Monday, February 28, 2011

आण घेतो आज रण्या

 

आहे माझ्या मराठीत आईचीच माया
तिच्या सेवेविना माझा जन्म जाई वाया

शब्दसुमनांची केली तिच्यासाठी माळ
कृपा ठेव माझ्यावरी, विनवितो बाळ

किती आली गेली युगे एकामागे एक
गाती तुझी थोरवी ते थोरही अनेक

इतिहास सरला तो काळ हा वेगळा
आता येथे शिकायाला इंग्रजीची शाळा

तरी आई तुझा पोर बदलला नाही
तुझा अभिमान माझ्या नसांतून वाही

आण घेतो आज रण्या कर्तव्याच्या पोटी
तुझे नाव आणीन मी आकाशाच्या ओठी

गतवैभवाला देऊ नवीन झळाळी
कोणी नाही म्हणणार “कोणे एके काळी”


....रसप....
२८ फेब्रुवारी २०११

आहे माझ्या मराठीत

साहित्य जे कालातीत
आहे माझ्या मराठीत

माया-ममता अपरिमित
आहे माझ्या मराठीत

मने जोडण्याची रीत
आहे माझ्या मराठीत

मर्द रांगडा शूर धीट
आहे माझ्या मराठीत

अक्षराची गोडी अवीट
आहे माझ्या मराठीत

इतिहासही वादातीत
आहे माझ्या मराठीत

साधे वाक्य होणे गीत!
आहे माझ्या मराठीत

स्वाभिमानी अपराजित
आहे(त) माझ्या मराठीत


....रसप....
२८ फेब्रुवारी २०११

Saturday, February 26, 2011

अफलातून


सूर ज्याचे काळजाला साद घालिती सदा
शब्द ज्याचा आशयाच्या खोल जाई एकटा
चित्र ज्याचे जीव होई चौकटीला ओळखून
हात धरणे शक्य ना सा-या जगा तो अफलातून


पावलांचे थिरकणे ते पाहणे संमोहिनी
मुग्ध हो ब्रम्हांड सारे ताल ऐसा ऐकुनी
दाद देणारा रसिक जो जाणतो सारे कळून
तेथ मैफल रंग घेई जेथ सारे अफलातून


खंगलेल्या मानवाला आपलेसे मानतो
प्राणीमात्रा-वृक्षवेलींना खरा संभाळतो
दु:ख सारे जिंकतो जो वेदनेला साठवून
देवही माने तयाला देव, तोचि अफलातून


जन्म ज्याने वाहिला त्याला हवा होता जसा
पूर्ण केले सर्व काही घेतला ज्याचा वसा
सर्व स्वप्ने एकदाही पाहिली ज्याने जगुन
तोच सज्जन मानला आहे रण्याने अफलातून


....रसप....

Thursday, February 24, 2011

किती काळ गेला

.

"मराठी कविता" समुहाच्या "प्रसंगावरून गीत" ह्या उपक्रमासाठी लिहिलेली रचना॥

कसा आज माझा ठोका चुकावा
किती काळ गेला तरी का स्मरावा?

तुला ना कळावी वेदना मनाची
तुटे आत काही खुपते तळाशी
नको व्यक्त काही होते कराया
किती काळ गेला….

विनवले मनाला विसरून जा रे
जुने मैत्रबंध नको ते जपू रे
तरी आसवांना वाहिले मी वाया
किती काळ गेला….

पुन्हा आजमावे तोडलेले नाते,
पुन्हा का मनाला तीच ओढ लागे ,
जुन्या मैत्रभावा पुन्हा श्वास द्यावा,
किती काळ गेला….

....रसप....
२४ फेब्रुवारी २०११

Tuesday, February 22, 2011

आता पुरे अबोला... (तो - ती)

"मराठी कविता" समुहाच्या "प्रसंगावरून गीत" ह्या उपक्रमासाठी लिहिलेली रचना॥


(तो)
.

तू काळ जीवना तो का आणला पुन्हा रे
आकाश आठवांनी झाकोळले पुन्हा रे

ह्या दूर दूर देशी संसार थाटला मी
विसरून जाहले जे का आठवे पुन्हा रे

माझ्या मनास नाही सद्सद्विवेकबुद्धी
तू जाणतोस सारे का छेडले पुन्हा रे

लोकांस सांग आता नव्हते खरेच काही
डोळ्यांत हासताहे बघ ती छबी पुन्हा रे


(ती)

तुला माझी गरज होती..
मला माहीत होतं
मलाही तुझी गरज होती
तुला माहीत होतं
तरी का ही ताटातूट..?
मैत्रीचाही त्याग..!
पुन्हा एकदा माझ्याशी तू
पूर्वीसारखा वाग..
. .
पुन्हा एकदा माझ्याशी तू
पूर्वीसारखा वाग..


