Wednesday, February 09, 2011

तुला पाहता

कुणी मुग्ध बेहोश शुद्धीत यावा, तुला पाहता
कुणी झिंगुनी धुंद हरपेल वाचा, तुला पाहता

कुणी मोजतो चंद्रिकांना नभीच्या जरी रात ना
कुणी स्तब्ध होई जसा खुद्द तारा, तुला पाहता

कुणी गान गाई नसे भान त्याला कुठेही असो
कुणी शब्दवेडा लिही फक्त गजला, तुला पाहता

कुणी 'चंद्र' नामी हरवलाच आहे कसा ठाव ना
कुणी तोडतो त्या गुलाबी गुलाबा, तुला पाहता

कुणी प्रार्थनाही करेना अता जाऊनी देऊळी
कुणी फक्त मागे “हवी 'ही'च मजला”, तुला पाहता

कुणी बोल लावी नशीबास का मी नसे लाघवी
कुणी धन्यता मानतो ह्याच जन्मा, तुला पाहता

कुणी बायकोच्या सवे राहुनी माग काढी तुझा
कुणी बायकोला म्हणे "तू हिडिंबा", तुला पाहता

कुणी ह्या रण्याच्या म्हणे शायरीला "अरे बात क्या!"
कुणी गालिबाने भुलावे रदीफ़ा, तुला पाहता


....रसप....
०८ फेब्रुवारी २०११

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...