Tuesday, July 24, 2012

.. नाही जमले तुला..!


टपटपत्या पानांना पाहुन ताल मोजला कधी
दरवळत्या झुळुकीला ओढुन श्वास भारला कधी
कधी कधी मेघांना फुटले पंखच दिसले तुला
तुझ्या मनाला समजुन घेणे नाही जमले तुला

सागरतीरी वाळूवरती नाव कोरले कधी
लाटांनी पुसले जाता नि:श्वास सोडले कधी
पुन्हा नव्याश्या व्याकुळतेने कधी व्यापले तुला
जुने नको ते विसरुन जाणे नाही जमले तुला

दिलास खांदा रडण्याला दु:खी मित्राला कधी
टिपले डोळ्यातील कुणाच्या तू मोत्याला कधी
किंचितसेही खरचटल्यावर किती डाचले तुला
पिऊन अश्रू जखम फुलवणे नाही जमले तुला

पुढे निघाले येउन कोणी पाठीमागुन कधी
तुला पाहुनी शिकले अन गेले ओलांडुन कधी
तू दैवाला दोष दिला अन दैवच नडले तुला
उत्साहाने उभे राहणे नाही जमले तुला

जे होते ते प्रेमापायी गमवुन झाले कधी
'नको प्रेम ते' दुसऱ्यालाही शिकवुन झाले कधी
खरे प्रेम जाणुन घ्यावे ना कधी वाटले तुला
चौकट आखुन मुक्त विहरणे नाही जमले तुला

....रसप....
२३ जुलै २०१२

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...