नाही गुन्हा कुणाचा, झाले अजाणता जे
त्याची सजा दिली तू, आता नको पुन्हा रे

नाते विशुद्ध वाटे मजला हवेहवेसे
आता पुरे अबोला, तोडू नको पुन्हा रे....रसप....
२२ फेब्रुवारी २०११

Sunday, February 20, 2011

त्वेषाने घे धाव..!

सूर्य उगवला पूर्व दिशेला
नवा मांडला डाव
आभाळाला उरात भरुनी
त्वेषाने घे धाव

रात संपली उजेड झाला
झुगार काळोखाला
झाले-गेले विसरून सारे
लाग पुन्हा रस्त्याला
जीर्ण शीर्ण वसनांची मळक्या
वासलात तू लाव
आभाळाला उरात भरुनी
त्वेषाने घे धाव

तुझ्या अंतरी ईश्वर आहे
नसानसातून वाहे
कशास चिंता प्रारब्धाची
मुठीत सारे आहे
दूर सांडल्या क्षितिजावरती
तुझेच आहे नाव
आभाळाला उरात भरुनी
त्वेषाने घे धाव

बाहुत येईल पोलादी बळ
पायी घोघो वादळ
वेग असा घे सोसाट्याचा
कापित जा कातळ
अजिंक्य हो तू अमर्त्य हो तू
स्वप्नांचा घे ठाव
आभाळाला उरात भरुनी
त्वेषाने घे धाव


....रसप....
१९ फेब्रुवारी २०११

Monday, February 14, 2011

भिड बिनधास्त..!!..... reloaded


नवीन वाटा नवे सोबती
पहा जरासा तुला खुणवती
टाकित जा तू पाऊल पुढती, भिड बिनधास्त

कशास चिंता करी उद्याची?
उद्यास आहे पुन्हा 'उद्या'ही
मुजोर झाल्या क्षणाक्षणाही, भिड बिनधास्त

तुझ्याच पायी तुझी भ्रमंती
भल्या पहाटे, अथांग राती
कुणी मांडली ठोके-गणती, भिड बिनधास्त

नको घालवू वेळ विचारी
उभे रहाणे पडेल भारी
चाल चाल तू अपुली न्यारी, भिड बिनधास्त

वादळ येता अंगावरती
झेल त्यास तू छातीवरती
पर्वतांसही रस्त्यावरती, भिड बिनधास्त


....रसप....


भिड बिनधास्त..!!..... - १ 


Sunday, February 13, 2011

"म.क." पुराण (१२ कविता)

ऑर्कुट वरील "मराठी कविता" समुहावर, समुहाबद्दल लिहिलेले काही:

