डोळ्यांत मृगजळ भरेल
हातभरावरचं क्षितीज टीचभरच वाटेल
वाट असेल गूढ काळोखी
पण मनात ’त्या’चा प्रकाश असेल
सुन्न झालेल्या इंद्रियांना एकच चेतना असेल
झाला प्रवास निरर्थक आणि
पुढचा टप्पा आकर्षक दिसेल
तेव्हा पटेल प्रारब्धाला -
एकच सत्य "काळ" - अजरामर आहे
एकेक क्षण आला-गेला त्याचाच हिशोब आहे.


....रसप....
३० जानेवारी २०१०

Friday, January 14, 2011

गा-हाणे

"मराठी कविता" ह्या ऑर्कुट समुहाच्या "प्रसंगावरून कविता" ह्या उपक्रमासाठी केलेली रचना

देवा तुझी नवलाई
कणाकणाच्याही ठायी
तरी साद का रे माझी
तुझ्या कानी जात नाही

कसा बहरला ऋतू,
तुझ्या मायेने फळला
मीही तुझाच रे लेक,
भोग मलाच लाभला

थंड गार ह्या हवेला
आसवांचाच ओलावा
भाळी लिहिला अंधार
कुणी उजेड पाहावा

कुणा सांगावे गा-हाणे
घायकुतीला येऊन
काय भरावी खळगी,
हाल आपले खाऊन

तुझ्या हाती खेळ सारा
तूच मांडला पसारा
देवा आता पामराला
आहे तुझाच निवारा

चारा शेरडापुरता
नको गार माळरान
घासभर पोटाला दे
अन डोक्यावर पान


....रसप....
१३ जानेवारी २०१०

Tuesday, January 11, 2011

कॉलनी....बदललेली (बस स्टॉप वरच्या कविता)

 कॉलनी....बदललेली
.
पूर्वीची कॉलनी बरीच वेगळी होती
सर्वात उंच बिल्डिंग चार मजली होती
एका बाजूस हायवे धो-धो वाहत असे
दुस-या बाजूस झोपड्यांचा बजबजाट असे
कॉलनीतल्या श्रीमंताकडे ओम्नी कार असायची
मध्यमवर्गीय माणसाकडे हिरो होंडा दिसायची
रुपयात तासभर सायकल भाड्याने मिळायची
शाळेची पोरं शाळेत पायी चालत जायची
"अमृत" वाण्याच्या दुकानात रेलचेल असायची
रेशनच्या केरोसीनसाठी लाईनसुद्धा लागायची
"कलामंदिर" नामक एक डब्बा थिएटर होतं
आणि दारू प्यायला एकच "उजाला" बार होतं
.
पण हळूहळू करत खूप बदल झाले
झोपड्यांच्या जागी टावर उभे राहिले
कॉलनीचा ’पुनर्विकास’ टोलेजंग झाला
कळत नाही कसा काय पैसा स्वस्त झाला
होंडा आणि टोयोटाचा सुळसुळाट झाला
सायकल चालवणारासुद्धा कार फिरवू लागला
थिएटरच्या जागी शॉपिंग कॉम्प्लेक्स झाला
वाणी आणि रेशनला ग्राहक नाही राहिला
कॉलनीतली पोरं आता कॉन्व्हेंटमध्ये जातात
त्यांच्यासाठी पिवळ्या बसेस ये-जा करतात
"उजाला"चा उजेड आता गल्लोगल्ली पडलाय
नाक्या-नाक्यावरती एक ए.सी. बार झालाय
.
ह्या सगळ्या धबडग्यात बस स्टॉप तसाच राहिला
पण टोलेजंग विकासाने पिंपळ बुटका झाला....


....रसप....
११ जानेवारी २०१०


बस स्टॉप वरच्या कविता

Thursday, January 06, 2011

बेवडा..!!

"मराठी कविता" ह्या ऑर्कुट समुहाच्या "ओळीवरून कविता" ह्या उपक्रमासाठी केलेली रचना

सांजवेळी सोबतीला लागते ना मज कुणी
मी तुझा होताच मदिरे, बेवडा म्हणती कुणी

आठ ठोके ऐकताच पावले वळतात ही
बाटलीला पाहता कंठात येतो श्वासही
घोट घेतो जाळ करतो जाळण्याला आतडी
मी तुझा होताच मदिरे, बेवडा म्हणती कुणी

शोधतो ना मद्यडोही उत्तरे मी कोणती
ना मनाशी पाळतो मी वेदनाही कोणती
मारण्या संवेदनांना धुंद होतो प्राशुनी
मी तुझा होताच मदिरे, बेवडा म्हणती कुणी

काय सांगावे कुणाला गूढ ह्या घोटांतले
हारला गालीबही सांगून लुत्फ़ा ना कळे
लोक मजला बोल देती, घोट घेती चोरूनी
मी तुझा होताच मदिरे, बेवडा म्हणती कुणी


....रसप....
०६ जानेवारी २०११

Tuesday, January 04, 2011

समाधीस्थ

चार फूट चौथ-यावर
एक नाव कोरलेलं
बाजुलाच पारिजातकाचं
एक रोप वाढलेलं

रोज पहाटे फुलांचा -
सडा तिला सजवत असे
कोरलेलं नाव तेव्हढं
फक्त मोकळं ठेवत असे

येता-जाता थांबून लोक
नमस्कार करत असतात
मनामध्ये शांतीसाठी
प्रार्थना करत असतात

लोकांनी त्या 'बाबा'मध्ये
देवालाच पाहिलं होतं
समाधीस्थ होण्यासाठी
त्याने आयुष्य वेचलं होतं


....रसप....
०४ जानेवारी २०१०
Related Posts Plugin for WordPress, Blogger...