Monday, December 23, 2013

दीड दमडीचा धुमड्या (Movie Review - Dhoom - 3)

"ट्रकच्या मागे लिहिलेली वचनं" हा तत्वज्ञानाचा एक अविरत स्त्रोत आहे. द व्हेरी फेमस 'बुरी नजरवाले, तेरा मूह काला' पासून अनेक उत्तमोत्तम शेरही मी तिथे वाचलेत. पण अगदी हल्लीच, काही दिवसांपूर्वीच एका ट्रकवर वाचलेलं वचन मात्र सगळ्यांवर कडी असावं -

"भाई हो तो ऐसा, ना मांगे हिसाब ना मांगे पैसा !!"

ह्याच उदात्त विचारसरणीचा एक जादूगार नव्वदच्या दशकात शिकागोमध्ये होऊन गेला, हे काल धूम-३ पाहिल्यावर समजलं. पण हा जादूगार तर ट्रकवाल्या पेक्षाही उदात्त विचारसरणीचा असतो. तो अशी अपेक्षा स्वत:च्या भावाकडून नव्हे, तर बँकेकडून ठेवतो आणि कर्ज घेतो. पण ती बँक म्हणजे महाराष्ट्र सरकार नसतं आणि कर्ज घेणारा कुणी शेतकरीही नसतो. त्यामुळे व्यवहारास चोख बँक, हफ्ते चुकवणाऱ्या जादूगाराला नोटिशीची जादू दाखवते आणि हबकलेला हताश जादूगार आत्महत्या करतो. त्याने आत्महत्या केल्यावरही बँकेच्या अधिकाऱ्याचं हृदय द्रवत नाही. बिच्चाऱ्याला ट्रकवाला व जादूगाराचे उदात्त विचार माहित नसतात. तो जादूगाराची तारण मालमत्ता जप्त करवतो आणि त्या जादूगाराचा लहान मुलगा, मोठा झाल्यावर बँकेच्या कायदेशीर कारवाईचा बेकायदेशीर बदला घेतो. मायला ! चोर तो चोर, वर शिरजोर ? ही तर खोब्रागडेगिरी झाली ! असाच आहे धुमड्या, अर्थात धूम - ३.

धुमड्याची सुरुवात आश्वासक होते. आमिरची सनी लिओनीश पाठ दिसेपर्यंतची पहिली काही मिनिटं आपल्या अपेक्षा उंचावतात. नंतर कैच्याकै भंकस सुरु होते. बाईक चालवणारा चोर आमिर स्वत:चे तोंडही लपवत नाही आणि अमेरिकेचे पोलिस इतके दुधखुळे असतात की ते त्याला ओळखू शकत नाहीत. लगेच पुढच्या दृश्यात अभिषेक आणि उदय चोप्रा कृत गुंडांची पिटाई दाक्षिणव्रात्य सिनेमाला लाजवेल अशी आहे. पुढल्या चाकावर गोल गोल फिरणारी रिक्षा पाहिल्यावर तिचा स्टिअरिंग कॉलम बनवाणाऱ्या कंपनीच्या मालकाचा उर अभिमानाने भरून आला नसेल, तरच नवल !
केवळ दोन चोऱ्या करून अमेरिकन पोलिसदलास हवालदिल करणाऱ्या एक अज्ञात चोरास पकडण्यासाठी, दोन धुमड्यांतील सुपरफ्लॉप कामगिरीनंतरही आंतरराष्ट्रीय 'सुपरकॉप' ठरलेल्या 'जय दीक्षित'ला (अभिषेक बच्चन) खास भारतातून बोलावले जाते. कारण कदाचित हे असावं की, हा चोर (आमिर खान) चोरी केल्यावर हिंदीत निरोप सोडत असतो - "तुम्हारी ऐसी की तैसी." गाड्याबरोबर नळ्याची यात्रा होते, तसा जयबरोबर 'अली'ही (उदय चोप्रा) येतोच !
पुढे काही बाही होत राहतं आणि सगळ्याचा हिशोब थोडक्यात मांडायचा झाल्यास - सुमारे ३ तासाच्या धुमड्यात तासभर बाईक्स व्रुमव्रुमत राहतात. तासभर आमिरवरून कॅमेरा हलत नाही. अर्धा तास गाणी, नाच, सर्कशीत जातो. १५ मिनिटं अभिषेक बच्चनच्या नाकावरील माशी उडवण्याच्या असफल प्रयत्नात जातात आणि उर्वरित १५ मिनिटं उदय चोप्रा प्रेक्षकांना वात आणण्यासाठी वापरतो. कतरिना पानात कतरी सुपारी असते, तशी हरवते किंवा पोह्यांवर भुरभुरवलेल्या खोबऱ्यासारखी नुसतीच दिसते.आमिरचे बचकांडेपण कधी नव्हे इतकं धुमड्यात जाणवतं. त्या बाईक्सचा धुडांवर बसल्यावर त्याचे पाय खाली कसे पोहोचत असतील, हा एक संशोधनाचा विषय आहे.
दोरावरून बाईक चालवून एका बिल्डिंगमधून दुसऱ्या बिल्डींगमध्ये जाणे असो की चालू-चालूमध्ये बाईक बोटमध्ये कन्व्हर्ट होणं असो की दोन बाईक्स एकमेकांना खटाखट जोडल्या जाऊन त्यांची एक चार चाकी बनून तिने उडी मारणं असो, सगळंच आजच्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीतील असामान्य बुद्धिमानांसाठी एक जबरदस्त 'फूड फॉर थॉट' ठरायला हरकत नाही.
एकंदरीतच सगळे पाठलाग, स्टण्ट्स बॉन्ड-फॉण्ड, स्पायडर-वायडर मॅनांनी शिकवणी लावावी असेच.

धुमड्या संपल्यावर जरा वेळाने शांतपणे विचार केल्यावर लक्षात आलेल्या चार गोष्टी -

१. आमिर आणि शाहरुखमध्ये काही फारसा फरक नाही. दोघेही स्वत:च्या प्रेमात आकंठ बुडलेले आहेत. 'जतहैंजा' मधला समर आणि धुमड्यातला समर दोघेही सारखेच पकवतात.
२. उदय चोप्रा हे यश चोप्रांना पडलेलं एक भयानक स्वप्न असावं, जे खरं झालंय.
३. प्रत्येक सिनेमागणिक अभिषेक बच्चन एक लांबलचक ठोकळा बनत चालला आहे.
४. रोहित शेट्टी, तू एकटा नाहीस.  

साधारण साडे नऊला धुमड्या संपला. माझ्या सुदैवाने दहा वाजता कलर्सवर '24' चा शेवटचा भाग होता. आमिरने केलेल्या घोर अपेक्षाभंगावर अनिल कपूरने अप्रतिम साकारलेला 'जयसिंग राठोड' एक उत्कृष्ट उतारा होता. त्यामुळे पराकोटीचा निराश झालेलो असतानाही मी शांतपणे झोपी जाऊ शकलो आणि सुचलेल्या बऱ्याच शिव्या विसरू शकलो !
थँक यू, अनिलकाका !

रेटिंग = जतहैंजा  

Wednesday, December 18, 2013

विचारू नका 'काय प्यालास' त्याला

विचारू नका 'काय प्यालास' त्याला
पुरे एव्हढे की विसरला जगाला

तुम्ही शुद्ध सांभाळली, काय झाले?
कुणी थांबुनी पाहतो का तुम्हाला?

तुझे दु:ख वाटे मला आपले, घे
तुला एक प्याला, मला एक प्याला

जुना वाळण्याची नवा वाट पाही
नसे ओढ आता जुनी आसवाला

मशीदी तुझ्या अन् तुझी देउळे पण
मनी फक्त आहे तिचा बोलबाला

तिचे रंग ओठावरी राहिलेले
नवे घोट घेता, नवा स्वाद आला

उधारी नको रोख घे सर्व दु:खा
तुझे व्याज देता रिता होय प्याला

....रसप....
१८ डिसेंबर २०१३

Thursday, December 12, 2013

'वेक अप सिड' - मला जाणवलेला - (Wake Up Sid - Movie Review)

काही वेळेस बोलायला खूप काही असतं. कदाचित, भेटणारी व्यक्ती बऱ्याच काळानंतर भेटलेली असते किंवा अचानक बरंच काही घडलेलंही असतं. अश्या संवादात वेळ चटकन निघून न गेल्यासच नवल. बरेचदा जर बोलण्यासारखं खूप काही असेल, तर अक्षरश: कुणीही बोलायला चालून जातं ! पण खरी दोस्ती तेव्हा कळते, जेव्हा बोलायला खूप कमी असतं किंवा नसतंही, तरी वेळ चटकन निघून जातो. न बोलताही, बरंच काही बोललं जातं. 'क्वालिटी टाईम' ह्यालाच म्हणत असावेत.

एक कलाकार आणि त्याचा श्रोता/ वाचक/ प्रेक्षक ह्यांच्यातल्या नात्याचा विचार करतानाही असेच काहीसे विचार माझ्या मनात येतात. तूर्तास आपण चित्रपटाबद्दल बोलू. समजा एखादी कहाणीच जबरदस्त असेल. जसं की 'मुघल-ए-आझम'. तीन साडे तीन ताससुद्धा सर्रकन् निघून जातात. किंवा (जुना) 'वक़्त'. राजकुमारसुद्धा चालून जातो. पण खरी गंमत तेव्हा असते जेव्हा 'प्लॉट' छोटासाच असतो किंवा काही विशेष असा नसतो, पण तरीही मन गुंतून राहातं.

'वेक अप सिड'.
अगदी सामान्य कहाणी. कुठलेच धक्के, झटके नाहीत. जे जे जसं जसं आहे/ होईल, ते ते तसं तसं दाखवलेलं. प्रामाणिकपणे. पण किंवा म्हणूनच मन गुंततं. इथला प्रत्येक चेहरा आपल्याला परिचित वाटतो. कुणाचा राग येतो, कुणाची कीव येते, कुणाला आपण 'हुं' करून उडवून लावतो आणि कुणी अगदी आपलंसं वाटतं.

सिद्धार्थ मेहरा - सिड - (रणबीर कपूर) एक बडे बाप की बिगडी औलाद. दक्षिण मुंबईच्या अनेक गल्ल्यांत, भागांत असे सिड दिसून येतात. बापाच्या पैश्यावर ऐश करणारे. पब्स-डिस्कोज मध्ये थिरकणारे, महागड्या गाडयांतून मित्रांसोबत मस्तवाल घोड्यासारखे उधळणारे आणि हे सगळं करताना त्यात काही विशेष न वाटणारे. सिडसाठी आयुष्य खूप सोपं आहे. मित्र, त्यांच्याबरोबर टाईमपास, पार्ट्या, मजा-मस्करी, नाईट आऊट्स आणि जेव्हा जे मनात येईल तेव्हा ते करणं. जे तोंडाला येईल ते बोलणं, कुणालाही उडवून लावताना क्षणभर विचारही न करणं. मग ती आई असो वा बाप.
वडिल (अनुपम खेर) एक 'सेल्फ मेड' यशस्वी माणूस. अत्यंत साधारण परिस्थितीतून वर येऊन स्वत:चं एक मोठ्ठं Business Empire उभारलेला एक नावाजलेला उद्योजक. साहजिकच कामाच्या व्यापात मुलाच्या बेमुर्वतखोर वागण्याकडे विशेष लक्ष न देता येणारा, एक हताश, पराभूत बाप. आई (सुप्रिया पाठक), एक अर्धशिक्षित गृहिणी. जिचं जग म्हणजे नवरा व मुलगा, इतकंच. त्यापलीकडे काही नाही. स्वत:सुद्धा नाही.
दुसरीकडे आयेशा (कोंकणा सेन-शर्मा) - लेखिका बनण्याचं स्वप्न घेऊन, कोलकत्याहून मुंबईला एकटीच आलेली एक उत्साही, कॉन्फिडण्ट तरुणी. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली, आयुष्याकडून मोजक्याच पण विशिष्ट अपेक्षा व त्या अपेक्षांची पूर्ती करवून घेण्याचा आत्मविश्वास असणारी आयेशा अति-लाडावलेल्या, लक्ष्य-हीन सिडच्या आयुष्यात येते. किंबहुना, दोघेही एकमेकांच्या आयुष्यात येतात आणि क्षणाक्षणातून आनंद टिपणाऱ्या दोघांच्या दृष्टीला आयुष्याकडे पाहण्याचा एक वेगळा कोन मिळतो. स्वत:च्याच नकळत सिडमध्ये आमुलाग्र बदल घडवणारी आयेशा, त्याच नकळतपणे तिच्या दृष्टीने तिच्यासाठी पूर्णपणे मिसफिट असलेल्या सिडकडे आकर्षित होते आणि स्वत:च्या आत जाणीवपूर्वक जपलेला 'बच्चा' आयेशाच्या सहवासात कधी मोठा, जबाबदार होतो हे स्वत: सिडलाही कळत नाही.आपल्याला माहित असतं की पुढे काय होणार आहे. तरी प्रत्येक दृश्य बघावंसं वाटत राहतं. ह्यामागे पडद्यावरील व्यक्तिरेखांचा सहजसुंदर अभिनय खूप महत्वाचा आहे.

रणबीर कपूरने, तसं पाहिल्यास भावनिक चौकट अगदीच छोटीशी असणारं 'सिड'चं पात्र अत्युत्तम साकारलं आहे. त्याची बदलत जाणारी शारीरिक भाषा, त्याच्यातलं खट्याळ लहान मूल त्याच्या डोळ्यांतून दिसणं, त्याचा 'हू केअर्स !' अटिट्यूड आपल्याला अगदी पटतो. काही ठिकाणी त्याच्या वागण्याचा संताप येणं, काही ठिकाणी त्याचा हेवा वाटणं आणि काही ठिकाणी त्याची गंमत वाटणं ह्या आपल्या भावना रणबीरने साकारलेल्या 'सिड'च्या यशाचं द्योतक मानता येऊ शकतात.
सुप्रिया पाठक आणि अनुपम खेर ह्यांना तसं कमी काम आहे. पण प्रत्येक दृश्यात दोघेही जान ओततात.
रणबीर - अनुपम खेरच्या वादाचा आणि नंतर ऑफिसमध्ये संवादाचा असे दोन प्रसंग ह्या सिनेमाचे हायलाईट्स आहेत.

कोंकणाची 'आयेशा' मात्र मन जिंकते. बॉसने डेटची ऑफर दिल्यावर तिचं खट्याळ हसणं, घरातला पसारा पाहून वैतागणं, प्रेमभावनेची जाणीव होणं, अश्या छोट्या-मोठ्या प्रसंगातून तिने अशी काही करामत केली आहे की सिडच्या आधी आपणच तिच्या प्रेमात पडतो. तिचा वावर इतका सहज आहे की जणू हे तिचंच आयुष्य ती जगत असावी. गालावर खळ्या नाहीत, मधाळ चेहरा नाही, दिलखेचक फिगर नाही तरीही ही अभिनेत्री जगातली सगळ्यात सुंदर स्त्री वाटते. Hats off !

शंकर-एहसान-लॉय आणि अमित त्रिवेदीचं संगीत टवटवीत फुलांसारखं तजेलदार आहे. अमित त्रिवेदीचं 'इकतारा' नि:संशय गेल्या अनेक वर्षांत तयार झालेल्या सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक आहे.

सो गयी रात जा के दिन है अब जाग उठा
आँखें मसलता है सारा यह समां
आवाजें भी लेती है अंगडाइयाँ - (जावेद अख्तर)  

किंवा

बीती रात बासी बासी पड़ी है सिर्हाने
बंद दरवाजा देखे लौटी है सुबह
ठण्डी है अँगिठी, सीली सीली हैं दिवारें
गूँजे टकराके इनमें दिल की सदा - (अमिताभ भट्टाचार्य)

अश्या सहजसुंदर शब्दांतून पडद्यावरील पात्र व्यक्त होतात.

निरंजन अयंगारचे संवादही साधेच, कुठलीही फेकाफेक नसलेले आहेत, अगदी तसेच जशी अयान मुखर्जीच्या कथेची गरज आहे.

अत्यंत सामान्य कथानकाला एखाद्या कवितेसारखं सादर करणाऱ्या दिग्दर्शक अयान मुखर्जीचं मन:पूर्वक अभिनंदन ! प्रत्येक दृश्य, प्रत्येक क्षण अत्यंत तजेलदार ठेवल्याने हा चित्रपट तरुणाईची एक जादूई, हळुवार झुळुक अंगावरून नेतो. सिडने बोलता बोलता आयेशाला सहज प्रपोज करणं आणि तिने त्यावर त्याला त्याच सहजतेने नाकारणं, अशी काही दृश्यं रंगवताना अयान मुखर्जीने हा विचार केलेला जाणवतं की हे खऱ्या आयुष्यात घडलं असतं, तर कसं घडलं असतं ?
दोन सव्वा दोन तासानंतर चित्रपट संपल्यावर गालावर मोरपीस फिरल्यासारखं हलकं हसू आपल्या चेहऱ्यावर राहतं. असं आजकाल क्वचितच अनुभवायला मिळतं, नाही ?

'वेक अप सिड' ही एक सोप्या शब्दांतली प्रामाणिक कविता आहे. त्यात काही ठिकाणी काही चुका असतील, पण तरी तिचा परिणाम कमी होत नाही. हा चित्रपट सर्वश्रेष्ठ नसेल, पण पुन्हा पुन्हा पाहण्यासारखा निश्चितच आहे.

....रसप….

ह्या चित्रपटावर लिहिण्याची प्रेरणा दिल्याबद्दल फेसबुकवरील मीनाक्षी कुलकर्णी ह्यांचे मनापासून आभार !

Wednesday, December 11, 2013

अंधार

ऊब देण्यास असमर्थ शाल
काही बोचऱ्या शब्दांची उशी
पुन्हा पुन्हा कूस बदलणे
मनात बेचैनी अखंडशी

अशीच एक रात्र पुन्हा येणार आहे
आजही माझी तयारी कमी पडणार आहे

घडयाळाचा काटा डोळ्यांत टिकटिकत राहील
वेळ कूर्मगतीने पुढे सरकत राहील
तरी वेळ बदलणार नाही
अंधार ओसरणार नाही..