'काव्य'शाला

कवीमित्र आणि
सर्व वाचकांनी
"म.क." समूहाशी
बंध जोडा

इथे भेटतील
किती शब्दवीर
काव्यज्ञानक्षीर
वाही रोज

अशी पर्वणी ही
कुठे अन्य नाही
दिशा लीन दाही
काव्यानंदी

इथे महंतांनी
थोर पंडितांनी
काव्यतुषारांनी
तोषविले

मुक्तछंद आहे
वृत्तबद्ध आहे
ग़ज़ल-गान आहे
सर्व काही

शिकायचे ज्याला
काव्यलेखनाला
अशी 'काव्य'शाला
एकमेव

रण्या म्हणे आता
मराठीस माता
ठेवियला माथा
पायी त्याच


....रसप....
१२ फेब्रुवारी २०११


शब्दराज्य
.
काव्यदेवतेस
दावला प्रसाद
इथे तेवतात
मैत्रदीप

इथे येत जावे
शब्दरूप व्हावे
सुखेची रहावे
खेळीमेळी

अभिप्राय द्यावे
कधी बोध घ्यावे
अहंभाव द्यावे
सोडुनिया

कुणी थोर नाही
कुणी क्षुद्र नाही
इथे लोकशाही
शब्दराज्य

कुणाला कळावे
कुणा ना कळावे
तरी ना रुसावे
रण्या म्हणे

....रसप....
१२ फेब्रुवारी २०११


वाहिला जन्म
.
इथे महाराज
इथे स्वामीजीही
शब्दश: सारे
नांदतात

एक आहे ‘नाम’
तुषारास जाण
शुद्ध सारंगास
ऐक येथे

आकाश अनंत
कुणी ‘कल्पी’लेले
कृपे विनायका
लाभिले गा

फुलावे नीरज
कवनवनात
सत्स्वरूपी राम
प्रकटला

पुनश्च हरीही
शब्दरूप घेई
"म.क." माऊली ही
धन्य थोर

स्वप्नाजा "मराठी
कविता" समूह
जाहला प्रसिद्ध
"ब्रम्ह"रूप

रण्या म्हणे मीही
मार्गस्थ उषेचा
"म.क." ला वाहिला
अवघा जन्म

....रसप....
१२ फेब्रुवारी २०११


प्रवास अनोखा
.
अभंग तुक्याचा
भाव ज्ञानेशाचा
संतसाहित्याचा
इतिहास

शब्द माधवाचे
विष्णु वामनाचे
आणि कितीकांचे
आशीर्वच

लेखणीस बळ
ह्रुदयात जाळ
आतड्यास पीळ
अम्हां ठायी

पाऊल मराठी
दौड घेण्यासाठी
बांधी खूणगाठी
सिद्ध जाले

सवे एकमेकां
घेऊ आणाभाका
प्रवास अनोखा
आरंभिला

रण्या म्हणे आहे
भविष्य उज्जवल
अता साहित्याचे
हमखास

….रसप….
१३ फेब्रुवारी २०११


मयूरपिसारा
.
कुणा वाटे लाख
"म.क." प्राथमिक
पूर्णपणे चूक
समज हा

लिहिती सुरेख
एक ना अनेक
नियमित नेक
कवीजन

अम्हां नसे गंड
नाहीच घमेंड
चालतो अखंड
काव्ययज्ञ

दिसे ज्यां पसारा
मयूरपिसारा
दृष्टिदोष सारा
त्याचा असे

जिथे पीक आले
शिवारही डोले
कुइकुई कोल्हे
येतातच

रण्या म्हणे ऐका
वाजविला डंका
निर्धार खमका
आम्ही केला.......


….रसप….
१३ फेब्रुवारी २०११


मूर्तिमंत साचा
.
कविता निनावी
"म.क.” ला नसावी
कुणीही लिहावी
डिलीट हो

इथे नसे थारा
कुणा चोरा-पोरा
फालतूचा सारा
नसे केर

स्वच्छ समूहाचा
मूर्तिमंत साचा
“म.क.” वरी वाचा
मूळ प्रत

अनावश्य वाद
कुणाचा प्रमाद
जाहिरातबाज
सह्य नाही

रण्या म्हणे येथ
लिहा स्पष्ट-थेट
तरीही भाषेस
गोड ठेवा

....रसप....
१३ फेब्रुवारी २०११


जाणिले म्या
.
मनाचा तरंग
बने तो अभंग
करी मुग्ध दंग
आळविता

अलामत कळावी
रदीफे लिहावी
ग़ज़ल पूर्ण व्हावी
वृत्तबद्ध

कवितेस नाही
जरी बंध काही
चित्र चौकटीही
शोभते ना?

लिही मुक्तछंद
ओळखून अंग
विषया सुसंग
जेथ वाटे

यमकात येणे
नसे काव्य होणे
जरा ‘नाद’ देणे
अत्यावश्य

रण्या नसे ज्ञानी
कुणी थोर-मानी
“म.क.” ला येऊनी
जाणिले म्या


….रसप….
१४ फेब्रुवारी २०११


रण्यामुखी नाम

.
गंध रातराणी
निर्झराचे पाणी
कोकिळाची गाणी
“म.क.” “म.क.”

घास आवडीचा
भास प्रेयसीचा
ध्यास अंतरीचा
“म.क.” “म.क.”

पाय विठ्ठलाचे
दान शारदेचे
बोल सावळ्याचे
“म.क.” “म.क.”

माऊली मराठी
तुझ्या सेवेसाठी
उदधरणासाठी
“म.क.” “म.क.”

दिवस-रात हेच
रण्यामुखी नाम
असे एक धाम
“म.क.” “म.क.”


