Saturday, June 30, 2012

विसरुन जाणे अवघड आहे..


कधीकाळची तुटकी-फुटकी स्वप्ने सारी विसरुन गेलो
डोळ्यांना रोजच खुपणारे विसरुन जाणे अवघड आहे
बरेच पाणी वाहुन गेले पुलाखालच्या प्रवाहातले
माझे घर वाहुन नेणारे विसरुन जाणे अवघड आहे

दिवस रोजचा उदासवाणा रोज उगवतो अन मावळतो
उगाच काही तांबुसरंगी शिंतोड्यांना दूर उधळतो
एक कोपरा आभाळाचा मनासारखा करडा दिसता
क्षितिजावरती भळभळणारे विसरुन जाणे अवघड आहे

थबथबल्या पाउलवाटेवर प्राजक्ताचा सडा सांडला
तिथेच त्या वळणाच्या आधी मी नजरेला बांध घातला
किती गंध मी उरात भरले अन श्वासांना गुंतवले पण,
नसानसांतुन दरवळणारे विसरुन जाणे अवघड आहे

कपोलकल्पित तीरावरती अगणित लाटा खळखळ करती
मनातल्या फेसाळ मनाला फिरून येते अवखळ भरती
नकोनकोसे भिजणे होता माझे पाउल मीच अडवतो
रेतीवर अक्षर बुजणारे विसरुन जाणे अवघड आहे

जमेल का तू सांग एकदा तुला जरासे पुन्हा बहकणे
पुन्हा एकदा मिठीत येउन रोमरोम अंगावर फुलणे
मी माझ्या चुकल्या ठोक्यांना अजून थोडे जुळवत आहे
तुझ्या मनातुन धडधडणारे विसरुन जाणे अवघड आहे  

....रसप....
३० जून २०१२

Friday, June 29, 2012

विस्कळीत वासेपुर - (Gangs of Wasseypur) - Review

"मोठ्या नावाजलेल्या व्यक्तींचा एकेरी उल्लेख करून किंवा ज्याला-त्याला काका-मामा-दादा-मावशी-आत्या म्हणून दाखवून आपली किती चांगली ओळख आहे असं दाखवलं, की आपणही कुणी तरी असामी बनतो." हा हमखास फॉर्म्युला जसा सर्वांना माहित आहे; तसंच "जिथे जमेल तिथे मनसोक्त भ-कार, म-कार घालून, अतिरंजित खून-मारामाऱ्या किंवा काही तरी विक्षिप्त/ विकृत/ भडक/ अश्लील/ क्रूर/ बीभत्स वगैरे चित्रण केलं की आपला चित्रपट वास्तवदर्शी होतो आणि 'हट के' ठरतो", हाही फॉर्म्युला सर्वांना माहित होत चालला आहे. 'गँग्स ऑफ वासेपुर' अश्याच पठडीतला एक तथाकथित 'हट के' सिनेमा वाटला. (इंग्रजीत नाव देणं - हाही एक 'फॉर्म्युला'!)

सिनेमाची सुरुवात होते तीच गोळ्यांच्या धो-धो वर्षावाने. वासेपुर, बिहार (आता झारखंड) मधील एक छोटंसं खेडं.. तिथले कुणी गुंड कुणाच्या तरी वाड्यावर बॉम्ब आणि गोळ्यांचा असा काही पाउस पाडतात की तिथेच कल्पना येते की पुढे तुम्हाला असं काही बघायला मिळणार आहे, जे पूर्वी क्वचितच पाहिलं असेल. 
सिनेमाची एकूण कहाणी साधारणत: तीन कालखंडातली आहे. एक स्वातंत्र्यपूर्व (१९४१-४२), स्वातंत्र्योत्तर - १ (१९४७ च्या आसपास) आणि स्वातंत्र्योत्तर - २ (१९८० चे दशक). 
१९४१ ची गोष्ट. धनबादजवळील वासेपुर गावात 'कुरेशी' जातीच्या सुलताना डाकूचं वर्चस्व असतं. एकंदरीतच कुरेशी, ह्या कसाई ह्या जमातीचा गावावर वचक असतो. हा भाग मुस्लीमबहुल दाखवला आहे. इथल्या मुस्लिमांचे सरळसरळ दोन भाग आहेत. एक कुरेशी आणि दुसरा इतर. तर, हा सुलताना इंग्रजांच्या रेल्वेगाड्यांना लुटत असे. गावातील 'शाहीद खान' नामक पठाण सुलतानाच्या नावाचा - धाकाचा - फायदा घेऊन त्याच्या नावाने लुटमार सुरू करतो. रेल्वेही लुटतो. ही माहिती सुलतानाला कळल्यावर तो शाहीद खानच्या संपूर्ण टोळीला कंठस्नान घालतो आणि जिवंत वाचलेला शाहीद खान बायकोच्या अन होणाऱ्या बाळाच्या प्रेमाखातर लुटमार सोडतो, वासेपुरही सोडतो आणि धनबादला येऊन कोळश्याच्या खाणीत मजुरी करू लागतो. त्याची बायको मुलाला जन्म देताना मरण पावते. मजुरांवर वचक ठेवणारा पहेलवान त्याला वेळेवर घरी जाऊ देत नाही, म्हणून तो त्यास बदडून काढतो. त्याची हिंमत व ताकद बघून कोळश्याच्या खाणीचा नवा मालक 'रामाधीर सिंग' त्याला त्याचा खास माणूस बनवतो. पण शाहीद खानच्या मनात घातक विचार असतात, जे रामाधीरला समजतात आणि वेळीच तो शाहीद खानचा काटा काढतो, अर्थात त्याला मारून टाकतो. खानाचा जुना साथीदार, खानाच्या ६-७ वर्षांच्या मुलाला घेऊन पळतो आणि त्याला वाढवतो. हा मुलगा लहान वयातच शप्पथ घेतो की, "रामाधीर सिंगला बरबाद करून बापाच्या खूनाचा बदला घेईन, त्यानंतरच केस वाढवीन!"
कट. मुलगा मोठा झाला आहे - टकला मनोज वाजपेयी, नाव 'सरदार खान'.
सरदार खान, सिनेमातील इतर प्रत्येक व्यक्तिरेखेप्रमाणे उदरनिर्वाहासाठी गुंडगिरी, लुटमार वगैरेच करत असतो. पुढे तो वासेपुरला येतो. काही तरी काही तरी करतो आणि रामाधीरला त्रास देतो. बायकांची लफडी करतो. खून करतो.. स्मगलिंग करतो.. अनधिकृत जमिनी बळकावतो.. हफ्ता वसुली करतो.. अखेरीस अगदी मासेमारीही करतो. त्याचा बदला पूर्ण होतो का? हे बघायचं असेल(च) तर सिनेमा पाहा. (नाही पाहिला, तरी फरक काहीही पडणार नाही. पण तरी......)

