Monday, April 16, 2012

दीप विझला पण अजुनही तेज आहे राहिले..

शाळेपासूनच माझी वाचनाची आवड मर्यादितच होती. लहानपणापासूनची ही सवय मी आजतागायत जपली आहे! शाळेत असताना दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत मी पुढल्या वर्षाचे मराठीचे पुस्तक मात्र पूर्ण वाचून काढायचोच. मला भाषेची आवड आहे हे मला उशीरानेच कळले आणि अनावधानानेही!

जेव्हा मला माझी आवड कळली, तेव्हा मी लिहायलाही लागलो होतो. कवितेशी तर माझा पूर्वीही फारसा संबंध नव्हता. (मराठीचं पुस्तक वाचून काढायचो, तेसुद्धा कविता वगळूनच..!) तसं नाही म्हणायला कणा, कोलंबसाचे गर्वगीत (कुसुमाग्रज), भ्रांत तुम्हा का पडे (माधव ज्युलियन), माणूस माझे नाव (बाबा आमटे) अश्या काही कविता प्रचंड आवडल्या होत्या व बऱ्यापैकी पाठही होत्या (आहेत.).
पण कॉलेजनंतर पहिल्यांदा जेव्हा मला एका कवितेने भुरळ घातली, तो क्षण मला अगदी व्यवस्थित आठवतोय.

एका सकाळी मी बेळगांवहून मडगांवला बसने जात होतो. बसमध्ये बसण्यापूर्वी मी बेळगांव बस स्थानकात 'तरुण भारत' घेतला बसमध्ये वाचायला. पूर्ण पेपर वाचला, चाळला आणि मग पुरवणीही उघडली! त्यात एक विडंबन काव्य होतं. मूळ रचनासुद्धा तिथे दिली होती. ही -

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते

गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
(पाऊल कधी वाऱ्याचे माघारी वळले होते?)

मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते

ह्याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते

नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते

घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते

- सुरेश भट

विडंबन मी वाचलंच नाही. मी ही कविताच (हो. गझल वगैरे मला तेव्हा काही समजायचं नाही.) असंख्य वेळा वाचली. पेपर पुन्हा पुन्हा उघडून वाचली.. मला त्यातील एकेक द्विपदी बेचैन करत होती. मी प्रत्येक वेळेस ती रचना वाचून मनातल्या मनात 'वाह वाह' करत होतो. अनेकदा काटा आला. संपूर्ण प्रवासात मी ती रचना इतक्या वेळा वाचली की मला पाठच झाली! मग पेपर हातात नसताना, ती रचना समोर नसतानाही माझ्या मनात त्या ओळीच मी वाचत होतो. ही पहिली खऱ्या अर्थाने मला झालेली भटांच्या लिखाणाची अनुभूती होती. मी ते कात्रण अजूनही माझ्या डायरीत ठेवले आहे.

पुढे अजून काही वर्षांनी मी ऑर्कुट-फेसबुकवरील मित्रांच्या सहवासाने कविता लिहू-वाचू लागलो आणि मग 'गझल'शी परिचय झाला. 'बाराखडी' वाचली.. कधी कधी मोडक्या तोडक्या गझलाही लिहिल्या. गझलेचे जे काही तंत्र-मंत्र समजले, आजमावले ते केवळ ती बाराखडी समोर ठेवून..

आज भट साहेबांना अभिवादन करताना मला काजव्याने सूर्याला ओवाळावे असं वाटतंय. माझ्यासारखे असंख्य गझलेचे चाहते, कवी ह्या सूर्याच्या तेजाने टीमटीम करत आहेत. माधव ज्युलियन ह्यांच्यानंतर, सुरेश भटांच्या काळातही ज्या ताकदीने आणि श्रद्धेने त्यांनी गझल फुलवली, तितकं करणारं दुसरं कुणीही नव्हतं. पण आज ह्या काव्यप्रकारावर मनापासून प्रेम करणारे आणि तो हाताळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारे अनेक जण आहेत. खरोखर त्यांच्या ह्या ओळी सर्वार्थाने खऱ्या आहेत -

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते
सुरेश भट 
(१५ एप्रिल १९३२ - १४ मार्च २००३)

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...