Monday, August 22, 2011

राजहंस मी


राजहंस मी उंच भरारी घेणे माझा स्वभाव नाही
डौलदारशी चाल मंदशी पळण्याचाही सराव नाही


कधी ओढली चर्या नाही उदासवाणे गीत गाउनी
कधीच फडफड पंखांची ना कधी न केला दंगाही मी
शांत विहरतो, कधीच केला क्रुद्ध होउनी उठाव नाही
................................. राजहंस मी उंच भरारी घेणे माझा स्वभाव नाही


ध्यान लावुनी डाव साधणे येथ चालली कुटील नीती
मला न मंजुर डाव रडीचा तुम्हीच पाळा तुमच्या रीती
स्थितप्रज्ञतेचा हा खोटा दर्शनरूपी बनाव नाही
................................. राजहंस मी उंच भरारी घेणे माझा स्वभाव नाही


किल्मिष नाही मनात काही कळकट माझी वसने नसती
मला न भासे ददात कसली कृपा ईश्वरी माझ्यावरती
तुम्हासारखा खुद्द आपला इथे मांडला लिलाव नाही
................................. राजहंस मी उंच भरारी घेणे माझा स्वभाव नाही


कुणास वाटे गर्व कुणाला दिसते माझी मुजोर वृत्ती
प्रसन्नतेचे गुपीत माझ्या मनात आहे निस्सिम भक्ती
सुखी जीवनावरती माझ्या भोग विलासी प्रभाव नाही
................................. राजहंस मी उंच भरारी घेणे माझा स्वभाव नाही....रसप....
२१ ऑगस्ट २०११

1 comment:

  1. रणजीतजी नमस्कार,
    खुप सुंदर कविता लिहलीय..मस्त.असं छान लिहायला मन राजहंसासारखं असावं लागतं तेव्हाच असं सुंदर काव्य लिहलं जातं.
    धन्यवाद.

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...