१. एकंदरीत सिनेमाची कथा उत्कंठावर्धक आहे. पण मांडणी अत्यंत विस्कळीत वाटली. सरदार खानचं 'दुर्गा' (रीमा सेन)शी लफडं दाखविण्याचं, त्याला 'रंडीबाज' दाखविण्याचं प्रयोजन सिनेमातील इतरही काही घटना व पात्रांप्रमाणे, कळत नाही. अश्या अनेक अनावश्यक पात्र व घटनांमुळे अनेकदा असं विचार येतो की, अरे नक्की काय चाललं आहे? आणि मग अर्थातच शेवट अचानक 'कसा तरी' होतो.
२. सिनेमात सर्वात महत्त्वाचे काम कुणाचे असेल तर निवेदक! निवेदन आहे, म्हणून सिनेमा मला तरी थोडाफार कळला. अन्यथा अनन्वित तुकड्यांना एकत्र सांधणं सहज शक्य करण्याचं कसब दिग्दर्शकात आहे का? - हा वादाचा विषय ठरावा. (निवेदकाचा आवाज बहुतेक मनोज वाजपेयीचाच आहे, मी श्रेयनामावली बघण्यास थेटरात थांबलो नाही. सिनेमा संपल्या संपल्या बाहेर पडलो. कारण मला बाहेर पडून 'नॉर्मल' भारत पाहायची अनावर इच्छा झाली होती.)  
३. खून, मारामाऱ्या, लुटालूट, वगैरे वगैरे इतकं सर्रास चाललेलं दाखवलं आहे की अतीच वाटावं. मान्य आहे, भारतातही असे काही भाग आहेत जिथे कायदा सुव्यवस्था नामशेषच असावी. परंतु, अश्या ठिकाणीही पोलिसांचा वावर असतोच, फक्त ते भ्रष्ट/ सामील असतात. पण सिनेमात तर म्हणजे 'जंगल कानून'च आहे! हे म्हणजे फार्रच काहीच्या काही वाटतं. हा भारत आहे की अफगाणिस्तान ?
४. दर १० मिनिटांनी कुणा ना कुणाच्या आई-बहिणीचा उद्धार केल्याने सिनेमा वास्तवदर्शी होतो, हा समज जर खरोखरच प्रेक्षक आणि दिग्दर्शक-निर्माते-लेखकांत दृढ झाला असेल, तर ही चिंतेची बाब आहे. पूर्वी 'कहानी की जरूरत' म्हणून अंगप्रदर्शन वगैरे केलं, असं म्हटलं जायचं. आता तर  'कहानी की जरूरत' म्हणून आम्ही अश्लील/ अश्लाघ्य वगैरे काही केलं नाही, असं म्हणायची वेळ आली आहे की काय? की आणायची आहे? गेट वेल सून, बॉलीवूड ! वास्तव म्हणजे शिवीगाळ नाही, अश्लीलता नाही. वास्तव भेदक असलं तरी ते परिणामकारकरीत्या दाखविण्यासाठी बिनधास्तपणाची कुबडी घेणं एक वेळ ठीक पण त्याच  एका बांबूवर अख्खा तंबू उभारणार असाल, तर अल्लाह मालिक !
५. संगीत ? ते काय असतं भाऊ?
६. सिनेमातील अनेक व्यक्तिरेखा (यादव, रामाधीरचा मुलगा, दुर्गा, दुर्गेची पोरं, ई.) आणि घटना (फैजल खान - नवाझुद्दिन सिद्दिकी - ची 'डेट', त्याने वाराणसीला जाऊन बंदुका घेऊन येणे आणि पकडलं जाणे,  नंतर परत तिथे जाऊन 'यादव'ला मारणे, सरदार खानची तुरुंगवारी, मासेमारी, ई.) मूळ कथेला भरकटवण्याचं काम करतात.
७. नवाझुद्दिन सिद्दिकी ला ह्या भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला आहे, असं ऐकलं. पण मला तर तो सिनेमात का आहे, हेच कळलं नाही. त्याच्या अभिनय कौशल्याला अक्षरश: वाया घालवलं आहे. 
८. सिनेमाच्या शेवटी 'To be continued....' आहे. ह्याचा अर्थ कदाचित कहाणी अजून बाकी आहे! हे तर अजूनच वाईट ! माझ्या मते तीन तासांत कुठलीही कहाणी पूर्णपणे मांडता आली पाहिजे. जमत नसल्यास सरळ सिरीयल काढावी!

