Sunday, July 31, 2011

Wake up Sid ! (स्वैर अनुवाद)

मूळ गाण्याच्या चालीत लिहायचा प्रयत्न केला आहे -

ऐक जरा
सांगतो मी तुला
वाजले किती
कळतंय का तुला?
रात्र गेली झोपी जागा दिवस जाहला
उघडुनी डोळ्यांना हसती दिशा दहा
खेळ चाले जणू नादांचा तू पहा

Wake up Sid !
क्षणही बोलती
Wake up sid !
करू भटकंती
Wake up sid!
दशदिशा या तुला मारतात हाका
अरे ऐक पुन्हा तू जरा !
Wake up!

प्रत्येकाचे
बोलणे ऐक तू
कर अपुल्या
फक्त मनाचे तू
जीवनाच्या निर्णयांना तूच घे सर्वथा
शोधूनी घे स्वत:च्या तूच तू रे पथा
तूच प्रवासात असशी तुझ्या सोबतीला

Wake up Sid !
क्षणही बोलती
Wake up sid !
करू भटकंती
Wake up sid!
दशदिशा या तुला मारतात हाका
अरे ऐक पुन्हा तू जरा !
Wake up!

आज ही न हो काल झाले तसे
आज ही तुला झोप लागेल रे
सुस्तीला टाकुनी बोल तू, ऐक तू; कर काही तरी
जीवनी दु:खाचा, सुखाचा काही तरी तू रंग भरी

Wake up Sid !
क्षणही बोलती
Wake up sid !
करू भटकंती
Wake up sid!
दशदिशा या तुला मारतात हाका
अरे ऐक पुन्हा तू जरा !
Wake up!


मूळ गीत - "Wake up Sid"
मूळ गीतकार - जावेद अख्तर
संगीत - शंकर-एहसान-लॉय
चित्रपट - Wake up Sid

स्वैर अनुवाद - ....रसप....
३१ जुलै २०११
मूळ गीत -
सुनो तो ज़रा
हमको है यह कहना
वक़्त है क्या तुमको पता है  ना
सो गयी रात जाके दिन है अब जाग उठा
आँखें मसलता है सारा यह समां
आवाजें भी लेती है अंगडाइयाँ   

Wake up Sid !
सारे  पल कहें
Wake up sid !
चल कहीं चलें
Wake up sid!
सब दिशाओं से आ रही है सदा
सुन सको अगर सुनो
Wake up!

यह जो कहें
वोह जो कहें सुन लो
बात जो सही
दिल को लगे चुन लो
करना है क्या तुम्हे
यह तुम्ही करो फैसला
यह सोच लो तुम को जाना है कहाँ
तुम ही मुसाफिर
तुम ही तो हो कारवाँ


Wake up Sid !
सारे  पल कहें
Wake up sid !
चल कहीं चलें
Wake up sid!
सब दिशाओं से आ रही है सदा
सुन सको अगर सुनो
Wake up!


आज भी देखो कल जैसा ही ना हो
आज भी यूँ ना तुम सोते ही रहो
इतने क्यूँ सुस्त हो कुछ कहो कुछ सुनो
कुछ ना कुछ करो
रो पडों या हसो ज़िन्दगी में कोई ना कोई रंग भरो


Wake up Sid !
सारे  पल कहें
Wake up sid !
चल कहीं चलें
Wake up sid!
सब दिशाओं से आ रही है सदा
सुन सको अगर सुनो
Wake up!
- जावेद अख्तर

Saturday, July 30, 2011

दिन जल्दी-जल्दी ढलता है - भावानुवाद

काळ अचानक येत असे
इप्सित मानस दूर नसे
हाच विचार करून कुणी, श्रांत जिवात उमेद भरे
लौकर लौकर दिवस सरे  

वाट किती बघतात पिले
अन घरट्यातून नजर फिरे 
जाणुन हे चिमणी असते, जोर परांत पुनश्च चढे     
लौकर लौकर दिवस सरे  

कोण मला बघण्यास झुरे?
कोण मनी मम वास करे
प्रश्न मला छळतो, पिडतो; त्राण पदातुन क्षीण उरे 
लौकर लौकर दिवस सरे

(गालल गालल गालल गा)
मूळ कविता - दिन जल्दी-जल्दी ढलता है!
मूळ कवी - हरिवंशराय बच्चन
भावानुवाद - ....रसप....
२८ जुलै २०११   
मूळ कविता -
हो जाय न पथ में रात कहीं,
मंज़िल भी तो है दूर नहीं -
यह सोच थका दिन का पंथी भी जल्दी-जल्दी चलता है!
दिन जल्दी-जल्दी ढलता है!

