Wednesday, March 28, 2012

रे मना गीत गा


"मराठी कविता समूहा"च्या "सुरात शब्द गुंफुया (भाग - १)" साठी लिहिलेलं अंबरीश देशपांडे ह्यांच्या चालीवरील गीत..

रे मना गीत गा तू आगळे वेगळे
सुखाचा ठिकाणा रडूनी ना मिळे!

धावतो तू असा मृगजळा पाहुनी 
भाळतो नेहमी गवसले हारुनी
हे तुझे दंगणे का कधी ना टळे ?
.......... रे मना गीत गा तू आगळे वेगळे

मी तुझ्या संगती भटकलो, धावलो
पाहुनी सावली थबकलो, थांबलो
थांब तूही जरा ओढतो का बळे ?
.......... रे मना गीत गा तू आगळे वेगळे

....रसप....
२७ मार्च २०१२ 

Monday, March 26, 2012

विशाल आसमंत मी अथांगसा समुद्र तू

विशाल आसमंत मी अथांगसा समुद्र तू
तुझ्या मिठीत रंगतो क्षितीज माळताच तू

कधी कधी निराश मेघ काळवंडती मनी
तुफान शांतवून मी विसावतो तिथेच तू

उरात आग पेटवून जाळतो मलाच मी
हलाहलास प्राशुनी निशांत अन निवांत तू

तमास ओढुनी खुशाल रोज मी पहूडतो
उसंत ना मुळीच घेउनी खळाळतेस तू

तुझ्यामधे तुझी किती रूपे दडून राहती
तुझा न आरसा कुणी छबी तुझीच पूर्ण तू

तुझी भयाण शांतता कधी मनास कोरते 
कधी निवांततेस सोडुनी प्रकोपतेस तू

अकांडतांडवास पाहुनी विषण्ण मी उरे
विराट गर्जना करून क्रूर भासतेस तू

तुला बघून  क्रंदतो, तुला बघून भांडतो 
तुझ्या मिठीत रंगतो क्षितीज माळताच तू


....रसप....
२६ मार्च २०१२ 

Sunday, March 18, 2012

प्रोफाईल


ती नाहीये.. माहितेय..
पण मला तिच्या प्रोफाईलला फ्रेंड म्हणून ॲड करायचंय
ती काहीच बोलणार नाहीये, लिहिणार नाहीये
मला माहितेय
पण मला तिच्या शांततेला 'लाईक' करायचंय
ती येणार नाही.. माहितेय..
पण तरी मला तिला माझ्या आवडत्या ग्रुपमध्ये गुपचूप जोडायचंय
ती कुठेच दिसणार नाहीये
हेही माहितेय
पण मला तिच्या जुन्या फोटोत तिलाच टॅग करायचंय

बघू तरी काय होतं..
तेव्हा तिने बोलणं बंद केलं होतं
तिच्या अबोल्याने अतोनात छळलं होतं
माझ्याकडे बघणंही कटाक्षाने टाळलं होतं
अगदी सहजपणे आयुष्यातून गाळलं होतं

आता ती मला 'ब्लॉक' तरी नक्कीच करू शकणार नाही
प्रोफाईलचे दरवाजे लॉक तरी नक्कीच करू शकणार नाही
कारण ती नाहीये..
..माहितेय....

तिचं नाव, तिचा फोटो...
पण प्रोफाईल खरं तर माझी आहे!
आणि आता ती राजी आहे..
फेक असली तरी माझी आहे..

....रसप....
१८ मार्च २०१२

Saturday, March 17, 2012

दिवसा फुलुनी दरवळ करती.. (लावणी)


"मराठी कविता समूहा"च्या "काव्य छंद" साठी लावणी लिहिण्याचा माझा प्रयत्न -

दिवसा फुलुनी दरवळ करती किती फुले हो गोजिरवाणी
सांज सावळी धुंदवणाऱ्या रातराणिची ऐक लावणी
{कोरस} -
अहो,
जपून उडवा फेटा जाइल चोरीला
टपून बघती चोर किती ह्या पोरीला !!
काय पाहता दाजीबा भुंग्यावाणी
धाप लागली आज्याला त्या द्या पाणी !!