मागे एकदा एका अत्यंत रद्दड चित्रपटावर मी सडकून टीका केल्यावर एका जाणकार वाचकाने मांडलेला एक मुद्दा मला मनोमन पटला होता. सिनेमा बघायला जाताना, प्रेक्षक आणि निर्माता-दिग्दर्शक ह्यांच्यात एक छुपा करार झालेला असतो. काही निर्माता-दिग्दर्शकांचे सिनेमे हे टोटली इललॉजिकलच असतात, तर काहींचे सिनेमे जरा सेन्सिबल वगैरे असतात, काहींचे अजून काही, काहींचे अजून काही...... थोडक्यात, एकाच मोजपट्टीवर डेव्हिड धवन, मणीरत्नम, कारण जोहर, वगैरे सगळे मोजले जाऊ शकत नाहीत. हाच विचार मनात होता आणि मी अनुराग कश्यपच्या सिनेमाला मोठ्या अपेक्षेने गेलो होतो. तब्बल तीन तासांच्या गदारोळानंतर मी जेव्हा बाहेर आलो, तेव्हा थोडक्यात सांगायचं तर, मला टोटलच लागली नाही! कदाचित हा सिनेमा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या इतर अनेक सिनेमांपेक्षा किंचित सरस असेलही, नव्हे आहेच ; पण अनुराग कश्यप...? बॉस, यु एक्स्पेक्ट समथिंग बेटर प्लीज!एक ठिणगी वेचली मी जाळताना हृदय माझेबोललो जे जे कधी मी बोललो नाही खरोखर
पण तरीही वाद झाला चूक होते की बरोबर !

तोडले नात्यास ह्याचे फारसे ना दु:ख झाले
का न सांगितले कधी तू सत्य लोकांच्या अगोदर ?

भिजवल्या मी पापण्या अन भास झाला पावसाचा
स्वच्छ डोळ्यांनी कधी नव्हते बघितलेले मनोहर

मी तुझ्या डोळ्यांत गंगा पाहिली अन धन्य झालो
लपवतो डोळ्यांमधे लोणारचे खारे सरोवर

दाखवा माणूस जो म्हणतो "सुखी आहे इथे मी"
चेहरा हसरा खरा मी शोधण्या फिरलो घरोघर

एक ठिणगी वेचली मी जाळताना हृदय माझे
तीच ठिणगी आणि ही कविता असे बहुधा सहोदर

सांगती सारेच, "जीतू, जा तिला विसरून आता"
काय सांगा लागते देण्यास हे सल्ले अगोचर ?

....रसप....
२७ जून २०१२

Thursday, June 28, 2012

एक ठिणगी तू


भक्तीची ठिणगी
चेतवली मनी
उजळलो झणी
रोम रोम

प्रेमाची ठिणगी
व्यापता हृदया
दिसू लागे प्रिया
ईश रूप

द्वेषाची ठिणगी
भडके डोळ्यांत
आपलाच घात
होणे खास

गर्वाची ठिणगी
छातीला फुलवी
बुद्धीला भुलवी
माती होई

हासरी ठिणगी
सांडत राहावी
दुनिया पाहावी
उत्साहित

एक ठिणगी तू
एक याग जग
किरकोळ धग
मानवा तू..