बच्चे प्रत्याशा में होंगे,
नीड़ों से झाँक रहे होंगे -
यह ध्यान परों में चिड़ियों के भरता कितनी चंचलता है!
दिन जल्दी-जल्दी ढलता है!


मुझसे मिलने को कौन विकल?
मैं होऊँ किसके हित चंचल? -
यह प्रश्न शिथिल करता पद को, भरता उर में विह्वलता है!
दिन जल्दी-जल्दी ढलता है!


- हरिवंशराय बच्चन

दूस्रा (वात्रटिका)


दूस्रा - दूस्रा नुसताच बोलतो..
"पहिला" सुद्धा नाही धड
भज्जी आता कृपा कर
क्रिकेट सोडून 'भज्जी'च तळकाल परवा आलेला "स्वान"
डोईजड होताना दिसतो
४०० बळींचा मालक मात्र
निव्वळ लाचार भासतो.......रसप....
२७ जुलै २०११ 

Thursday, July 28, 2011

सत्यवान सत्यशील सत्यरूप हो

"अनुप्रास" साधून काही लिहिण्याचा प्रयत्न केलाय...


वार सर्व झेलण्यास तू समर्थ हो
सत्यवान सत्यशील सत्यरूप हो


ना कधी मिळेल शांतता जनांस ह्या
श्रांत ना, निशांत हो निवांत शांत हो


दैव दुष्ट मानणे खरेच व्यर्थ रे
शौर्यवान धैर्यवान मूल्यनिष्ठ हो


अंग-संग, रंग-ढंग भंगले पुरे
पूर्त तूच धूर्त तूच मूर्तिमंत हो


स्वप्न पाहिलेस पाहिलेस खास तू
वेड घेत वेध घेत वेगवान हो


....रसप....
२७ जुलै २०११

Wednesday, July 27, 2011

रुसवा.... २६ जुलै २००५ चा..

काल.. एका महाप्रलयास ६ वर्षे पूर्ण झाली. ह्याच दिवशी, २६ जुलै २००५ ला मुंबईला अपरिमित पावसाने अक्षरश: झोडपून काढलं होतं.
एक काल्पनिक काव्यकथी.. एका "त्या"ची आणि "ती"ची.
आवडली तर अवश्य सांगा, न आवडल्यास कारणही सांगा..!
तिचा लटका राग
आणि त्याचं समजावणं
मिनतवाऱ्या करणं
मुसळधार पावसातही चालूच होतं
बँडस्टॅण्डचा समुद्र भलताच खवळलेला होता
त्या दिवशी पाऊसही जणू पिसाळलेला होता
पण लटक्या रागाला अन मिनतवाऱ्यांना
कसलीच शुद्ध नव्हती..
नखशिखांत भिजल्याचीही

रिजेन्ट हॉटेलकडून एक रिक्शा आली
लगबगीने ती तिच्यात बसती झाली..
त्याच्या हाकांना दुर्लक्षून..
"अंधेरी.. जल्दी.."

हे नेहमीचंच होतं..
त्याचं उशीरा येणं
आणि तिचं रुसणं..
रुसून रिक्षा पकडणं..
आणि त्याने पाठलाग करून रिक्षा थांबवणं..!!

रिक्षा सुरू झाली..
त्यानेही बाईककडे धाव घेतली..
आणि सुरू झाला पाठलाग..
अरे..!
पण इतकं पाणी कधीच भरलं नव्हतं..
रिक्षा पुढे निघून गेली..
गुडघाभर पाण्यात बाईक बंद पडली..
एव्हढ्या पाण्यातून बाईक ढकलत जायचं..?
छे: शक्यच नाही..
शेवटी रस्त्याच्या कडेला बाईक सोडून..
तोही रिक्षा शोधू लागला..