....रसप....
११ डिसेंबर २०१३

Sunday, December 08, 2013

पुस्तक

एक पुस्तक लिहावं, असा विचार करतो आहे

नाव 'तू'
हक्क तुझे
प्रस्तावना तुझी
मुखपृष्ठ तू
मलपृष्ठही तूच
आतला शब्दन् शब्द तुझाच
फक्त मनोगत माझं....

हे पुस्तक जगासाठी नसेल
फक्त आपल्यासाठी असेल
कारण खूप काही अव्यक्त राहिलंय
कारण खूप काही अव्यक्तच राहणार आहे

एक पुस्तक लिहिणार आहे
आठवांच्या पानांवर, आसवांच्या शाईने..

....रसप....
७ डिसेंबर २०१३

Saturday, December 07, 2013

जाग


अंगावरची शाल बाजूला झाल्याने थंडी वाजतेय,
असं वाटून जाग आली
प्रत्यक्षात तू जराशी बाजूला झाली होतीस
तुझा सैल पडलेला हात माझ्या गळ्यात होता,
पण तो शालीसारखाच निपचित

तुझ्या केसांचा सुगंध श्वासांत बाकी होता
विझलेल्या उदबत्तीच्या गंधासारखा
तुझ्या स्पर्शाचा शहारा अजून जाणवत होता
मावळतीच्या तांबड्या रंगासारखा

त्या पहाटे सूर्य उगवला नाही
आजपर्यंत सूर्य उगवलाच नाही

....रसप....
७ डिसेंबर २०१३

Wednesday, December 04, 2013

अनासक्त

चांदण्यांनी जमिनीवर उतरावं, तसा -
रोज पहाटे ओलसर अंगणात,
पारिजातकाचा सडा असतो..
तू बोलायचीस तेव्हा असाच सडा
मोत्यांचा पडायचा
जो तू नसताना मी तासन् तास न्याहाळायचो

वेचलेला सुगंध जसा सहज उडून जातो,
तितक्याच सहज तू दुरावलीस
हे झाड म्हणून तुझ्यासारखंच आहे,
माझंच असूनही परकं आणि
अनासक्तीने सगळ्या चांदण्या झटकून देणारं...

....रसप....
४ डिसेंबर २०१३

Friday, November 29, 2013

अभिनिवेश

क्षितिजावर अडला आहे
उत्तुंग नभाचा पूर
वा सहनशीलतेअंती
उधळले कुणी चौखूर

की पायदळाच्या तुकड्या
ह्या दबा धरुन बसलेल्या
घेरून, गराडा घालुन
हल्ल्यासाठी टपलेल्या

रंजला कुणी विद्रोही
बांधून मनाशी गाठ
देणार कदाचित आता
तो उद्रेकाला वाट

हे सगळे सगळे दिसते
मी तरी उदासिन, निश्चल
राखतो चेहरा माझा
पण आतुन अस्थिर, चंचल

हृदयाच्या पटलावरती
शब्दांनी खरवडतो मी
डोळ्यांच्या लालीने मग
कवितेला पेटवतो मी

मी षंढ, थंड रक्ताचा
मी कुणी न क्रांतीकारक
अभिनिवेश दाखवणारा
मी हताश कवितासाधक

....रसप....
२९ नोव्हेंबर २०१३ 

Tuesday, November 26, 2013

अनुभूती

कितीदा मनाला उभारी दिली मी
कितीदा नवी जिद्द मी बाणली
तरी सांज प्रत्येक घेऊन येते
निशेची निराशामयी सावली

इथे एकदा काळजाने झरावे*
जशी पाझरे पश्चिमा सावळी
निळाई मुक्याने जरा सावळावी
भरावी जरा लोचनांची तळी

तळातून गहिऱ्या उफाळून यावे
जुने साचलेले तरी सोवळे
मनातून माझ्या कुणी व्यक्त व्हावे
जरा मुक्त व्हावीत ही वादळे

कुणी हारले सर्व काही तरीही
मला जिंकवाया पडावे कमी
दिसे फक्त आनंद ओसंडता पण
स्वतःशीच आहे पराभूत मी

....रसप....
१६ नोव्हेंबर २०१३
*ओळ 'श्री. प्रसाद जोशी' ह्यांची. 

Monday, November 25, 2013

गाण्यांची वही हरवली आहे..

आजकाल मी मोजकीच गाणी गात असतो,
जी मला पाठ आहेत,
कारण माझी गाण्यांची वही हरवली आहे

अनेक शब्द माझ्याभोवती पिंगा घालतात
अर्ध्या-मुर्ध्या ओळी डिवचत राहतात
गाऊ शकणार नसताना अचानक काही गाणी आठवतात
शब्द, ओळी आणि सूर चकवा देऊन जातात
काहीच हातात उरत नाही
आणि मी गात राहतो तीच गाणी,
जी मला पाठ आहेत
कारण माझी गाण्यांची वही हरवली आहे

पूर्वी माझ्याकडे खूप वेळ होता
प्रत्येक गाण्याचा एक असा एकसष्टावा क्षण होता
आता प्रत्येक विसरलेलं गाणं एकेक क्षण घेऊन गेलंय
माझ्या मिनिटा-मिनिटाचं सगळं गणितच बिघडलंय
चुकलेल्या मात्रांवरचे हुकलेले क्षण मी सतत शोधत असतो
दिवसाच्या चोवीस तासांचा हिशोब रोज जुळवत असतो
मात्र वेळेची जुळवाजुळव नेहमीच जमत नाही
आणि मी गात राहतो तीच गाणी,
जी मला पाठ आहेत
कारण माझी गाण्यांची वही हरवली आहे

रंगलेल्या मैफलीत अनेक आवाज मला सांगतात, 'तू गा'
पण माझ्या आतून एक एकटा आवाज येतच नसतो
काय गावं तेच उमगत नसतं
मनातलं आणि डोक्यातलं गाणं नेहमीच वेगळं असतं
दोन्हींपैकी कुठलंच गाणं ओठांवर येत नाही
मैफल सरत राहते पण मला अनावर होत नाही
मी शून्य नजरेने काही निरक्षर भावना वाचत राहतो
अन् भवतालीच्या प्रत्येकाचा हेवा करत राहतो
आपल्याला हवं ते प्रत्येक जण गात असतो,
फक्त मलाच सुचत नाही
आणि मी गात राहतो तीच गाणी,
जी मला पाठ आहेत
कारण माझी गाण्यांची वही हरवली आहे

एक थिजलेलं गाणं
माझ्या डोळ्यांत कुणाला तरी दिसतं
मला हवं ते गाणं
दुसरंच कुणी गायला लागतं
त्या सुरांत नकळतच मी माझा सूर मिसळतो
काही क्षणांसाठी स्वत:लाच गवसतो
पण गाणाऱ्यापेक्षा पेक्षा मीच जास्त खूश असतो
कदाचित त्यालाही काही दुसरंच गायचं असतं
मला दिसतो त्या शून्य चेहऱ्यात माझाच विषण्ण चेहरा
अन् कळतं की मी एकटाच नाही
जो गात राहतो तीच गाणी,
जी पाठ आहेत
इथे तर प्रत्येकाची गाण्यांची वही हरवली आहे..!!

....रसप....
२४ नोव्हेंबर २०१३ 

Thursday, November 21, 2013

तू आवडण्याला नव्हते काही कारण..

तू आवडण्याला नव्हते काही कारण
तू नावडण्याला देखिल नाही कारण

मी झुरलो प्रेमाच्या ह्या नजरेसाठी
उपकारालाही असेल काही कारण

साचला बर्फ भवताली आयुष्याचा
दे सुटकेसाठी एक प्रवाही कारण

जो योग्य ठिकाणी पोचवायचा रस्ता
आता चकवा देण्याला पाही कारण

लागावा पैसा तिला पाहण्यासाठी
बरबादीला मग मिळेल शाही कारण

तू कितीकदा येण्याचे टाळुन झाले
बघ सुचेल जाण्याचे आताही कारण

....रसप....
२१ नोव्हेंबर २०१३  

Monday, November 11, 2013

अनाहत

हा नितळ शांतसा डोह
भवताल मूक अन् मुग्ध
मी नजर स्थिरावुन बसतो
दिसते धूसर संदिग्ध

ही चंचलतेची जाणिव
ही नगण्य क्षणभंगुरता
अद्याप न जिंकू शकलो
ही पराभवी हतबलता

जगण्याला लय देताना
झिजलो मी कणाकणाने
घे सामावून मला तू
वाहिन मी मुक्तपणाने

इतक्यात कुणाचा नाद
माझ्याच मनातुन येई
"मी काल कुणाचा नव्हतो
मी उद्या कुणाचा नाही -
हा क्षण जो हाती आहे, मी तुझाच आहे केवळ
आकाश तुझे, पाणीही, पर्वत अन् निर्झर खळखळ!"

भावूक झुळुक हलकीशी
जळि तरंग बनुनी हसली
जगण्याची कविता झाली
मनपटलावर मोहरली

....रसप....
०८ नोव्हेंबर २०१३


Saturday, November 09, 2013

'सत्या'चार - (Movie Review - Satya -2)

कलाकाराने आयुष्यभर विद्यार्थी राहायचं असतं. किंबहुना, जो आयुष्यभर विद्यार्जन करत राहातो, तोच चांगला कलाकार असतो. ज्या क्षणी, 'मला आता हे येत आहे' अशी भावना मनात उत्पन्न होते, त्याच क्षणी कलेचा व कलाकाराचा ऱ्हास सुरु होतो. कधी मिळालेला पैसा, लाभलेली प्रसिद्धी डोक्यात शिरते आणि काही अश्या निर्मिती खपून जातात ज्या प्रत्यक्षात साधारण असतात, हे त्या कलाकाराला माहित असतं. पण 'मी काहीही केलेलं आवडून जातंय' अशी एक 'ग'ची बाधा होते आणि मग निर्मितीमागे पूर्वीसारखी मेहनत घेतली जात नाही, वैचारिक बैठक कमजोर होते किंवा नष्टही होते. इथपर्यंत येईतो लोकांचं प्रेम आटलेलं असतं आणि अचानक त्या कोणे एके काळच्या उत्कृष्ट कलाकाराला, त्याचे कोणे एके काळचे चाहते झिडकारतात, नाकारतात, जागा दाखवतात. झोपेत बरळणाऱ्याला खणखणीत कानाखाली बसावी आणि तो खाडकन् जागा व्हावा, तसं सर्वज्ञानाच्या फसव्या नशेच्या अंमलाखाली असलेल्या त्या कलाकाराला सत्यस्थितीचे भान येते आणि तो धाडकन् जमिनीवर आपटतो.
रामगोपाल वर्मा कधी जमिनीवर आपटणार आहे, ह्याची माझ्यासारखे त्याचे कोणे एके काळचे चाहते वाट बघत असावेत. रामूने 'शोले'चा रिमेक बनवला तेव्हाच त्याच्यावर सर्वच स्तरांतून झालेली टीका खरं तर जाग येण्यासाठी पुरेशी होती, पण नाही आली. एकेका सिनेमागणिक रामू स्वत:च स्वत:चं तोंड काळं करत राहिला आणि आता त्याने 'सत्या-२' बनवला. शोलेचा रिमेक पाहिल्यावर अनेकांनी म्हटलं होतं की, 'वाटच लावायची असेल, तर दुसऱ्या कुणाच्या निर्मितीची का लावायची. स्वत:च्याच एखाद्या निर्मितीची लावावी की !' त्या लोकांची ही इच्छा 'सत्या - २' मधून पूर्ण झाली आहे.

'सत्या' - हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मैलाचा दगड. 'गँगवॉर मूव्हीज' प्रकारात हिंदी चित्रपटाला एका वेगळ्या पातळीवर ह्या चित्रपटाने नेलं. अण्डरवर्ल्डकडे बघण्याचा दृष्टीकोन, तो विषय हाताळण्याची विचारधारा ह्या चित्रपटाने पूर्णपणे बदलून टाकली. बराच काळ झाकोळलेला मनोज वाजपेयीसारखा एक तगडा अभिनेता झोतात आणला. 'सत्या' हा रामूचाच नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीतील आजपर्यंतच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांतला एक असावा. अश्या चित्रपटाला 'सत्या - २' उजळणी देणार होता.

ह्या उजळणीची सुरुवात संमिश्र होते. कॅमेरा अप्रतिम फिरतो, फिरवतो आणि निवेदक सदोष हिंदी बोलतो. तो आवाज ओळखीचा आहे, पण कोण आहे ते विचार करण्यात वेळ दवडावासा वाटला नाही. कुठल्याश्या गावातून 'सत्या' (पुनीत सिंग रत्न) मुंबईत येतो, त्याच्या प्राणप्रिय प्रेयसीला - 'प्रिया' (अनाइका सोती)ला - न सांगता. का ? माहित नाही. विचारलं तर म्हणतो, 'विचारायचं नाही!'. बरं ज्या मुंबईत ४ संपर्क दिल्याशिवाय कुणी चपराश्याची नोकरी देत नाही, तिथे ह्याला एक करोडपती बिल्डर (महेश ठाकूर) सहाय्यक म्हणून ठेवतो. त्याचं पूर्ण नावही न विचारता ! ह्या बिल्डरच्या मदतीने इतर काही बड्या धेंडांशी ओळख वाढवून, त्यांची मोठमोठे डॉन व त्यांचा वारेमाप पैसासुद्धा करू शकत नसलेली कामं चुटकीसरशी करून सत्या आपलं बस्तान बसवतो. त्याला बनवायची असते एक 'कंपनी'. बोले तो - 'गँग' ! अशी गँग जिचे मेंबर्स कोण आहेत, हे त्यांना स्वत:लाही माहित नसेल. पैसा कुठून येतो, कसा येतो हे कुणालाही कळू नये म्हणून तो एक 'फायनान्शियल कन्स्लटन्ट'सुद्धा नेमतो ! (तो नेमकं काय करणार असतो हे कथालेखकाच्या डोक्याबाहेरचं असल्याने ते दाखवलेलं नाही. पण तो काही तरी करतो आणि ते व्यवस्थित करतो ह्यावर अंधविश्वास ठेवणे, हे इथे प्रेक्षकांकडून अपेक्षित आहे.) ह्या कंपनीत सगळे सिस्टिममुळे दुखावलेले लोक असतात. सिस्टिमने दुखावलेला कुणीही माणूस गँगस्टर बनू शकतो, देशद्रोह करू शकतो, गद्दारी/ नमक-हरामी करू शकतो आणि तेही एका पूर्ण नावही न सांगणाऱ्या छपरी झिपऱ्याच्या शब्दांत येऊन, इतका दुधखुळेपणाही प्रेक्षकांत असायलाच हवा, म्हणजे हे पटतं.

पुढे ही अत्यंत फडतूस कथा, त्याहून फुटकळ सादरीकरणाने पुढे सरकते. अनेक निष्पाप मरतात आणि सगळ्यांचा तथाकथित बाप 'सत्या' कोठडीत जातो. पण तरीही ही स्टोरी संपत नाही. निवेदक धमकी देतो की बाकीची कहाणी पुन्हा कधी तरी सांगीन ! समोरचा पडदा काचेचा नसतो आणि प्रोजेक्टर लगेच झाकला जातो त्यामुळे चप्पल फेकून काही फुटणार नसतं. म्हणून ती धमकी ऐकून क्षणभर संतापलेलं पब्लिक 'खड्ड्यांतून रस्ता शोधतो, फुरफुरणारे नळ बघतो, सडकछाप लोकप्रतिनिधींना मत देतो तर एक गंडलेला पिच्चर पण सहन करू आता !' अशी काहीशी मनाची समजूत घालून मुकाटपणे बाहेर पडतं.


पुनीत सिंग रत्न हे एक असं रत्न रामूने निवडलं आहे की सांगावं ! हा दिसतो 'चंद्रचूड सिंग'सारखा, बोलतो 'चक्रवर्ती'सारखा आणि अभिनय म्हणजे 'सुनील शेट्टी' झक मारेल असा ! इंटरव्ह्यू दिल्यासारखे सपाट डायलॉग मारणं आणि 'ठिक्कर पाणी' खेळल्यासारखं चालणं हे दोन नियम सगळीच पात्रं इमाने इतबारे पाळतात. कदाचित त्याच अटीवर त्यांना काम दिलं असावं. एक व्यक्तिरेखा तर सहजता यावी म्हणून कंबरडं मोडलेलीही दाखवली आहे.

'पुनीत'चं रत्न शोभेल अशीच त्याची जोडीदार आहे. 'अनाइका सोती' हे  नाव जितकं अनाकलनीय आहे, तितकीच व्यक्ती अनाकर्षक. आणि पुनीत रत्न जितका ठोकळा आहे तितकीच ही थडथडा उडणारं पॉपकॉर्न. एक जोक ऐकला होता. बसचे तिकीट काढताना प्रवासी म्हणतो, 'दीड तिकीट द्या. कारण माझा हा मित्र डोक्याने अर्धवट आहे.' कंडक्टर म्हणतो, 'तरी दोन घ्यावीच लागतील. त्यांचं अर्धं आणि तुमचं दीड!' रामूने हिरो + हिरवीण = २ होण्यासाठी असाच काहीसा हिशेब केला असावा.

गाणी का आहेत ? हा प्रश्न त्या गाण्यांपेक्षाही जास्त अत्याचार करतो. तो जो कुणी पुरुष गायक आहे तो फिक्का चहा भुरके आणि झुरके मारून प्यायल्यासारखा भंकस गाणी आळवून आळवून गातो. डोक्याला शॉट !!

एक मात्र खरंय; मी 'सत्या - १' पाहिल्यावर जितका भयसाटलो होतो, तितकाच 'सत्या - २' पाहून भयसाटलो. पिच्चरचं प्रत्येक अंग वाईटात वाईट कसं करता येईल, ह्याकडे रामूने अगदी जातीने लक्ष पुरवले आहे. आणि हा त्याचा प्रयत्न अगदी १००% यशस्वी झालेला असल्याने, ही सर्टनली डिझर्व्ज अ‍ॅन अप्प्लॉज !