....रसप....
२८ जून २०१२

Thursday, June 21, 2012

पावलांपाशीच आता जोजवा हो विठ्ठला

आज काही आपलेही ऐकवा हो विठ्ठला
दु:ख विश्वाचे मलाही दर्शवा हो विठ्ठला

रोज माझे एव्हढेसे दु:ख मी गोंजारतो
अंश थोडा 'माउली'चा दाखवा हो विठ्ठला

पंख फुटले ह्या मनाला भरकटे येथे-तिथे
अंबराच्या पिंजऱ्यातुन सोडवा हो विठ्ठला

आर्ततेने मागतो प्रत्येक जण काही तरी
मी कधी लाचार झालो ? आठवा हो विठ्ठला

मी कवाडे उघडली माझ्या मनाची, आत या
अन् प्रियेची रिक्त गादी चालवा हो विठ्ठला

शोधले आहे तुम्हाला खूप मी सगळीकडे
एकदा माझ्यामधूनच जाणवा हो विठ्ठला

वाटते की झोपलो नाही किती वर्षांत मी
पावलांपाशीच आता जोजवा हो विठ्ठला

....रसप....
२० जून २०१२    

Tuesday, June 19, 2012

मी कधी बोललो नाही..


जा दूर कितीही तू पण, असशील तरीही जवळी
ना सूर्य कधीही विझतो, किरणांस जरी तो उधळी
मी असाच तळपत होतो, पण तुलाच दिसले नाही
मी कधी बोललो नाही, अन तुला समजले नाही

भिरभिरता नीलाकाशी मी एकलकोंडा मेघ
वा तांबुस क्षितिजावरची मी क्षणात पुसली रेघ
गहिवरलेल्या धरणीला मी कधी भिजवले नाही
मी कधी बोललो नाही, अन तुला समजले नाही

पानांना झाडुन साऱ्या गुलमोहर मी मोहरलो
झेलून झळा दु:खाच्या मी मनासारखा फुललो
मी चाफा बनून माझ्या गंधास उधळले नाही
मी कधी बोललो नाही, अन तुला समजले नाही

तू हसताना मी माझ्या डोळ्यांचा सागर प्यालो
तू चिंब चिंब भिजताना मी मनात माझ्या न्हालो
माझ्या कविताही हसल्या, दु:खास उधळले नाही
मी कधी बोललो नाही, अन तुला समजले नाही

धगधगता लाव्हा माझ्या छातीत कोंडला आहे
एकेक निखारा माझ्या डोळ्यांत पेरला आहे
बेचिराख झालो आहे, पण तू पेटवले नाही
मी कधी बोललो नाही, अन तुला समजले नाही

आरोप कधी ना केले, ना दिला तुला मी दोष
तू मित्र मानले होते, ह्याच्यात मला संतोष
मन माझे झोके घेते, पण कधी उलटले नाही
मी कधी बोललो नाही, अन तुला समजले नाही

एकेक तुझ्या अश्रूला टिपण्यास धावलो होतो
मी तुला घडवण्यासाठी शून्यात संपलो होतो
पण माझ्या अस्तित्वाला माझ्यात रुजवले नाही
मी कधी बोललो नाही, अन तुला समजले नाही..

मी कधी बोललो नाही, अन तुला समजले नाही....!

....रसप....
१९ जून २०१२

Monday, June 18, 2012

कधी कधी


वाट चालली, तसा चालतो कधी कधी
हवा वाहिली, तसा लहरतो कधी कधी

मला जवळचा मित्र मानती किती तरी
तरी एकट्याने मी रडतो कधी कधी

धडपडलो अन सावरलो मी अनेकदा
हार मानली तरी जिंकतो कधी कधी

तू सागर मी तुझा किनारा निवांतसा
तुझा असुनही तुझाच नसतो कधी कधी

मला सुखी करण्याकरिता झटतेस खरी
तरी तुला मी दु:खी करतो कधी कधी

नकळत होते तुझ्यामुळे संपूर्ण गझल
अथवा मी काफियात चुकतो कधी कधी

....रसप....
१७ जून २०१२

Sunday, June 17, 2012

सर येते जेव्हा जेव्हा....


सरल्या स्मरणांच्या ओठी उत्कट शब्दांचे गाणे
हलकासा शीतल वारा हातातुन निसटुन जाणे
सावरतो भरकटणाऱ्या बेधुंद मनाला जेव्हा
दरवळत्या संध्याकाळी सर रिमझिम येते तेव्हा

विसरुन गेलेली प्रीती धडधडत्या हृदयी दाटे
झुकलेले अंबर पाहुन संदेह अनामिक वाटे
खिडकीची चौकट मजला खिळवून ठेवते जेव्हा
आक्रोश आतला घेउन सर धो-धो येते तेव्हा

हातावरच्या रेघांतुन भलतीच वाट सापडते
अन मनासारख्या देशी मन पळभर हे बागडते
माझ्यातच रमलो असतो मी कधी नव्हेतो जेव्हा
दबकून छुप्या रस्त्याने सर उगाच येते तेव्हा

ओथंबुन येता डोळे निर्धास्त चिंब मी भिजतो
आभाळ मोकळे होता मी क्षितिजापाशी थिजतो
मन पुन्हा पुन्हा वेडावुन भिजण्यास धावते जेव्हा
बरसून दूर गेलेली सर फिरून येते तेव्हा

छुनछुन पैंजणनादाने नजरेची भिरभिर होते
हळुवार तुझ्या गंधाने भारून हवा ही जाते
रेशीम खुल्या केसांचा मज स्पर्श जाणवे जेव्हा
आकाश फिरून उजाडे सर चुकवुन जाते तेव्हा

....रसप....
१६ जून २०१२

Friday, June 15, 2012

खपलीरक्ताचं पाणी तर कधीचंच झालंय..
फरक इतकाच की,
पूर्वी डोळ्यातून बाहेर वाहायचं..
आता आतल्या आत झिरपतंय

दिसायला मी कोरडाठाण दिसतो
पण आतून चिंब चिंब असतो
आणि लोक म्हणतात -
माझ्या हातात मायेचा ओलावा वाटतो....!

