Wednesday, May 11, 2011

ती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता.. - रसग्रहण

ती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता
मेघात अडकली किरणे हा सुर्य सोडवित होता

तशी सांज आमुच्या दारी येउन थबकली होती
शब्दात अर्थ उगवावा,अर्थातून शब्द वगळता

ती आई होती म्हणुनी घन व्याकुळ मी ही रडलो
त्या वेळी वारा सावध पाचोळा उडवित होता

अंगणात गमले मजला संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता

हे रक्त वाढताना ही मज आता गहिवर नाही
वस्त्रात द्रौपदिच्याही तो क्रृष्ण नागडा होता

ग्रेस

"ती गेली" म्हणजे नक्की कोण? पुढे येणा-या ओळीत "ती" म्हणजे "आई" हे स्पष्ट होतंय आणि त्याला पुष्टी देणारं कडवं त्याच्या मागोमाग आहे.

आता तपशीलवार बघुया...
.
ती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता
मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता

.
"ती गेली तो दिवस इतका दु:खाचा होता की आभाळही, खुद्द निसर्ग (देवही) रिमझिम रिमझिम बरसून अश्रू ढाळत होते.." असा सरळसोट अर्थ असेल, असं मला वाटत नाही. कारण पुढे एका ओळीत कवी आपल्या नास्तिकतेबद्दलही काही बोलतो.. तसेच पाऊस जर रिमझिम असेल तर "निनादेल" कसा?

नळातून एकेक थेंब पडणारं पाणी जर जमिनीवर पडत असेल तर फार आवाज होत नाही.. पण तेच पाणी कळशीत पडत असेल तर टप्प-टप्प आवाज सुस्पष्ट ऐकू येतो.. तसाच हा पाऊस आत मनात रिमझिम बरसतोय आणि म्हणूनच घुमतोय.. निनादतोय.. कवी आतल्या आत रडतोय, त्याचे अश्रू कुणाला दिसत नाहीत. तिच्या जाण्याने सर्व काही अंध:कारमय झालंय.. मळभ दाटून आलंय जणू.. त्यातून आपल्या भविष्याचा ठाव घेण्याचा कवी प्रयत्न करतोय.
.
तशी सांज आमुच्या दारी येउन थबकली होती
शब्दात अर्थ उगवावा,अर्थातून शब्द वगळता

.
हे असं होणार आहे, हे ठाऊक होतंच.. काळ कधीचाच दाराशी येऊन ठेपला होता.. पण त्याने आज घाला घातल्यावर मनाची अवस्था अशी झालीय की मी काय बोलतोय ते कळत नाहीये आणि जे कळतंय ते बोलताच येत नाहीये..! काही तरी महाभयंकर शोकांतिका आहे ही.. तिचं जाणं नुसतंच जाणं नाहीये.. त्याचं कारण विदारक असणार..

.
ती आई होती म्हणुनी घन व्याकुळ मी ही रडलो
त्या वेळी वारा सावध पाचोळा उडवित होता

.
इतका वेळ मी दाबून ठेवलेला आकांत अखेरीस बाहेर आलाच. जसं एखादा ढग आपल्या उरात पाणी साठवून ठेवतो आणि असह्य झाल्यावर धो-धो बरसतो, त्याच व्याकुळतेने अखेरीस माझे अश्रूही वाहिले... पण त्यावेळी दुनिया निर्विकारपणे आपल्यातच गर्क होती.. ह्या ढगाला, ह्या पावसाला पुढे नेणारा वारा.. पाचोळा उडवत होता..!
.
अंगणात गमले मजला संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता

.
लहान वयात "दुनिया कळली". अवेळी प्रौढत्व आले.. जबाबदा-या आल्या.. "खिडकीवर एकटा धुरकट कंदील" हे त्या घरावर आलेल्या बिकट परिस्थितीचं द्योतक असावं.
.
हे रक्त वाढताना ही मज आता गहिवर नाही
वस्त्रात द्रौपदीच्याही तो कृष्ण नागडा होता