वेल डन रामू ! वे टू गो.............................................................................................. टू गेट लॉस्ट.

रेटिंग - घंटा 

Friday, November 08, 2013

तुझ्या पावलांचेच ठसे

'मायबोली' च्या 'हितगुज दिवाळी अंक २०१३' मध्ये समाविष्ट कविता -

पारिजात तू दरवळणारा
अंगणात अव्यक्तपणे
निरलस हसरा सडा सांडशी
रोज किती आश्वस्तपणे
जितके तू उधळून दिले ते
मला न वेचाया जमले
तरुण व्यथांच्या करुण फुलांना
मी माझ्या नयनी टिपले  

रोम रोम फुलतो, बागडतो,
तुझा स्पर्श मज आठवतो
रसरशीत नवतारुण्याचा
बहर मनाला धुंदवतो
अवचित चाहुल तुझी जाणवे
आतुरता दाटे नयनी
हव्याहव्याश्या बेचैनीची
चंचल मी व्याकुळ हरिणी

झुळझुळणाऱ्या वाऱ्यामधुनी
जाणवतो रे श्वास तुझा
उधाणलेल्या देहवसंती
मिरवत मी मधुमास तुझा
किती शोधते कुठे विसरले
धडधडणारे हृदय कसे
सर्वदूर माझ्या भवताली
तुझ्या पावलांचेच ठसे

....रसप....
२६ फेब्रुवारी २०१३ 

Thursday, November 07, 2013

अबोला

'मराठी कविता समूहा'च्या 'कविता विश्व - दिवाळी अंक २०१३' मध्ये समाविष्ट कविता -

तू अशी सवय जी शक्य सोडणे नाही
मी शब्द अबोल्याचा माघारी घेतो
तू नसल्याची कल्पनाच करणे नाही
तू सांग स्वत:ला कोण यातना देतो ?

हा नाराजीचा सूर नकोसा वाटे
मी पंखाविन पक्ष्यासम तडफड करतो
श्वासांची सरिता क्षणाक्षणाला आटे
मी जगण्याचे हे नीरसपण अनुभवतो
............. मी शब्द अबोल्याचा माघारी घेतो

तव नयनसुमांवर दहिवर डबडबताना
मी दु:खाचे आकाश त्यातुनी बघतो
कटु शब्दांना मी माझ्या आठवताना
माझ्या प्रतिबिंबालाही परका ठरतो
............. मी शब्द अबोल्याचा माघारी घेतो

हातातुन माझ्या तुझा हात सुटल्यावर
हाताला माझ्या हलका दरवळ असतो
जाशील निघुन तू जाण्याचे ठरल्यावर
हे जाणुनदेखिल तुला मनाशी जपतो
............. तू सांग स्वत:ला कोण यातना देतो ?

....रसप....
३ ऑक्टोबर २०१३

Saturday, November 02, 2013

भविष्यातला देसी सुपरहिरो (Krrish 3 - Movie Review)

मागे एकदा माझा एक मुंबईकर मित्र औरंगाबादला आला होता. ऐन उन्हाळ्यात. म्हणजे नेमके उन्हाळ्याचेच दिवस होते का ते आठवत नाही, पण हवा मात्र होती. त्याच्या येण्याच्या २ दिवस आधी ४३ अंशाच्या आसपास तापमान होतं. त्याने मला विचारलं, 'कसं करावं ?' मीही त्याला म्हटलं की, 'बघ बाबा ! आपण मुंबईकर ह्युमिडिटी सहन करू शकतो, पण हा कोरडा उन्हाळा म्हणजे बिनपाण्याची हजामत केल्यासारखा बिनघामाचं 'डिहायड्रेशन' करवतो. अगदीच आवश्यक असेल तर ये, नाही तर टाळ !' पण त्याचं काम अत्यावश्यक होतं. तो आला. आणि गंमत अशी की पाऊस पडला ! अन् तापमान बऱ्यापैकी सुसह्य झालं ! दोन दिवस मजेत गेले आणि जाताना म्हणाला, 'मुंबईपेक्षा इथेच छान आहे रे !'
त्याला तसं का वाटलं असेल हे मला काल समजलं. 'क्रिश - ३' पाहिल्यावर. तिकिट घाबरत घाबरत काढलं होतं. हृतिकसाठी पाहायचा होता आणि सुपरहिरो व विवेक ओबेरॉय मुळे टाळावासा वाटत होता. पण काढलं तिकीट, घेतली रिस्क, केली हिंमत आणि झाली गंमत ! कारण बऱ्यापैकी सुसह्य होता की ! अडीच तासांच्या स्टंटबाज नाट्यानंतर हा स्पायडरमॅन + एक्स-मेन + सुपरमॅन + मिशन इम्पॉसिबल + वगैरे + देसी शक्तिमान चांगलाच मनोरंजक वाटला.

'कोई मिल गया' मधला अर्धवटराव रोहित 'जादू'च्या मदतीने स्वत: स्वत:ला गवसतो, नंतर 'क्रिश' मध्ये त्याला डॉ. आर्या डांबून ठेवतो व त्याचा मुलगा 'क्रिश' स्वत: स्वत:ला गवसतो. 'क्रिश-३'मध्ये रोहित आणि क्रिश दोघेही आपापल्या क्षेत्रात व्यवस्थित एस्टॅब्लिश झालेले आहेत. बाप एक नावाजलेला शास्त्रज्ञ आणि मुलगा एक नावाजलेला सुपरहिरो !
दुसरीकडे 'काल' (विवेक ओबेरॉय) हा एक महत्वाकांक्षी माथेफिरू अख्ख्या जगावर राज्य करायचं स्वप्न बघत असतो. त्यासाठी तो एक 'मानवर' (मानव + जानवर) फौज तयार करत असतो. जन्मजात अपंग असलेल्या 'काल'ने आपल्या दुर्दम्य आत्मविश्वास, बुद्धी आणि पैश्याच्या जोरावर आपल्या अपंगत्वावर एका मर्यादेपर्यंत मात केलेली असते. पण पूर्णपणे सुदृढ होण्यासाठी तो जंग जंग पछाडत असतो. ह्या सगळ्या संशोधन, निर्मितीसाठी हवा असलेला पैसा कमवायची क्लृप्ती असते, विषाणू आणि त्याच्यावर 'अ‍ॅण्टीडोट' (प्रतिबंधक औषध) तयार करणे. आधी स्वत:च तयार केलेल्या विषाणूचा संसर्ग घडवून आणून हाहाकार माजवणे आणि मग त्यावरचं औषध स्वत:च पुरवून अव्वाच्या सव्वा कमावणे !
एक संहार नामिबियात यशस्वीरित्या घडवून आणल्यावर काल व कं. आपला मोर्चा 'बिग्गर मार्केट' भारताकडे वळवते आणि मुंबईत घातपात घडवला जातो.
ओव्हर टू शास्त्रज्ञ व सुपरहिरो.
ते काय करतात ?
अर्थातच शहराला वाचवतात, पण कसं ?
त्यानंतर काय होतं ?
'काल'च्या महाशक्तीस तोंड देताना 'क्रिश'ला कशाकशाला तोंड द्यावं लागतं ?

ह्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी चित्रपट बघा.काही वर्षांपूर्वी काही सुपरहिरो किंवा चमत्कारी पुरुष हिंदीत आणायचे हास्यास्पद प्रयत्न केले गेले होते. 'क्रिश'सुद्धा मी घरी, टीव्हीवर तुकड्या-तुकड्यांत पाहिला होता. थेटरात जायची हिंमत झाली नव्हती. सुपरहिरो किंवा काहीही सुपरह्युमन दाखवण्यात बॉलीवूड मार खातं किंवा हॉलीवूड मात देतं ते मुख्यत्वेकरून 'स्पेशल इफेक्ट्स' मधल्या तफावतीमुळे. क्रिश-३ ही तरी उणीव भरून काढतो. (थ्री चिअर्स फॉर 'रेड चिलीज'!) पण फुटकळ प्रेमकहाणी अन् फडतूस गाणी मात्र कोंबतोच आणि बॉलीवूडपण राखतो.

प्रियांका चोप्राला स्वत:कडून नेमक्या काय अपेक्षा आहेत ? असा प्रश्न 'जंजीर' आणि 'क्रिश-३' मुळे पडतो. जिथे 'नटी की केवळ शोभेची बाहुली असते' हा पूर्वीचा बहुमान्य समज हळूहळू मोडीत निघत आहे, तिथे प्रियांका एकानंतर एक कमजोर भूमिका करते आहे. स्वत:ची अधोगती स्वत:च करवते आहे. कदाचित आधीच्या भागात तीच 'प्रिया' होती म्हणून कंटिन्यू केलं असेल, पण तरी डझ नॉट मेक सेन्स.

गाणी म्हणजे तर कोपरापासून दंडवत आहेत ! राजेश रोशन साहेबांचं घणाघाती संगीत त्यांच्या वयाच्या इतर कुठल्या सामान्य माणसास ऐकवलं तर त्याचा रक्तदाब निश्चित वाढेल, कदाचित गचकेलही ! 'छू कर...', थोडा हैं थोडे की जरूरत हैं', 'बातो बातो में' सारखं तरल संगीत आत्ताच्या काळात अपेक्षित नाही. पण हे ? असं ?
बरं, गाणी भंकस आहेतच. त्यांची पेरणी ? म्हणजे कसंय.... कहाणी आपली पुढे जात असते. मध्येच 'कट' ! --------- गाणं ---------- गाणं संपलं. कहाणी पुढे………. अरे काय लावलंय काय ? गणेशोत्सवाचा मंडप आहे का हा ?
समीर अनजान कोण आहे माहित नाही. तो 'अनजान'च राहिलेला बरा. 'समीर'कडून काहीच अपेक्षा कधीच नव्हती. त्यामुळे गाण्यांच्या शब्दांबद्दल तक्रार नाही. चालू द्या दळण.

हृतिक हा एक अत्यंत प्रामाणिक कलाकार आहे. तो प्रत्येक भूमिकेत जीव ओततो. त्याने साकारलेला म्हातारा रोहित अप्रतिम ! सुपरहिरोच्या भूमिकेतही तो अगदी फिट्ट. आजच्या हिरोंपैकी तो एकटाच आहे जो 'सुपर' वाटू शकतो. दोन्ही भूमिका करताना त्याने लाजवाब अदाकारी केली आहे, नि:संशय ! इतकं की, हे दोन नट नसून एकच आहे ह्याचाही विसर पडावा !

'काल'ची हुकमाची राणी मानवर 'काया' उभी करणारी 'कंगना राणावत' एक आश्वासक अभिनेत्री वाटते बऱ्याचदा. प्रियांकापेक्षा कंगना लक्षात राहावी, ह्यातच सर्व काही यावं, नाही का ?

पण, द सर्प्राईज इज 'विवेक ओबेरॉय' ! हातापायाची हालचाल करण्याला काही वावच नसताना, केवळ मुद्राभिनयातून त्याने 'काल' सुंदर साकारला आहे. ह्यापूर्वी अत्युत्साही अभिनयाने काही बऱ्या भूमिकांची माती करणारा वि. ओ. इथे समजूतदार, संयत अभिनयाचं दर्शन घडवून सुखद धक्का देतो. आत्तापर्यंतचे हे त्याचे नक्कीच सर्वोत्कृष्ट काम आहे.

अ‍ॅक्शन, स्टण्ट्स आणि स्पेशल इफेक्ट्स अनन्यसाधारण महत्वाचे असणार होते, आहेतही. काही ठिकाणी इंग्रजी चित्रपटांची आठवण येते, नाही असं नाही. पण चालसे. एकूणच हाणामाऱ्या, उड्या, फेकाफेकी, तोडफोड, चिरफाड चांगली रंगली आहे.

शंभर वर्षानंतर हिंदी चित्रपटाला एक सुपरहिरो मिळाला आहे का ?
ह्याचं उत्तर 'हो' द्यावंसं वाटतंय. पण होल्ड ऑन. चित्रपटाच्या अखेरीस पुढील भागाची सोय केलेली आहेच, तोही पाहू या, मग ठरवू ! घाई काय आहे ? १०० वर्षं थांबलो अजून ३-४ थांबू !!

रेटिंग - * * १/२

Thursday, October 31, 2013

आता सुरू नव्याने माझा प्रवास झाला - तरही गझल

'म.क.स.'च्या 'अशी जगावी गझल - भाग ३१' मधील तरहीत सहभाग -

प्रत्येक दु:ख सरता मज हाच भास झाला
आता सुरू नव्याने माझा प्रवास झाला

माझ्यासमोर जेव्हा बसलो निवांत थोडा
ओळख पटावयाला भलताच त्रास झाला

थांबून ज्या ठिकाणी अश्रू तिचा झिरपला
तेथेच उंबरा ह्या माझ्या घरास झाला

आयुष्य-चोपडी ही माझी लिहू कशी मी ?
जागा मला मिळाली तेथे समास झाला

माझ्या मिठीत जेव्हा तू श्वास एक भरला
प्रत्येक श्वास माझा निव्वळ सुवास झाला

येशील एकदा का भेटायला मला तू,
थोडा उशीर जर का मज दर्शनास झाला ?

मी शब्दखेळ केला ना छंद एक जमला
ती गोड हासली अन् अनुप्रास-प्रास झाला

उरली असेल थोडी माणूसकी कदाचित
दिसता 'जितू' म्हणूनच मुखडा उदास झाला

....रसप....
३० ऑक्टोबर २०१३

Monday, October 14, 2013

कवेत माझ्या अखेरचे भिजून तू विरघळून जा..

निवांत माझ्यासमान तू कधी तरी ओघळून जा
कवेत माझ्या अखेरचे भिजून तू विरघळून जा

तुझी प्रतीक्षा किती करू? मनास समजावणे वृथा
समोर येऊन तू पुन्हा नजर फिरव अन् वळून जा

सरेल किंवा उरेलही, पुरेल देशील जेव्हढे
निरोप घेशील त्या क्षणी, मनातुनी हळहळून जा

कमावतो मी, गमाव तू, असेच आयुष्य चालले
लुटून झाल्यावरी तरी खरेखुरे फळफळून जा

जिथे म्हणालास तू तिथे सदैव आलो तुझ्यासवे
तिच्या घराची दिशा पहा, इथून रस्त्या वळून जा

जगायचे ते जगून घे, जिवंत आहेस तोवरी
पिकून पानासमान मग हसून अलगद गळून जा

पसंत मेघा जरी तुझे असे अनिर्बंध सांडणे
उनाड भटकायचे पुरे, हवे तिथे आढळून जा

पहाटवेळीच रोज हा विचित्र काळोख ग्रासतो
मलाच मी सांगतो 'जितू, मनात तू मावळून जा !'

....रसप....
१४ ऑक्टोबर २०१३

Friday, October 11, 2013

व्यवस्थित चालते दुनिया

बनवते कायदे जितके स्वत: ते तोडते दुनिया
कसे ते ठाव नाही पण व्यवस्थित चालते दुनिया

चुका केल्या, गुन्हे केले, तरी निर्दोष सुटलो मी
स्वत:च्या कार्यक्षमतेची बढाई सांगते दुनिया

कशाला वृत्त वाचू मी कशाला कान मी देऊ ?
अशी मी बातमी जी आवडीने ऐकते दुनिया

कधी जर थांबलो थोडे सुरू होते तिथे फरफट
मला धावायचे असते तिथे रेंगाळते दुनिया

भिडा बिनधास्त किंवा प्रेमही उधळा मनापासुन
जराशी पाठ फिरल्यावर निशाणा साधते दुनिया

तुला तो भेटल्यानंतर कुणाला भेटला नाही
'जितू'चा चेहरा आहे, 'जितू'ला शोधते दुनिया

....रसप....
९ ऑक्टोबर २०१३
                  

Tuesday, October 08, 2013

घुसमट

तळमळणार्‍या, घुसमटलेल्या अनेक रात्री उश्यास घेउन
आठवणींची चादर ओढुन
कधी कधी मी विचार करतो
काय नेमके तुटले आहे?
काय हरवले, काय खोलवर रुतले आहे ?

तू नसताना विचार येती पूर्णत्वाला
उत्तर कळते
स्वच्छ मोकळ्या नभासारखे क्षणभर वाटे

आणि स्वतःशी बोलू बघता -
शब्द फिरवती पाठ असे की,
त्यांच्या लेखी माझी किंमत नसेच काही !

पुन्हा एकदा सखे, परत ये
आणि व्यक्त हो,
शब्दबद्ध हो
माझे उत्तर मला मिळू दे
तोड अबोला, मिटव दुरावा
सोड तुझा हा रुसवा, कविते..

सोड तुझा हा रुसवा, कविते..!!

....रसप....
७ ऑक्टोबर २०१३

किंवा

तळमळणार्‍या,
घुसमटलेल्या
अनेक रात्री
उश्यास घेउन
आठवणींची
चादर ओढुन
कधी कधी मी
विचार करतो
काय नेमके
तुटले आहे?
काय हरवले,
काय खोलवर
रुतले आहे ?

तू नसताना
विचार येती
पूर्णत्वाला
उत्तर कळते
स्वच्छ मोकळ्या
नभासारखे
क्षणभर वाटे

आणि स्वतःशी
बोलू बघता -
शब्द फिरवती
पाठ असे की,
त्यांच्या लेखी
माझी किंमत
नसेच काही !

पुन्हा एकदा
सखे, परत ये
आणि व्यक्त हो,
शब्दबद्ध हो
माझे उत्तर
मला मिळू दे
तोड अबोला,
मिटव दुरावा
सोड तुझा हा रुसवा, कविते..

सोड तुझा हा रुसवा, कविते..!!

