Sunday, September 30, 2012

जेव्हा 'देव' 'जमिनी'वर येतो.. (Oh My God - Movie Review)


विचार करण्याची क्षमता असणे, बुद्धीचा अधिक परिणामकारक उपयोग करणे, ह्या वैशिष्ट्यांमुळे मानव हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा व श्रेष्ठ समजला जातो. जे बरोबरही आहे. पण ह्या मानावाच्याही हातात अनेक गोष्टी नाहीत. अनेक ठिकाणी हा हतबल होतो, लाचार होतो. तेव्हा 'हे देवाच्या हातात आहे', असं म्हणून तो स्वत:ची लाचारी मान्य करतो व ते मान्य करत असतानाही इतर प्रन्यांहून श्रेष्ठत्व सांभाळतोच. इतपत ठीक आहे. पण आजच्या घडीस देव-धर्माने दांभिक रूप घेऊन गावोगावी धंदा मांडला आहे, २१ व्या शतकात पाउल ठेवलेलं असतानाही अनेक अंधश्रद्धांच्या जोरावर (भीतीवर) सुशिक्षित व सुसंस्कृत लोकांनाही फसवलं जात आहे किंवा असं म्हणू की सुजाण लोकही त्याच्या आहारी गेले आहेत... (अशिक्षितांचं तर सोडाच..!) त्याचं काय ? देवाला नवस बोलून, सोन्या-चांदी-पैश्यांची एक प्रकारे लाच देऊन आपली श्रद्धा दाखवणं योग्य आहे  ? तो तर जागोजागी आहे ना ? मग मंदिरं का ? बरं, मंदिरं असावीत... प्रार्थनेच्या, साधनेच्या जागेसाठी म्हणून पण मग अमुक देव जागृत वगैरे काय आहे ?
- असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. पण आपण ते स्वत:च नाकारतो किंवा क्वचितच हे प्रश्न विचारण्याची हिंमत करतो. आणि जो माणूस हे प्रश्न वारंवार विचारतो, त्याला - जरी आपल्यालाही ते प्रश्न पडत असले तरी त्यांच्यापासून स्वत:च पळून - त्याला 'नास्तिक' म्हणवतो/ म्हणतो. 'ओह माय गॉड' हेच प्रश्न पडद्यावर विचारतो, बिनधास्त !


कानजी मेहता (परेश रावल) मुंबईत राहाणारा एक गुजराती व्यापारी असतो. त्याचं देवाच्या मूर्ती, फोटो विकण्याचं चांगलंसं दुकान असतं. धंदा जोरदार असतो. देवाच्या मूर्ती विकत असला, तरी कानजी स्वत: देवाला मानत नसतो. टिपिकल धंदेवाईक बुद्धीने तो लोकांना फसवतही असतो. त्यांच्या भाबड्या श्रद्धांचा गैरफायदा घेऊन लुबाडतही असतो. कानजीचा लहान मुलगा दहीहंडी उत्सवात गोविंदा बनतो. तो हंडी फोडणार इतक्यात कानजी 'श्रीकृष्ण दही खातो आहे' अशी खोटी वावडी पसरवून लोकांना पांगवतो आणि हंडी न फोडताच मुलाला खाली उतरवतो. तत्क्षणी हलकासा भूकंपाचा धक्का बसून मुंबई हादरते. काहीही नुकसान होत नाही पण संपूर्ण मुंबईत फक्त एक दुकान जमीनदोस्त होतं, ते असतं कानजीचं. लाखो रुपयांचं नुकसान होतं. घर गहाण ठेवून दुकानासाठी कर्ज काढलेलं असतं.. आणि विमा कंपनी कुठलीही भरपाई देण्यास नकार देते कारण विम्याच्या अटींत 'Act of God' ला संरक्षण नसतं. अर्थात, ज्या दुर्घटनांवर मनुष्याचा जोर नाही अश्या त्सुनामी, भूकंप, ई. घटना. जमीनदोस्त झालेल्या दुकानाची जमीनही कुणी अपशकुनी जमीन असल्याच्या समजुतीपायी विकत घेण्यास तयार होत नाही. आता काय करायचं ? ह्या विवंचनेत असलेल्या कानजीला एक वेगळीच कल्पना सुचते. 'माझं नुकसान देवाने केलं आहे ना? ठीक आहे. मग देवाने मला भरपाई द्यावी!' असा दावा घेऊन तो न्यायालयाचे दरवाजे ठोठावतो. कुठलाही वकील त्याची केस घेण्यास तयार होत नसतो म्हणून स्वत:च स्वत:ची केस मांडून चतुर युक्तिवाद करतो व खटला दाखल करून घेण्यास भाग पाडतो. प्रतिवादी म्हणून विविध खंडापीठांचे गुरू, मशिदींचे इमाम व चर्चेसचे फादर आणि विमा कंपनी ह्यांना नोटीसा बजावल्या जातात आणि सुरू होतो एक अभूतपूर्व न्यायालयीन लढा - मानव वि. देव !!
खटल्याची बातमी देशभर पसरते आणि देशाच्या कोपऱ्या-कोपऱ्यातून लोक आपापल्या फिर्यादी घेऊन येतात व 'आम्हालाही भरपाई हवी आहे' अशी मागणी ठेवतात. कानजी व इतर सर्व फिर्यादींची मिळून भरपाई रक्कम ४०० कोटींच्या घरात पोहोचते आणि विमा कंपनी व धर्मगुरू बेचैन होतात.
खटला दाखल झाल्यावर कानजीला जीवे मारायचा प्रयत्न होतो तेव्हा त्याच्या मदतीला साक्षात भगवान श्रीकृष्ण मनुष्यरुपात (अक्षय कुमार) धावून येतात आणि नंतर खटला चालू असतानाही त्याची मदत करत राहातात.

