Wednesday, July 06, 2011

मुंबईचा पाऊस (पावसाळी नॉस्टॅलजिया - ११)

मुंबईचा पाऊस सारं काही भिजवतो..
'लोकल्स'ना अडवतो, 'बसेस'ना थांबवतो..
दर पावसाळ्यात एकदा तरी,
मला घरातच कोंडतो..
पण मीही कमी नाही; कैदेतही रमतो!
किशोर-रफी ऐकतो,
चार-दोन ओळी लिहितो..!

मुसळधार कोसळूनही
त्याचं मन भरत नाही
बदाबद सांडूनही,
पाउस थांबत नाही

ओली संध्याकाळ गारठते..
अन् तास दोन तासासाठी तो शांत होतो
रडून थकलेल्या मुलासारखा कोपऱ्यात जाऊन बसतो..
पण झाडांची, इमारतींची टीप-टीप चालूच असते
कधी न मिळणारी शांतता त्या दोन तासांत असते..

किशोर-रफीची मैफल रंगते..
ग्लासातली व्होडका डोळ्यांत उतरते
अन् पुन्हा एकदा.. आधीसारखंच..
बदाबद कोसळायला -
आभाळ भरून येते..


....रसप....
६ जुलै २०११
पावसाळी नॉस्टॅलजिया १ ते ११  

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...