बागेमध्ये गुलाब फुलतो डौलाने तो कसा डोलतो
गुंफुन त्याला कधी कुणीही देवाला ना वाहत असतो
तशीच मीही गंधबावरी दरवळते तोऱ्यात दिवाणी
सांज सावळी धुंदवणाऱ्या रातराणिची ऐक लावणी
{कोरस} -
अहो,
जपून उडवा.........

कळ्या मोगऱ्याला त्या येता खुशाल माळी साऱ्या खुडतो
अन वेणीच्या सुगंधामधे कारभारणीला दंगवतो
मी दंगवते त्या माळ्याला दावुन ठुमका गाउन गाणी
सांज सावळी धुंदवणाऱ्या रातराणिची ऐक लावणी
{कोरस} -
अहो,
जपून उडवा.........

मला नको तू शोधत येऊ मी इवलीशी लपून बसते
मला तोडणे नकोस ठरवू गंध हरवुनी मी मरगळते
ऐक दुरूनी तू माझी ही दरवळणारी मंजुळ वाणी
सांज सावळी धुंदवणाऱ्या रातराणिची ऐक लावणी
{कोरस} -
अहो,
जपून उडवा.........


....रसप....
(रणजित पराडकर)
१७ मार्च २०१२

Wednesday, March 14, 2012

कधीकाळचे भणंग येथे..


कधीकाळचे भणंग येथे बघता बघता दिवाण बनले
देशाचा बाजार मांडला अन विकणारे अजाण ठरले

इतिहासाची पुनरावृत्ती होत असावी, कुणी जाणले ?
नव्या उद्याला आज-उद्याचे जुने कालचे निशाण उरले

माळ्यावरती नैतिकतेला गुंडाळुन बासनात ठेवा
माणुसकीचे विचारसुद्धा कलीयुगातिल पुराण ठरले

तिच्या प्रितीचा मनातला तो झरा आटला, असे वाटले
पुन्हा परत ही सागरभरती येउन डोळी उधाण भरले

आयुष्याने खेळवले मज पकडापकडी रोज स्वत:शी
पळून माझ्या मागे माझे नशीब जिप्सी-लमाण बनले

तिच्या गळ्याशी काळे सर अन हातामध्ये चुडा किणकिणे
जवळ जाउनी बघता "जीतू", डोळे केवळ विराण दिसले

....रसप....
१४ मार्च २०१२

Monday, March 12, 2012

कवितेची एक ओळ.. (अधुरी कविता)


"मराठी कविता समूहा"च्या "लिहा ओळीवरून कविता - भाग ८८" मधील माझा सहभाग -

तिला पाहून कविता
लिहिताना झाला घोळ
तिच्या बटेवर झुले
कवितेची एक ओळ

कशी मला ती मिळावी
बट थांबता थांबेना
माझी कविता अडली
काही म्हणता सुचेना

क्षण एक रेंगाळली
बट तिच्या गालावरी
माझी नजर गोठली
अशी तिची जादुगरी

चाफेकळीस लाडिक
बट तिने लपेटली
माझा जीव कासावीस
कविताही बहकली

दिला सोडून मी नाद
कवितेस लिहिण्याचा
कवितेची एक ओळ
बटेवर माळण्याचा

आता हलके हलके
येते दुरून उडून
कवितेची एक ओळ
येते डोळ्यात भरून

एक थेंब दुराव्याचा
एक तिच्या नकाराचा
एक अधुऱ्याश्या माझ्या
निरागस कवितेचा...

....रसप....
१२ मार्च २०१२

Sunday, March 11, 2012

Rahul Dravid -Take a bow.. (शेवटचा जंटलमन)


"पुरे झालं आता",
हे मीही बोललो होतो
पण तेव्हा तू तिथे होतास..
म्हणून बोलणारा मी आश्वस्त होतो..
आता..?

एकशे तीस यार्डांच्या खेळात..
चोवीस चेहऱ्यांत..
पुन्हा एकदा एखादा खराखुरा जंटलमन
कधी दिसेल..?
खुनशी नजरांच्या आवेशास टाळून
शिवराळ भाषेच्या आवेगास गाळून
स्थितप्रज्ञ आविर्भाव
कधी दिसेल..?
स्टँड अँण्ड डीलीव्हरच्या जमान्यात
दगडी बचाव
कधी दिसेल ?
कधी दिसेल ते
"द बॉय नेक्स्ट डोअर" वाटणं ?
"द मॅन टू डिझायर" वाटणं ?

