Saturday, December 29, 2012

ती बट का झुलते गालावरती?


ती बट का झुलते गालावरती? प्रश्न मला पडताना
हृदयाचा चुकलेला ठोका पायाशी घुटमळताना
दिलखेच नजर ती नकळत माझ्या नजरेसोबत भिडली
मी अजून लोकांना दिसतो नजरेला सोडवताना
.

.

माझी ही धडपड शून्यामधली तुला उमगली नाही
अन पुन्हा नव्याने प्रेमासाठी हिंमत उरली नाही
तो चुकला ठोका अजूनही मी शोधत वणवण फिरतो
तू तहान म्हण जी मृगजळवेडी शमता शमली नाही

डोक्यावर तळपे सत्यसूर्य जो रात्रीपुरता विझतो
मी शांत मनाच्या अंधाराच्या तळास जाउन निजतो
तू गंध रातराणीचा लेउन अवचित वेळी यावे
ह्या कल्पनेत मी चकोररूपी पहाटवेळी भिजतो

सारे केशर-केशर होते अन मी बघतो क्षितिजाला
आकाश केशरी बटांस पसरे त्या पहिल्या प्रहराला
तेव्हा कळते की, तुझ्याचसाठी खुद्द निसर्गच सजतो !
मग कशास तूही समजुन घ्यावे मला क्षुद्र वेड्याला ?

....रसप....
२९ डिसेंबर २०१२

Saturday, December 22, 2012

चव अळणी, वास खमंग.... दुसरा दबंग (Movie Review - Dabangg - 2)


सध्या भारत-इंग्लंड सामने चालू आहेत. भारताचे स्टार फलंदाज मोठ्या झोकात खेळपट्टीवर येतात १०-१५ मिनिटं, पाऊण तास, फार तर तास भर चांगल्या फलंदाजीचं दर्शन देतात आणि अचानक हत्तीच्या कानात मुंगीने 'मैं तुम्हारे बच्चे की मां बननेवाली हूं' म्हटल्यावर हत्ती कसा बावचळेल, तसे बावचळतात आणि दांड्या उडतात..... अशी चित्रं मी सिनेमाइतकाच क्रिकेटचाही चाहता असल्याने गेला महिनाभर तरी नियमित पाहात आहे. त्यामुळे असेल, पण जब्बरदस्त स्टाईलमध्ये व दमदारपणे इण्टर्व्हलपर्यंत येणाऱ्या आणि नंतर बावचळल्यागत विकेट फेकणाऱ्या 'दबंग - २' ने, अपेक्षाभंग करूनही, म्हणावं तितकं डोकं फिरवलं नाही.

पहिला दबंग सल्लूपटांतला शिरोमणी होता. त्याचाच हा दुसरा भाग, म्हणजे हाणामाऱ्यांमध्ये (नवराबायकोच्या फिल्मी भांडणां उडणाऱ्या उश्यांप्रमाणे) ठोश्यासरशी उडणारी माणसं आली (इथे ती टप्पे वगैरे पण खातात, हे मूल्यवर्धन), बनियानमध्ये पाल सुरसुरावी तसं वाकडं-तिकडं होऊन हसणं आलं आणि शेवटच्या दृश्यात सल्लूभायच्या शर्टाने लाजणंही आलंच. हे सगळं येणार हे माहित असतानाही हा सिनेमा बघायचा होता म्हणून मी सोबत एक मोठी रिकामी पिशवी घेऊन गेलो होतो.. बायको आणि माझं डोकं काढून ठेवायला !