.
ह्या ओळी काळीज पिळवटून काढतात. कवी कोवळ्या वयात सोसलेल्या आघातांनी आता निर्ढावला आहे, कोरडा झालाय..! द्रौपदीची अब्रू ज्या कृष्णाने वस्त्र देऊन वाचवली होती.. तो कृष्ण स्वत:च नागडा आहे.. लाचार आहे. इथे शोकांतिका जराशी कळते. आईवर झालेला अत्याचार/ अन्याय, त्या मुलाने पाहिलाय आणि म्हणूनच अशी निष्ठूर दुनिया बनविणा-या त्या विधात्यावर आता त्याचा विश्वासच नाही.. त्याच्या मते तो देव स्वत:च इतका लाचार आहे की आज त्यालाच द्रौपदीची गरज आहे..!!
ह्या कवितेत एक प्रवास आहे..
सुरुवातीस एक आघात.. पण आपल्या आकांतास दाबून ठेवणे... मग घुसमटणे... नंतर टाहो फोडणे... मग जबाबदारीची जाणीव होणे... आणि मग रूक्ष बनणे.... नास्तिक बनणे..

कवीने निरागसतेकडून नास्तिक होईपर्यंतचा प्रवास ह्या रचनेत रेखला आहे.

कुणास ठाऊक, मला जे ह्या कवितेतून कळले तो अन्वयार्थ बरोबर आहे की नाही... पण एक प्रयत्न केलाय.
चू. भू. द्या. घ्या.

धन्यवाद..!

8 comments:

 1. ग्रेस यांची हि कविता हवी होती मिळाली एकदाची...........
  आपले मनापासून आभार.......!!
  मस्त आहे तुमचा ब्लोग .......
  धन्यवाद.........

  http://parth-sarathi.blogspot.in/

  ReplyDelete
 2. Dear Sir
  Mr grace himself has explained the whole meaning of this poem in a great DVD and the meaning is absolutely different my friend absolutely different that what you are thinking about please visit here and listen to all DVD listen it total then you will understand.
  in short it is not about child who is in sorrow over his mother,s death
  it is in very short i am saying ( in detail grace has said himself in DVD) his mother goes to her lover by leaving her kids and so on.....it goes like this..... DVD is here http://www.youtube.com/watch?v=-t96SKJB2gQ

  ReplyDelete
  Replies
  1. Thanks for sharing , there is lot of CONFUSION AS ALWAYS , on top of it people tend to dislike and accept logical conclusions

   Delete
  2. Dear Mr Deepak,
   i am writing for Radio on various marathi songs. i had already written on Grace's "tula pahile mi nadichya kinari" and is covered by Radio station.
   i am now writing on this song. i was knowing this meaning (that you say) from one of marathi book on him. i tried to find the dvd on the given link. but its unavailable. would you please share, if you have ?

   Minish Umrani | 9822390363
   minishumrani@gmail.com

   Delete
 3. रणजित, खूप धन्यवाद। कवि ग्रेस एक गूढ आहे. ते खूप सोपे केलेत. त्यांच्या रचने इतकेच तुमचं रसग्रहण परिणामकारक आहे.
  संध्या साठे
  कुर्ला मुंबई

  ReplyDelete
 4. At Deepak Saraswat,
  I couldn't get to listen to the DVD. I read your comment later. I m now more curious to know the meaning from poet's point of view.
  Sandhya Sathe

  ReplyDelete
 5. Abhijeet Joshi20 July 2019 at 13:34

  Dear Ranjit - My Marath is not very good, hence writing this comment in English. Apologies for the same. This song is very close to my heart as I remember my mother singing it when I was a child. I was always intrigued as to the message/thoughts behind it. Looking at the comments, it seems that the poet had a different meaning, but I feel art is as interpreted by the receiver and I found your analysis of the poem and its meaning to be absolutely wonderful. I have just switched on the song on Spotify and will listen to it as deciphered by you. Thanks a lot!!

  ReplyDelete
 6. माझा नाव हितेश संघवी.

  माझा एक मित्रा नी ही कविता आमचं ग्रुप मध्ये पाठवली होती.

  कोणी ग्रेस यांनी म्हटलेली डीवीडी ची लिंक पाठवाल का? इथे दिलेली लिंक ओपन होत नाही.

  ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...