अंधेरी आलं..
पण तो नाही आला..
"कुणास ठाऊक का? चिडला की काय?
हुं:! चिडला तर चिडू दे..
नेहमीच कसा उशीरा येतो?
मीही नाही फोन करणार!"

रुसव्या-फुगव्यातच दिवस सरला..
सकाळ झाली तरी फोन नाही आला
"शहाणाच आहे.. बघतेच आता..
पण फोन का लागत नाहीये..?

आता मात्र हद्द झाली
दुपार होत आली!
घरीच फोन करते.."
२ ६ १ _ _ _ _ ६
"हॅलो, _ _ _ आहे का?"

एक शांतता.. आवाज बदलला..
"तो कालपासून घरीच नाही आला"

एक तो २६ जुलै.. आणि एक आजचा
रुसवा अजून गेला नाही
तो अजून आला नाही........रसप....
२६ जुलै २०११
२६ जुलै २००५ वर लिहिलेली अजून एक कविता - पावसाळी नॉस्टॅलजिया

Tuesday, July 26, 2011

हताशा


तसे फार नाही, तरी फार होते; तुझ्या आठवांचे मला भार रे
पहाटेच होते इथे रात्र माझी; तुझी प्रीत डोळ्यांस अंधार रे


ढगाला कळेना कधी पाझरावे पुन्हा धार जख्मांतुनी वाहते
जिथे कोरले मी तुझे नाव प्रेमा, तिथे राहिले फक्त अंगार रे


मला दु:ख वाटे खरा मित्र माझा; मला सर्व शत्रूच बेजार का?
उभी मी किनारी कृपासागराच्या; परी रूप त्याचेच लाचार रे


सुटे तीर माझाच माझ्या दिशेने, कशी ही फितूरी, कसा घात हा?
कुणा दोष द्यावा, कुणा हाक द्यावी; असा जीव घेणार हा वार रे


उद्याला जरी सूर्य आलाच नाही; तुला पाहुनी वाट रंगेल ही
उरी स्वप्न घेऊन हासेल प्राची, तरी कुंद माझाच संसार रे....रसप....
२६ जुलै २०११

Monday, July 25, 2011

बस स्टॉप "सुटल्यापासून"..


चिंब भिजलेला बस स्टॉप   
वेगळाच दिसत होता  
काळवंडलेला पिंपळसुद्धा 
वेगळाच दिसत होता  

तोच पांचट चहा आज 
हवाहवासा वाटला
कॉँक्रिटचा ओला वास 
हवाहवासा वाटला

बस स्टॉप वर कुणीच नव्हतं,
मी तेव्हढा सोडून
काहीच कोरडं राहिलं नव्हतं,
मी तेव्हढा सोडून

ओल्या पावसासोबत आल्या 
जुन्या आठवांच्या सरी
वाऱ्यासोबत बोचू  लागल्या 
जुन्या आठवांच्या सरी

काळाबरोबर माणसं तुटतात 
पण - Life Goes on…
ओलं-सुकं नशीब असतं 
पण - Life Goes on…


उगाच काही विचारांनी मनात गर्दी केली
चहा-सिगारेट झाल्यावर मी माझी वाट धरली
फारच विचित्र वाटतंय मला,
बस स्टॉप "सुटल्यापासून"
हरवून बसलोय स्वत:लाच 
बस स्टॉप "सुटल्यापासून"


….रसप….
२३ जुलै ११
बस स्टॉप वरच्या कविता

Tuesday, July 19, 2011

जुनाट घर, पाऊस आणि आई (पावसाळी नॉस्टॅलजिया - १४)


पोपडे निघालेल्या भिंती
पिवळट पांढऱ्या बुरशीची नक्षी सजवायच्या
दर पावसाळ्यात गळक्या छताला
प्लास्टिकच्या झोळ्या लटकवायच्या

पावसाळ्यात पाणी मुबलक असायचं
नळाला दोनच तास यायचं
छतातून चोवीस तास गळायचं

दाराबाहेर नेहमीच घोटाभर पाणी साचायचं
छोट्या-मोठ्या दगडांवरून उड्या मारत जायचं!