रोज रात्री धरते,
रोज सकाळी उघडते
डोळ्यांच्या जखमांवर पापण्यांची खपली
एकही थेंब बाहेर न सांडता,
मी तुझी प्रत्येक आठवण
अशीच तर जपली...!

प्रत्येक जखम... फक्त तुझी,
प्रत्येक खपली... फक्त माझी..
पण तीसुद्धा रात्रीपुरतीच.....

....रसप....
१४ जून २०१२

Thursday, June 14, 2012

वाढले पेट्रोलचे दर आणखी!


तरही गझल -

येत जा देऊन थोडी कल्पना 
देत जा येऊन थोडी सांत्वना

ओसरीच्या कंदिलासम पेटलो
ना घराची वा नभाची कामना

भांडलो अन जिंकले दुनियेस मी
आज पण आहे स्वत:शी सामना 

पत्थराला देव म्हणती माणसे
माणसे दिसण्यास लागे साधना 

जीवनी ह्या लाभली सारी सुखे
अन तरी दु:खात माझी वासना 

पोर फेके पोटची कचऱ्यामधे
माउलीला त्या कशाची वंदना? 

वाढले पेट्रोलचे दर आणखी
जाळतो गाडीस ओतुन इंधना ! 

....रसप....
१३ जून २०१२ 
(तरह - "येत जा देऊन थोडी कल्पना") 

Wednesday, June 13, 2012

का लिहितो मी कविता?


का लिहितो मी कविता?
कारण 'ती' लिहित नाही..
तीच जिला आजकाल गुलाबी रंग खूप आवडतो
किती ठोके चुकले त्याचा हिशेब नेहमी चुकतो
ती हसत राहते मनातल्या मनात
कुणालाच न सांगता
मी तेच मोती वेचतो आणि
गुंफतो माझी कविता !

का लिहितो मी कविता?
कारण 'तो' लिहित नाही..
तोच ज्याला कुठे दुखतंय तेच कळत नाही,
पण दु:ख उगाळायला आवडतं
त्याची व्यथा डोळ्यातून झरत राहते
काहीच न बोलता..
मी तेच शब्द टिपतो आणि
गातो माझी कविता !

का लिहितो मी कविता?
कारण 'तो' लिहित नाही..
तोच जो फक्त किनाऱ्याच्या दगडांवर आपटत राहातो
पुन्हा पुन्हा मागे जाऊन, पुन्हा पुन्हा उसळत राहातो
तो खवळतो, आतल्या आत खदखदतो..
कधीच न थकता
मी तोच उत्साह चोरतो आणि
उधळतो माझी कविता !

का लिहितो मी कविता?
कारण 'ते' लिहित नाहीत
तेच जे प्रत्येक गोष्ट शांतपणे बघतात
अन्याय, अत्याचार मूकपणे साहतात
चरफडतात, तळमळतात, धुमसतात
पण बायका-पोरं पाहून परत शांत होतात
ते चिडतात स्वत:वरच
पण कुणाला न दाखवता
मी तीच हताशा जाणतो आणि
देतो माझी कविता !

का लिहितो मी कविता?
कारण 'तो' कधीच लिहित नाही
तोच ज्याच्याकडे निर्मितीची शक्ती आहे,
पण व्यक्त व्हायची युक्ती नाही !
तो पाहतोय सगळं वर बसून
त्याने धरलाय हात माझा
आणि घेतोय सगळं लिहून
तोही होतो कधी खूष, कधी नाखूष
मग करतो मलाच लिहिता...
मी त्याचेच बोल बोलतो आणि
प्रसवते माझी कविता....

....रसप....
१३ जून २०१२

Tuesday, June 12, 2012

मन भरून गेले प्रेमाने मी रिताच होतो ना?मन भरून गेले प्रेमाने मी रिताच होतो ना?
नव्हतीस कधी तू माझी पण मी तुझाच होतो ना ?

"चल विसरुन जाऊ झाले-गेले, जगू नवे आता"
म्हटलेस तरीही गुरफटून मी उगाच होतो ना ?

तुज बरेच काही दिले सुखी करण्याला नशिबाने
पण मनात गुपचुप जपलेली मी व्यथाच होतो ना ?

मज वेडा मानुन सोडुन जा, हरकत नाही माझी
'तो' प्रेम तुझ्यावर करणारा मी खुळाच होतो ना?

माझ्या पायाशी हरून ही दुनिया लोळण घेवो
तू समोर माझ्या आल्यावर मी खुजाच होतो ना ?