....रसप....
७ ऑक्टोबर २०१३

Wednesday, September 25, 2013

राधा ही बावरी (झी मराठी) - १० सप्टेंबर २०१३

मित्रांनो,

'झी मराठी'वरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका 'राधा ही बावरी' मध्ये माझा एक सहभाग होता.
दि. १० सप्टेंबर २०१३ चा गणपती विशेष भाग 'राधा..'च्या टीमने खूप वेगळ्याप्रकारे केला. कथानक असं होतं की, मालिकेतील कुटुंबाच्या घरी गणपती आहे आणि त्या निमित्त त्यांच्या काही कविमित्रांचा कविता सादरीकरणाचा एक कार्यक्रम त्यांनी घरीच आयोजित केला आहे. ज्येष्ठ कवी अरूण म्हात्रे, निसर्गकवी नलेश पाटील आणि आजच्या पिढीच्या कवींचा प्रतिनिधी म्हणून मी असे तिघे त्या भागात आमंत्रित होतो. मी पुढील दोन कविता सादर केल्या -

ती बघते तेव्हा 

ती बघते तेव्हा राधा बनुनी चित्त चोरते माझे
अंतरात माझ्या श्याम बोलतो "राधे... राधे.. राधे...!"

ती बघते तेव्हा गंध प्यायले रंग उधळती वारे
मज वाटे रंगित, गंधित, धुंदित भवतालीचे सारे

ती बघते तेव्हा असे वाटते बघून बघतच राहो
क्षण एक आज हा इथेच ऐसा क्षणभर थांबुन राहो

ती बघते तेव्हा विशाल अंबर पायी लोळण घेते
प्राशून सागराला मी उरतो मुठीत धरणी येते

ती बघते तेव्हा लाजलाजरे गाल गुलाबी होती
मधुशाला सारी जणू मांडली लाल रसील्या ओठी 

ती बघते तेव्हा हृदयामधुनी तीर पार तो जातो
मी 'हाय' बोलुनी पुन्हा पुन्हा तो छातीवरती घेतो

ती बघते तेव्हा शब्दांचाही गोंधळ थोडा उडतो
अर्थास शोधणे व्यर्थच होते, फक्त पसारा उरतो !

....रसप.... 


तुमची बायकोसुद्धा अगदी अशीच आहे ना हो?

तुमची बायकोसुद्धा अगदी अशीच आहे ना हो?
रोज जरी भांडली तरी तुम्हाला आवडते ना हो?

ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी जाता 
चकाचक हॉटेलात डीलक्स रूम घेता 
नाश्त्यापासून डिनर पर्यंत हाण-हाण हाणता 
तरीसुद्धा पोट काही भरत नाही ना हो?
तिच्या स्वयंपाकाची चव येतच नाही ना हो?

काही दिवसांसाठी जेव्हा ती माहेरी जाते 
जमेल तेव्हढी तुमची व्यवस्था लावून ठेवते 
चार वेळा फोन करून हालहवाल विचारते 
रिकाम्या घरात काही केल्या करमत नाही ना हो?
ऑफिस संपल्यावरती घरी जाववत नाही ना हो?

समारंभाला जाण्यासाठी ती भरपूर नटते 
तुम्ही तयार होऊन बसता, ती तासभर लावते 
पुन्हा पुन्हा विचारते, “मी कशी दिसते?”
कशीसुद्धा असली तरी, सुंदर दिसते ना हो?
तुम्ही “सुंदर” म्हटल्यावरती, गोड लाजते ना हो?

अनेक महिने-दिवसांनंतर तुम्ही मित्रांना भेटता 
जुने दिवस आठवून आठवून गप्पांमध्ये रमता 
थोड्याच वेळासाठी तुम्ही बायकोला विसरता 
तितक्यात येतो फोन आणि तुम्ही पळता ना हो?
मित्र तुम्हाला बायकोचा गुलाम म्हणतात ना हो?

तुमचं पहिलं प्रेम तुम्ही बायकोत पाहता का हो?
तिच्या दोन डोळ्यांमध्ये आरसा दिसतो का हो?
तिचा हात हातात घेताच निवांत होता का हो?
“तिच्याशिवाय तुम्ही नाहीच” असं समजता का हो..??
.
.
तुमची बायकोसुद्धा अगदी अशीच आहे ना हो?
.
तुमची बायकोसुद्धा अगदी अशीच आहे ना हो?

....रसप....

कार्यक्रम खूपच छान झाला आणि असा वेगळा विचार करून तो अंमलात आणल्याबद्दल झी-मराठी व 'राधा..'च्या टीमचे मन:पूर्वक अभिनंदन !

ह्या भागाचा यू-ट्यूब दुवा खालीलप्रमाणे -
धन्यवाद !

Monday, September 23, 2013

पिच्चर बघू काय ? "होय महाराजा !" - (Narbachi Wadi - Marathi Movie Review - नारबाची वाडी)

नारळाचं झाड जरासं नाठाळ असतं. ते सुरुवातीला अगदी हळूहळू वाढतं.. बहुतेकदा तर मालकाचा अगदी अंत पाहतं. वाटतं हे झाड काही उपयोगाचं नाही. पण मग, एकदा ही सुरुवातीची वर्षं सरली की फणा काढलेल्या नागासारखं डौलात उभं राहातं... उंचच उंच ! मग त्याच्या नाठाळपणाचा अनुभव हवेला येतो. कितीही जोरदार वारं वाहिलं तरी काहीही फरक पडत नाही. बरं कित्येक फूट वाढलं, तरी झाडाचा बहुतेक भाग खोडच! नारळ काढायचे म्हणजे झाडावर चढण्या-उतरण्याची कसरत!
असाच काहीसा नाठाळपणा माणसातही असतो. आयुष्याचे बारकावे उमगण्यात किती तरी वर्षं निघून जातात, पण जेव्हा ते उमगतात तेव्हा माणूस हाताला लागत नाही. तो नारळासारखा उंच होतो. वादळवार्‍यांना बधत नाही आणि त्याच्याकडून फायदा करून घेण्यासाठी जाम मेहनत करावी लागते !
काही माणसं तर इतकी नारळ बनतात की ती असतातही बाहेरून रुक्ष, कोरडी, कडक आणि आतून शीतल, निर्मळ..!!

असाच एक नारळ म्हणजे 'नारोबा'. कोकणातल्या कुठल्याश्या लहानग्या गावात राहणारा एक म्हातारा. ह्या नारबाची एक अत्यंत सुंदर वाडी असते, वडिलोपार्जित. ह्या बागेवर, इथल्या झाडांवर नारबा पोटच्या पोरांप्रमाणे माया करत असतो, त्यांची निगा राखत असतो. प्रामाणिक माया केली तर झाडंसुद्धा आपल्या रंध्रा-रंध्रांतून ममता पाझरतात. नारबाची वाडीसुद्धा अशीच झाडा-झाडातून ममता पाझरणारी शांत स्वर्गभूमी! नारबाची बायको, मुलं कुणीच नसतात. फक्त एक नातू असतो - पंढरी. छोट्या नातवासह सुखात नांदणार्‍या नारबाच्या ह्या सुंदर वाडीवर गावच्या खोताची - रंगराव खोताची - वक्रदृष्टी पडते आणि सुरू होते एक वेगळेच गंमतशीर नाट्य! ते काय, कसं हे कळण्यासाठी एकदा 'नारबाच्या वाडी'ला भेट देऊन यायलाच हवं !


दिलीप प्रभावळकरांचा 'नारोबा' निव्वळ भन्नाट झाला आहे. व्यक्तिरेखेच्या आवश्यकतेनुसार त्यांनी आपल्या अंगकाठीचा अप्रतिम वापर करून घेतला आहे. डोळे बारीक करून बोलण्याची लकब खूपच खास ! आणि कोकणी हेल काढून बोलणेही एकदम अस्सल झाले आहे. त्यांच्या चतुरस्र प्रतिभेचं दर्शन पहिल्यांदा झालेलं नाहीच, त्यामुळे खरं तर चित्रपट सुरु होण्याआधीच आपल्याला माहित असतं की ते आपली छाप सोडणारच आहेत.

मनोज जोशींनी रंगराव व त्याचा मुलगा मल्हारराव अशी दुहेरी भूमिका अफलातून साकारली आहे. लंपट बेवडा रंगराव आणि कंजूष धूर्त मल्हारराव फार सहज उतरले आहेत. काही दृष्यांत तर त्यांचा खलपुरुषसुद्धा काळजाला हात घालतो.
दिलीप प्रभावळकर आणि मनोज जोशी - ह्या 'कास्टिंग'मध्येच चित्रपट अर्धी बाजी जिंकतो, असं मला वाटतं. ह्या भूमिकांसाठी हे दोन नट इतके अचूक हेरले आहेत की ह्या भूमिका त्यांच्याचसाठी जन्माला आल्या असाव्यात.

निखिल रत्नपारखी, किशोरी शहाणे, विकास कदम, अतुल परचुरे आपापलं काम चोख करतात.  

कोकण, तिथे राहणारा एक बेरकी म्हातारा, त्याची नारळी-पोफळीची बाग ह्या सगळ्यावरून अपरिहार्यपणे पु.लं. चा अंतू बर्वा आठवतोच आणि मनातल्या मनात जराशी तुलनाही होते. मग वाटतं की, 'रत्नांग्रीच्या समस्त म्हयशी तूर्तास गाभण होय रे झंप्या?' असं म्हणणार्‍या अंतूचा तिरकस, खडूसपणा नारोबात अगदी जसाच्या तसा नसता तरी थोडाफार गुंफता आला असता का ? असंही जाणवतं की बागेतलं एखादं झाड कसं इतर सगळ्या झाडांच्या वर डोकं काढून असतं, तसं गावातली इतर पिकली पानं हळूहळू गळत जात असल्याने नारबाचा एकटेपणा कसा वाढत चालला आहे, हे 'अंतू बर्व्या'च्या व्यथेप्रमाणेही दाखवता आलं असतं का? त्याऐवजी इतर काही दृष्यं गाळताही आली असती का ? पण अश्या जर-तरच्या समीकरणांना काही अंत नसतो. सर्वोत्कृष्टतासुद्धा अजून उत्कृष्ट करता येऊ शकते, कदाचित 'सर्वोत्कृष्ट' हे फक्त आभासी अस्तित्व असावं.

मनोज मित्रा ह्यांच्या बंगाली 'शाज्जानो बागान' ह्या नाटकावर आधारित हा चित्रपट मराठीत करताना ही कहाणी कोकणात घडवणं खूप परिणामकारक ठरलं आहे. नारबाच्या मुखी अधूनमधून येणारे 'नारो म्हणे' अभंग चित्रपटाला एक काव्यात्मक सौंदर्य व उंची देणार्‍या विविध सौंदर्यस्थानांत नक्कीच सगळ्यात महत्वाचे आहेत. गुरु ठाकूर ह्यांची पटकथा, संवाद एकदम 'फिट्ट' झाले आहेत !
 
दोनच गाणी आहेत आणि दोन्ही श्रवणीय आहेत. 'ही गजाल खरी काय?' तर बेफाट गाणं आहे..!!

वैचारिक उंची गाठण्यासाठी चित्रपट गंभीरच असायला हवा, असं नाही. हलका-फुलका चित्रपटही 'सेन्सिबल' असू शकतो. हे 'ना.वा.' दाखवून देतो. बासू चटर्जींची निर्मिती आहे, हे मला चित्रपट नामावली पाहताना कळलं आणि तिथेच चित्रपटाकडून अपेक्षा वाढल्या होत्या, ज्या माझ्या तरी पूर्ण झाल्या.

'पिच्चर फर्मास आसां', ही गजाल खरी काय?
'होय महाराजा !!'

रेटिंग - * * * *

Friday, September 20, 2013

तुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..

तुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा

घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा
तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा
हरेक फांदीस पापणी, किती आसवांस माळते
उदासवाणी किती फुले, गळून पडली बघून जा

तुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा

अनेक थेंबांस थोपवुन, पन्हाळ खिडकीत रांगते
तुला पाहण्या पुन्हा पुन्हा, मुजोर वाऱ्यास सांगते
झुळूक येते घरात अन्, सुन्या मनाने परत फिरे
समोर त्यांच्याच एकदा, झुळूक होउन निघून जा

तुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा

बराच अवधी सरूनही, अजून संध्या न मावळे
किती बरसले मेघ तरी, अजून आकाश ओघळे
भिजून पाऊलवाट ही, सुकेल ऐसे न वाटते
कवेत माझ्या अखेरचे, भिजून तू विरघळून जा

तुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा

नकोच येऊस तू पुन्हा, नकोच दावूस आसही
उधाणलेला समुद्र मी, नको किनारा भकासही
अथांग डोळ्यांतुनी तुझ्या, खळाळुनी हासलो कधी
जुनी तरलता तुझीच तू, पुन्हा जरा आठवून जा

तुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा

....रसप….
२० सप्टेंबर २०१३

Saturday, September 07, 2013

खपवता दु:खही येते..

खपवता दु:खही येते पहा जाऊन बाजारी
स्वत:चे दु:ख विकणारे इथे कित्येक व्यापारी

तुझ्याशी बोलणे म्हणजे विसावा शर्यतीमधला
फिरे आयुष्यही माझे मला पाहून माघारी

कुणाचे भोग थोडेसे कुणी भोगून फेडावे
असे ना कोणते नाते, अशी ना कोणती यारी

तुझ्या स्मरणांमुळे दाटून येते खूप व्याकुळता
तुला शोधत हरवतो मी जरी बसलीस शेजारी

तुझ्या रंगाविना मजला न भावे रंगही कुठला
म्हणूनच आवडे बहुधा मला ही रात्र अंधारी

कधी अळणी, तिखट किंवा कधी आयुष्य चव देते
'जितू' समजून घे थोडे, शिजवतो एक आचारी

....रसप....
७ सप्टेंबर २०१३ 

Friday, September 06, 2013

फिर मुझे कल रात नींद नहीं आयी..

इक पल भी तेरी याद भुले न भुलायी
फिर मुझे कल रात नींद नहीं आयी

बिस्तर पे लेटे हुए पंखे के चक्कर गिनता रहा
बीते दिनों की कडीयों को आपस में बुनता रहा
अपनीही धुंद में बारिश चुपचाप बरस रही थी
जैसे मेरी आंखो की बात उसने अनजाने में पढी थी
खुलकर कोई दास्ताँ न सुनी न सुनायी
............. फिर मुझे कल रात नींद नहीं आयी

चांद भी बहका हुआसा खिडकीसे झाँकता रहा
एक बादल रुका रुका मुझसे नमीं माँगता रहा
तुम होती तो उस चाँद को हथेली में छुपा लेती
और उस सहमेसे बादल को यादों की नमी देती
सरसराती दहलियों ने तुम्हारे लिए दस्तक लगायी
............. फिर मुझे कल रात नींद नहीं आयी

इक और अकेली रात यूँही खयालों में उलझी रही
जाने किस पल मुरझा गयी, अब तो याद भी नहीं
चादर की सिरवटों में कई बार लिखा था नाम तेरा
ओस संभाले हुए अपनी पलकों पर बताता हैं सवेरा
रोशनी की झूठी किरनें सारे घर में समायी
............. फिर मुझे कल रात नींद नहीं आयी

....रसप....
४ सप्टेंबर २०१३ 

Wednesday, September 04, 2013

अस्वस्थ कुजबुज आणि अनभिज्ञ उशी.. (उधारीचं हसू आणून.... भाग - २)

८.

उबदार काळी शाल ओढून घेतल्यावर
माझी माझ्याशीच
एक अस्वस्थ कुजबुज सुरु होते
स्वत:कडे पाठ फिरवण्यासाठी
मी कूस बदलतो
मिटलेले डोळे गच्च आवळतो
थोडा वेळच, मग टक्क उघडतो
भिंतीवरच्या घड्याळ्याच्या टिकटिकीतून
एक क्षण निसटल्याचं जाणवतं
आणि छातीत काही तरी हेलावतं
पुन्हा एकदा एक कुजबुजणारी रात्र
डोळ्यांतून मनात झिरपणार असते

बाजूच्या निश्चल उशीच्या
कोरड्या अनभिज्ञतेतून
छळणारा तिचा आणि माझा एकटेपणा
काळोखाला छेदत दूरवर पसरतो

आणि एका बेसावध क्षणी
रात्र गुपचूप निघून जाते
मला जागं ठेवून
अनभिज्ञ उशी बघत असते सगळं
उधारीचं हसू आणून..

....रसप....
३ सप्टेंबर २०१३

उधारीचं हसू आणून.... (भाग - २)

Monday, September 02, 2013

पहा लक्ष देऊन हसण्याकडे..

पहा लक्ष देऊन हसण्याकडे
तिच्या कोरड्या पापणीला तडे

मला दु:ख दे पारिजाता तुझे
टिपे गाळताना पडावे सडे

समांतर तुला चाललो जीवना
तुझी वाट घेते वळण वाकडे

जळावे असे वाटलेही तरी
कधी आग नव्हती, कधी लाकडे

'जितू' धर्म झाल्यावरी आंधळा
दिसावे कसे सारखे आतडे ?