देवाने बनवलेले पाहिले
देव बनलेलेही पाहिले
पण स्वत: स्वत:ला बनवणारा माणूस..
परत कधी दिसेल ?

वेळ सरत जाईल
क्रिकेट चालूच राहील
पण प्रतिस्पर्ध्याला नमवणारी विनम्रता
परत दिसणार नाही..
विजयाच्या जल्लोषात तुझ्याइतकं शांतपणे
कुणी हसणार नाही..

पण मी हसून अभिमानाने बोलेन -
शेवटचा जंटलमन मी पाहिला होता..
शेवटचा जंटलमन मी पाहिला होता..
 

....रसप....
१० मार्च २०१२
टेक अ बोउ.. राहुल द्रविड..!

Saturday, March 10, 2012

खुर्चीच्या टोकावरची - "कहानी" (चित्रपट परीक्षण) - Kahani Review


एखाद-दुसरं नाव वगळता कुणीच 'माहितीचं' नाही.. सिनेमात एकही गाणं नाही.. परदेशातलं शूटिंग नाही.. (शूट करताना स्लो आणि नंतर फॉरवर्ड केलेले) गाड्यांचे जीवघेणे पाठलाग नाहीत.. अकारण रक्तरंजन नाही.. कानठळ्या बसवणारं पार्श्वसंगीत देऊन भंपक नाट्यनिर्मिती करायचा प्रयत्न नाही.. तरीही गच्च आवळलेल्या मुठी, एकावर एक दाबून धरलेले दात आणि पडद्यावर खिळलेली नजर.. असा खुर्चीच्या टोकावर आणणारा रोमांचक अनुभव (किमान २-३ ठिकाणी) देणारा हिंदी सिनेमा बऱ्याच दिवसांनी पाहिला आणि "हिंदी सिनेसृष्टी वाटते तितकी 'होपलेस' नाही" हा माझा समज किंचित आणखी दृढ झाला!

'कहानी' सुरू होते आणि घडते कोलकात्यात. मेट्रो रेल्वेत विषारी वायू सोडून शेकडो लोकांना ठार करण्याचा घातपात घडवला जातो. हे घडवणारा माणूस दुसरा-तिसरा कुणी नसून खुद्द गुप्तचर खात्याचा एक गद्दार एजंट 'मिलन दामजी' असतो. जो अर्थातच ह्या 'कामगिरी'नंतर गायब होतो आणि त्याच्या अस्तित्त्वाचे सर्व पुरावेही हेतुपुरस्सर नष्ट केले जातात.
ह्या प्रकारानंतर साधारण दोन वर्षांनी 'विद्या बागची' (बंगालीत - 'बिद्या') ही गरोदर स्त्री कोलकात्याला येते. सॉफ्टवेअर व्यावसायिक असलेले बागची नवरा-बायको लंडनस्थित असतात. व्यावसायिक कामासाठीच तिचा नवरा - अर्णव बागची - कोलकात्यात दोन आठवड्यांसाठी आलेला असतो, पण तो परततच नाही. त्याचा शोध घेण्यासाठी विद्या कोलकात्यात येते. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवल्यानंतर ती "National Data Center" जिथे अर्णव कामासाठी आलेला असतो, तिथे जाते व छाननीचा प्रयत्न करते. अर्णवचा चेहरा एका दुसऱ्या व्यक्तीशी थोडाफार जुळत असल्याचे कळते.. आणि सुरु होते एक वेगळेच नाट्य.. जीवावर बेतणारे.. बेतलेले.. तिच्या ह्या शोधात 'सांत्योकी सिन्हा उर्फ राणा' हा पोलीस ऑफिसर तिची मदत करतो. गुप्तचर खात्याचा ऑफिसर खान ह्या प्रकरणात समाविष्ट होतो.. वारंवार नवीनवी वळणं घेत ही 'कहानी' अखेरीस एका पूर्णत: अनपेक्षित वळणावर येऊन संपते आणि सिनेमातील पात्रांसह प्रेक्षकही विस्मयचकित होतो.