सदैव एक कुबट वास..
भिजलेल्या कपड्यासारखा..
नाकात, छातीत भरायचा
आणि तुझ्या दम्याला
खरवडून काढायचा..

बाबांचा डबा.. आमच्या शाळा
आजीच्या शिव्या अन्.. छतातून धारा!
तुझी परवड कधीच जाणवली नाही
अन् तुझी सहनशीलता कधीच खुंटली नाही

आता दिवस बदललेत -
आज ते भाड्याचं घर नाही
छतातून धार नाही
भिंतीला बुरशी नाही
कामाचा भार नाही
पण खोलवर मनात एक बोच आहे तुझ्या खस्तांची
अंधाऱ्या आयुष्याला उजळायला घेतलेल्या कष्टांची

खरं सांगतो आई,
जेव्हा आभाळ भरून येतं
माझ्या डोळ्यांसमोर ते
आपलं जुनाट घर येतं........रसप....
१९ जुलै २०११
पावसाळी नॉस्टॅलजिया - १ ते १४

Monday, July 18, 2011

सांग ना गं आई.. (पावसाळी नॉस्टॅलजिया- १३)


सांग ना गं आई कसं
आभाळ भरून येतं?
काळ्या काळ्या ढगांमध्ये
कुठून पाणी भरतं?

मोठे मोठे ढग सारे
रोज कुठे लपतात?
उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये
कुठल्या गावी जातात?

पाऊस जेव्हा पडतो
तेव्हाच बेडूक येतो
मला समजत नाही
नेहमी कुठे असतो?

जोरात वीज पडते
आवाज होतो केव्हढा
ढगांच्याही पोटामध्ये
येतच असेल गोळा!

जिथे तिथे पाणी पाणी
शाळेत का गं नव्हतं?
सांग ना गं आई कसं
आभाळ भरून येतं ?


....रसप....
१८ जुलै २०११

पावसाळी नॉस्टॅलजिया (१ ते १३) 

मी कुणीही 'खास' नाही..

सामान्य, मध्यमवर्गीय माणसाची व्यथा मांडायचा प्रयत्न केला आहे.


बंध नाही, वेध नाही
खंत नाही, खेद नाही

राग नाही, चीड नाही
लाज नाही, भीड नाही

वेड नाही, खोड नाही
तेढ नाही, जोड नाही

चूक नाही, दोष नाही
डूख नाही, रोष नाही

शब्द नाही, नाद नाही
युद्ध नाही, वाद नाही

मी कुणीही 'खास' नाही
साहतो मी, त्रास नाही

 ....रसप....
१७ जुलै २०११

Sunday, July 17, 2011

धुंद हो तू, चिंब हो तू, मुक्त हो तू..

थेंब काही सांडण्याला आज यावे पावसाने
मोकळ्या केसांत तुझिया ओघळावे पावसाने


मी जळावे थेंब ओठांशी जरा रेंगाळताना
आग ओली पेटवूनी कोसळावे पावसाने


शांतश्या त्या सागराला खळखळूनी हासवीतो
गुदगुल्यांना थेंब-थेंबानी करावे पावसाने


जाणिले नाही कुणीही अंबराच्या वेदनेला
आसवांना आज त्याच्या पाझरावे पावसाने


वाट वेडीवाकडी ओलावली आहे तिची का?
ती नसे येथे तरीही गुंग व्हावे पावसाने...


शिरशिरी अन् स्पर्श ओला, वाटते की ती असावी
कल्पनेला वास्तवाचे रूप द्यावे पावसाने..!


ना कहाणी मी जुनी ती मांडली माझी कधीही
बोल माझ्याही मनाचे ऐकवावे पावसाने


धुंद हो तू, चिंब हो तू, मुक्त हो तू, आज 'जीतू'
रक्त घावांचे बनूनी साखळावे पावसाने..!....रसप....
१७ जुलै २०११

Saturday, July 16, 2011

अश्या कवीची कीव करावी..!

