Thursday, September 06, 2012

उधारीचं हसू आणून.... (भाग - २)

१.

घरी जाणं रोजच जीवावर येतं
डोळ्यात खुपतं ते घर, रितं-रितं
त्या भिंतींना सुरकुत्या पडल्या आहेत
दारं-खिडक्या केविलवाणे आवाज करून रडतात

माझी आवडती आरामखुर्ची
हिरमुसून कोपऱ्यात जाऊन बसली आहे
आणि छत...
सताड, कोरड्या, निस्तेज डोळ्यांनी
माझ्याकडे रात्र रात्रभर टक लावून पाहात असतं..
की कधी मी तुझं नाव उच्चारीन
कधी भावनांच्या पायात घातलेल्या
उदासीनतेच्या बेड्यांना तोडीन
कधी बांध फुटेल मनाचा
आणि घरासारखाच रिता-रिता होईन एकदाचा

रोजच्या वळणांची पावलांना सवय झाली आहे
आपोआप घरापर्यंत येतात..
आणि मग मीही येतोच त्यांच्या मागून
जीवावर आलेलं असतानाही
उधारीचं हसू आणून....

....रसप....
१९ मार्च २०१२

====================

२.
आरसा नेहमी खरं बोलतो
जे आहे.. जसं आहे..
तसंच्या तसं दाखवतो
पण.. तोही मला फसतो !
कारण, त्याला फक्त माझा चेहराच दिसतो
त्याला तेच दिसतं,
जे मी दाखवतो..

मी त्याला दाखवतो...
माझ्या खिश्यातले पैसे
तो खूष होतो... म्हणतो "मी श्रीमंत आहे!"

मी त्याला दाखवतो...
माझे नीटनेटके कपडे
तो चमकतो.. म्हणतो "मी राजबिंडा आहे !"

मग मी त्याला दाखवतो
तुझी छबी.. माझ्या डोळ्यात असलेली
तो हबकतो.. म्हणतो, "मी नशीबवान आहे!"

त्याच्या निरागस भोळेपणाचं
मला कौतुक वाटतं
मला बघून नेहमी आनंदण्याचं
मला कौतुक वाटतं

मग मीही त्याच्यासोबत खूष होतो
त्याला थोडं अजून फसवून..
मी नशीबवान असल्याचं मान्य करतो
उधारीचं हसू आणून...

....रसप....
२० मार्च २०१२

====================

३.
त्याने विचारलं, "रडत का नाहीस?"
मी म्हटलं, "माहित नाही."
त्याने विचारलं, "चिडत का नाहीस?"
मी म्हटलं, "माहित नाही"
त्याने विचारलं, "का झालास उद्ध्वस्त?"
मी म्हटलं, "माहित नाही!"
त्याने विचारलं, "कसा रे तू इतका आश्वस्त?"
मी म्हटलं..... "माहित नाही!!"
तो कंटाळला.. म्हणाला, "माहित तरी काय आहे?"
मी म्हटलं.. "माहित नाही!"

अखेरीस तो गप्प झाला..
मी छद्मी हसलो.. अन् बोललो,
"अरे नशिबा.. तू तर जन्मजात रडका आहेस..
पिढीजात चिडका आहेस..
म्हणूनच फुटका आहेस!!
पण मी तसा नाही....

तू खरडलंस काही-बाही माझ्या कपाळावर
अगदी दात-ओठ खाऊन..
अन् मी त्याचाही स्वीकार केला..
उधारीचं हसू आणून.....

....रसप....
२२ मार्च २०१२
====================

४.
आज परत एकदा प्रेमात पडावं म्हणतो..!

दु:खाची नशा आणि वेदनेची झिंग
उतरत चालली आहे
जगण्यातली गंमत आणि जळण्यातली मजा
ओसरत चालली आहे

परत एकदा नख लावायचंय
काळजातल्या हळव्या पडद्याला
अन अनुभवायचाय तोच एक शहारा..
पापणीवर तरळून आभाळ हेलावणारा

परत एकदा मनाच्या दगडाला पाझर फुटेल
अन डोळ्यांच्या विहिरी भरतील
हळव्या हवेच्या झुळुकीने
वाळलेली पानं उडतील..

परत एकदा घ्यायचीय
काटेरी उबदार शाल ओढून
अन फुटून ठिकऱ्या उडालेल्या स्वप्नांना
परत एकदा जोडायचंय
उधारीचं हसू आणून....

