Wednesday, October 19, 2011

"लेक लाडकी " - एक अभूतपूर्व ई-पुस्तकजग पुढारलं आणि पृथ्वी म्हणजे एक लहानसं खेड झालं. आंतरजालासारखी जादूची कुपी हाती आली. एका क्लिकवर सगळं समोर यायला लागलं. मराठी साहित्यही याला अपवाद राहीलं नाही. मराठी कविता, मराठीतलं उत्तमोत्तम साहित्यही नेटवर उपलब्ध होऊ लागलं. 

जागतिकीकरण झालं आणि मराठीचा वारू काहीसा थंडावला. पण अमृताशीही पैजा जिंकणाऱ्या मायमराठीचे शिलेदार लेचेपेचे नव्हते, होणाऱ्या बदलाच्या झंझावातात वाहून न जाता त्याच्यासमोर उभे राहून सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून मराठी साहित्याने कात टाकली. अश्याच बदलाच्या कालखंडात "ऑर्कुट" या सोशल नेट्वर्किंग साईट वर जन्म झाला "मराठी कविता समुहाचा". अल्पावधीतच हा समूह लोकप्रियही ठरला. यामागे मुख्य कारण होते ते या समूहावर चालणारे सर्वसमावेशक उपक्रम. लोकांना लिहितं आणि हो, वाचतंही करणारं दर्जेदार साहित्य.
या दर्जेदार लिखाणाचं चीज व्हायला हवं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले प्रयत्न आणि ही प्रतिभा पोचायला हवी. म्हणून मग संकल्पना पुढे आली ती "ई-बुक" ची. जास्तीत जास्त लोकांपुढे, विशेषतः तरुण लोकांपर्यंत पोचण्याचा हा अतिशय प्रभावी मार्ग!!


 "लेक लाडकी "

                       आपल्या घराची लेक, हा प्रत्येक घराचा एक हळवा कोपरा असतो, लेक घराची  मर्यादा असतेच पण घराचा अमर्याद आनंदही असतो.

                       मुलीची नाळ घराशी दोनदा तुटूनही घट्ट बांधलेली असते, दोनदा ती नाळ तोडली जाते. एकदा जन्म घेतल्यावर अपरिहार्य असते म्हणून आणि दुसरी लग्न करून ती दोन घर सजवणार असते म्हणून. पण कसेही, कस्सेही असले तरी आयुष्याच्या कुठच्याही टप्प्यावर तिला "माहेर" ही तीन अक्षरं मोहिनी घालतात, हळवं करतात म्हणून घराला मुलगी हवीच ! आज मुलींची चिंताजनक संख्या, आणि स्त्री भ्रूण हत्ये विरोधात इंटरनेटच्या प्रभावी माध्यमातून काहीतरी करता याव, प्रत्येकाच्या मनातला एक हळवा धागा पकडून मुलगी ही उद्याच्या समाजाचा मुलभूत आधार आहे हे सांगावं ह्यासाठी "मराठी कविता समूहा"ने राबवलेला अजून एक दर्जेदार उपक्रम "लेक लाडकी ". ज्याला अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला, म्हणूनच ई- बुक क्षेत्रात आम्ही उतरायचं ठरवलं ते "लेक लाडकी "या ई बुकच्या  रूपाने.

ह्यात मिळतील, लेकीच्या भावविश्वात रममाण झालेले, तिच्या पंखात ताकद देणारे, तिच्या कर्तृत्वावर कौतुकाची झळाळी चढवणारे आणि सासरी चालेल्या तिला पाहून हळूच डोळे टिपणारे "असंख्य लेकींचे आई बाबा "

तुम्हाला ते नक्की आवडतील ही खात्री वाटते, तरीही या प्रयत्नात काही कमी-अधिक झाल्यास किंवा न्यून राहिल्यास तुम्ही ते निदर्शनास आणून द्याल ही अपेक्षा. 


या अंकाचा आनंद घ्या.  इथे - 

आणि अभिप्राय द्यायला विसरू नका. 
इथे - "मराठी कविता समूह" संचालक मंडळ.

शब्दांकन - अनुजा मुळे 

2 comments:

 1. नमस्कार,

  तुमचा योगायोगावर विश्वास आहे का?

  माझा आहे :)
  आज मी "बोले तो मालामाल" हा कार्यक्रम बघत होतो आणि त्याच वेळी मराठी ब्लॉग वाचत होतो.
  तुमचे नाव कार्यक्रमात आले आणि त्या क्षणी मी तुमचाच ब्लॉग वाचत होतो...

  ReplyDelete
 2. ओह!
  धन्यवाद!

  (आणि योगायोगावर विश्वास आहेच. योगायोगाचा परिणाम म्हणूनच हा एव्हढा मोठा ब्लॉग आहे.. नाही तर मी कधी कविता करीन, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं!)

  ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...