-------------------------------------------------------

नको वाटते हे तिचे पाहणे
उतरली नसे अन् नव्याने चढे

....रसप....
२ सप्टेंबर २०१३

Thursday, August 29, 2013

शून्य मनाची आर्त विराणी

'मराठी कविता समूहा'च्या 'लिहा ओळीवर कविता - भाग १०८' मध्ये माझा सहभाग -

शून्य मनाची आर्त विराणी
तूही गावी, मीही गातो
मी ऐकावे सुरांस माझ्या
तू ऐकावे तुझेच केवळ

दूर तू तिथे, दूर मी इथे
अज्ञानाच्या आनंदाचे
करू साजरे मूर्त सोहळे
दुनियेला दाखवण्यासाठी
की मी सुखात आहे येथे
पर्वा नाही कुठलीसुद्धा
काय चालले आहे तिकडे

फुटलेल्या गोंडस स्वप्नांचा
जरी ढिगारा मनात असला
तरी जराशीसुद्धा हळहळ
दाखवण्याच्या सौजन्याचे
भान वास्तवाला ह्या अपुल्या
उरू नये इतकेही आता

सरून गेलेल्या काळाच्या
अवशेषांना जपले मीही
आणि खुणांना जपले तूही
ह्या दु:खाच्या कस्तूरीच्या
गंधाच्या उगमाचा पत्ता
शोधुनसुद्धा कुणासही पण
येथे नाही तेथे नाही

....रसप....
२९ ऑगस्ट २०१३

Sunday, August 25, 2013

पुन्यांदा 'पोपट' ! (Popat - Marathi Movie Review)

माणसाचे आयुष्य त्याने केलेली धडपड आणि त्याच्या चुका ह्यातून आकारास येते. काय वाटतं ?
जुलुमाचा राम-राम म्हणून केलेली मेहनतसुद्धा 'धडपड'च आणि नकळत घडलेलीही 'चूक'च किंवा काहीच न करता - असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी - असे म्हणून आळसात वेळ घालवणे हीसुद्धा 'चूक'च. धडपड जास्त की चुका जास्त ह्यावरून आयुष्याचा रस्ता उजवं वळण घ्यायचं की डावं हे ठरवत असावा, बहुतेक.
'पोपट'सुद्धा कुणाची धडपड आणि कुणाच्या चुका दाखवतो. कुठलाही संदेश द्यावा/ पोहोचवावा इतका काही हा चित्रपट खास नाही, हे  आधीच सांगतो. पण अधिक विचार केल्यावर हेच वाटतं की चित्रपट बनविणाऱ्याच्या चुका त्याच्या धडपडीहून जास्त झाल्या असाव्यात.

तर, कोल्हापुरच्या जवळपास 'कुळपे' गाव असतं. 'ग्रामपंचायत' शासित एक खेडंच. ह्या गावातले तिघे मित्र. बकुळ/ बाळ्या (सिद्धार्थ मेनन), रघ्या/ रघु/ रघुनाथ (अमेय वाघ) आणि मुक्या/ मुकुंद (केतन पवार). बाळ्या पक्का 'झोलर'. इकडम तिकडम करून, काही बाही उलट सुलट करून खर्चापुरता जुगाड करणारा, रघुनाथ एक मोठा अभिनेता बनण्याचे स्वप्न पाहात कोल्हापुराच्या 'लोकल' चित्रपटसृष्टीत चिल्लर कामं करणारा आणि मुकुंद आषाढी-कार्तिकी केल्याप्रमाणे ऑक्टोबर-मार्च करत बारावीत खितपत पडलेला एक बाप्या. तिघांचं स्वप्न एकच. रघु मोठ्ठा 'ष्टार' झाला पाहिजे ! पण कसलं काय ! त्याच्या हातात असलेलं चिल्लर कामही जातं आणि त्याला हाकलून देण्यात येतं. बास्स ! तीन सुपीक डोकी ठरवतात की आपणच बनवायचा पिच्चर ! नेमकं ह्याच वेळेस गावात 'एड्स जागृती अभियान' सुरु होतं. कण्डोम्स वाटप, पथनाट्यं, पुस्तकविक्री सुरु होते आणि हे त्रिकुट ठरवतं की आपण 'एड्स'वरच पिच्चर काढायचा.
आता पिच्चर काढायचा म्हणजे कॅमेरा ? बाळ्याचा एक मित्र असतो शेजारच्या गावातला फोटोग्राफर 'जन्या/ जनार्दन' (अतुल कुलकर्णी). जन्याला भरीस पाडलं जातं.    

पुढे, चित्रपटाचे चित्रिकरण आणि खरेखुरे आयुष्य ह्यांचा गुंता होत जातो अन् कहाणी विचित्र वळण घेते.
ती काय वळण घेते आणि कुठे पोहोचते, हे जाणून घ्यायचे असेल तर पिच्चर पाहा. 'पोपट' झाल्यास मी जबाबदार नाही !!खूप वेगळा विषय आहे. असे वेगळेपण दाखवायचे धाडस करण्यासाठी नक्कीच चित्रपटकर्ते अभिनंदनास पात्र आहेत. बट देन, वेगळेपण, प्रयोगशीलता मराठी चित्रपट नेहमीच दाखवत असतो! प्रॉब्लेम 'सफाईदारपणा'त असतो. गुलजार साहेब सांगतात, 'हर मिसरा अच्छी तरह से साफ करके पेश करना चाहिये.' कुठे तरी अश्या प्रकारच्या सफाईत जशी आजची कविता आळशी झालीय, तसेच आजचे प्रयोगशील लेखक-दिग्दर्शकही झाले असावेत का ?

अनेक दृश्यं कंटाळा येईपर्यंत अकारण लांबवली आहेत, तर काही दृश्यं कशासाठी होती? असाही प्रश्न अखेरीस पडतो. नक्कीच अश्या काही ठिकाणी साफसफाई करता आली असती, असं वाटतं.
रघ्या आणि बाळ्याला गावची भाषा विशेष जमली नाही, असं जाणवतं. दोघांचं बोलणं नक्लीच वाटत राहतं. मुक्या मात्र परफेक्ट !

अतुल कुलकर्णीचा 'जन्या' अप्रतिम ! २-३ दृश्यांत अ. कु. पडदा खाऊन टाकतो. पण मग वाटतं की, वाया घालवलाय यार ! ह्याच्या सोबतीला कुणी तरी 'खमक्या' असता तर मजा आली असती. 'प्रेमाची गोष्ट' नंतर 'पोपट'सुद्धा केवळ अतुल कुलकर्णी असल्यामुळे बघितला जातो.
'अविनाश-विश्वजित' जोडीचं संगीत चांगलं आहे. का श्वास हा.., दाबा की बटन मोबाईलचं..  ही गाणी चांगली जमून आली आहेत.

'दुनियादारी' टीमने जी हुशारी, जे धाडस दाखवले नाही, ते 'पोपट' टीमने केलं. नवीन चेहरे आणले. जरी हा प्रयोग पूर्ण यशस्वी झाला नसला, तरी जर रघ्या-बाळ्या-मुक्या च्या जागी तेच थोराड, खप्पड, जुनाट चेहरे असते, तर चित्रपट मध्यंतरापर्यंतसुद्धा पाहवला नसता, हेही तितकेच खरे आहे. वेगळा विषय व वेगळे चेहरे पडद्यावर आणण्यासाठी सतीश भाऊ राजवाडेंचे पुनरेकवार अभिनंदन. पण पुढील खेपेस कात्रीचा वापर अधिक व्हावा ही अपेक्षा !

एकंदरीत, 'पोपट' केला गेला नसला तरी 'पोपट' होतोच.

रेटिंग - * * 

Saturday, August 24, 2013

झंकार

ती रोज चोरून मला बघते
तिला वाटतं मला कळत नाही
पण मला सगळं समजतं
फक्त मी दाखवत नाही

तिच्या नजरेत मला दिसते
मी जवळ घेईन अशी आशा
तिच्या व्याकुळतेच्या बदल्यात
मी तिला रोज देतो फक्त निराशा

खरं तर मलाही वाटत असतं
की तिला जवळ घ्यावं
छातीला लावावं
तिने गळ्यात पडावं
माझी बोटं तिच्यावरून फिरावीत
गात्रं शहारावीत
थरथरून कंपनं उठावीत
त्या कंपनांचे सूर कानात घुमावेत
मनात रुजावेत
आणि एखादी वेगळीशीच धून वाजावी,
जिची नशा आसमंतास व्यापावी..

पण,
असं काही होत नाही
मी तिची नजर टाळतो
रोजच तिला नाकारतो

मग एक दिवस
तिची आर्तता जिंकते
ती मला जवळ ओढते
मीही तिला बाहूंत घेतो
तिच्या लडिवाळ मिठीत धुंद होतो
तिच्या स्पर्शाने उत्साहाचा तरंग येतो
आणि माझ्या पहिल्या स्पर्शानेच उठतो
तिच्यातून एक धुंद धुंद झंकार
माझ्या हातून स्वत:ला अशीच छेडून घेते
माझी अकॉस्टिक गिटार ! ;-) :-)

....रसप....
२१ ऑगस्ट २०१३

Friday, August 16, 2013

एव्हढेच बस !

नकोत कागद
नको लेखणी
शब्दही नको
अंतरातली
तेजोवलयी
ज्योती बन तू
लिहिण्यासाठी
पुरे वाटते
एव्हढेच बस्

'तो' दगडाचा
निश्चल निष्ठुर
ढिम्म राहतो
'त्या'चे डोळे
वाळुन गेली
खोल खोबणी
लढण्यासाठी
पुरे वाटते
एव्हढेच बस्

वेढा माझ्या
सभोवताली
विरोधकांचा
ललकाऱ्यांनी
आसमंतही
दुमदुमलेला
भिडण्यासाठी
पुरे वाटते
एव्हढेच बस्

कुणी निरागस
लोभसवाणा
गोड चेहरा
इवले डोळे
खट्याळ निरलस
मला पाहता
हसण्यासाठी
पुरे वाटते
एव्हढेच बस्

'तुझ्यामुळे ह्या
आयुष्याला
अर्थ मिळाला'
कुणी बोलता
पाठीवरती
हात ठेवुनी
निजण्यासाठी
पुरे वाटते
एव्हढेच बस्

….रसप….
१५ ऑगस्ट २०१३

Wednesday, August 14, 2013

त्याला शाहरुख आवडत नाही, तिला शाहरुख आवडतो..

त्याला शाहरुख आवडत नाही, तिला शाहरुख आवडतो
पिच्चर रिलीज झाल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो

मी तुला आवडते पण शाहरुख आवडत नाही
असलं तुझं गणित खरंच मला कळत नाही !!

शाहरुख म्हणजे उथळ काला, शाहरुख म्हणजे बडबड
शाहरुख म्हणजे मालमसाला, शाहरुख म्हणजे धडधड
शाहरुख डोकं खराब करतो, शाहरुख वैतागवाडी
शाहरुख म्हणजे हसूची लाट, शाहरुख म्हणजे गोडी
शाहरुख वेडेवाकडे चाळे, शाहरुख म्हणजे अ‍ॅक्टिंग चुलीत
शाहरुखकडे गुपचूप पाहता, मन जाऊन बसतं त्याच्या खळीत

दरवर्षी पिच्चर येतो, दरवर्षी असं होतं
शाहरुखवरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं

शाहरुख आवडत नसला तरी ती त्याला आवडते
शाहरुखसकट आवडावी ती म्हणून तीही झगडते

रुसून मग ती निघून जाते, बसून राहते थेटरात
त्याचं-तिचं भांडण असं सणासुदीच्या दिवसात !

....रसप....
१३ ऑगस्ट २०१३

---------------------------------------------------------------

मूळ कविता - 

त्याला पाऊस आवडत नाही, तिला पाऊस आवडतो
ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो 

मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही  
असलं तुझं गणित खरंच मला कळत नाही 

पाऊस म्हणजे चिखल सारा, पाऊस म्हणजे मरगळ 
पाऊस म्हणजे गार वारा, पाऊस म्हणजे हिरवळ
पाऊस कपडे खराब करतो, पाऊस वैतागवाडी 
पाऊस म्हणजे भिजरी पायवाट, पाऊस म्हणजे झाडी 
पाऊस रेंगाळलेली कामं, पाऊस म्हणजे सुटी उगाच 
पावसामध्ये गुपचूप निसटून, मन जाऊन बसतं ढगात 

दरवर्षी पाऊस येतो, दरवर्षी असं होतं 
पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं 

पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते 
पावसासकट आवडावी ती म्हणून तीही झगडते 

रुसून मग ती निघून जाते, भिजत राहते पावसात
त्याचं-तिचं भांडण असं ओल्याचिंब दिवसात 

- सौमित्र 

Tuesday, August 13, 2013

व्यवहार

स्वप्नांच्या आडोश्याला लपलेलं वास्तव
मी शोधतच नाही म्हटल्यावर
स्वत:च बाहेर येतं आणि 'भो:' करतं !
मला माहित असतं की,
त्याच्या बाहेर येण्याची वेळ आली आहे
पण तरी, दचकण्याची सवयच झाली आहे

त्यानंतर रोज सकाळी मी आणि आयुष्य
एकमेकांशी हातमिळवणी करतो
आणि शस्त्रसंधी केलेल्या देशांसारखे
जबरदस्तीचा संयम पाळतो

रात्र, स्वप्नांच्या लपाछुपीची
दिवस, वास्तवाशी शस्त्रसंधीचा
उरते संध्याकाळ
नेहमीच संवेदनशील
तेव्हढा वेळ सोडल्यास सारं काही आलबेल असतं
शांततेच्या राज्यात दु:खसुद्धा गालात हसतं

निदान,
तुझ्या दिवस-रात्रींचा व्यवहार तरी,
तुझ्या मनासारखा घडतोय ना गं ?

....रसप....
१२ ऑगस्ट २०१३

Friday, August 09, 2013

वेगवान चेन्नई एक्स्प्रेस (Movie Review - Chennai Express)

झुळझुळ वाहणारं पाणी खळखळ नाद करतं. एक चैतन्य, उत्साह निर्माण करतं. कधी त्याचा फेसाळ, दुधाळ रंग चित्तवेधक असतो तर कधी त्याच्या स्वच्छ प्रवाहातून दिसणारा तळ ! पण हेच पाणी साचून राहिलं की ? नकोसंही होतं.
प्रवासही प्रवाही असायला हवा. कुठेही अडून राहावं लागलं, खोळंबा झाला की नकोसं होतं. दिशा चुकली, भरकटली की संयम सुटतो. गती ही प्रवासासाठी अत्यावश्यक.
'चेन्नई एक्स्प्रेस' हा एक गतिमान प्रवास आहे. ही गाडी कुठेही 'सायडिंग'ला पडत नाही. औरंगाबाद-पुणे रेल्वे दौंड मार्गे जाऊन ८ तास खाते, तशी ही चेन्नई एक्स्प्रेस वेड्यासारखी भरकटत नाही. ह्या गाडीचं तिकीट काढताना आपल्याला माहित असतं की ही कुठल्या मार्गाने जाणार आहे, किती थांबे आहेत, किती वेळ लागणार आहे आणि अर्थातच कुठून सुरु व कुठे संपणार आहे. सगळं काही माहित असतानाही हा प्रवास कंटाळवाणा होत नाही. डब्यातल्या शौचालयाच्या वासाने गुदमरायलाही होत नाही आणि विदाउट तिकीट चढलेल्या उपऱ्या लोकांचा त्रासही होत नाही.

गाडी मुंबईहून सुरु होते. जसा अमिताभ 'विजय' असायचा, तसा शाहरुख 'राज' किंवा 'राहुल' असतो. इथे तो राहुल आहे. भूमिकेत शा.खा. फिट्ट होण्यापेक्षा भूमिका शा. खा. साठी फिट्ट व्हावी म्हणून आधीच सांगून ठेवलेलं आहे की तो चाळीशीचा आहे. वयस्कर व्यक्तिची प्रेमकहाणी दाखवायची आहे म्हणून त्याचं आधी एखादं लग्न झालेलं आणि बायको गचकलेली वगैरे भावनिक ठिगळं इथे नाहीत. आई-बापाविना वाढवलेल्या नातवावरील अपार प्रेमासमोर, आजोबा नातवाचं लग्न वगैरे क्षुल्लक गोष्टी बाजूला ठेवतात, इतकंच. सचिन तेंडुलकरचे परमचाहते असलेले राहुलचे आजोबा, स्वत:च्या शंभराव्या वाढदिवशी भारत-पाकिस्तान सामना पाहत असतात. सचिन आणि आजोबा दोघेही ९९ वर असतात आणि एक चेंडू दोघांचीही विकेट काढतो. तिकडे पाकिस्तानी खेळाडू सुटकेचा निश्वास टाकतात आणि इकडे राहुल मुक्त हवेत मोकळा श्वास घेतो. मित्रांसोबत आधीच ठरलेला गोव्याला जायचा प्लान 'ऑन' ठेवतो आणि तयारी करतो. पण आजोबांची एक विचित्र इच्छा असते. त्यांच्या अर्ध्या अस्थींचं विसर्जन गंगेत आणि अर्ध्या अस्थींचं विसर्जन रामेश्वरमला करावं ! (ही अशी इच्छा का असते ? ह्याचं कारण/ संदर्भ कुठेच मिळणार नाही. बस्स. असते. कारण चित्रपट पुढे जायचा असतो.) राहुलला आजीला दाखवण्यासाठी चेन्नई एक्स्प्रेसने जाण्याचं नाटक करावं लागतं. प्रत्यक्षात कल्याणला उतरून, मित्रांसोबत गोव्याला जाऊन तिथेच अस्थि विसर्जित करण्याचा नतद्रष्ट प्लान केला जातो. मृत व्यक्तीच्या भावनांशी खेळ केल्याबद्दल त्याला तळतळाट लागतो आणि सगळ्या प्लानचा खेळखंडोबा होतो. चालू गाडीतून उतरताना मिनम्मा (दीपिका) गाडीसोबत धावताना त्याला दिसते. हात देऊन तो तिला आत घेतो. (असा सीन चित्रपटात असणार हे मला आधीच माहित होतं आणि त्याला पार्श्वसंगीत काय असेल, हे तुम्हालाही नक्कीच माहित आहे.) दीपिकापाठोपाठ ३-४ सांडसदृश मनुष्यसुद्धा धावत येतात आणि त्यांनाही राहुल आत घेतो. दीपिका एका डॉन (सत्यराज) ची मुलगी असते, 'थंगबली' (निकितिन धीर) नामक होतकरू डॉनशी होऊ घातलेल्या लग्नापासून ती पळालेली असते, हे आपल्याला ट्रेलरमधूनच माहित झालेलं असतं. पुढे सगळे जण तमीळनाडूतल्या त्यांच्या गावी येतात आणि परिस्थितीशरण राहुललाही त्यांच्यासोबत यावंच लागतं. निकितिन हा खरं तर 'शाखातिन' आहे. (शा. खा. X ३ इतका धिप्पाड) त्यामुळे इथून पुढे पळापळी असणार असते. होते. आणि सगळ्या धावपळीनंतर, काही गाड्या-माणसं उडून-उडवून झाल्यानंतर कहाणी अपेक्षित शेवटाला पोहोचते.चेन्नई एक्स्प्रेस ही काही रोलर कोस्टर राईड नाही. लागणारे धक्के पोटात गोळा आणत नाहीत. पण ही अगदीच संथगती ट्रामही नाही. काही सिनेमे सुरु होण्याआधीच 'आपकी यात्रा आनंददायी एवं सुखकाकरक हो, यही हमारी शुभकामानायें' वाली भारतीय रेलची अनाउन्समेण्ट करतात. तसाच चे.ए. आहे.
 