घातपात घडवून आणणारा एजंट मिलन दामजी कोण असतो?
घातपात घडवून आणण्यामागे मास्टरमाइंड असलेल्या गुप्तचर खात्यातील व्यक्ती, ज्या मिलन दामजी पर्यंत कुणालाही पोहोचू देत नाहीत, त्या कोण आहेत ?
दामजी आणि अर्णवचा नेमका संबंध काय ?
अर्णव जिवंत आहे का?
एका अनोळखी बाईला इतकी मदत करण्यात 'राणा'ला इतका रस का आहे?
'खान'चा नक्की हेतू काय आहे ?
असे असंख्य प्रश्न वारंवार पडत राहतात, पण सिनेमाचा वेग विचार करायला क्षणाचीही उसंत देत नाही आणि सरतेशेवटी उघडणारे रहस्य डोळे सताड उघडे करते!

सिनेमा संपतो आणि अर्थातच लक्षात राहते - विद्या बालन.
'डर्टी पिक्चर' मध्ये वजन वाढवणारी विद्या इथे गरोदर स्त्रीची भूमिका बरहुकूम वठवते. नव्या जमान्याची शबाना आझमी बनायची ताकद ह्या अभिनेत्रीत नक्कीच आहे. कदाचित ती त्याही पुढची असेल, असंही वाटतं.
'राणा' आणि 'खान' ह्या दोन व्यक्तिरेखा सुद्धा चांगल्या वठवल्या गेल्या आहेत.
संगीतकार 'विशाल-शेखर'ला फारसा वाव नाही, हे बरं झालं. "रा-वन"च्या गगनभेदी कर्कश्य संगीतानंतर त्यांना इतपतच मोकळीक मिळालेली बरी!!

एकंदरीत, अस्सल थरार अनुभवण्यासाठी हा सिनेमा अवश्य पाहावा असाच आहे.

(डिस्क्लेमर - एखाद्या इंग्रजी सिनेमाची नक्कल असल्यास, ते मला समजले नसल्यास, तो माझ्या अज्ञानाचा भाग समजून माझ्याच अक्कलखाती जमा करावा, पण सिनेमा जरूर पाहावा!)

Friday, March 09, 2012

माझी हो ना


हसता हसता उगाच लाडिक रुसण्यासाठी माझी हो ना
रुसता रुसता खुदकन गाली हसण्यासाठी माझी हो ना

हात तुझा मी हाती घेता तू नाजुक लाजाळू व्हावे
मिठीत माझ्या कळीसारखे खुलण्यासाठी माझी हो ना

गंध तुझा लेऊन सरावी रात रोज अन पहाट व्हावी
ओठावरचा थेंब दवाचा बनण्यासाठी माझी हो ना

रेशिम रेशिम मल्मल मल्मल स्पर्श तुझा तो हवाहवासा
मोरपिसाचा लुब्ध शहारा उठण्यासाठी माझी हो ना

कर्पुरकांतीवरती सारे रंग खुलूनी तुझ्या दिसावे
जीवनास ह्या रंगसफेती करण्यासाठी माझी हो ना

मधुर तुझ्या ओठांची चव माझ्या ओठांवर तरळत यावी
जवळी नसता भास बनूनी छळण्यासाठी माझी हो ना

रूक्ष कोरडा रखरखता मी मनात माझ्या माळ मोकळा
हळवी रिमझिम करून थोडे भिजण्यासाठी माझी हो ना

सरता सरता आयुष्याचे होउन जाइल मखमल केशर
थरथरणारा हात कापरा धरण्यासाठी माझी हो ना

टप्प्या-टप्प्यावरती येथे आयुष्याशी भांडुन थकलो
माझ्यासोबत उभी राहुनी लढण्यासाठी माझी हो ना