....रसप....
२२ मार्च २०१२

====================

५.


उसळणाऱ्या लाटांनी
किनारा भिजतो
अन उधाणलेल्या वाऱ्याने
क्षणार्धात सुकतो

मीही चार इंचाच्या पेल्यात
स्वप्नं भिजवून घेतो
आणि सगळ्यांच्या नकळत
पापण्यांना देतो !

स्वप्नं असतात -
कधी तिची
कधी माझी
कधी जे जमलं नाही त्याची
कधी जे उरलं नाही त्याची
कधी हातून निसटलेली
कधी गुपचूप हरवलेली
कधी इतस्तत: विखुरलेली
कधी मुद्दामच उधळलेली

पण सकाळ होते..
आणि मिटलेल्या पापणीतल्या अंधाराला
उजेड देते, वास्तव दाखवते
नकली प्रसन्नतेच्या रखरखीत वाऱ्याने
परत पापणी सुकते

रुजवायला भिजवलेली स्वप्नं
डोळ्यात उरतात रुतून
मी नव्या दिवसाचं स्वागत करतो
उधारीचं हसू आणून....

....रसप....
२९ मार्च २०१२

====================


६.
तू असतानाच्या आठवणी..
आठवणीतला एकेक क्षण
डोळ्यात साठवला होता...
त्या एकेक क्षणाने डोळ्यातलं पाणी शोषलं आहे

शेवाळलेल्या हिरवट डबक्यातल्या चिखलात
जसं कमळ उमलतं..
तसं त्या आठवणींतून उमलतात काही शब्दपाकळ्या..
आणि फुलते कविता..

रोज कातरवेळी माझं मन
मीच स्वत: लपवतो
त्या कमळाच्या मिटणाऱ्या पाकळ्यांत
आणि रोज सकाळी
एका प्रसन्न कवितेच्या उमलत्या पाकळ्यांतून
ते बाहेर येतं.... सुगंधित होऊन
अन दिवसभर बागडतं...
.
उधारीचं हसू आणून....

....रसप....
९ ऑक्टोबर २०१२

====================

७.

दु:ख फुलपाखरासारखं..!
मी अनेकदा अलगद चिमटीत पकडलंय
अगदी निरागस शांतपणे
ते दोन बोटांना शरण आलंय
त्याचा तो मलमली स्पर्श..
मोहवणारे रंग..
पण तो निष्पाप चेहरा..
मन भरून न्याहाळल्यावर
मी जेव्हा पुन्हा त्याला सोडून देतो..
इथे तिथे बागडायला..
तेव्हा बोटांवर राहतो
एक करडा रंग
त्याच्या पंखांचाच रंग मागे राहिलेला असतो
पण पंखांवर बोटांचा ठसा मात्र नसतो

असंख्य फुलपाखरं अवतीभवती असतात
मी पुन्हा पुन्हा
चिमटीत पकडण्याचा प्रयत्न करत असतो
एकावर तरी माझा ठसा उमटेल म्हणून
अन् दरवेळी फक्त बोटांवरचा करडा
रंग पाहात राहातो -
उधारीचं हसू आणून....

....रसप....
०३ मार्च २०१३

====================

८.
उबदार काळी शाल ओढून घेतल्यावर
माझी माझ्याशीच
एक अस्वस्थ कुजबुज सुरु होते
स्वत:कडे पाठ फिरवण्यासाठी
मी कूस बदलतो
मिटलेले डोळे गच्च आवळतो
थोडा वेळच, मग टक्क उघडतो
भिंतीवरच्या घड्याळ्याच्या टिकटिकीतून
एक क्षण निसटल्याचं जाणवतं
आणि छातीत काही तरी हेलावतं
पुन्हा एकदा एक कुजबुजणारी रात्र
डोळ्यांतून मनात झिरपणार असते

बाजूच्या निश्चल उशीच्या
कोरड्या अनभिज्ञतेतून
छळणारा तिचा आणि माझा एकटेपणा
काळोखाला छेदत दूरवर पसरतो

आणि एका बेसावध क्षणी
रात्र गुपचूप निघून जाते
मला जागं ठेवून
अनभिज्ञ उशी बघत असते सगळं
उधारीचं हसू आणून..

....रसप....
३ सप्टेंबर २०१३ 

उधारीचं हसू आणून.. भाग - १

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...