तमिळनाडू म्हणून दाखवलेला भाग गोवा असावा, असं वाटलं. कोम्बण गावाला जाण्यासाठी जिथे ट्रेन थांबवली जाते, तो बहुतेक गोवा-कर्नाटक सीमेवरचा नयनरम्य दुधसागर धबधबा असावा, असंही वाटलं.

दीपिकाच्या 'मिनम्मा'च्या अ‍ॅक्सेन्टवरून बरेच लिहिले-बोलले गेले आहे. हा अ‍ॅक्सेन्ट खरोखर तमीळ आहे की मल्याळी माहित नाही. पण तो काही काळ गंमतीशीर वाटतो. तिच्यासोबत राहून राहून राहुल थोडंसं तमिळ बोलायला लागतो तरी तिचा अ‍ॅक्सेन्ट जराही बदलत नाही. शेवटी शेवटी तिने जपलेलं ते बेअरिंग बोअरिंग वाटायला लागतं. पण दिसलीय लै भारी ! :-)
शा. खा. 'जतहैंजा'मध्ये दिसला त्यापेक्षा तरूण दिसलाय आणि त्यामुळे चाळीशीचाच (Not more) वाटलाय. शा. खा. ह्या चित्रपटाची जान आहे. बाकी काहीही असलं, तरी त्याचा उत्साह नेहमीच बेजोड असतो. (त्या उत्साहापोटी तो बरेचदा ओव्हर अ‍ॅक्टिंग करतो, हा भाग वेगळा) त्याचा उत्साह पडदा व्यापतो. विनोदनिर्मितीत अनेक ठिकाणी अचूक टायमिंग त्याने साधले आहे. एकंदरीत मला शा. खा. आवडला असेल अश्या काही मोजक्या चित्रपटांत मी चे.ए. ला मोजेन ! (Have I made it too large??)
साऊथ इंडियन पार्टी आणि निकीतीन धीरला विशेष काम नाहीये. जे आहे, जितकं आहे, ते आणि तितकं ते व्यवस्थित निभावतात.
कॉलीवूडमध्ये नावाजलेला 'सत्यराज' त्याच्या शारीरिक अभिनय व भेदक नजरेने लक्षात राहतो. ह्या अभिनेत्याला हिंदीत अधिकाधिक संधी मिळावी, असे वाटते.

संगीत विशाल-शेखरचं आहे. संपूर्ण स्कोअरवर पुन्हा एकदा विचार करावा, अशी शा. खा. आणि रोहित शेट्टीची इच्छा वजा मागणी होती आणि अर्थातच त्यासाठी विशाल-शेखरने विनम्र नकार दिला होता म्हणे. बरोबरच आहे. विशाल-शेखर ह्याहून चांगले काम करतील अशी आशा वाटणेच चुकीचे आहे. कुठलेच गाणे लक्षात राहील असे दमदार नाही. प्रत्येक गाणे कुठल्या न कुठल्या गाण्याची नक्कल किंवा दोन-तीन गाण्यांची भेसळ वाटते. चांगल्या संगीताची अपेक्षा रहमानशिवाय इतर कुणाकडून करावी का ? असा प्रश्न आजकाल पडायला लागला आहे.

रोहित शेट्टीचे सिनेमे वैचारिक उंची गाठत नसतातच. ते अगदीच वैचारिक दिवाळखोरीसुद्धा दाखवत नाहीत. नर्मविनोदाचा जमाना गेला आहे. आताचा विनोद अंगावर आपटतो आणि शेट्टी इज मास्टर ऑफ इट. अनेक प्रासंगिक विनोद मस्त जमले आहेत. अनावश्यक पसारा न करता कहाणीला वेग देण्यावर लक्ष केंद्रित केल्याचं जाणवतं आणि त्यामुळेच पटकथेतल्या काही 'भोकां'कडे लक्ष जात नाही. जसं - कल्याणचा प्लान बदलून कर्जतला भेटणार असलेला आपला मित्र आला नाही. त्याचा फोन लागत नाही. ह्याची काळजी न वाटून, काहीच न करण्याच्या वयाचे राहुलचे मित्र नसतात. चाळीशीत इतपत तर समज येते, नाही का ? मोबाईल फोन जवळ नाही, पण एखादा नंबरही पाठ नसतो, असं नसतं ना ? किमान घरचा नंबर तरी प्रत्येकालाच पाठ असतो.

एकंदरीत चे. ए. एकदा बघायला नक्कीच हरकत नसावी, (शा. खा. भक्त पारायणंहीकरू शकतील) असा नक्कीच आहे. फक्त चित्रपटाचं तिकीट आणि रेल्वेचं खरंखुरं तिकीट एकाच किमतीचं नसावं !

रेटिंग - * * १/२


Thursday, August 08, 2013

हरेक जन्मी तूच भक्त मी गाभाऱ्याचा बंदी..

'मराठी कविता समूहा'च्या 'अशी जगावी गझल - भाग २९' मध्ये माझा सहभाग -

ती नसल्याच्या दु:खाला आनंदी किनार आहे
स्वप्नामध्ये भेटण्यास ती रोजच तयार आहे

भिंतीवरचे घड्याळ माझी वेळ दाखवत नाही
हृदयी टिकटिकणारा काटा बहुधा चुकार आहे

दाढ्यांना कुरवाळुन जो तो 'हांजी-हांजी' करतो
मलाच केवळ खरे बोलण्याचा हा विकार आहे

हो, मी करतो तिची चाकरी इमान-इतबाराने
बस प्रेमाचा कटाक्ष एकच माझा पगार आहे

हरेक जन्मी तूच भक्त मी गाभाऱ्याचा बंदी
एकदा तरी 'तू' बनण्याचा माझा विचार आहे

------------------------------------------------------

कविता लिहिणे, पोळ्या करणे एकसारखे असते
गोलाईला जपले इतकेसुद्धा चिकार आहे

....रसप....
७ ऑगस्ट २०१३ 

Wednesday, August 07, 2013

वास्तवाच्या विस्तवाची राख असते शायरी..

बोल तू माझ्या घराशी एकटी असशील तर
सावली शोधायला मी सोडले केव्हाच घर

जो गुन्हा केलाच नाही डाग तो देऊ नका
दोष द्या दुसरा मला मी खूप चुकलो आजवर

माणसांची वेगळीशी चालली शर्यत इथे
जिंकले कोणीच नाही, जिंकले आहे शहर

ईश्वरा, दगडातही मी पाहिले होते तुला
पाहिले ना तू मला जीतेपणी आयुष्यभर

वास्तवाच्या विस्तवाची राख असते शायरी
आपल्या अस्तास रोजच पाहुनी जगला ज़फ़र

------------------------------------------------------

हात हाती घेतला अन् थेट सारे बोललो
ऐकण्याआधीच उत्तर वाजला होता गजर


....रसप....
५ ऑगस्ट २०१३ 

Monday, August 05, 2013

खुळा

सुमन तिचे सुमनासम सुंदर स्वच्छ पवित्र सुगंध जसा
नितळ निळ्या नयनी नभरंग निरागस लोभस अल्लडसा
अधरकळी कमनीय जुळी मकरंदकुपी पुरती भरली
बघुन तिला मज ईश्वरदर्शनआस नसे दुसरी उरली

रुणझुण पैंजण नादत भासत मोहक चालत मोहविशी
अलगद शब्द अनाहुत येउन स्पर्श करे जणु मोरपिशी
कटिखटके लटके झटके बघता उडते मन होत खुळे
लय हलते हृदयात नि स्पंदन एक-दुज्यास कधी न जुळे

झुळुकहवा उडवून खट्याळ बटांस तिच्या लडिवाळपणे
बहरुन येउन बाग हसे भ्रमरासम हे मन बागडणे
जणु हरिवल्लभ व्यस्त झुले श्रवणाभरणे झुलतात तशी
नकळत मी झुललो उलटा, झुरलो पडलो नित तोंडघशी

लिहुन किती कविता जमल्या पण शब्द न एक कधी वदलो
कुणि सुकुमार तिचे मुख चुंबित पाहुन मीच खुळा ठरलो

....रसप....
४ ऑगस्ट २०१३
सत्यकथेवर आधारित
वृत्त श्रवणाभरण - ललललगा ललगा ललगा ललगा ललगा ललगा ललगा

Thursday, July 25, 2013

वेडा (सुनीत)

'मराठी कविता समूहा'च्या 'लिहा ओळीवरून कविता - भाग १०७' मध्ये माझा सहभाग -

डोळ्यांखाली नकळत बनली वर्तुळे शुष्क काळी
दृष्टीसुद्धा विझुन हरवली शून्य देशात गेली
जाळे आठ्यांमधुन पसरले कृष्णवर्णी कपाळी
झोळी त्याची मळकट विटकी भार खांद्यास झाली

प्रत्येकाने सजवुन लिहिली त्या खुळ्याची कहाणी
कोणासाठी मजनु अपयशी प्रेमखेळात झाला
कोणी बोले बहुत धनिक तो भोगतो शापवाणी
आला होता कुठुन समजले ना कधीही कुणाला

धुंदीमध्ये बडबड करि तो नेहमी आपल्याशी
ऐकू आले सहजच मज तो गातसे काव्यओळी
नाही त्याला फिकिरच कुठली सख्य नाही जगाशी
काही बाही खरडत असतो गच्च ती पूर्ण झोळी

काव्योत्पत्ती हरवत असतो बावळा हा, तसा मी
तोही आता समजुन हसतो आपला, हासता मी !

….रसप….
२५ जुलै २०१३
वृत्त - चन्द्रलेखा

Monday, July 22, 2013

ह्या घरात शीतल वारा वाहत नाही मित्रा..

ह्या घरात शीतल वारा वाहत नाही मित्रा
मन माझे माझ्या घरात लागत नाही मित्रा

शेजार कधी पक्ष्यांचा होता किलबिल किलबिल
रात्रीस सोबती तारे होते झिलमिल झिलमिल
खिडकीत डहाळी आता वाकत नाही मित्रा
................ ह्या घरात शीतल वारा वाहत नाही मित्रा

प्राजक्त अंगणी गंध प्रितीचे सांडत होता
तो चाफा राजस रंग उषेचे माळत होता
आता दगडांतुन अंकुर हासत नाही मित्रा
................ ह्या घरात शीतल वारा वाहत नाही मित्रा

मी दूर दूरच्या नवीन देशी जावे म्हणतो
आवडते गाणे विसरुन दुसरे गावे म्हणतो
ह्या सुरांत आता रंगत वाटत नाही मित्रा
................ ह्या घरात शीतल वारा वाहत नाही मित्रा

येशील कधी तू भेटण्यास हे वाटत होते
पण एक अनामिक मळभ मनाशी दाटत होते
तू गेल्यावर मी माझ्यासोबत नाही मित्रा
................ मन माझे माझ्या घरात लागत नाही मित्रा 

....रसप....
२१ जुलै २०१३
(संपादित - ५ जानेवारी २०१९)

Sunday, July 21, 2013

लवलेटर

"अनेकदा हे सुचले होते
पण ना कधीच जमले होते
तुला सांगणे मनातले मी
ठरले होते, फसले होते

आज मात्र मी लिहिले आहे सगळे काही
आवडले ना तुला तरीही पर्वा नाही

तू वाचावे म्हणून आहे लिहिले सारे आज सविस्तर
मनात भीती वाटत आहे तरी वाच तू हे लवलेटर -

तुला पाहिले
जेव्हापासुन
मनास नाही
मुळीच थारा
असतोही मी
मी नसतोही
चालत असतो
पोचत नाही

कुणास ठाउक
काय हरवले
शोधत आहे
काय इथे मी
उगाच वाटे
मलाच माझे
तुझ्याचपाशी
आहे बहुधा
जे मी शोधत
आहे येथे

सांग मला तू
पहिल्या वेळी
पाहिलेस ना
तेव्हा काही
त्या नजरेने
ह्या नजरेचे
दिले-घेतले
होते असले
जाणवले का ?

असेल किंवा
नसेलही पण
इतके नक्की
खरेच, की ती
मनात जपली
छबी लाडकी
तुझीच आहे

नकार जर का
असेल तर तू
शांतपणाने
परत मला कर
हे लवलेटर….
समजा जर का
असेल 'हो' तर
नकोस बोलू
त्या धक्क्याने
वेडा होइन
म्हणून एकच
दे तू उत्तर
दे लवलेटर….

असेल 'ना' तर
'हे' लवलेटर
असेल 'हो' तर
'ते' लवलेटर !!"
.
.
.
.
.
इतके लिहिले आणि वाटले जरा थांबतो
तिच्या मनाचे अंदाजाने समजुन घेतो
आधी थोडी
मैत्री करतो
जवळिक करतो
नंतर देतो
हे लवलेटर

जरा थांबलो आणि कळाले
की लवलेटर तिला मिळाले
माझे नाही…
अन्य कुणाचे..!!
ती फुललेली
तो खुललेला
पुन्हा एकदा
मनात माझ्या
एक निखारा
धगधगलेला

उशीर केला म्हणून उरले हातामध्ये हे लवलेटर
तिला न कळले, मला न जमले पुन्हा राहिला प्रश्न निरुत्तर

….रसप….
२१ जुलै २०१३

Saturday, July 20, 2013

फसलेल्या 'कास्टिंग'ची पिचकवणी 'दुनियादारी' (Duniyadari - Marathi Movie Review)

कॉलेज.… कट्टा.… चहा.… सिगरेट.…दोस्ती-यारी आणि जराशी भाईगिरी.… साधारण असं सगळं असलेली एक कविता, नवीन-नवीन कविता करायला लागलो तेव्हा मी लिहिली होती. कमी अधिक फरकाने असं कॉलेज अनेकांनी पाहिलेलं व अनुभवलेलं असावं, ह्याचा प्रत्यय काल थेटरात 'दुनियादारी' बघताना आला. अनेक पुस्तकं वाचायची बाकी आहेत, त्यापैकी सुहास शिरवळकरांचे मूळ पुस्तक - दुनियादारी - सुद्धा आहे. त्यामुळे चित्रपट जरी त्या पुस्तकावरून घेतला असला तरी मी त्याकडे स्वतंत्र नजरेने पाहू शकलो, अनुभवू शकलो.

तर होतं काय की, पुण्यात एक कॉलेज असतं. जिथे मुंबईहून एका मोठ्या उद्योगपतीचा एकुलता एक मुलगा श्रेयस तळवलकर (स्वप्नील जोशी) शिकायला येतो. कॉलेजात आल्याबरोबर त्याला एक 'फॅक्ट चेक' मिळतो. कॉलेजचा प्रस्थापित दादा दिगंबर पाटील उर्फ दिग्या उर्फ डीएसपी (अंकुश चौधरी) व कॉलेजचा (की बाहेरचा हे नीट नाही) दुसरा एक स्ट्रगलिंग दादा साई देढगावकर (जितेंद्र जोशी) ह्यांच्या दुश्मनीत तो सापडतो. जो 'उसूल'वाला दादा असतो, त्याच्या म्हणजे अर्थातच दिग्याच्या बाजूने श्रेयस जातो आणि त्यांच्यात यारी होते.
कॉलेज म्हटलं की दोस्ती-यारी, भाईगिरी येते तशीच प्रेमप्रकरणंही येतात. दिग्याची असते सुरेखा (ऋचा परियल्ली). आणि श्रेयस अडकतो शिरीन (सई ताम्हनकर) अन् मीनू (उर्मिला कानिटकर) दोघींत ! मध्ये मध्ये लुडबुड करायला साई आहेच. ही प्रेमप्रकरणं व भाईगिरी, ह्या सर्वांना बरीच दुनियादारी करायला लावते. ती काय काय आणि कशी कशी हे पुस्तकात किंवा चित्रपटात समजेल.चित्रपटाच्या मुख्य पात्रांपैकी कुणीही कॉलेजवयीन वाटत नाही. दिग्या आणि साई नापास होऊनही पडून असतात, असं जरी मानलं तरी बाकीच्यांचं काय ? स्वप्नील जोशीला स्वेटर घातल्याने तो आणखीच तुंदिलतनु दिसतो. काही कॅमेरा कोनांतून त्याने विग घातला असावा असाही संशय आला. सई ताम्हनकर जितके कमी व घट्ट कपडे घालते तितकी ती मराठीतली भक्कम सोनाक्शी सिन्हा वाटते. चित्रपट म्हाताऱ्या सईच्या फ्लॅशबॅकमध्ये घडतो. त्या वयस्कर शिरीनच्या भूमिकेत ती अधिक शोभते. जितेंद्र जोशी नकारात्मक भूमिकेत असल्याने त्याला किळसवाणा दाखवला असावा. तो तसा दिसतो. विचित्र वाढलेलं पोट, पिंजारलेले केस आणि ती ओठांवरून जीभ फिरवायची स्टाईल ह्या सगळ्यामुळे तिरस्करणीय साई व्यवस्थित उभा होतो. अंकुश चौधरी 'स्टाइलिश भाई'च्या भूमिकेत आणि उर्मिला कानिटकर कॉलेजवयीन तरुणीच्या भूमिकेत 'त्यातल्या त्यात' फिट्ट वाटतात. स्व. आनंद अभ्यंकर, उदय सबनीस, वर्षा उसगांवकर, उदय टिकेकर, संदीप कुलकर्णी आणि नागेश भोसले छोट्या छोट्या भूमिकांत आहेत. फक्त दोन किरकोळ सीनमध्ये असलेला नागेश भोसले अक्षरश: पडदा खाऊन टाकतो. सुशांत शेलारला काहीच काम नाही.