....रसप....
९ मार्च २०१२

Monday, March 05, 2012

पुन्हा एका वादळाचे मला स्वप्न हवे


"मराठी कविता समूहा"च्या "लिहा ओळीवर कविता -भाग ८७" मध्ये माझा सहभाग -

अंधाराला जाळणारे पेटविण्या दिवे
पुन्हा एका वादळाचे मला स्वप्न हवे

नको मला सुखासीन आयुष्य गोजिरे
कोळसाच हाती येवो नको मला हीरे

माझ्या मनामध्ये हीरा आहे मी जपला
संघर्षाच्या खाणीमध्ये सापडला मला

समाधान नाव त्याचे लख्ख चकाकतो
त्याच्या तेजानेच माझा चेहरा खुलतो

उजेडाचा अंधाराशी लढा नेहमीचा
अंधाराचा कावा आता आहे ओळखीचा

चोरपावलाने येणे लपून छपून
हळूहळू चहूबाजूंनी घेणे वेढून

झेलण्याला सज्ज आहे सारे त्याचे वार
आहे माझ्या जीवनाचा मीच शिलेदार

अंधाराला जाळणारे पेटविण्या दिवे
पुन्हा एका वादळाचे मला स्वप्न हवे


....रसप....
५ मार्च २०१२

Sunday, March 04, 2012

प्रतिपश्चंद्रलेखेव..


प्राक्कथन:

२७ फेब्रुवारी; अर्थात 'मराठी भाषा दिन', म्हणजेच मराठी सारस्वताच्या उत्तुंग अस्मिताभिमानाचा सुदिन.
हा सुवर्ण-दिवस 'मराठी कविता समूह' काहीतरी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करतो. मागील वर्षी ह्याच दिवशी सतत २४ तास ऑर्कुटवरील 'मराठी कविता समूहा'वर काव्यसमिधा अर्पण करून साजरा केला होता. ह्या 'काव्य महायज्ञा'त प्रथितयश कवींच्या १८४ आणि आंतरजालावरील कवींच्या २०४ नवीन कविता; अशा एकूण ३८८ कविता लिहिल्या गेल्या.
या अशा अभिनव उपक्रमाची परंपरा पुढे घेऊन जाताना ह्या वर्षीच्या 'मराठी भाषा दिना'च्या निमित्ताने 'मराठी कविता समूह' आपला नित्याचा 'प्रसंगावर गीत' हा उपक्रम, मराठी माणसाच्या हृदयाशी अत्यंत निकट असणारा आणि महाराष्ट्राच्या भूमीच्या ज्ञात इतिहासातील सर्वोच्च मानबिंदू असलेला एक प्रसंग घेऊन साजरा करण्याचा प्रयत्न करणार आहे. या उपक्रमात प्रत्येक मराठी कवीने आपली कविता लिहून या प्रसंगावरील आपले विचार 'गीत स्वरुपात' मांडणे अपेक्षित आहे आणि त्याच बरोबरीने 'मराठी भाषा दिन' आजपासून पुढील पंधरा दिवस साजरा करणे अपेक्षित आहे.
चला तर मग मराठी काव्यमित्रांनो, तुमच्या लेखण्यांना लावा संगीनीची धार, तुमच्या धमन्यांमधले रक्त तुमच्या लेखणीच्या वाटे झिरपू द्या आणि तुमच्या अद्वितीय प्रतिभेतून उमटलेल्या मराठी काव्यगीतांचा अर्घ्य मराठी साहित्य-रत्नाकरामध्ये अर्पण करू या!!!
  

"मराठी कविता प्रोडक्शन्स"चा अत्यंत महत्वाकांक्षी आगामी चित्रपट - "शिवराज्याभिषेक" तयार होत आहे !