तर डोकं काढून ठेवेपर्यंत जरासा उशीर झाला आणि सुरुवातीचा काही भाग चुकला.. पण जिथून पाहिला तिथून पुढे असं काहीसं झालं -
पहिल्या दबंग प्रमाणे (प.द.प्र.) एका गोडाऊनमध्ये इन्स्पेक्टर पांडे १५-२० गुंडांना यथेच्छ तुडवतो, उडवतो आणि त्याच्या तावडीतून एका लहान मुलाला सोडवतो. प.द.प्र., गोडाऊनच्या बाहेर त्याचे सहकारी पोलिस उभे असतात आणि प.द.प्र.च इथेही तो गुंडांनी 'कमावलेला' माल हडप करतो. (मुलाच्या बदल्यात देण्यासाठी बापाने आणलेले पैसे) पूर्वी लालगंजमध्ये असणाऱ्या इन्स्पेक्टर पांडेची आता कानपूरला बदली झाली आहे आणि त्याच्या सोबतीने तिवारी-मिश्रा सुद्धा आहेत. त्यांच्याशिवाय सिद्दिकी आणि अजून एक-दोन जण नव्याने आले आहेत. कानपुरातला बाहुबली आहे बच्चा भैया (प्रकाश राज). त्याचे दोन भाऊ - चुन्नी आणि गेंदा. हे तिघे मिळून कानपुरात दहशतीचं साम्राज्य पसरवून असतात. अर्थातच 'रॉबिन हूड' पांडे वि. बच्चा भैया पार्टी असा सामना रंगतो. मध्यंतरापर्यंत दोन्ही खेळाडू आश्वासक खेळ करतात, पण मध्यंतरात हत्तीच्या कानात मुंगी पुटपुटते आणि अचानक खेळ गुंडाळला जातो.. प.द.प्र., इथे पांडे 'एकटा जीव सदाशिव' नसतो, आता भाऊ, बाप व बायकोसोबत राहाणारा जबाबदार कुटुंबकर्ता असतो. साहजिक आहे, त्याच्या पोलिसी दुष्मनीचे चटके त्याच्या कुटुंबाला बसतात. वडिलांना धमकी, भावाला मार आणि गरोदर बायकोच्या मनावर मूल जन्माआधीच मरायचा वार.. हे सगळं झाल्यावर रॉबिन हूड पांडे चवताळतो आणि कपडे काढून (स्वत:चे) सर्व दुर्जनांना यमसदनी धाडतो. हे सगळं करताना तो अनेक अचाट हाणामाऱ्या करतो, मध्ये-मध्ये वेळ मिळाल्यावर कधी भावासोबत, कधी बायकोसोबत, कधी पोलिसांसोबत तर कधी नर्तकींबरोबर रस्त्यावर/ स्टेजवर/ परदेशात वगैरे ठिकाणी नाचतो व गातो. खुसखुशीत संवादही 'फेकतो'. एकंदरीत विद्या बालनला जामच सिरीयसली घेऊन मनोरंजन-मनोरंजन-मनोरंजन करतो.शीर्षक गीत (पु. लं. च्या भाषेत) 'बिपीशायला जायपीचा डबा' जोडल्यासारखं प.द.प्र.'हूड हूड दबंग..दबंग..दबंग..' करतं. बाकी गाणी ठीक-ठाक. 'दगाबाज नैना' प.द.प्र. 'तेरे मस्त मस्त दो नैन..' ची जादू करतं.
प्रकाश राज सारख्या नटाला पूर्णपणे वाया घालवलं आहे. संपूर्ण चित्रपटात त्याला एकून मिळून १५ वाक्यंही नसावीत. प.द.प्र. सोनू सूदइतका रोल तरी त्याच्यासाठी लिहिला जायला हवा होता.
सोनाक्शी सिन्हा आता जरा तासलेला ओंडका दिसायला लागली आहे. तिचं आकारमान आटोक्यात येण्याच्या मार्गावर असलं तरी कंबर मात्र काही केल्या हलता हलत नाही आणि नाकावरची माशी काही केल्या उडता उडत नाही.
अरबाज व विनोद खन्नालाही काहीही काम नाही.
छायाचित्रणाला विशेष वाव नव्हताच, पण तेवढ्यातही माती खाऊन झालीय.
दिग्दर्शक अरबाज खान, हीरो सलमान असल्याने तरतो, अन्यथा अजून खूप प्रयत्न हवे आहेत नक्कीच. लहान मुलाने, आधीच काढून दिलेली अक्षरं गिरवावीत तसा तो बहुतांश पहिला दबंग जसाच्या तसा गिरवतो.
सलमान खान हा अभिनेता नाही म्हणजे नाहीच. तो फक्त हीरो आहे आणि त्याची हीरोगिरी प.द.प्र. इथेही पैसा वसूल ! नाही म्हणायला त्याने इस्पितळातल्या एका दृश्यात डोळ्यात पाणी वगैरे आणलं आहे, ती त्याच्या अभिनयाची पराकाष्ठा असावी.

एकूणात, प.द.प्र. हा 'दबंग' थ्रूआउट मनोरंजन न करता अर्ध्यावरच बावचळतो.
सिनेमा पाहन बाहेर आल्यावर मला पहिला दबंग पाहाण्याची अतीव इच्छा झाली, पण बाहेर येईपर्यंत खऱ्या पोलिसांनी माझी बाईक उचलून नेली होती, ती सोडवून आणण्यात इच्छा विरली आणि 'खरे पोलिस' कसे असतात ह्याची जाणीव पाकिटाला जबरदस्त फोडणी बसून झाली !
असो... ह्यात पांडेजीचा काय दोष ?

