Tuesday, April 24, 2012

ती कविता तर माझी होती :-(


दुनिया वाचुन हसली होती
कुणी 'उचलली' हळूच होती
'मेल'मधुन जी धावत होती
ती कविता तर माझी होती :-(

प्रसववेदना मीच साहिल्या
शब्दकळ्या त्या मीच फुलविल्या
पर्वा त्याची कुणास नव्हती
पण कविता तर माझी होती :-(

बिननावाची तुम्ही छापली
अगतिक पुरुषांनीहि वाचली
'नावही लिहा', तुम्हा विनंती
कारण कविता माझी होती :-(

माझी प्रतिभा माझ्यापाशी
नसेल भिडली आकाशाशी
तरी पोटची पोरच होती
ती कविता तर माझी होती :-(

तुमच्यासाठी 'स्लॉट' एकला
पेपरवरचा 'प्लॉट' रंगला
'नेटवरून साभार'च होती
पण कविता तर माझी होती :-(

'भव्य-दिव्य' नावाचा पेपर
अडलं का हो तुमचं खेटर?
गरिब कवीच्या नावापोटी
खरेच कविता माझी हो ती! :-(

....रसप....
२४ एप्रिल २०१२
एका नावाजलेल्या वृत्तपत्रात माझी कविता 'इंटरनेटवरून साभार, कवीचे नाव माहित नाही' असे लिहून छापून आली. राग नाही, रोष नाही. छापून आली, ह्याचा आनंदच. पण नाव न आल्याने जरासं दु:ख झालं. म्हणून ही जराशी गंमत..!

2 comments:

  1. शेवटच कड़व खरच सुन्दर लिहिण्यात आलय. वाचताना मजा पण वाटली पाहिजे आणि कवितेतल कारुन्य स्पष्ट दिसल पाहिजे.

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...