पार्श्वभूमी-

महाराष्ट्राचे दैवत असलेला शिवशंभूराजा, आदिलशाहीमध्ये गाढवाचे नांगर फिरवलेल्या पुण्याच्या पुण्यभूमीवर त्यांच्या लाल महालात मातोश्री जिजाबाई यांच्या समवेत राहायला आले. तेथे त्यांचे शारीरिक, बौद्धिक, सामरिक आणि राजकीय शिक्षण संस्कारांच्या बरोबरीनेच सुरु झाले. अल्पावधीतच शिवबा युद्धपारंगत तर झालाच; परंतु त्याच बरोबरीने आपल्या चाणाक्ष बुद्धिमत्तेने त्याने तत्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा सखोल अभ्यासही केला. हळूहळू या शिवबाने बारा मावळातील अठरापगड जातींमधल्या गरिबीत खितपत पडलेल्या मराठी मावळ्यांशी नाते जमवले आणि त्यांना त्यांच्या अस्तित्वाची; अस्मितेची जाणीव निर्माण करायला सुरुवात केली.
हळूहळू हा शिवबा आदिलशाही, निझामशाही यांच्या कडील एकेक प्रदेश काबीज करत सुटला. प्रत्येक वेळी नवनवीन युक्तीने आणि क्लृप्तीने त्याने सा-या शाह्यांना चकित आणि चारी मुंड्या चीत करून टाकले.
केवळ एक जुजबी वाटणारे बंड हळूहळू एका स्वतंत्र साम्राज्याचे स्वरूप घेऊ लागले. मग हे बंड मोडून काढण्यासाठी या शहांनी एकेक मोठमोठी संकटे या छोटुकल्या स्वराज्यावर धाडली. परंतु अफजलखान, शाहिस्तेखान, दिलेरखान यासारख्या बलाढ्य सरदारांशी झालेली भयंकर युद्धे असोत की सिंहगड, पावनखिंड-पन्हाळा, पुरंदर सारख्या किल्ल्यांवर मावळ्यांनी दिलेली झुंज असो, हरेक दिन मराठी स्वराज्य विस्तारत गेले आणि एक स्वतंत्र साम्राज्य म्हणून वाढत गेले.
आणि अशा त-हेने स्वतंत्र साम्राज्य निर्माण करणा-या शिवाजीराजांवर राज्याभिषेक होऊन त्यांनी छात्रचामरे धारण केली पाहिजेत हा आग्रह घेऊन प्रत्यक्ष काशीवरून प्रकांड पंडित विश्वनाथ भट्ट उर्फ गागाभट्ट थेट शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचले आणि त्यांनी महाराजांना राज्याभिषेक करवून घेण्याची आग्रही विनंती केली. शिवाजी महाराजांनी ती मान्य केली आणि महाराष्ट्रभूमीचे भाग्य खुलले.
अनेक युद्धे आणि नाट्यमय प्रसंग दाखवून चित्रपटाचा अखेरचा प्रसंग दाखवण्यात येत आहे तो "शिवराज्याभिषेका"चा!!!

चित्रपटातील प्रसंग -

एक दवंडीवाला एका गावामध्ये दवंडी देतो - 'ऐका हो ऐकाSSS! आजपातूर अर्ध्या मासानं आपल्या शिवाजीराजाला अभिषेक होनार हाये होSSS!
आणि चित्रपटातील गीताला सुरुवात होते...........................
ही वार्ता ऐकताच गावातील प्रत्येक माणूस आनंदानं फुलून निघतो. सारे अबालवृद्ध आनंदानं गावाच्या रस्त्यांवर अक्षरश: नाचू लागतात.
चहूकडे आनंद आणि उत्साहाला उधाण आलेलं आहे. सारा मावळ परिसर आनंदानं न्हाऊन निघाला आहे. महाराष्ट्राच्या मातीमाधली हिरवाई नवचैतन्यानं डोलू लागली आहे.
रायगडावर राज्याभिषेकाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. गडावर महाराजांच्या दरबाराचे बांधकाम जोरात सुरु झाले आहे. महाराजांचा राजमहाल, अश्वशाळा, गोशाला, मंदिरे, कार्यालये ई. सर्व ईमारतींची डागडुजी, रंगरंगोटीचे काम सुरु झाले आहे.
महाराजांचे रत्नजडीत सिंहासन, हिरे-माणिकमंडित राजमुकुट, रेशमी उंची पेहराव ई. ची तयारी सुरु आहे.
शास्त्रशुद्ध राज्याभिषेकासाठी काशीवरून वेदविद्याविभूषित अनेक महापंडित ब्राह्मण आले आहेत आणि राज्याभिषेकाच्या विविध विधींसाठी पंचनद्यांच्या पवित्र जलापासून ते चंदन-अष्टगंधादी नाना परिमळ द्रव्यांपर्यंत प्रत्येक बारीक सारीक तपशीलाकडे जातीने लक्ष देत आहेत.
स्वराज्याचं सैन्यदेखील जोरदार तयारीत आहे. विविध पथके आपापल्या विशिष्ट गणवेशात संचालनाची तयारी करत आहेत. राज्याभिषेक समारोहाच्या वेळी कुठलीही आगळीक होऊन नये याची दक्षता घेण्यासाठीची सज्जता चालू आहे.
आणि अखेरीस महाराष्ट्राची भाग्यरेखा बदलणारा; मराठी मातीला तिच्या अस्तित्वाची ओळख करून देणारा, मराठी माणसाच्या अस्मितेचा मानबिंदू असलेला तो दिवस; तो क्षण आला आहे.
रायगडावर पहाटेच्या मंगलप्रसंगी होम-हवनादी अनेकविध विधी संपन्न झाल्यानंतर महाराजांवर पंचनद्यांच्या पवित्र जलाचा अभिषेक करण्यात आला आहे. त्यानंतर महाराष्ट्राची भाग्यदेवता शिवाजी महाराज हे राजसिंहासनावर अधिष्ठित झालेले आहेत. वेदमंत्रघोषात शिवाजी महाराजांवर छत्र-चामर धरली गेली आहेत आणि गागाभट्ट आपल्या खड्या आवाजात छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा वाचून दाखवत आहेत "प्रतीपश्चंद्रलेखेव.............."