रेटिंग - * *

Wednesday, December 19, 2012

नकोसे वाटते..


स्वत:ला शोधणे नकोसे वाटते
निराशा दाटणे नकोसे वाटते

सरे ना वाट ही किती चालायचे ?
विसावा पाहणे नकोसे वाटते

उधारी दे जरा सुखाची जीवना
भिकेचे भोगणे नकोसे वाटते

नव्याने हारणे मला चालेल पण,
सततचे झुंजणे नकोसे वाटते

खरा ये वा मला 'नसे मी' सांग तू
तुझे आभासणे नकोसे वाटते

जराशी रात्र दे जरासा चंद्र दे
उन्हाने पोळणे नकोसे वाटते

उद्याशी आजचा निरंतर हा लढा
कुणीही हारणे नकोसे वाटते

तुझ्या हातातले बनावे खेळणे
स्वत:शी खेळणे नकोसे वाटते

तुझा होईल रे 'जितू'ही ईश्वरा
तुझे बोलावणे नकोसे वाटते

....रसप....
१८ डिसेंबर २०१२

इथे ओशाळला म्हणे मृत्यू कधी
पुन्हा 'संभा'वणे नकोसे वाटते

....रसप....

Saturday, December 15, 2012

एक उनाड दिवस एकदा तरी यावा....


पापण्यांत लपलेला स्वप्नांचा थवा आभाळात उडावा..
एक उनाड दिवस एकदा तरी यावा....

पावलांनी चालत जावं जिथे नेईल वाट
मनात उफाळून यावी अल्लड खट्याळ लाट
चतूर, टाचणी, फुलपाखरांच्या मागे-मागे धावावं
पाण्यात 'डुबुक्' दगड टाकून तरंगांना पसरावं
सावलीसोबत पाठशिवणीचा खेळ अवचित रंगावा
एक उनाड दिवस एकदा तरी यावा....

पाठीवरचं दप्तर जाऊन हलकी सॅक यावी
कॉलेजची मोकळी हवा श्वासांतून वाहावी
कॅन्टिनच्या निवलेल्या चहाचा घोट घेताना
अनोळखी नजरेला चोरून नजर देताना
'पहला नशा' प्रेमाचा हवाहवासा वाटावा
एक उनाड दिवस एकदा तरी यावा....

पहिल्या नोकरीने नव्याने व्हावी जबाबदारीची जाणीव
कपड्यांच्या कपाटात 'फॉर्मल्स'ची भरून निघावी उणीव
घड्याळ्याच्या काट्याला घट्ट पकडायला शिकणं
खिश्यांमध्ये 'पेरूचा पापा'ला जपणं
पहिल्या पगाराचा आनंद चेहऱ्यावर ओसंडावा  
एक उनाड दिवस एकदा तरी यावा....

बरेच क्षण कळत नकळत हातातून निसटले
रित्या-भरल्या ओंजळीतून बरेच थेंब ओघळले
निसटलं-ओघळलं, हरकत नाही,
पण हिशोब तरी लागावा  
उगाच एक उनाड दिवस एकदा तरी यावा....
पापण्यांत लपलेला स्वप्नांचा थवा आभाळात उडावा..
असाच एक उनाड दिवस एकदा तरी यावा....

....रसप....
१५ डिसेंबर २०१२

Tuesday, December 11, 2012

प्रत्येक वाट माझी जाते तुझ्या घराशी


प्रत्येक वाट माझी जाते तुझ्या घराशी
मी भांडतो स्वत:शी, तू थांब उंबऱ्याशी

बसलो तुझ्या पुढे अन स्मरले तुलाच जेव्हा
कळली गझल मलाही तेव्हा कुठे जराशी

मूर्तीस पत्थराच्या पाझर कधी फुटेना
अन मी तहानलेला ठरलो उगा अधाशी

मी मोगऱ्यास रात्री ओंजळ भरून नेतो
नसतेस तू म्हणूनी ठेवायला उशाशी

इच्छा नसून माझे चालूच श्वास असती
कारण अजूनही मी जपले तुला उराशी

ना पार जायचे वा मागे फिरायचेही
सागर बघून रमतो मी एक तो खलाशी

....रसप....
११ नोव्हेंबर २०१२

Friday, December 07, 2012

विरहोत्सुकता


अर्ध्यात संपतो येथे
प्रत्येक डाव दैवाचा
जो कमी हारतो थोडा
आणतो आव जेत्याचा

नियतीचे प्यादे होउन
माझ्याशी जेव्हा भिडलो
माझ्या डोळ्यांच्या देखत
मी अनेक वेळा हरलो