तुला नेहमी तुझ्या घराची चौकट प्यारी होती
केलेस मनातुन प्रेम तरी मी 'दुजा'च होतो ना ?

....रसप....
११ जून २०१२

Monday, June 11, 2012

तुझी निराळीच तऱ्हा

'मराठी कविता समूहा'च्या 'लिहा ओळीवरून कविता - भाग क्र. ९४' मध्ये माझा सहभाग -

दुडूदुडू धावण्याची, गोड गोड बोलण्याची
निरागस हसण्याची, उगाचच रुसण्याची
तुझी निराळीच तऱ्हा, खेळवते साऱ्या घरा
तुझ्यातच दिसते रे, बालपण माझे मला

तुझी निराळीच तऱ्हा, तुझी निराळीच तऱ्हा

तुझ्या हाती बोट देता, तुझ्यासोबत चालता
जाशील तू तेथे जाता, तुला उचलून घेता
आनंदाची वाही धारा, मनाला नसावा थारा
तुझ्यातच दिसते रे, बालपण माझे मला

तुझी निराळीच तऱ्हा, तुझी निराळीच तऱ्हा

बोलघेवड्या डोळ्यात मऊ इवल्या हातात
जादूभरल्या बोलात, खळी पडल्या गालात
मला सापडतो जरा, माझ्या मनाचा निवारा
तुझ्यातच दिसते रे, बालपण माझे मला

तुझी निराळीच तऱ्हा, तुझी निराळीच तऱ्हा

गुंतवून माझे मन, हरवून देहभान
इथे दूर मी असून, तुझ्यासोबत राहून
सारी रात दिन सारा, तुझा चेहरा हासरा
तुझ्यातच दिसते रे, बालपण माझे मला

तुझी निराळीच तऱ्हा, तुझी निराळीच तऱ्हा

 ....रसप....
१० जून २०१२

Sunday, June 10, 2012

माझेच घर टाळून..


माझेच घर टाळून नभातून मेघ निघाले होते
माझ्या दु:खाने माझे अंगण कधीच न्हाले होते

मी कोरडवाहू मातीमध्ये बाग फुलवला हसरा
तू फुले वेचता केवळ काटे मला मिळाले होते

क्षण एक जरासा थांब जीवना तुला न्याहळू दे ना
पाऊल तुझे अन माझे सोबत कधी न आले होते

मी डोक्यावरती छप्पर येण्यासाठी धडपड केली
अन पायाखाली जमीन येता सर्व उडाले होते

आयुष्य असावे कसे मला ही जाणिव झाली जेव्हा
तोपर्यंत 'जीतू' जीवन माझे जगून झाले होते


....रसप....
१० जून २०१२

Thursday, June 07, 2012

दहावीपर्यंत प्रत्येक पावसाळा असाच होता.. (पावसाळी नॉस्टॅलजिया)


१५.
जीवशास्त्राच्या तासाला
खिडकीबाहेर पत्र्यावरून वाहणाऱ्या पाण्यात
गुंतलेलं माझं मन
आणि समोर चाललेलं
जास्वंदीच्या फुलाचं विघटन...

फळ्यावर बीजगणिताची रांगोळी काढणाऱ्या
सरांचं कृत्रिम बोलणं
आणि मी
वर्गाच्या दाराबाहेरच्या ओहोळात
मनातल्या मनात कागदी होड्या सोडणं..

पहिल्या पावसाचे थेंब पडताच
पसरलेला गारवा,
छातीत भरलेला मातीचा सुगंध
आणि सुस्तावलेल्या पायांना बाकाखाली ताणून...
थोडंसं मागे रेलून..
तिच्याकडे बघण्याचा आवडता छंद..

दहावीपर्यंत प्रत्येक पावसाळा असाच होता
प्रत्येक थेंब अगदी मनापासून माझाच होता..

चिंब चिंब होण्यासाठी माझं मन
शाळेत जाऊन येतं
प्रत्येक पावसात जेव्हा जेव्हा
आभाळ भरून येतं......

....रसप....
७ जून २०१२


पावसाळी नॉस्टॅलजिया (सर्व)


Wednesday, June 06, 2012

मुसक्या बांधलेली कविता


मुसक्या बांधलेली कविता
काल स्वप्नात आली
तिची घुसमट पाहून माझीही
खूप घालमेल झाली

मी म्हटलं, 'सोडवतो तुला'
ती म्हणाली, 'राहू दे..
मला सोडवावंसं अजून कुणाला वाटतं
मलाच जरा पाहू दे'

तिच्या हसऱ्या चेहऱ्यावर
दु:खाचा लवलेश नव्हता
दुर्लक्षित झाल्याच्या भावनेने
डोळ्यांत क्लेश नव्हता

माझी घालमेल वाढली तसे
खाडकन डोळे उघडले
अजून उजाडायला अवकाश होता..
अंधार पाहून समजले

डोक्यात आणि मनात
नुसतं काहूर माजलं होतं
तिच्या हसऱ्या चेहऱ्याने
मला बेचैन केलं होतं

नकळतच हातात
कागद आणि पेन घेतलं
शब्दांच्या शेपट्यांना
भावनेला जुंपलं...