....रसप....
१४ फेब्रुवारी २०११


सुवर्णेतिहास..
.
कुणी ना इथे भोगण्या ‘अर्थ’ आला
“म.क.” संघ 'नेटी' अवाढव्य झाला
कृपा लाभली शारदेची आम्हाला
इथे चालली थोर साहित्य-शाला

जया गर्व झाला, “मला सर्व येते”
तया दाखवा खास साहित्य येथे
पुरे विश्व आले लिहीण्यास जेथे
नसे कोण ज्ञानी कुणी श्रेष्ठ तेथे

भविष्यास आता लिहीतोय आम्ही
सुवर्णेतिहासा घडवणार आम्ही
नभी फडकवू ह्या तिरंग्यास आम्ही
मराठीस नोबेल देणार आम्ही

रण्याला इथे लाभले मार्गदर्शी
इथे जोडली बंधने भावस्पर्शी
लिहू लागलो मुक्तके ऐसी-तैसी
असा वाहिला जन्म शब्दार्जनासी

....रसप....
१५ फेब्रुवारी २०११


अभिप्रायदान
.
इथे टाकली जी
एक कविताही
वाचलीच जाई
शब्द-शब्द

कुणीही लिहावे
कुणीही पहावे
अभिप्राय यावे
अर्थपूर्ण

नसे कोरडासा
नुसताच वाह वाह
दृष्टांत मिळावा
शोभे जेथ

असा एकटाच
संघ हाच खास
जिथे दावतात
मर्म-दोष

बामणास भीक्षा
पूर्ण हो अपेक्षा
कविता समीक्षा
येथ होई

रण्या म्हणे माना
अभिप्रायदाना
कडू वाटताना
मौल्यवान

....रसप....
१६ फेब्रुवारी २०११


सोहळा
.
ऋतू-रस-रंग
नव-रस-रंग
कवितांचे कुंभ
ओसंडले

थोर महंतांनी
नावाजलेल्यांनी
कविता वाचोनी
तोलीयल्या

जरी ओळ एक
कविता अनेक
लिहिल्या कितीक
शीघ्रतेने

प्रसंगानुरूप
लेखनास ऊत
जणू चित्ररूप
रेखाटले

नसे खेळ सारा
असे सोहळा हा
नवा जन्म झाला
काव्याचा हो

रण्या म्हणे माझी
लागू दे समाधी
मायबोलीसाठी
कामी येवो

....रसप....
१६ फेब्रुवारी २०११


"म.क." पुराण समाप्त
.
माघ शुद्ध पक्षी
चतुर्दशी दिवशी
“म.क.” चे पुराण
पूर्ण होय

स्विकार करावा
लोभही असावा
तसाच रहावा
पोरावरी

शब्द ना पुरेसे
गुंफले मी ऐसे
कविते प्रयासे
यथाशक्ती

कृपा अभिलाषी
तुझ्या चरणाशी
बैसलो अधाशी
माझे माय

कळी फूल व्हावी
विठ्ठला वहावी
प्रतिभा जगावी
तैसी येथे

संथ प्रवाहाला
पुन्हा वेग द्यावा
लेखनास यावा
तैसा अर्थ

अंबरी विहंग
विहरतो अखंड
उंच हा पतंग
तैसा जावा

भेद ना असावा
गर्व ना चढावा
द्वेष ना करावा
कोणाचाही

करितो प्रणाम
स्मृतीस तयांच्या
गुणी थोरल्यांच्या
मनोभावे

रण्याला नको ती
कोणती प्रसिद्धी
माजवे जी बुद्धी
अनाठायी


....रसप....
१७ फेब्रुवारी २०११

Wednesday, February 09, 2011

आतूर

तुझे पाश लेण्यास आतूर आहे
निशेचा नशीला नवा नूर आहे

तृषा संपते ही तुझी ना कधीही
रिते होत जाण्यास मंजूर आहे

जरा धीर घे रे जरा श्वास घे रे
घडी मीलनाची जरा दूर आहे

असे मी तुझी खास नाही कुणाची
जरी गीत माझे, तुझा सूर आहे

नको त्रास देऊ तुझ्या लाडकीला
तुझे प्रेम नयनी जणू पूर आहे

….रसप….
०९ फेब्रुवारी २०११

तुला पाहता

कुणी मुग्ध बेहोश शुद्धीत यावा, तुला पाहता
कुणी झिंगुनी धुंद हरपेल वाचा, तुला पाहता