कविता म्हणुनी निबंध लिहितो
भाषेचाही खून पाडतो
अश्या कवीची कीव करावी

चुकांस अपुल्या मानत नाही
शिकण्याचीही आवड नाही
अश्या कवीची कीव करावी

अर्थबोध ना काही लागे
तत्त्वशोध ना कधीच जो घे
अश्या कवीची कीव करावी

टिमटिमत्या प्रतिभेचा अपुल्या
अहंकार अन माज जयाला
अश्या कवीची कीव करावी

उस्फूर्ततेचा भास करतो
दुबळी बाजू त्यात लपवितो
अश्या कवीची कीव करावी

निंदकास जो सदा हिणवितो
स्वत:स केवळ थोर मानतो
अश्या कवीची कीव करावी


....रसप....
१४ जुलै २०११
(प्रत्येक ओळीत १६ मात्रा)

Friday, July 15, 2011

फनकार (साहिर लुधियानवी) - भावानुवाद

 
शब्द माझे गुंफले जे आपल्या प्रेमासभोती
आज सौदा मांडला त्यांचाच मी बाजारहाटी  


श्वास प्रेमाचे दिले तू शब्द तेही तोडतो मी
खास बोली आज त्यांची ह्या दुकानी लावतो मी
शब्द सारे, शायरी अन भावनांचे मोल केले
मोजण्या अन तोलण्याला तागडी घेतोय हाती
..............................आज सौदा मांडला त्यांचाच मी बाजारहाटी  


तूच तू सामावली होतीस ती सारीच गीते 
ही भणंगी ऐवजाचे रूप थोटे त्यांस देते 
प्राशले ज्यांनी तुझ्या त्या चेहऱ्याच्या अमृताला 
त्याच शब्दांना विके मी पोसण्याला जीवनासी
..............................आज सौदा मांडला त्यांचाच मी बाजारहाटी  


भरडुनी मी जात असता हाल माझे पाहण्याला
थांबली नाहीच प्रतिभा आज माझ्या सोबतीला  
ते तुझे नखरे कुणा शेठासमोरी शोभताना    
त्या तुझ्या हसऱ्या छबीला बाळगावे का उराशी ?

आज सौदा मांडला त्यांचाच मी बाजारहाटी  
शब्द माझे गुंफले जे आपल्या प्रेमासभोती


मूळ रचना - फनकार
मूळ कवी -  साहिर लुधियानवी
भावानुवाद - ....रसप....
१३ जुलै २०११मूळ रचना -

मैंने जो गीत तेरे प्यार की खातीर लिखे
आज उन गीतों को बाज़ार में ले आया हूँ...


आज दुकान पे नीलाम उठेगा उनका,
तूने जिन गीतों पर रख्खी थी मोहब्बत की असास...
आज चांदी की तराज़ू में तुलेगी हर चीज़,
मेरे अफ़कार, मेरी शायरी, मेरा एहसास...


जो तेरी ज़ात से मनसूब थे, उन गीतों को
मुफ़्लिसी, जिन्स बनाने पर उतर आई है...
भूक, तेरे रूख-ए-रंगीं के फ़सानों के इवज़
चंद आशीया-ए-ज़रूरत की तमन्नाई है...


देख इस अरसागह-ए-मेहनत-ओ-सरमाया में
मेरे नग़्में भी मेरे साथ नहीं रह सकते...
तेरे जल्वे किसी ज़रदार की मीरास सही,
तेरे खाके भी मेरे पास नहीं रह सकते...


आज उन गीतों को बाज़ार में ले आया हूँ
मैंने जो गीत तेरे प्यार की खातीर लिखे...-  साहिर लुधियानवी 

Thursday, July 14, 2011

पाचोळ्याची भटकंती

.
असाच जगलोय मी
वाळलेल्या पानासारखा
वाऱ्यासोबत दिशा पकडत.. धडपडत

सुखात हुरळलो
दु:खात वितळलो
उगाच भटकलो
उगाच रेंगाळलो

तुटेस्तोवर झिजूनही
हाती काही लागलं नाही
चुकेस्तोवर फिरूनही
कधीच काही साधलं नाही

दिशाहीन प्रवास माझा
कुठेही संपणार नाही
उडीन.. भिजीन.. जळीनही
एका जागी थांबणार नाही..

पाचोळ्याच्या भटकंतीला
धुळीचीच साथ
खंत नाही, खेद नाही..
जरी फुटलं ललाट.......रसप....
१३ जुलै २०११

सखे सांग झेलू कसे पावसाला ?