एकेक शेर लिहित होतो,
एकेक कविता म्हणून
गझल पूर्ण होत होती
साच्यातून काढून....

पण डोक्यातलं काहूर
काही केल्या शमेना
अन डोळ्यातली आग
काही केल्या विझेना


कसं शमणार आणि कशी विझणार ?
कवितेच्या प्रेमात पडून
मी लिहायचं शिकलो होतो
अन गझल-गझल करता-करता
कवितेलाच विसरलो होतो......

....रसप....
६ जून २०१२

रद्दड राठोड (Rowdy Rathore - Review)

काल ऑफिसात फारच पकलो. जाम बोअर झाल्यावर मला अत्यंत टुकार, बंडलबाज, फालतू सिनेमे बघायला आवडतं. आजकाल बहुतेक हिंदी सिनेमा च्यानल्सवर संध्याकाळी टिपिकल दक्षिण भारतीय सिनेमे हिंदीत डब करून माझ्यासारख्यांसाठीच असतात! पण, काल जरा जामच पकलो होतो म्हणून म्हटलं आज काही तरी वेगळं करू. आज पैसे देऊन फालतू सिनेमा बघू! पेपर बघितला. त्यातल्या त्यात 'फिल्मी' सिनेमा निवडला. शोचं टायमिंगही सोयीस्कर होतं. बास्स.. बाईकवर टांग टाकली आणि थेट थेटरात पोहोचलो ! ती संध्याकाळ होती 'राउडी राठोड' ची.. समोर लावलेलं अक्षय कुमारचं पोस्टर सिनेमा कस्स्सला 'फिल्मी' असणार आहे, ह्याची कल्पना देत होतं आणि भोवतालचं पब्लिकही एकदम 'डोंट अँग्री मी' टाईप छपरी होतं. मला माझ्या मनोरंजनाची खात्री मिळाली. सिनेमा नक्कीच टुक्कार असणार, ह्या विचाराने मला गुदगुल्या होत होत्या.
-------- हे असं सगळं मी केलं असेल, असं जर तुम्हाला खरोखर वाटलं असेल तर तसं नाहीये !! प्रभुदेवा हा एक बरा दिग्दर्शक आहे (असं ऐकलं होतं), भन्साळीची निर्मिती म्हणजे अगदीच 'गेला बाजार' नसेल (असं वाटलं होतं) आणि अक्षय कुमार विचार करून सिनेमे निवडत असतो (असा गैरसमज होता) म्हणून मी सिनेमाला गेलो. (खरं तर मला प्रभूदेवाचा 'वाँटेड' आवडला होता. फुल्ल टाईमपास होता आणि हा 'राठोड'ही त्याच पठडीतला असेल अशीही एक अवास्तव अपेक्षा होती.) असो. आता, शेण तर खाल्लं. ते का खाल्लं, ह्याला काही अर्थ नाही. खाल्लं हेच महत्त्वाचं! त्यामुळे मी माझ्या ह्या मूर्खपणासाठी स्वत:ला मोठ्या मनाने क्षमा करतो आणि माझा गुन्हा विस्तृतपणे इथे विषद करतो.

ही कथा आहे शिवा आणि विक्रम राठोड ह्या एकसारख्या दिसणाऱ्या दोन 'राउडीं'ची. शिवा एक पट्टीचा चोर आहे आणि विक्रम राठोड हा एक कर्तव्यदक्ष, शूरवीर व चाणाक्ष पोलीस ऑफिसर (ए. एस. पी.) शिवा मुंबईत तर राठोड उत्तर प्रदेशातील 'देवगढ' ह्या भागात. देवगढमध्ये 'बाबजी' ह्या गुंडाची हुकुमत चालत असते. तोच तिथलं सरकार असतो. पोलीस, सरकारी यंत्रणा सगळ्या त्याच्या टाचेखाली असतात. बाबजी, त्याचा मंद मुलगा आणि बलदंड भाऊ (टिटला) देवगढवासियांवर अनन्वित अत्याचार करीत असतात. लुटमार, हफ्ता वसुली, बायका पळवणे, खून, बलात्कार सगळं सगळं अगदी बिनधास्त उघड उघड चालत असतं. अश्या ह्या अराजक माजलेल्या भागात नवीन ए. एस. पी. म्हणून विक्रम राठोड येतो आणि अर्थातच बाबजीला भिडतो.   टिटला राठोडवर प्राणघातक हल्ला करून त्याला डोक्यात गोळी मारतो आणि त्याला अख्ख्या गावासमोर लटकवून आपली दहशत अजून वाढवतो. पण डोक्यात गोळी जाऊनही राठोड मरत नाही! राठोडचे कनिष्ठ पोलीस साथीदार ही गोष्ट गुप्त ठेवून त्याच्यावर उपचार करवतात आणि तो बरा होतो. उपचारासाठी राठोडला मुंबईत आणलं जातं आणि तो जिवंत आहे हे बाबजीला कळतं. राठोडला मारण्यासाठी गुंडांची फलटण पाठवली जाते. 
तत्पूर्वी, आजारी राठोडच्या लहान मुलीची देखरेख करणे खूप कठीण होऊन बसल्याने आणि योगायोगाने राठोडचा डुप्लिकेट 'शिवा' नजरेस पडल्याने राठोडचे साथीदार मोठ्या शिताफीने राठोडच्या मुलीला शिवापर्यंत पोहचवतात आणि अशी परिस्थिती निर्माण करतात की शिवाला तिचा स्वीकार करावाच लागतो.
पण, राठोडला मारण्यासाठी मुंबईला आलेल्या गुंडांच्या तावडीत शिवा सापडतो. मग त्याला वाचवायला खुद्द राठोड प्रकटतो. रक्तरंजित हाणामारीत तो किमान ३० एक जणांना ठार मारतो आणि स्वत:ही जबर जखमी होऊन नंतर मरतो!
शूरवीर राठोडची कहाणी समजल्यावर शिवा गेट्स इम्प्रेस्ड ! तो राठोड बनून देवगढला येतो आणि बाबजी व त्याच्या साम्राज्याला संपवतो. (तेही फक्त शेवटच्या अर्ध्या तासात!)

