Monday, February 13, 2012

अशक्य आहे..


मागे पडल्या वळणावरती पुन्हा परतणे अशक्य आहे
घात एकदा झाल्यावर मी तुला विसरणे अशक्य आहे

अपमानांना पचवुन साऱ्या तुझ्या मनासारखे वागलो
आज स्वत:शी हरल्यावर मी मान मिळवणे अशक्य आहे

आवडतीचे ना मिळणे हे बहुधा माझे नशीब आहे
खोट्या रेषा हातावरती मला गिरवणे अशक्य आहे

मला न कळले जळता जळता उभा जन्म हा सरून गेला
राख पसरली सरणावरती, जाळ पकडणे अशक्य आहे

का तोडावे आरश्यास मी माझ्या जागी तुला पाहता
काच एकदा तुटल्यावर ती छबी जुळवणे अशक्य आहे

....रसप....
१३ फेब्रुवारी २०१२

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...