सखे सांग झेलू  कसे पावसाला ?
कुठे ओल आता असे पावसाला ?


तुझ्या पैंजणांची मला ओढ होती
तसा नाद वेडा नसे पावसाला


तुझे ते बहाणे, अदा और होती
जमे ना जराही तसे पावसाला


मला थेंब सारे असे बोचती का?
फुटावेत काटे जसे पावसाला


इथे सांडली वाट होती तुझीही
दिसे ना फुलांचे ठसे पावसाला?


किती गायली मी तुझी गोड गीते
तरी प्रेमगाणे हसे पावसाला....रसप....
१२ जुलै २०११

Tuesday, July 12, 2011

खंत नाही, खेद नाही धुंदलेल्या पावसाला..

खंत नाही, खेद नाही धुंदलेल्या पावसाला
ओढ नाही, चाड नाही दंगलेल्या पावसाला


मेघ काळे खेळती हा खेळ आकाशी विजेचा
शुद्ध नाही, जाग नाही गुंतलेल्या पावसाला


काल जो आला इथे तो कोरडा होऊन गेला
वेग नाही, जोर नाही संपलेल्या पावसाला


वेगळीशी ओल होती पापण्यांना आज थोडी
ठाव नाही, नाव नाही सांडलेल्या पावसाला


थेंबवेड्या चातकाचे दु:ख मेघांना कळे का?
गंध नाही, छंद नाही गंडलेल्या पावसाला


बोललो आहे कितीदा मी तुला माझ्या मनाचे
अर्थ नाही, मोल नाही बांधलेल्या पावसाला


पाहिले का आज 'जीतू' फाटले आभाळ जेव्हा
रंग नाही, संग नाही कुंदलेल्या पावसाला


....रसप....
११ जुलै २०११

Monday, July 11, 2011

कधी तू पहावे, कधी मी पहावे..

कधी तू पहावे, कधी मी पहावे
असे पाहताना कुणा ना कळावे


मनाचे मनाशी छुपे गूज होता
जरा लाजुनी तू मनाशी हसावे


तुझ्या पावलांचे ठसे सोडले तू
कसे सांग मी आज रस्ता चुकावे?


मला ठाव नाही जगाचा जनाचा
अता सांग तू मी जगावे? मरावे?


दिशांनी तुझे तेज माळून घेता
कुणी ईश्वराला कशाला नमावे?


भला वा बुरा "जीत" माणूस होता
कधी ना कुणी प्रेम वेडे करावे !....रसप....
१० जुलै २०११

Sunday, July 10, 2011

२६ जुलै २००५ (पावसाळी नॉस्टॅलजिया - १२)


ऑफिसला जाण्यासाठी
आपली बस ठरलेली
तुझी जागा ठरलेली;
माझी जागा ठरलेली

तुझ्या गालावरची बट
तू कानामागे खोवायची
बटसुद्धा अशी लोचट
पुन्हा पुन्हा रूळायची....
....पुन्हा पुन्हा झुलायची

दीड तासाचा प्रवास
तुझ्या सुगंधाने बहरायचा
रोज एक नवा गुलाब
मनामध्ये फुलायचा

परत घरी येताना
वेगळे वेगळे यायचो
कारण मी ऑफिसमध्ये
उशीरापर्यंत बसायचो

त्या दिवशी मात्र
गडबड झाली होती
पावसामुळे ऑफिसं
लौकर सोडली होती

पाऊस मी म्हणत होता
छत्र्या फाडून बरसत होता
टॅक्सी-रिक्शा-बस साठी
नुसता गोंधळ चालला होता

मी घाई केली नाही
ऑफिसातच थांबलो
दुसऱ्या दिवशी सकाळी
घरी परत आलो

पण त्या दिवशीनंतर तू
परत दिसलीच नाहीस
पाऊस गेला, पाणी सरलं
तरी तू आलीच नाहीस

आजकाल तुझ्या घरालाही
म्हणे कुलूपच असतं
बाल्कनीतून गुलाबफुल
एकटंच हसत असतं

आता जेव्हा कधीही
आभाळ भरून येतं
गुलाबाचा गंध माझ्या
मनात सोडून जातं...