पुढे काय होतं ? कानजी खटला जिंकतो का ? देवावर त्याचा विश्वास बसतो का ? धर्माचे दांभिक स्वरूप लोकांना समजते का ? असे अनेक प्रश्न सिनेमा पाहिल्यावर सुटतील. किंबहुना, ते तसे सुटण्याचे अनुभवण्यातच खरी मजा आहे. तेव्हा सिनेमा अवश्य पाहाच !

सिनेमात, इतर धर्मांपेक्षा हिंदू धर्मावर अधिक टीकात्मक भाष्य केले आहे. कारण सरळ आहे - स्वत: 'कानजी' हिंदू आहे ! पण असं होत असताना त्याच्या सोबतीला स्वत: देवानेच उभे राहाणे, ही कल्पना धर्माचा अपमानही होऊ देत नाही. किंबहुना, मनुष्यासाठी त्याचा धर्म किती महत्त्वाचा आहे हे सिद्ध करते. एक फार सुंदर वाक्य ह्या सिनेमात आहे. 'लोगों से उनका धरम मत छिनना, वरना वोह तुम्हे अपना धरम बना लेंगे !' ह्या व्यतिरिक्त असे अनेक दमदार संवाद तितक्याच दमदार फेकीने दाद घेऊन जातात. जसं की - 'These are not Loving people, these are fearing people' असं जेव्हा धर्मगुरू (मिथुन चक्रवर्ती) कानजीला सांगतो तेव्हा खरोखर पटतं की खरंच देवाला मानण्यात, त्याची प्रार्थना करण्यात आपली श्रद्धा नसते तर भीती असते.

संगीताला फार वाव नाही पण जे आहे ते श्रवणीय आहे. अक्षय कुमार, महेश मांजरेकर, मिथुन चक्रवर्ती, गोविंद नामदेव सगळे आपापली कामं चोख निभावतात. पण सिनेमा खिश्यात घालतो अर्थातच 'कानजी भाई' परेश रावल. अगदी सहजसुंदर अभिनयाने परेश रावल कानजीचे विचार आपल्याला आपल्याच नकळत पटवून देतो. आणि मनोमन आपण हाच विचार करतो की देव हरावा व कानजी जिंकावा.

हा सिनेमा एका गुजराती नाटकाचे सिनेरुपांतर आहे. मूळ नाटक सिनेमाचे दिग्दर्शक 'उमेश शुक्ला' ह्यांचेच आहे. विषयाला धरून, थोडीशी 'फिल्मी लिबर्टी' (न्यायालयीन कामकाजाबाबत) घेऊन मार्मिक भाष्य करणारा, विनाकारण फाफट पसारा न मांडता व्यक्त होणारा हा सिनेमा निश्चितच पाहण्याजोगा वाटला.

रेटिंग  - * * *

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...