असं सगळं घडल्यावर एकदाचा हा रद्दड राठोड संपतो आणि सुटकेचा निश्वास घेण्यासाठी EXIT लिहिलेल्या पाटीकडे प्रेक्षक जीव मुठीत घेऊन पळत सुटतो. अनेक दिवसांनंतर इतका बंडल सिनेमा बनला असावा की ज्यात काही म्हणता काहीही चांगलं सांगता येणार नाही! संगीत तर इतकं टुकार की साजीद-वाजीद ला आजीवन प्रतिबंधित करावं. पटकथाकाराचं नाव दिसलं नाही. बहुतेक असा कुणी माणूस नेमलाच नसावा. प्रभूदेवाचा अभिनय त्याच्या दिग्दर्शनापेक्षा बरा आहे. (ह्याहून वाईट प्रतिक्रिया सुचली नाही.) सोनाक्षी सिन्हा नामक दांडोबाने पुढील सिनेमा (मिळाल्यास) 'हिरो' म्हणून करावा. तिची धटिंगण शरीरयष्टी 'हिरो' म्हणूनच शोभून दिसेल. खरं तर तिच्यापेक्षा एखादा ओंडका उभा केला असता तर त्यानेही जरासा अभिनय केला असता आणि जो काही नाच-बीच केला आहे, तेव्हढा त्या ओंडक्याकडून प्रभुदेवा व अक्षयकुमारने करवून घेतला असता. ह्या चौघांना (आणि पटकथाकार असल्यास तो पाचवा) गळ्यात धोंडा बांधून विहिरीत टाकावं, असा एक खुनशी विचार माझ्या मनातून काही केल्या जात नाहीये. त्यातल्या त्यात अक्षय कुमार (आता इतक्या वर्षांचा अनुभव आहे म्हटल्यावर) सुसह्य वाटतो. अन्यथा सिनेमा सहनशक्तीचा अंत पाहणाराच आहे. भन्साळीने शरमेने खजील होऊन कुठे तरी तोंड लपवून बसावं की इतक्या रद्दड सिनेमाशी त्याचं नाव जोडलं गेलं आहे..

हा सिनेमा मी थेटरात जाऊन पाहिला. ह्याचं प्रायश्चित्त म्हणून मी येत्या सुट्टीच्या दिवशी घरात बसून डीव्हीडीवर लागोपाठ तीन वेळा "बॉडीगार्ड" सिनेमा बघणार आहे. (भोग मेल्या आपल्या कर्माची फळं.. बघशील ? बघशील परत असला सिनेमा..? बघशील ?) (रामदासांनी त्यांची बासुंदीची वासना कशी मारली होती? तसंच काहीसं!)

आता इतकं सगळं वाचल्यावर मी ह्या सिनेमाला दर्जात्मक रेटिंग वगैरे देईन, असं काही तुम्हाला वाटलं नसेल; ही अपेक्षा करतो.


Tuesday, June 05, 2012

तुझी नि माझी स्वप्ने सारी उधळलीस ना ?


तुझी नि माझी स्वप्ने सारी उधळलीस ना ?
जुन्यांस फेकुन नवी सजावट करवलीस ना ?

कश्या अचानक वाटा झाल्या धूसर धूसर ?
डोळ्यांमधले बनून पाणी तरळलीस ना ?

तू नसताना नको वाटले जगणे तरिही
पुन्हा आज मी मजेत आहे, समजलीस ना ?

हल्ली तू काजळ भरणेही सोडले, म्हणे !
तुझ्याच प्रतिमेच्या नजरेतुन उतरलीस ना ?

फुलांसारख्या कितीक कविता तुला दिल्या मी
माझ्या दु:खाच्या गंधाने बहरलीस ना ?

नकोच होती संगत 'जीतू' तुझी कुणाला
तुझी सावली पसार झाली, बघितलीस ना ?


....रसप....
४ जून २०१२

Related Posts Plugin for WordPress, Blogger...