Saturday, July 14, 2012

नव्या ग्लासातली जुनी 'कॉकटेल' (Cocktail - Movie Review)


वर्षानुवर्षं सकाळी उठून चहा/ कॉफी घेण्याची जवळजवळ प्रत्येकाला सवय असते. तीच चव.. साधारण तीच वेळ.. आणि बहुतेकदा जागाही तीच, फक्त काही ठराविक काळानंतर 'कप' बदलतो. तसंच अगदी तसंच.. वर्षानुवर्षं रोज सकाळी जाग आल्यावर प्रेमत्रिकोणाची कॉकटेल घ्यायची बॉलीवूडकरांचीही जुनी सवय आहे. फक्त ठराविक काळानंतर इथेही पिण्याचा 'ग्लास' बदलत जातो..

'होमी अदाजानिया' दिग्दर्शित नवीन ग्लासातल्या जुन्या "कॉकटेल" मधली मिश्रणं आहेत -
गौतम (सैफ अली खान) - एक महाफ्लर्ट पंजाबी लौंढा
वेरॉनिका (दीपिका पडुकोण) - एक टिपिकल बिघडलेली श्रीमंत बापाची व्यसनाधीन मुलगी
मीरा (डायना पेंटी) - एक टिपिकल 'शादी मटेरीअल' मुलगी

तिघेही मूळचे दिल्लीकर, लंडनमध्ये एकमेकांना भेटतात. सॉफ्टवेअर इंजिनिअर गौतम नोकरीनिमित्त लंडनमध्ये असतो, तर फोटोग्राफर वेरॉनिका (बहुतेक तरी) फक्त अय्याशी करण्यासाठी. मीरा, तिला सोडून लंडनला आलेल्या तिच्या नवऱ्याला (रणदीप हूडा) शोधण्यासाठी तिथे येते, पण तिचा नवरा तिला अपमानित वगैरे करून हाकलून वगैरे देतो. अपमानित, असहाय्य आणि हताश मीराला वेरॉनिका आधार देते. स्वत:च्या घरी घेऊन येते. एअरपोर्टवरच तिला ‘भिडलेल्या’ गौतमबाबत मीरा जेव्हा वेरॉनिकाला सांगते, तेव्हा वेरॉनिका जाऊन गौतमला ‘भिडते’. पुढे गौतम आणि वेरॉनिका आपापल्या चारित्र्या(?)शी प्रामाणिक राहून एकमेकांसोबत ‘झोपतात’. (सिनेमात असंच वारंवार म्हटलं आहे, मी ऐकताना लाजलो नाही… लिहिताना का लाजू?)
गौतम, वेरॉनिका आणि मीरा एकत्र राहू लागतात आणि अश्यातच गौतमची आई (डिंपल कपाडिया) लंडनला अवतरते. तिच्या समाधानासाठी मीराला गौतमच्या होणाऱ्या बायकोचं सोंग वठवावं लागतं. हे सोंग करता करता गौतम आणि मीरा खरोखरच प्रेमात पडतात, तर दुसरीकडे वेरॉनिकाही गौतमवर प्रेम करू लागते.
बस्स फिर वोही घीसी-पिटी कहानी.... मीरा-गौतम-वेरॉनिका की जुबानी....!

बहुतांश सिनेमा वास्तवाचं भान ठेवून पुढे सरकत जातो. अनेक ठिकाणी पडद्यावरील व्यक्तिरेखा आपल्याला कधी तरी पाहिलेल्या, अनुभवलेल्या किंवा जगलेल्याही वाटतात, ही 'हाताळणी'ची जमेची बाजू. पण अनेक अनावश्यक फाटे उगाचच सिनेमा रेंगाळवतात. त्यात ती हार्मोनियमच्या शेवटच्या सप्तकात सुरू होऊन तिथेच कुठे तरी गोल-गोल फिरून मग संपणारी कर्णकर्कश्य गाणी तुम्हाला सिनेमात भावनिक ओढाताणीमुळे डिस्टर्ब झालेल्या पात्रांपेक्षा जास्त डिस्टर्ब करतात. (अपवाद – तुम ही दिन ढले…)
गौतमच्या भूमिकेत सैफ अली खानचा वावर खूप नैसर्गिक वाटतो, पण नवाब साहेबांचं वय लपत नाही.
डायना पेंटीला मीराच्या भूमिकेत चांगलं काम करायला खूप वाव होता, पण 'मीरा वाया गेली.'
दीपिका पडुकोण 'वेरॉनिका' जगते आणि जगवते. तसं पाहाता, ही परीक्षा देण्यासाठी तिला हवं तेव्हढं 'स्टडी मटेरीअल' बाजारात उपलब्ध झालं असेल; पण शेवटी अभ्यासही करावाच लागतो आणि तो तिने केलेला दिसला. एरव्ही मला तिचं ते भुवया आकुंचित करून बोलणं अजिबात आवडत नाही, पण इथे ते फारसं जाणवलं नाही. आत्तापर्यंतच्या छोट्याश्या कारकीर्दीत दीपिकाने केलेलं 'वेरॉनिका' हे सर्वोत्कृष्ट काम असावं.
सिनेमा लंडनमध्ये का घडतो? - उगाच..
शेवट दिल्लीत का होतो ? - उगाच..
बोमन इराणी आणि डिंपल सारखे दिग्गज सिनेमात का आहेत ? - उगाच..
अश्या अजून काही 'उगाच' गोष्टी असल्या तरी तीच व्होडका आणि तीच व्हिस्की ओतून बनवलेलं तेच 'कॉकटेल' एकदा घेऊन बघण्यास हरकत नसावी. (कारण सिनेमापूर्वी आणि मध्यंतरानंतर 'कॉकटेल' ड्रिंकिंग इज इन्ज्युरिअस टू हेल्थ अशी सूचना केली जात नाही!!)


No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...