Saturday, March 19, 2011

मैफल - त्या रात्री.. (२ कविता)

त्या रात्री..
जिथे बसलो होतो आपण सगळे
आणि उधळली होती
कवितांची फुले
बहुरंगी, सुगंधी, मोहक, सुखद
ती खोली अजून तशीच आहे..
मी आवरली नाही.

फुलांचे गुच्छ बनलेत... आपोआप
आणि सजलेत..कोप-या-कोप-यात
खिडकीत आणि मेजावर
जमिनीवरचा सडा अजून टवटवीत आहे
आणि..
एक धुंद परिमळ दरवळतोय
सा-या घरात....

कारण ती खोली अजून आवरलीच नाहीये..
तुम्ही पुन्हा पसराल..
उधळण कराल म्हणून..............रसप....
१९ मार्च २०११


भाग - २

आज त्या खोलीतून एक सळसळ ऐकू आली
काही तरी लपून बसलंय.. अशी चाहूल लागली
उश्या, लोड, जाजम.. सारं काही उचललं
खुर्चीखाली, मेजाखाली.. पुन्हा पुन्हा धुंडाळलं
माळ्यावर चाचपलं… कोप-या कोप-यात पाहिलं
पण काहीच नाही सापडलं..

मग मनात विचार आला
"बहुतेक मला भास झाला..!"
आपणच हसलो आणि पुन्हा..
सगळं आधीसारखं ठेवलं.. पसरलं

बाहेर आलो.. पुन्हा सळसळ.. तीच चाहुल!!
मग सरळ कवितांची वहीच उचलली..
त्यात मला एक पाकळी सापडली
मिश्किल हसली आणि म्हणाली..
"सगळ्या कविता वाचल्यास..
मलाच का झाकली?"

म्हटलं..

"सगळ्याच कविता सगळ्यांच्या नसतात
काही फक्त आपल्या आणि आपल्याच असतात..
कुणालाच दाखवायच्या नसतात..
अश्याच झाकून ठेवायच्या असतात.."

ती पुन्हा सळसळली, मिश्किल हसली

मी पुन्हा ती वही जाजमावर ठेवली
पुढचं पान उलटवून..


....रसप....
२१ मार्च २०११

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...