....रसप....
९ जुलै २०११

पावसाळी नॉस्टॅलजिया १ ते १२

Saturday, July 09, 2011

दिंडी - २

टाळ मृदुंगाची | साथ आयुष्याची ||
तशी ह्या मनाची | विठ्ठलाशी ||


सारे वैषयिक | संसार भौतिक ||
एक असे सुख | श्रद्धा भक्ती ||


पावलोपावली | चाहूल वाढली ||
विठूची सावली | ओढ लावी ||


उभा जन्म गेला | जगूनही मेला ||
मुके दर्शनाला | विठ्ठलाच्या ||


'विठू' नाम घ्यावे | रूप न्याहाळावे ||
कृतकृत्य व्हावे | जाणीवेने ||


'जितू' म्हणे आता | विठू तूच त्राता ||
संपल्यात वाटा | वीटेपाशी ||....रसप....
९ जुलै २०११

दिंडी - १

Thursday, July 07, 2011

दिंडी

विठ्ठलाचे नाम घेती | पंढरीची वाट चाली ||
पालखीच्या भोवताली | भक्त वेडे ||


भक्तीरूपी पावले ती | एकनादी चालताना ||
त्यागुनी संवेदनांना | नाम घेती ||


टाळ वाजे सूर लागे | कीर्तनी रंगून सारे ||
नाचती बेधुंद न्यारे | सार्थ झाले ||


धन्य झाली माऊली ती | अन् तुकाही  धन्य झाला||
धन्य एका धन्य नामा | वाटताती ||


सोहळा पाहून जीतू | ह्याच देही ह्याच डोळां ||
केव्हढा हा हर्ष झाला | तृप्त वाटे ||....रसप....
७ जुलै २०११

Wednesday, July 06, 2011

मुंबईचा पाऊस (पावसाळी नॉस्टॅलजिया - ११)

मुंबईचा पाऊस सारं काही भिजवतो..
'लोकल्स'ना अडवतो, 'बसेस'ना थांबवतो..
दर पावसाळ्यात एकदा तरी,
मला घरातच कोंडतो..
पण मीही कमी नाही; कैदेतही रमतो!
किशोर-रफी ऐकतो,
चार-दोन ओळी लिहितो..!

मुसळधार कोसळूनही
त्याचं मन भरत नाही
बदाबद सांडूनही,
पाउस थांबत नाही

ओली संध्याकाळ गारठते..
अन् तास दोन तासासाठी तो शांत होतो
रडून थकलेल्या मुलासारखा कोपऱ्यात जाऊन बसतो..
पण झाडांची, इमारतींची टीप-टीप चालूच असते
कधी न मिळणारी शांतता त्या दोन तासांत असते..

किशोर-रफीची मैफल रंगते..
ग्लासातली व्होडका डोळ्यांत उतरते
अन् पुन्हा एकदा.. आधीसारखंच..
बदाबद कोसळायला -
आभाळ भरून येते..


....रसप....
६ जुलै २०११
पावसाळी नॉस्टॅलजिया १ ते ११  

श्रांत झालोमाझ्या वाट्याला तू | नको देऊ सुख |
सोसायला दु:ख | शक्ती दे तू ||


कडाडती वीज | झेलून घेईन |
झळाळते ऊन | साहीन मी ||


दया भक्ती श्रद्धा | सदा मनी राहो |
द्वेष दूर जावो | अंतरीचा ||


ऊन सावलीचा | खेळ सुख-दु:ख ||
कुणी नसे तृप्त | जीवनी ह्या ||


तागडी घेऊन | सारे मोजतोस ||
भोग वाटतोस | प्रत्येकाला ||


जितू दास झाला | लीन तुझ्या पायी |
आता नको काही | श्रांत झालो ||


....रसप....
४ जुलै २०११

Tuesday, July 05, 2011

गुगलून गुगलून..!! (तिचे उत्तर)


"तुझी भेट झाली गुगलता गुगलता" असे म्हणणाऱ्या "त्या" गुगलर ला तिने टाकलेला गुगली..