जखमाही माझ्या साऱ्या
भळभळणे विसरुन गेल्या
एकट्याच वाटा माझ्या
भरकटणे विसरुन गेल्या

तूही जा सोडुन आता
मी थांबवणारा नाही
ह्या अपूर्ण डावासाठी
मी तळमळणारा नाही

स्वप्नांनी मला शिकवली
नात्यांची क्षणभंगुरता
मी जपतो मनात माझ्या
सवयीने विरहोत्सुकता

....रसप....
६ डिसेंबर २०१२

Wednesday, December 05, 2012

तू असतानाच्या आठवणी.. (उधारीचं हसू आणून....भाग - २)


६.
तू असतानाच्या आठवणी..
आठवणीतला एकेक क्षण
डोळ्यात साठवला होता...
त्या एकेक क्षणाने डोळ्यातलं पाणी शोषलं आहे

शेवाळलेल्या हिरवट डबक्यातल्या चिखलात
जसं कमळ उमलतं..
तसं त्या आठवणींतून उमलतात काही शब्दपाकळ्या..
आणि फुलते कविता..

रोज कातरवेळी माझं मन
मीच स्वत: लपवतो
त्या कमळाच्या मिटणाऱ्या पाकळ्यांत
आणि रोज सकाळी
एका प्रसन्न कवितेच्या उमलत्या पाकळ्यांतून
ते बाहेर येतं.... सुगंधित होऊन
अन दिवसभर बागडतं...
.
उधारीचं हसू आणून....

....रसप....
९ ऑक्टोबर २०१२

उधारीचं हसू आणून.... (भाग - २)

Saturday, December 01, 2012

वर्तमानात घेतलेला भविष्याचा शोध (Talaash - Movie Review)


अपनी मर्ज़ी से कहाँ अपने सफ़र के हम हैं
रुख हवाओं का जिधर का है उधर के हम हैं
- निदा फाजली
कमी-अधिक प्रमाणात असंच आपलं आयुष्य असतं. बहुतेक गोष्टी ओघानेच घडत असतात आणि आपण त्यासोबत घडत-बिघडत जातो. स्वबळावर आपली दिशा निवडणारे लोकही अनेकदा ह्या ओघासोबत वाटचाल करतातच. आपला असूनही आपला नसलेल्या किंवा नसूनही असेलल्या ह्या प्रवासात काही जाणीवा आपसूक होत जातात. कुणी त्याला ठाव लागणे म्हणतं तर कुणी शोध घेणे. फरक काही नसतो, काही तरी नवीन उमगलेलं असतं, फारसा प्रयत्न न करता किंवा प्रयत्न काही वेगळ्याच इप्सितासाठी असतो आणि हाताला काही वेगळंच लागतं. गुंतागुंतीचं आहे, पण बहुतेक वेळा सत्य गुंतागुंतीचंच असतं. नसेल पटत तर एकदा रीमा कागती दिग्दर्शित 'तलाश' पाहा, कदाचित पटेल आणि तरीही नाही पटलं तर हरकत नाही. ओघ चालू आहे, कधी ना कधी पटेलच; अशी मला - रणजितला - एक वेडी खात्री आहे.