शिरीन मेडिकलची विद्यार्थिनी दाखवलेली असताना ती ह्या दुसऱ्याच कॉलेजात का येत असते ? तिच्या आगमनाला ती फाडफाड इंग्रजी का झाडते ? ती काही परदेशातून वगैरे आलेली नसते !
तिला मेडिकलवाली दाखवण्याचं कारणच काय ? - हे चाणाक्ष प्रेक्षकाला कळायला वेळ लागत नाही. किंबहुना, ती डॉक्टर होणार असल्यामुळे तिचं कहाणीत अपरिहार्य असलेलं कर्तव्य ती जेव्हा करते, तेव्हा काहीच आश्चर्य वाटत नाही. खरं तर एक अंगावर येऊ शकणारा शेवट केवळ पिचकवणी सादरीकरण व पोकळ पटकथेमुळे फुसका बार निघतो.

श्रेयस मीनूला समजावतानाचा संवाद वगळता बाकी संवाद फक्त परिस्थितीजन्य निर्मिती असावीत असे वाटतात. द व्हेरी फेमस 'तुझी माझी यारी, तर #@त गेली दुनियादारी' हे मला तरी काही विशेष वाटलं नाही.

एका दृश्यात, बहुतेक अंकुश किंवा कुणी तरी दुसरा, 'व्हेस्पा'वर बसलेला दाखवला आहे. दोन-एक सेकंदाचं दृश्य.. ही 'व्हेस्पा' सध्याची 'प्याज्यो' कंपनीने आणलेली व्हेस्पा आहे. ही 'छोटीशी' चूक निश्चितच नाही. जुन्या काळाची वातावरणनिर्मिती करण्यासाठी त्या काळच्या गाड्या दाखवणं अतिशय महत्वाचं असतं. चांगल्या चित्रपटनिर्मितीसाठी अश्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष पुरवायलाच हवे.

गाणी त्रास होणार नाही, इतपत श्रवणीय नक्कीच आहेत. 'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया..' चांगलं जमलं आहे. 'देवा तुझ्या गाभाऱ्याला..' हे फेसबुकमित्र मंदार चोळकरचं गाणंसुद्धा चांगलंच जमून आलं आहे.

मराठीत चांगल्या कलाकारांची वानवा कधीच नव्हती. सर्वच बाबतीत मराठी चित्रपट वेगवगेळे प्रयोग करताना कधीच मागे राहिला नाही. आता चांगली प्रोडक्शन हाऊसेससुद्धा मराठीत आली आहेत. ह्या सगळ्याचं भान ठेवून पडद्यावरील कलाकारांनी स्वत:ला प्रेझेंट करतानाही पारंपारिकता दूर करायला हवी. कहाणीची गरज म्हणून जीवापाड मेहनत घेऊन शरीर बनवणारा एखादाच नटरंग अतुल कुलकर्णी मराठीत दिसतो. बाकी लोक कुठलीही व्यक्तिरेखा असो, शारीरिक मेहनत घेत नाहीत असंच वाटतं. कॉलेजची कहाणी असतानासुद्धा फुगीर शरीरयष्टी घेऊन हे लोक कसे काय वावरू शकले, कळलं नाही. सुरुवातीच्या एका दृश्यात अंकुश चौधरीला धावताना पाहिल्यावर जाणवतं स्लिम-ट्रिम असला तरी ते पुरेसं नाही, इतकं ते कृत्रिम वाटतं. दुनियादारी 'कास्टिंग'मध्ये जबरदस्त फसला आहे. ह्या कथेसाठी तरुण, तजेलदार चेहरे खूप आवश्यक होते. ओबडधोबड थकेल चेहरे आणि बेढब शरीरं ह्यांमुळे ही 'दुनियादारी' अस्सल वाटत नाही.

एकंदरीत, पिचकवणी सादरीकरण आणि पूर्णपणे वाया घालवलेला शेवट इतकंच अडीच तासानंतर लक्षात राहातं आणि वाटतं, नसता पाहिला तरी चाललं असतं.

रेटिंग - * *  

Tuesday, July 16, 2013

कळले ताई ?

शाळेसाठी
जातानाचा
डोंगरातला
रस्ता होता
आठवतो का
आता ताई ?

घोट्याइतके
खळखळ पाणी
असलेला तो
ओढा लागे,
त्याच्यानंतर
माळावरच्या
चिखलामधली
पायवाटही
थबथब थबथब..!!
आठवते का ?

रोज तिथूनच
दूर-दूरच्या
शाळेसाठी
चालत जाणे
तरी कधीही
कंटाळाही
आला नाही
आठवते का ?

बरेच चालुन
गेल्यावरती
शाळा येई
तू आनंदी
अन् मी दु:खी
रोज व्हायचो
आठवते का ?

कितीकितीदा
माझ्या बाई
माझ्याबाबत
तक्रारींचा
तुझ्याचपाशी
पाढा वाचत
पण तू कधिही
आईला ना
सांगितले ते
आठवते का ?

मला आठवे
तेच नेहमी
म्हणून अजुनी
आयुष्याच्या
ह्या रस्त्यावर
माझ्यासोबत
तू नसल्याच्या
तक्रारींना
कुणाकडेही
कधीच मीही
मांडत नाही
कळले ताई ?

....रसप....
१६ जुलै २०१३

Sunday, July 14, 2013

मला ओढ नाही तुला भेटण्याची..

'मराठी कविता समूहा'च्या 'प्रसंगावरून गीत - भाग क्र. २७' ह्या उपक्रमात माझा सहभाग -

मला ओढ नाही तुला भेटण्याची
तुला भेटतो रोज स्वप्नातुनी
मला फक्त सांगायचे हेच आहे
तुला चोरले मी तुझ्यापासुनी

पुन्हा एकदा रंग आला ऋतूला
तुझी फक्त चाहूलही लागता
तुझ्या आवडीची फुले हासती अन्
सुगंधी हवेचा सुरू राबता
दिसे आज प्रत्येक रस्ता नव्याने
जणू चालला घेत वळणे जुनी
मला ओढ नाही तुला भेटण्याची
तुला भेटतो रोज स्वप्नातुनी

कशाला कुणाला मनातील सांगू
तुझ्यावर इथे सर्व असती फिदा
तुझे नाव ऐकून गुंगीत सारे
तुझी धुंद मदमस्त ऐसी अदा
मला ना नशा ही, तुझी सावली मी
कुठे जायचे मी तुला टाळुनी
मला फक्त सांगायचे हेच आहे
तुला चोरले मी तुझ्यापासुनी

....रसप....
१४ जुलै २०१३  

Saturday, July 13, 2013

न धावणारा मिल्खा सिंग (Bhaag Milkha Bhaag - Movie Review)

राकेश ओमप्रकाश मेहरा, फरहान अख्तर आणि मिल्खा सिंग ह्या तिघांसाठी हा चित्रपट पाहायला गेलो. तिथे गेल्यावर दिसलं, मीच नाही शेकडो लोक आले होते, ह्याच तिघांसाठी. प्रवेशद्वाराबाहेर तोबा गर्दी होती. अशी गर्दी मी फक्त 'वाँटेड', 'एक था टायगर' ह्या सलमानपटांसाठी पाहिली होती. दरवाजा उघडण्यासाठी सगळेच आतुर होते. शर्यत सुरु होण्यापूर्वी 'गेट सेट गो' च्या वेळी सगळे स्पर्धक जसे असतात तसेच होते का? कदाचित ! कारण मी तर होतोच. दरवाजा उघडला. गर्दी इतकी होती की आम्ही - आई, बाबा, बायको, मी आणि मित्र विनायक - जागेवर पोहोचेपर्यंत नामावली सुरूही झाली.

वर्ष १९६०. रोम ऑलिम्पिक्सचे दृश्य. पिळदार शरीरयष्टीचा मिल्खा सिंग - द फ्लाईंग सिख - बाणासारखा सुटतो. पण फिनिशिंग लाईनजवळ आल्यावर, 'भाग मिल्खा भाग' च्या आरोळ्या मिल्खाला विचलित करतात. जुने काही तरी आठवते आणि शर्यतीतील लक्ष उडते. मिल्खा जिंकता जिंकता मागे पडतो, हरतो. देशभरात नैराश्य, संतापाची लाट येते. ही एक मोठी बातमी असते. 'मिल्खा हरला.' अशी चित्रपटाची रोमांचक सुरुवात होते. किंचितशी 'चक दे' ची आठवण होते. पण किंचितशीच आणि थोडा वेळच. कारण ह्या रोमांचक व वेगवान सुरुवातीनंतर चित्रपट पुन्हा हा वेग पकडत नाही. आपण 'भाग मिल्खा भाग' बघत असतो, पण मिल्खा रमतगमत चालतो. मध्येच थोडासा धावतो, पण लगेच पुन्हा थांबतो. संपूर्ण पुढचा प्रवास असाच 'थांबा - पहा - पुढे जा' आहे.

'मिल्खा सिंग' भारतीय क्रीडाजगतातील एक अविस्मरणीय व्यक्तिमत्व. आज क्रिकेटव्यक्तिरिक्त कुठल्याही क्षेत्रात भारताला अजिबात भाव मिळत नाही. पण एके काळचा हॉकीतला दादा भारत, त्याच काळात अभिमानाने एक खेलरत्न मिरवत होता. 'धावपटू मिल्खा सिंग'.

सध्याच्या पाकिस्तानातील मुलतान भागात मिल्खा सिंगचा जन्म होतो. फाळणीची भयंकर झळ लागलेल्या हजारो निरापराध कुटुंबांपैकी एक मिल्खाचं कुटुंब होतं. बालवयातच बेघर, अनाथ झालेला मिल्खा दिल्लीत आला. दिल्लीच्या गल्ल्यांत उलटसुलट धंदे करणारा मिल्खा सिंग एकेक पायरी चढत आंतरराष्ट्रीय ख्यातीचा धावपटू बनला. एक असामान्य प्रवास ! हाच प्रवास, त्यातील अनेक अडथळे, वळणे 'भाग मिल्खा भाग' मांडतो. अर्थातच ह्यात बऱ्यापैकी सूट घेऊन काही काल्पनिक भागही आहेच. ह्यातील काही काल्पनिक व सत्यकथन थरारक आहे, तर काही मनोरंजक. पण काही भाग दिग्दर्शकाला अपेक्षित थरार व मनोरंजन करण्यात कमी पडतो. काही भाग तर अगदीच अनावश्यक वाटतो. उदा. सोनम कपूरची व्यक्तिरेखा. कुठलाही आगा-पिछा न दाखवलेली ही व्यक्तिरेखा चित्रपटात येते आणि जाते. कहाणीत विशेष फरक पडत नाही. असे लहान-मोठे तुकडे मिल्खाला धावूच देत नाहीत. चित्रपटभर प्रेक्षक मिल्खाच्या वेगाची अपेक्षा करत राहातो. सव्वा तीन तास उलटून जातात, पण वेग सापडत नाही. सुरुवातीच्या दृश्यात मिल्खा हरतो आणि शेवटच्या दृश्यात चित्रपट. अगदीच शेवटचा वगैरे येत नाही, पण पदकही मिळत नाही व नैराश्य पदरी पडतं.मिल्खा सिंगना ऑलिम्पिक पदक मिळालं नव्हतं. तरी त्यांची कामगिरी अद्वितीयच होती. ज्या परिस्थितीवर मात करून व जी मेहनत करून त्यांनी ऑलिम्पिकेतर स्पर्धांत भारताचं नाव केलं, ते निश्चितच 'क़ाबिल-ए-तारिफ़' होतंच. तद्वतच, चित्रपट चांगला असला तरी अपेक्षेइतका चांगला नसला तरी, 'मिल्खा' मन जिंकतो. फरहान अख्तरची मेहनत फक्त त्याच्या 'पॅक्स'वरूनच दिसत नाही. तर त्याची देहबोलीसुद्धा एखाद्या सैनिकाची व खेळाडूचीच वाटते. शर्यतींत धावणारा फरहान अख्तर खरोखर एखाद्या व्यावसायिक धावपटूसारखा, ते तंत्र समजून घेऊन, धावत असतो. त्याचं चालणं, बोलणं आणि आपल्या लक्ष्याला वाहून घेणं कधीच हे जाणवू देत नाही की हा 'फरहान अख्तर' आहे. आपण पूर्ण वेळ फक्त आणि फक्त 'मिल्खा'च पाहात असतो. तरुणपणी स्वतःच्या मूळ गावी आल्यावर हमसून हमसून रडणारा मिल्खा मात्र जरा कमी पडल्याचं प्रकर्षाने जाणवतं.

सोनम कपूर एका छोट्या व अनावश्यक भूमिकेत आहे. ती अभिनयाचा मनापासून प्रयत्न करते. पण ती 'मनापासून प्रयत्न करत आहे' हेच जाणवत राहतं.

दिव्या दत्ता ह्या गुणी अभिनेत्रीला अखेरीस बऱ्यापैकी वाव मिळाला आहे, ह्याचा मला खूप आनंद झाला. मिल्खावर आईसारखी माया करणारी मोठी बहिण तिने अप्रतिम साकारली आहे. तिचं प्रत्येक दृश्य ती जिंकते. दिग्दर्शक दिव्या दत्ता पडद्यावर असताना इतर कुणाला मुद्दामच जास्त वाव देत नाही. कारण इथे कदाचित फरहानचा मिल्खा कमी पडलाच असता. त्यामुळे जिथे जिथे दिव्या दत्ता आहे, तिथे तिथे ते ते दृश्य तिच्यावरच जणू एकवटलं आहे.

पवन मल्होत्रा हाही एक अत्यंत गुणी कलाकार. त्यालाही इथे बराच वाव मिळाला आहे. त्याच्यातला सैनिक त्याने खूप भावनिक बनवला आहे मात्र. दिव्या दत्ता आणि पवन मल्होत्रा निम्म्याहून अधिक दृश्यात गहिवरतात व गहिवरवतात.

इतर भूमिकांतून दिलीप ताहिलने साकारलेले पं. नेहरू लक्षात राहतात. फार काही काम नाहीये. पण एकदम डिट्टो वाटतात !

शंकर-एहसान-लॉयला बऱ्याच दिवसांनी ऐकलं का ? बहुतेक हो. हवन करेंगे, घुलमिल घुलमिल आणि रंगरेज ही गाणी छान आहेत. खासकरून 'घुलमिल घुलमिल' ऐकत असताना मनातल्या मनात आपण जरासं नाचूनही घेतो ! गाण्यांचे शब्द समजत नाहीत. पण आजकाल बहुतांश गाण्यांचं तसंच असतं !

राकेश मेहरा, आशुतोष गोवारीकर, संजय लीला भन्साळी अशी काही नावं आहेत ज्यांचे चित्रपट तीन - साडेतीन तास चालतातच. जातानाच त्याची मानसिक तयारी करून जायला हवे. ती कदाचित मी केली नव्हती म्हणून असेल पण मला असं वाटलं की इतपत कहाणी अडिच तासात सांगता येऊ शकली असती. फ्लॅशबॅक्समधून कहाणी उलगडत जाण्याचं तंत्र, कॅमेऱ्याचे विशिष्ट कोण मेहरा सुंदर वापरतात. त्यांची मेहनत व त्यांचं 'व्हिजन' दिसून येतं. पण ह्या सगळ्यावर चित्रपटाची लांबी व वेग मात करतात. चित्रपट अगदीच कंटाळवाणा नसला तरी कमी रंजक करतात.

संवाद लेखनाची बाजू ह्या चित्रपटात सगळ्यात कमकुवत असावी. हवा तर अशी होती की काही वादग्रस्त संवाद आहेत. पण एकही ओळ लक्षात राहात नाही. सपक संवादांमुळेही अपेक्षित नाट्यनिर्मिती काही ठिकाणी मार खाते.

एखादा अंतिम सामना, आपल्या आवडीच्या संघ जिंकतो. निकाल आपल्या पसंतीचा लागतो, पण सामन्यात रंजकता कमी असते. अगदीच एकतर्फी झाला असतो. अश्या सामन्याने जितका आनंद मिळतो; तितका आनंद 'भामिभा' देतो.

रेटिंग - * * *

Wednesday, July 10, 2013

मृत्युही गझलीय यावा.. (भावानुवाद - अपने होंठों पर सजाना चाहता हूँ..)

'मराठी कविता समूहा'च्या 'कविता एक अनुवाद अनेक - भाग २८' ह्या उपक्रमात माझा सहभाग -

वाटते ओठांवरी तू हास्य व्हावे
जन्मभर केवळ तुला मी गुणगुणावे

एकदा तर एक अश्रू तू टिपावा
पापणीने मोतियाचे दान द्यावे

खूप जपली मी तुझी स्मरणे उराशी
'मी तुला स्मरतो' असे तूही स्मरावे

स्वप्न काळोखात माझे हरवलेले
वास्तवाचे दीप आता पेटवावे

श्वास शेवटचा तुझ्या डोळ्यांत घ्यावा
मृत्युही गझलीय* यावा, मी जगावे

मुळ गझल : अपने होंठों पर सजाना चाहता हूँ
मूळ गझलकार : क़तील शिफ़ाई
भावानुवाद : ....रसप....
९ जुलै २०१३

मूळ गझल :-

अपने होंठों पर सजाना चाहता हूँ
आ तुझे मैं गुनगुनाना चाहता हूँ

कोई आँसू तेरे दामन पर गिराकर
बूँद को मोती बनाना चाहता हूँ

थक गया मैं करते-करते याद तुझको
अब तुझे मैं याद आना चाहता हूँ

छा रहा है सारी बस्ती में अँधेरा
रोशनी हो, घर जलाना चाहता हूँ

आख़री हिचकी तेरे ज़ानों पे आये
मौत भी मैं शायराना चाहता हूँ

- क़तील शिफ़ाई

* * * *

मीच गप्पा मारतो आता तुझ्याशी
एकट्याने तू मना का हिरमुसावे ?

