Saturday, September 15, 2012

चविष्ट 'बर्फी' (Barfi - Review)


एक सरदारजीचा विनोद ऐकला होता.
युद्धात सरदारजीच्या युनिटला शत्रू चहूबाजूंनी घेरतो. हे समजल्यावर सरदारजी म्हणतो.. 'मस्तच की! आता आपण कुठल्याही दिशेने हल्ला करू शकतो!'
खरं तर हा मला कधीच विनोद वाटला नव्हता. प्रतिकूल परिस्थितीतही आपली विनोदबुद्धी जागृत ठेवणे, काही तरी सकारात्मक शोधणे/ बोलणे; हे ज्याला जमलं तो खरा जिंकला, असंच मला नेहमी वाटत आलं आहे. आणि अश्या हारकर जितनेवाले को बाजीगर-फिजीगर म्हणत नसतात, त्याला 'बर्फी' म्हणत असतात..!

'बर्फी' चं कथानक साधारणत: तीन कालखंडात विभागलेलं आहे. १९७२, १९७८ व आसपासचा काही काळ आणि मग थेट आज.
१९७२. 'श्रुती घोष' (इलिएना डि'क्रुझ), तीन महिन्यांवर लग्न ठरलेलं असताना दार्जीलिंगला येते आणि इथे तिची ओळख होते 'बर्फी' (रणबीर कपूर) शी. नेहमीच हसतमुख असणारा चुलबुला बर्फी मूक-बधीर असतो. ह्या मैत्रीचं रुपांतर नकळतच प्रेमात होतं. श्रुतीचं ठरलेलं लग्नही 'प्रेमविवाह'च असतो पण तरीही 'बर्फी'कडे आकर्षित होण्यापासून ती स्वत:ला रोखू शकत नाही. दार्जिलिंगमधील एक प्रतिष्ठित श्रीमंत चटर्जी (आशिष विद्यार्थी) ह्यांच्या वाहनचालकाचा एकुलता मुलगा बर्फी अर्थातच आर्थिकदृष्ट्या हलाखीत असतो. श्रुती आणि स्वत:मधील हा जमीन-अस्मानाचा फरक ओळखून तो स्वत:च तिला तिचं ठरलेलं लग्न करून सुखी राहाण्याचे पटवतो आणि तिच्या आयुष्यातून दूर जातो.
दुसरीकडे, चटर्जीची ऑटिस्टिक मुलगी झिलमिल (प्रियांका चोप्रा) - जिला तिच्या घरजावई वडील व व्यसनाधीन आईच्या जाचापासून दूर एका रेस्टहोममध्ये तिच्यावर भरपूर माया करणाऱ्या तिच्या गर्भश्रीमंत आजोबांनी ठेवलेलं असतं - परत दार्जिलिंगला येते कारण आजोबा शेवटच्या घटका मोजत असतात. झिलमिल आणि बर्फी लहानपणापासून एकमेकांना ओळखत असतात आणि सगळ्यांना हवाहवासा वाटणारा बर्फी झिलमिललाही बाकी दुनियेपेक्षा जास्त 'विश्वासू' वाटत असतो. आजोबा मरण्यापूर्वी सर्व मालमत्ता झिलमिलच्या नावाने एका ट्रस्टमध्ये ठेवून, झिलमिलच्या वडिलांना पगारदार नोकर म्हणून नियुक्त करतात. चवताळून उठलेला चटर्जी सासऱ्याच्या मृत्यूनंतर सर्व नोकरांना हाकलून देतो. बर्फीच्या वडिलांचीही नोकरी जाते आणि परिस्थिती अजूनच हलाखीची होते. दुष्काळात तेरावा महिना यावा तसं ते गंभीर आजारी पडतात आणि उपचारासाठी बऱ्याच पैश्यांची ताबडतोब गरज निर्माण होते.
ह्यानंतर बर्फी जे काही करतो, त्यामुळे तो एका विचित्र कोंडीत फसतो. एकीकडे कायदा आणि दुसरीकडे एक भावनिक बंध.. अश्या द्विधेत तो असताना परत एकदा श्रुतीशी त्याची भेट होते. पुढे काय होतं, कसं होतं हे 'बरंच काही' आहे. त्यासाठी सिनेमाच पाहायला हवा.

ही कथा मांडताना अनेक आव्हानं होती, असं मला जाणवलं -
१. गुंतागुंतीचं कथानक.
२. बऱ्याच मोठ्या कालखंडातील घटनाक्रम
आणि सगळ्यात महत्त्वाचं -
३. दोन्ही प्रमुख व्यक्तिरेखा संवादरहित.
पैकी आठवणींतून उलगडत जाणाऱ्या (Flashback) मांडणीमुळे पहिल्या दोन आव्हानांना दिग्दर्शक अनुराग बसूने आणि अप्रतिम अभिनयाच्या जोरावर तिसरं आव्हान अनुराग, रणबीर आणि प्रियांकाने मिळून व्यवस्थित पेललं.
ऑटिस्टिक व्यक्तीचं काम म्हणजे फक्त चेहरा मख्ख ठेवून, कबुतरासारखी मान हलवून आणि लाकडासारखं कडक होऊन चालून वावरणं नाही हे प्रियांकाचा अभिनय पाहिल्यावर शाहरुखला कळावं. (संदर्भ - माय नेम इज खान)
आत्तापर्यंतच्या मोजक्याच सिनेमांतून रणबीरने जी परिपक्वता दाखवली आहे, त्याला तोड नाही. एकाही, अगदी एकाही दृश्यात तो 'रणबीर' वाटत नाही. तो फक्त आणि फक्त 'बर्फी'च वाटतो. दु:ख, हताशा, विनोद, निरागसता अश्या वेगवेगळ्या छटांनी सजवून तो बर्फी असा काही आकर्षक रंगवतो की शारीरिक अपंगत्व, आर्थिक डबघाई, गुन्हेगारी बट्टा असं सगळं असतानाही एखाद्या सुशिक्षित सुसंस्कृत लग्न ठरलेल्या/ झालेल्या स्त्रीने त्याच्यात गुंतणं अजिबातच आश्चर्यकारक वाटत नाही.
नवा चेहरा 'इलिएना डि'क्रुझ', खूपच आशादायक आहे. तिचाही वावर अगदी सहज आहे आणि चेहऱ्यात एक मिश्कील गोडवा आहे.
इतर अभिनेत्यांमध्ये सौरभ शुक्लाचा पोलीस उपनिरीक्षक 'दत्ता' खूप प्रभावशाली. त्याची आणि बर्फीची काही दृष्यं खसखस पिकवतात, काही खळखळून हसवतात आणि उरलेली मनाला स्पर्श करून जातात. अनेक ठिकाणी चार्ली चाप्लीन व मि. बीन छाप धमाल आहे.
'प्रीतम'चं संगीत अतिशय म्हणजे अतिशय कर्णमधूर आहे. 'इतनीसी हसी, इतनीसी खुशी..' हे गाणं तर मनात घर करतं.

जराशी धीमी गती, जी बहुतकरून भारतीय सिनेमांची असतेच, वगळता 'बर्फी' अगदी बरोब्बर गोडीचा आहे. दातात कळ येईल इतकी जास्त गोडही नाही आणि प्युवर साजूक तुपातली जिभेवर ठेवताच विरघळणारी बर्फी जर तुम्हाला आवडत असेल, तर 'बर्फी'ही आवडेलच.

रेटिंग - * * * *

1 comment:

  1. very correctly said ... Saurabh shukla is spellbound....and very true what u said about my name is....101% agree

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...