मला न होती तुझी प्रतीक्षा बंध जोडला गुगलून गुगलून
नेटकरी तू हाडाचा रे शोधले मला गुगलून गुगलून

माझ्या मागे मागे होता कॉलेजात अन शाळेमधेही
तेही न का रे पुरले तुला माग काढला गुगलून गुगलून ?

मला 'पोक'तो मला 'टॅग'तो तू माझ्या वॉली 'हाय*' पोस्टतो
उगा धाडला स्क्रॅप तुला मी खुळा जाहला गुगलून गुगलून

तुला न काही काम की धंदा भार भुईला बनून राहिला
अरे टपोरी शोध नोकरी जरा पोर्टला** गुगलून गुगलून

तुझ्यासारखे मी किती पाहिले वास काढती जिकडे तिकडे
असे वाटते मानवरूपी श्वान भेटला गुगलून गुगलून

गप्प बैस तू ब्लॉक करीन मी सदैव खातोस डोके माझे
वाटले मज असशील आता जरा सुधरला गुगलून गुगलून....रसप....
२ जुलै २०११
३४ मात्रांची गझल लिहायचा प्रयत्न केला आहे.*हाय = Hi !!
**पोर्टला = (जॉब) पोर्टल्सनाMonday, July 04, 2011

गुगलता गुगलता..!!

तुझी भेट झाली गुगलता गुगलता
मला तू मिळाली गुगलता गुगलता

तुला शोधले मी इथेही तिथेही
किती रात झाली गुगलता गुगलता

कधी ऑर्कुटी मी कधी फेसबूकी
नसे एक वाली गुगलता गुगलता

अता स्कॅन डोके करावेच वाटे
कमी स्पीड झाली गुगलता गुगलता

कदाचीत माऊसही 'बोर' झाला
पडे आज खाली गुगलता गुगलता

तुझे ओठ दोन्ही गुलाबी कळ्या त्या
दिसे तीच लाली गुगलता गुगलता

तुझा स्क्रॅप येता खुळा जाहलो मी
उडे शीर भाली गुगलता गुगलता

तुला 'पोक'ले मी, तुला 'टॅग'ले मी
मजा खास आली गुगलता गुगलता!!

किती शेर सांडून गेलेत 'जीतू'
गझल एक झाली गुगलता गुगलता..!


....रसप....
२ जुलै २०११


Sunday, July 03, 2011

जगायला हवे तसे..

जगायला हवे तसे विमुक्त आज मी असे
सुखात मी असूनही उदास खास वाटते


शिकायतें नसीब से करें न तो किसे करें
मकाम पे विरानियाँ बहाल क्यूँ करीं हमें
कभी न रास आयेगी नुकीली हैं यह शोहरतें
.......... सुखात मी असूनही उदास खास वाटते


जगायला हवे तसे विमुक्त आज मी असे
नशेत मी असूनही उदास खास वाटते


बुडून जायचे मला तुझ्यात लाल सागरा
नकोच शुद्ध बोचरी, विषासमान वेदना
विषण्ण सुन्न सावली मनात दूर सांडते
.......... नशेत मी असूनही उदास खास वाटते


इसीको गर कहें खुशी किसे कहें चुभन यहाँ
हताश वाट थांबली भकासल्या दिशा दहा
कुणास एकटेपणा मनातला कधी दिसे?
.......... जगायला हवे तसे विमुक्त आज मी असे
....रसप....
२ जुलै २०११

हे गीत एका विशिष्ट प्रसंगासाठी लिहिले आहे. त्यामुळे तो प्रसंगसुद्धा वाचावाच.

Saturday, July 02, 2011

कधी परत याल बाबा..?

तेच थेंब त्याच सरी
दररोज बागेत बरसतात
पारिजातक, मालती अन् मोगरा बहरतात
जास्वंद लगडते
पण डवरलेला बाग मला निपचित भासतो
कालच्या फुलांचा आज चिखल साचतो

तरी तोच सुगंध रोज पसरतो
नवी फुलं रोज हासतात
तुमची वाट पाहातात

त्यांना चिखल व्हायचं नाहीये
हारात गुंफलं जायचंय, बाबा..

कधी परत याल बागेत?

....रसप....
२६ जून २०११
Related Posts Plugin for WordPress, Blogger...