आणि चित्रपट येथेच संपतो!

(लेखन - सारंग भणगे)

* * * * * * * * * * * * * *

"मराठी कविता समूहा"च्या "लिहा प्रसंगावर गीत - भाग क्र. २२ ("मराठी भाषा दिन" विशेष)"मध्ये अफाट वर्णन केलेल्या ह्या ऐतिहासिक प्रसंगासाठी गीत लिहिण्याचा माझा प्रयत्न - 


कोरस -

{उजळेल नवा रवि आज नभी 
तव नाम असे शिवछत्रपती 
गगनासम हा अभिमान उरी 
जयघोष करा शिवछत्रपती
शिवछत्रपती !! शिवछत्रपती !! शिवछत्रपती !! शिवछत्रपती !!}

राजाधिराज मावळचा भाग्यास बदलण्या आला
स्वप्नील स्वराज्याला हा सत्यात आणण्या आला 

सरणार दूर तो आता अंधार पारतंत्र्याचा
येथे फुटणार नव्याने ह्या मातीलाही वाचा
छातीत एक शौर्याचा अंगार फुलवण्या आला 
स्वप्नील स्वराज्याला हा सत्यात आणण्या आला  

जे पीडित शोषित होते जे वंचित शोणित होते
जे गाडा अन्यायाचा पाठीवर ओढित होते
त्यांच्या हाती बंडाचे औजार सोपण्या आला 
स्वप्नील स्वराज्याला हा सत्यात आणण्या आला 

लगबग खटपट जिकडे तिकडे सजावटीची चाले 
तासुन लखलख चमचमती साऱ्या तरवारी-भाले 
गनिमांचा नाश कराया शस्त्रांस उपसण्या आला 
राजाधिराज मावळचा भाग्यास बदलण्या आला
स्वप्नील स्वराज्याला हा सत्यात आणण्या आला 

कोरस -

{उजळेल नवा रवि आज नभी 
तव नाम असे शिवछत्रपती 
गगनासम हा अभिमान उरी 
जयघोष करा शिवछत्रपती
शिवछत्रपती !! शिवछत्रपती !! शिवछत्रपती !! शिवछत्रपती !!

पंच*नद्यांचे आशीर्वच तव अभिषेकरुप लाभते 
राजमुकुट अन हे सिंहासन तुला खरे शोभते 
**प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता 
शाहसूनो: शिवस्यैषामुद्राभद्रायराजते**| }


....रसप....
३ मार्च २०१२ 


*एक असाही समज आहे की पाच नव्हे, सात नद्यांचे पाणी होते. तसे असल्यास 'पंच' ऐवजी 'सप्त' करावे.

**शिवाजी महाराजांची राजमुद्रा - 
"प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसूनो: शिवस्यैषामुद्राभद्रायराजते|"

Saturday, March 03, 2012

कुणाकुणाला

माफ करावे कुणाकुणाला
समजुन घ्यावे कुणाकुणाला 

मंदिरातही खोगिरभरती
देव म्हणावे कुणाकुणाला 

नव्या युगाचा धर्मराज मी
स्वत्त्व हरावे कुणाकुणाला   

अवतीभवती असंख्य कविता 
सांग लिहावे कुणाकुणाला 

उरले सुरले श्वास नकोसे
उधार द्यावे कुणाकुणाला 

"मीच शहाणा" सारे म्हणती
मूर्ख म्हणावे कुणाकुणाला 


....रसप....
३ मार्च २०१२
Related Posts Plugin for WordPress, Blogger...