सुर्जनसिंह शेखावत उर्फ सूरी (आमीर खान) मुंबई पोलीसदलातील एक निरीक्षक असतो. नव्यानेच ह्या शहरात दाखल झालेल्या 'सूरी'कडे केस येते एका विचित्र अपघाताची. हा अपघात साधासुधा नसतो, कारण  तो फिल्म सुपरस्टार अरमान कपूरच्या गाडीला झालेला असतो आणि त्यात अरमान कपूर जागीच ठारही होतो. मध्यरात्रीच्या सुमारास, स्वत:च्या घरापासून बरंच दूर, एका वेश्यावस्तीजवळ असलेल्या समुद्र किनाऱ्यालगतच्या रस्त्यावर, कुठलीही नशा केलेली नसताना, कधीच स्वत: गाडी न चालवणारा अरमान त्याच रात्री भरधाव गाडी का चालवत असतो? अपघाताच्या आदल्या दिवशी संध्याकाळी त्याने त्याच्या अकौंटन्टकडून मोठी रक्कम का घेतलेली असते ? रस्त्यावर कुणीही नसताना अचानक रस्ता सोडून, त्याची गाडी समुद्रात का उडी घेते ? असे अनेक विचित्र प्रश्न ह्या केसला क्लिष्ट बनवत असतात. काहीच विशेष हाती लागत नसल्याने एक अन्सोल्वेबल केस म्हणून ही फाईल बंद करावी, असंही वाटत असतं.
दुसरीकडे, एक कर्तव्यदक्ष पोलीस म्हणून नाव कमावलेला सूरी स्वत:ला एक कर्तव्यशून्य पिता मानत असतो. कारण त्याचा अल्पवयीन मुलगा, त्याच्या अपरोक्ष अपघाती मरण पावलेला असतो. ह्या अकस्मात धक्क्यामुळे सूरी आणि त्याची पत्नी रोशनी (राणी मुखर्जी) खूप अस्थिर असतात. दोघांतला संवाद खुंटलेला असतो. मनातल्या अपराधी भावनेमुळे सूरी अबोल, एकलकोंडा झालेला असतो. ह्या मानसिक अस्वास्थ्यामुळे रात्रीची झोप हरवलेला सूरी बहुतेकवेळा रात्र-रात्र घराबाहेरच राहत असल्याने त्याचे व त्याच्या पत्नीचे नाते अजून बिघडत चाललेले असते.
अश्या विचित्र मानसिक व कौटुंबिक कोंडीत असलेल्या सूरीला एक अनाहूत वेश्या रोझी (करीना कपूर) अपघाताची केस सोडविण्यासाठी काही मदत करते आणि त्याला मानसिक आधारही देते. तो केसच्या मुळापर्यंत जाण्याच्या दिशेने झटू लागतो. हळूहळू गुंते उलगडत जातात आणि उघडकीस आलेले सत्य त्याचा वैयक्तिक आयुष्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोनही बदलते.

'तलाश' म्हणजे केवळ कुठली रहस्यकथा नाही किंवा फक्त एक भावनिक नाट्यही नाही. ही तलाश, हा शोध केवळ एका पोलिसाचा नसून एका पतीचा, पित्याचा आणि एका वेश्येचाही आहे. काही वेळी म्हणूनच आपल्याला असं वाटत राहातं की दिग्दर्शिकेला नक्की काय मांडायचं आहे ? थरारनाट्य की भावनाट्य ? उत्तर आहे - दोन्ही. फलित आहे - अप्रतिम !सिनेमा आमीर खानचा आहे, म्हटल्यावर सिनेमाभर आमीर असणारच, आहेच ! पण त्याने रंगवलेला सूरी व इन्स्पेक्टर शेखावत लाजवाब.
करीना व राणी, दोघींना मर्यादित वाव असला तरी दोघीही चोख काम करतात. राणी मुखर्जी खूप आकर्षक दिसते.
छोट्याश्या भूमिकेत नवाझुद्दिन सिद्दिकी परत एकदा आपली छाप पाडतो. त्याचा पाठलाग होत असतानाचा संपूर्ण भाग अतिशय थरारक झाला आहे.
पटकथा अजून जराशी आवळता आली असती, पण जशी आहे तशीही छानच !
दिग्दर्शिका रीमा कागती, दुसऱ्याच सिनेमात खूप प्रभावी पकड दाखवते.
बऱ्याच दिवसानंतर एका सिनेमात गाणी कानांवर बलात्कार करत नाहीत. त्यासाठी राम संपत ह्यांचे विशेष आभार !
हीरोच्या अंगावर 'खाकी' आहे म्हणून त्याने काहीही अचाट उड्या माराव्या, ठोसे लगवावे आणि 'माइंड इट' इष्टाईलने दुर्जनांचा नि:पात करावा असल्या दाक्षिणात्य मोहाला बळी न पडल्याबद्दल दिग्दर्शिका व एक्शन दिग्दर्शकाचेही आभार !!

काही ठिकाणी जराशी गती मंदावली असली, शेवट झाल्यानंतरही शेवट चालू ठेवला असला, तरी 'तलाश' नक्कीच ह्या वर्षातील उत्कृष्ट सिनेमांपैकी एक आहेच.

(अवांतर : "जब तक हैं जान" पाहिल्यापासून जर कुणाला बॉलीवूड-अपचनाचा त्रास सुरू झाला असेल, तर 'तलाश'ची एक गोळी हा रामबाण उपाय ! - इति वैद्य रणजित पराडकर !)

रेटिंग - * * * 
Related Posts Plugin for WordPress, Blogger...