Sunday, July 01, 2012

एक उनाड दिवस तू कधी तरी जगशील..


एक उनाड दिवस तू कधी तरी जगशील
पुन्हा पुन्हा मिटल्या डोळ्यांनी
फक्त मलाच बघशील
स्वत:शीच हसशील
गुपचूप लाजशील
पुन्हा पुन्हा मोबाईल काढून
जुना मेसेज वाचशील
रुळणाऱ्या चुकार बटेचा
गालाला होणारा हळूवार स्पर्श
खट्याळ वारा सारखा देत राहील
आणि तुला वाटेल -
माझी नजर थांबली आहे तुझ्या चेहऱ्यावर

- असं मला नेहमी वाटायचं
असं मला नेहमी दिसायचं
पण आत्ताच कळलं की,
नाही. तू कधीच बांधली गेली आहेस
तुझ्या आवडीच्या बंधनात
त्याची पोच म्हणून ही 'गोड' बातमी!
हरकत नाही!
मी तरी कुठे तुझ्याशिवाय झुरतोय?
मी तर जुन्या आठवणींवर मनापासून हसतोय !

पण एकच काळजी वाटते
तुझ्या लहानगीने मला 'मामा' म्हणू नये !
जखमेवरच्या खपलीला हसता हसता उघडू नये !!

....रसप....
१ जुलै २०१२

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...