Tuesday, July 09, 2013

पाऊस नसे हा पहिला..

पाऊस नसे हा पहिला पण भिजणे बाकी आहे
मी तिच्या लोचनांमधुनी पाझरणे बाकी आहे

विश्वास कसा ठेवावा तू आसपास असल्याचा
माणूस माणसामधला सापडणे बाकी आहे

मी लिहिल्या अनेक कविता संतोष वाटला नाही
नुकतेच मला कळले की, 'तू' सुचणे बाकी आहे

सत्यास शोधले होते, सत्यास मांडलेसुद्धा
पण सत्य नग्न असते हे आवडणे बाकी आहे

माझ्यात राम आहे अन् माझ्यामधेच रावणही
चेहरा तुम्हाला दुसरा दाखवणे बाकी आहे

आईस फसवुनी 'जीतू' मी अनेक पाउस भिजलो
ती ओल मनातुन अजुनी वाळवणे बाकी आहे

....रसप....
८ जुलै २०१३  

Thursday, July 04, 2013

बंडखोर मी !

मनातले मी
कवितेमधुनी
मांडत असतो
असे सांगतो
जरी तुम्हाला
मलाच माहित
हे तर आहे
केवळ वरवर

आवड आहे
एकच मजला
प्रस्थापितता
मोडुन काढुन
बंड करावे
म्हणून लिहितो

जे जे दिसते
लोकमान्य अन्
पारंपारिक
ते ते सगळे
चूकच आहे
असे म्हणावे
म्हणजे येते
नजरेमध्ये
तेव्हढेच तर
मला पाहिजे

मला म्हणा हो
नव्या पिढीचा
कारण आहे
बंडखोर मी !
लिहितो केवळ
ठरण्यासाठी
बंडखोर मी..

....रसप....
४ जुलै २०१३  

Wednesday, July 03, 2013

एक क्षण निसटलेला..

एक दिवस अचानक दिसला मला
खोलीच्या कोपऱ्यात एक क्षण रेंगाळलेला
माझ्या नकळत माझ्याच मुठीतून
कधीकाळी निसटलेला
बरेच दिवस लागत नव्हता हिशेब
सरलेल्या आणि उरलेल्या वेळेचा
आता लागेल बहुधा !

फक्त इतकंच व्हावं,
की हा क्षण मुठीत घेताना
अजून एक दोन निसटू नयेत !
कारण घरात राहतील तर कोपऱ्यात दिसतील
बाहेर पडले, तर गोल दुनियेत गोल-गोल फिरतील..
कुठे शोधीन ? कुठे मिळतील ?

बस्स!
ह्याच विचारात मी गढलो
आणि निसटल्यावरही दिसलेला क्षण
पुन्हा एकदा हरवून बसलो
आता घर इतकं मोठं झालंय की,
कोपरेही संपत नाहीत....

....रसप....
२ जुलै २०१३

Saturday, June 29, 2013

'घनचक्कर' - A perfect Stress buster (Ghanchakkar - Movie Review)

सोमवार ते शुक्रवार (शनिवार), सकाळ ते संध्याकाळ (रात्र) तेच ते रूटीन असतं. अमुक वाजता उठा, तमुक वाजता ऑफिससाठी निघा, पोहोचा, मग पुन्हा अमुक वाजता निघा, तमुक वाजता घरी या आणि सकाळी पुन्हा अमुक वाजता उठायचं असतं म्हणून ढमुक वाजता डोळ्यांवर झोप ओढून घ्या. काही जण, किंबहुना बहुतेक जण ह्या त्याच त्या दिनक्रमाला जरा कंटाळतात आणि मग त्यातील काही चित्रपटप्रेमी सुटीच्या दिवशी मित्र-मैत्रिणींसोबत किंवा कुटुंबासोबत किंवा एकट्यानेही 'स्ट्रेसबस्टर' साठी एखादा चित्रपट पाहातात. ह्या 'स्ट्रेसबस्टर'ची प्रत्येकाची व्याख्या निराळी. कुणाला 'डोक्याला शॉट' नको असतो, कुणाला काही तरी लॉजिकल हवं असतं, कुणाला 'आंबट' हवं असतं, कुणाला सेन्सिबल.. कुणाला गाणी, तर कुणाला कहाणी हवी असते.. कुणाला विशिष्ट नट/ नटी, तर कुणाला चांगला दिग्दर्शक, पटकथाकार..... वगैरे वगैरे. समजा असं सगळं सगळं एकाच चित्रपटात असेल तर ? Here is a flick, which has got the trick ! 'घनचक्कर; इज अ परफेक्ट 'स्ट्रेसबस्टर' !

थोडक्यात ष्टोरी अशी -
संजू (इम्रान हाश्मी) एक प्रतिष्ठित चोर असतो. प्रतिष्ठित म्हणजे किरकोळ हात न मारणारा. पुरेसा 'माल' कमवून झाल्यानंतर संजू आणि त्याची पत्नी नीतू (विद्या बालन) ठरवतात की, 'आता बस्स ! नो मोअर चोरी-चमारी, नो मोअर छक्के-पंजे.' But destiny has a different plan. पंडित (राजेश शर्मा - 'इश्क़िया' मधला 'कुक्कू') आणि इद्रिस (नमित दास - 'वेक अप सिड' मधला 'ऋषी') कडे एक प्लान असतो. बँक लुटायचा. त्यात त्यांना संजूची मदत हवी असते. हिस्सा असतो १० कोटी रु.!! '१० कोटी' ऐकल्यावर बायको म्हणते नवऱ्याला, 'मार एक आखिरी हाथ' आणि नवरा म्हणतो बायकोला, 'यह हुई ना दिल की बात !' संजू 'आखिरी हाथ' मारतो. प्लान यशस्वी होतो. भरपूर पैसा मिळतो. पण पैश्याची वाटणी, वातावरण थंडावल्यानंतर, म्हणजे साधारण ३ महिन्यांनतर करण्याचं ठरतं. पैसे सुरक्षित जागी लपवण्यासाठी संजूकडे दिले जातात. तो सुरक्षित, गुप्त जागी पैसे लपवतो. 
तीन महिन्यांनी पंडित आणि इद्रिस परततात, तोपर्यंत 'झोल' होतो. ('विजय' वाला नाही, 'गडबड'वाला.) एका अपघातात संजूला स्मृतिभ्रंश होतो. हा स्मृतिभ्रंश गजनीसारखा नसतो. जास्त विश्वसनीय असतो. त्याला काही गोष्टी आठवत असतात आणि काही नसतात. लक्षात असलेल्या गोष्टीही तो अधून-मधून, हळूहळू विसरत चालला असतो. आणि त्याने अंगावर गोंदवूनही ठेवलेलं नसतं. कारण आधी गोंदवायचं लक्षात राहिलं पाहिजे, मग गोंदवेपर्यंत लक्षात राहिलं पाहिजे आणि मग गोंदवलेलं पाहण्याचं लक्षात राहिलं पाहिजे ! 

पुढे काय होतं ?
पंडित-इद्रिस काय करतात ?
पैश्याचा छडा लागतो का ?
खरोखर 'झोल' झालेला असतो की ह्यातही काही 'गेम' असतो ? 
इत्यादीसाठी चित्रपट पाहा ! मी पैसे खर्च केले, तुम्हीही करा. इतकी ग्यारंटी देतो की पैसे वाया नक्कीच जाणार नाहीत. 'आमिर', 'नो वन किल्ड जेसिका' मुळे राजकुमार गुप्ताकडून अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. 'घनचक्कर'मध्ये तो अपेक्षापूर्ती करतो. कहाणीवरील पकड कुठेच ढिली पडत नाही. संजूचा अपघात कसा झाला, त्याला कसं हॉस्पिटलमध्ये नेलं, डॉक्टरने ओढलेला चेहरा करून 'डोक्यावर आपटलाय' हे कसं सांगितलं, वगैरे अनावश्यक गोष्टी दाखवण्यात वेळ घालवला नाहीये. बिनकामाची गाणी घुसडलेली नाहीत. पात्रांचा फापटपसारा करून ठेवलेला नाही. बांडगुळासारखी उपकथानकं तर नाहीतच. मुद्द्याची गोष्ट, तीसुद्धा मस्त ! एकूणच कहाणीला त्याने हलकी फुलकी ट्रिटमेण्ट दिली आहे. प्रासंगिक आणि संवादातील अनेक विनोद थेटरात हशा पिकवतात. संजूचं हळूहळू अधिकाधिक विसरभोळं होत जाणं अतिशय सहज दाखवलं आहे. 

राजेश शर्मा हा एक ओम पुरी टाईप वाईट चेहऱ्याचा उत्कृष्ट अभिनेता आहे. त्याच्याकडे जबरदस्त टायमिंग आणि संवादफेक आहे, हे तो पुन्हा पुन्हा दाखवत राहातो. 

नमित दास सुरुवातीला 'टपोरी' म्हणून पटत नाही. कारण त्याच्या डोळ्यांत एक निरागसपणा जाणवतो, पण कहाणीच्या विनोदी हाताळणीमुळे तो हळूहळू 'इद्रिस' म्हणून फिट्ट होतो. तरी काही ठिकाणी त्याचं टायमिंग जरासं हुकतंच. ट्रेनमधील मिटींग्सच्या वेळी नेहमी भेटणाऱ्या एका माणसाच्या सोबतच्या त्याच्या ३-४ छोट्याश्या प्रसंगात विनोदनिर्मिती तशी फसलीच आहे.            

पंजाबी उच्चार आणि भक्कम अंगकाठीतून विद्या बालनने पंजाबी नीतू जबरदस्त उभी केली आहे. तिचं 'अतरंगी' फॅशन करणं लै भारी आहे ! खूप जाडी दिसत असली, तरी खूप सुंदरही दिसते आणि भूमिकेत घुसते. 

इम्रान हाश्मी 'डायन'नंतर पुन्हा एकदा अभिनय दाखवतो. त्याला फक्त तोंडच नसून, चेहराही आहे आणि त्यावर 'इतर'ही अनेक भाव तो सहजी उमटवू शकतो, हे त्याने स्वत:लाच अधूनमधून आठवून देत राहायला हवं. संजूची हताशा, निराशा तो ज्या सहजपणे रंगवतो, तितक्याच सहजतेने त्याच हताशे-निराशेतून विनोदनिर्मितीही करतो !

अमित त्रिवेदीचं संगीत श्रवणीय आहे. लेझी लॅड, घनचक्कर बाबू आणि अल्लाह मेहरबान ही तिन्ही गाणी ठेका धरायला लावतात आणि दिलखेचक आहेत. 

अनेक चक्करा मारून, वळणं घेणारा हा घनचक्कर वेगळ्याच शेवटामुळे मनाला अधिक पटतो. ३५ कोटींइतकी मोठी रक्कम पंडित-इद्रिस संजूकडे कसे काय देतात ? त्याचा अपघात झालेला त्यांना कळत कसं नाही ? ते त्याच्यावर नजर ठेवून नसतात की काय ? असे काही प्रश्न चित्रपट पाहाताना पडतात पण शेवटी सुटतात. 

बऱ्याच दिवसांनी एक उत्कंठावर्धक विनोदी चित्रपट आला का ? कुणास ठाऊक ! आपल्याला तर स्ट्रेसबस्टर हवा होता.... मिळाला !! 

रेटिंग - * * *१/२ 

Saturday, June 22, 2013

मार्केटमधला नवा 'मजनू' - रांझणा (Raanjhnaa - Movie Review)

एक असतो बनारसी पंडित. त्याचा मुलगा एका मुस्लिम मुलीच्या प्रेमात वेडा होतो. त्या मुलाच्या कहाणीवर एक होतकरू दिग्दर्शक चित्रपट काढायचं ठरवतो. त्या चित्रपटातून एक तमिळ सुपरस्टार हिंदीत आगमन करणार असतो. त्याच्या हिंदी उच्चारांवर मेहनत घेऊन त्याचा आणि स्वत:चा अजून एखाद्या चित्रपटासाठीचा वेळ वाया घालविण्यापेक्षा रोलच जरासा 'अ‍ॅडजस्ट' करू या की, असं ठरवलं जातं आणि कहाणी अशी बनते की - 'एक असतो 'तमिळ' पंडित. तो बनारसला 'प्रॅक्टिस' करत असतो. त्याचा मुलगा एका मुस्लिम मुलीच्या प्रेमात वेडा होतो आणि वगैरे वगैरे'

'बऱ्याच दिवसात मार्केटमध्ये नवा देव आला नाहीये', असा काहीसा संवाद 'OMG' मध्ये आहे. तो ऐकून दिग्दर्शकाची ट्युब पेटली असावी आणि जाणवलं असावं की बऱ्याच दिवसात मार्केटमध्ये नवा 'मजनू' आला नाहीये ! दोन-तीन चांगल्या दर्जाची ठिगळं जोडून एक कहाणी विणली गेली असावी. ही कहाणी ठिगळ बाय ठिगळ उलगडत जाते. सुरुवात होते बनारसमध्ये. तमिळनाडूतून येऊन बनारसमध्ये स्थिरस्थावर झालेल्या एका पंडिताचा द्वाड मुलगा 'कुंदन' (धनुष), बालपणापासूनच 'झोया' (सोनम कपूर)च्या प्रेमात असतो. बालवयातल्या ह्या प्रेमाला स्वत: कुंदन आणि झोयाच्या घरचे फारच सिरिअसली घेतात आणि शोप्याची रवानगी बनारसहून अलिगढ आणि नंतर पुढिल शिक्षणासाठी तिथून दिल्लीला होते.
८-९ वर्षांनी परतलेली झोया बदललेली असते. ती 'अक्रम' (अभय देओल) ची दीवानी झालेली असते. पण कुंदन बदललेला नसतो. तो अजूनही तिच्याच प्रेमात असतोच. मस्त प्रेमत्रिकोण बनतो. पण इतकी कहाणी उलगडते तरी अजून मध्यंतरसुद्धा झालेलं नसतं. आजपर्यंत किती प्रेमत्रिकोण आपण पाहिलेत, ह्याची गणतीसुद्धा अशक्य आहे. पण ही कहाणी केवळ प्रेमत्रिकोण नाहीये. पुढचं एक ठिगळ ह्या कहाणीला एक अनपेक्षित वळण देतं आणि चित्रपटाच्या शेवटापर्यंत ती 'कुठच्या कुठे' जाऊन पोहोचते !

पुढची दोन ठिगळं काय आहेत, हे चित्रपट बघूनच समजून घ्यावं. त्यासाठी फक्त सोनम कपूरला आणि मध्यंतरानंतरच्या धीम्या गतीने भरकटण्याला सहन करावं लागतं. बाकी तसं ह्या चित्रपटात काहीच 'असह्य' नक्कीच नाही.कुंदनचा मित्र 'मुरारी' (अभिनेत्याचं नाव माहित नाही) जबरदस्त आहे. त्याचे वन लायनर्स हुकमी टाळ्या घेतात, हशा पिकवतात. त्याव्यतिरिक्तही संवाद बऱ्यापैकी खुसखुशीत आहेत. सगळ्याच सपोर्ट कास्टचं काम चोख झालं आहे. अभय देओलला तसं कमी काम असलं तरी त्याचा पडद्यावरचा वावर छाप सोडतोच आणि मुळात मुख्य भूमिकेतील 'धनुष' अगदीच पाप्याचं पितर असल्याने अभय लक्षात राहतो.
धनुषला पाहिल्यावर सुपरस्टार बनण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात, हे समजतं -
१. एखाद्या लार्जर दॅन लाईफ सुपरस्टारला मुलगी असली पाहिजे.
२. तिच्याशी तुमचं लग्न झालं पाहिजे.
बास्स ! झालात तुम्ही सुपरस्टार आणि त्यात हे प्रकरण दाक्षिणात्य असेल तर तुमचं येत्या काही दिवसांत सासऱ्याच्या बाजूला, रामासोबत हनुमानाचं असावं तसं मंदिरही बनू शकेल.
कारण, बाकी कुठलंही, सुपरस्टारच काय पडद्यावर झळकायच्या लायकीचंही लक्षण 'धनुष'मध्ये नाही. त्याची अंगकाठी इतकी बारकी आहे की राजपाल यादवची पर्सनालिटी भारी वाटावी. पंधरा थपडा मारणारी सोनम कपूरच होती म्हणून ठीक, बिपाशासारख्या भक्कम हिरविणीची एक थप्पडही ह्याचा डावा गाल उजवीकडे नेऊ शकेल, असं त्याला पाहून वाटतं. अभिनय म्हणावा, तर 'कुंदन'च्या व्यक्तीरेखेतच दम आहे. त्यात त्याने काही विशेष जीव ओतलाय, अश्यातला भागच नाही. त्याच्याकडे स्टाईल नाही, चेहरा नाही, अंगकाठी नाही, नृत्यकौशल्य नाही; तरी तो हीरो बनला आहे, ही गोष्ट अनेक सडकछाप रोमिओंचं मनोबल निश्चितच उंचावू शकेल.

शोसाठी घरून निघताना, जरासा वेळ होता म्हणून सहज टीव्ही लावला होता तर एका वाहिनीवर दिग्दर्शक आनंद रायची छोटीशी मुलाखत चालू होती. तो सतत 'धनुष सर, धनुष सर' म्हणत होता. दया आली.

'जब तक हैं जान' नंतर नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या रहमानच्या चाहत्यांना रहमान जरासा(च) दिलासा 'रांझणा'तून देतो. 'तुम तक' ही कव्वाली तर मस्तच बनली आहे.

एकंदरीत एकदा(च) पाहण्यास हरकत नसावी, असा हा चित्रपट मी आजपर्यंत पाहिलेल्या सगळ्यात मरतुकड्या सुपरस्टारला हिंदीत आणतो आहे. इथल्या बलदंड बैलांच्या गर्दीत, हे कुपोषित कोकरू टिकेल का हे काळच सांगेल !!

रेटिंग - * * १/२          
Related Posts Plugin for WordPress, Blogger...