Saturday, June 18, 2011

इथेच नावारुपास आलो..


इथेच नावारुपास आलो तुम्हासमोरी हळूहळू
तुम्हीच द्यावे धडे, बनावी मला शिदोरी हळूहळू

उरी जपावे कृतज्ञतेला मिळे कुणाला जसे-तसे
नभात चंद्रामुळेच हासे जशी चकोरी हळूहळू

पहाट होते निशा सरूनी दिसे कवडसा तमातुनी
सुखापुढेही उदासतेची सरे मुजोरी हळूहळू

मनास लाभे कधी न येथे क्षणापुरेशी निवांतता
स्वत: स्वत:ला अशीच गावी मनात लोरी हळूहळू

कशास सांगे उगाच मोठेपणा तुझा तूच फोफसा
पुन्हा न व्हावी कुठेच बोलायचीच चोरी हळूहळू

किती लिहावे किती रचावे तरी न तृप्ती मिळे 'जितू'
तुझ्या लिखाणात काच व्हावी जणू बिलोरी हळूहळू


....रसप....
१८ जून २०११

"मराठी कविता समूहा"च्या "अशी जगावी गझल (भाग - ५)" ह्या उपक्रमासाठी गझल लिहिण्याचा माझा प्रयत्न.

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...