कुणी मोजतो चंद्रिकांना नभीच्या जरी रात ना
कुणी स्तब्ध होई जसा खुद्द तारा, तुला पाहता

कुणी गान गाई नसे भान त्याला कुठेही असो
कुणी शब्दवेडा लिही फक्त गजला, तुला पाहता

कुणी 'चंद्र' नामी हरवलाच आहे कसा ठाव ना
कुणी तोडतो त्या गुलाबी गुलाबा, तुला पाहता

कुणी प्रार्थनाही करेना अता जाऊनी देऊळी
कुणी फक्त मागे “हवी 'ही'च मजला”, तुला पाहता

कुणी बोल लावी नशीबास का मी नसे लाघवी
कुणी धन्यता मानतो ह्याच जन्मा, तुला पाहता

कुणी बायकोच्या सवे राहुनी माग काढी तुझा
कुणी बायकोला म्हणे "तू हिडिंबा", तुला पाहता

कुणी ह्या रण्याच्या म्हणे शायरीला "अरे बात क्या!"
कुणी गालिबाने भुलावे रदीफ़ा, तुला पाहता


....रसप....
०८ फेब्रुवारी २०११

Monday, February 07, 2011

यौवनाचे मूर्त लेणे

पाहतो जेव्हा तिला मी काय होते ना कळे
स्पंदनांचा ताल घेई वेग वेडा अन पळे

चाल चाले ती मृगाची नाजुका मनमोहिनी
बांधणीही बांधणीची मन मनाशी घुटमळे

ही शलाका भूवरी आली कशी जाई कुठे
आशिकाने पास जाता राख होईतो जळे

बोल ईष्का कोणती देऊ तुला मी आहुती
दे मला तो रक्तिमा जो लाल ओठी ओघळे

यौवनाचे मूर्त लेणे ईश्वराने कोरले
धन्य झाला खुद्द तोही सृजन झाले आगळे


....रसप....
०७ फेब्रुवारी २०११

माझी भरभराट..... तिचा जळफळाट..!!

हातावरच्या रेषा कुणी
कधी आखून देत नाही
माझी भरभराट झाली
ह्यात तुझा दोष नाही

आजकाल म्हणे सगळ्यांशी
फारच विचित्र वागतेस
पाल्हाळ लावून बोलतेस
किंवा शब्दच निघत नाही

किरकोळ कारणांवरून तुझं
वाद उकरून काढणं
एकदा तरी भांडल्यशिवाय
दिवस सरत नाही

मला तोंडघशी पाडलंस
तेव्हा खुशीत होतीस तू
माझं वागणं बिथरताना
काहीच वाटलं नाही?

तारवटलेल्या डोळ्यांची ती
शून्यामधली नजर
तुझं जाळणं, माझं जळणं..
आता आठवत नाही?

दु:खाशी पण दोस्ती होते
जखमा येतात भरून
तुझे घाव पचवले ह्यात
शॉकींग काहीच नाही!

"बदलत जातो तो काळ"
असं ऐकलं होतं कधी
तुझ्याजागी दुसरी आली,
ह्यात गैर काहीच नाही..

....माझी भरभराट झाली
ह्यात तुझा दोष नाही........रसप....
०३ फेब्रुवारी २०११

Tuesday, February 01, 2011

तुझा दोष नाही (पहिलं प्रेम....चौथीमधलं - २)


ती असायची शाळेत म्हणून
मला शाळेची आवड होती
विज्ञान-गणित-इंग्रजीची पुस्तकं
मी फक्त पाहिली होती

मनातल्या मनात तिला मी
हजारदा ’लव्ह यू’ म्हटलं
लिहू नाही शकलो कधी
स्पेलिंग नाही जमलं

अनेक वर्षांनंतर आज
पुन्हा तिला स्मरतोय
वारंवार तिचं नाव
ऑर्कुटवरती शोधतोय

मला माहित आहे ती
मला ओळखणार नाही
एव्हढंच फक्त म्हणीन हसून
"तुझा दोष नाही

तुला सगळं सांगण्यासारखं
ते वयसुद्धा नव्हतं
मनातल्या मनात बोललेलं
कधी ऐकू थोडीच येतं?"


....रसप...
१ फेब्रुवारी २०११


पहिलं प्रेम - चौथीमधलं - १ 

पहिलं प्रेम - चौथीमधलं - ३

 

 


Related Posts Plugin for WordPress, Blogger...