Thursday, February 28, 2013

माझी शाळा

कुसुमाग्रजांच्या 'तुर्क' ह्या कवितेच्या आकृतीबंधापासून प्रेरणा घेऊन ही रचना लिहिली आहे.


अजूनही ती
आठवते मज
माझी शाळा
अजूनही पण
समजत नाही
हवीहवीशी
होती शाळा
की कंटाळा ?

अभ्यासाच्या
नावे शंखच
होता तरिही
बाकावरती
कोरुन कोरुन
नावे लिहिणे
चित्रं काढणे
खोड्या करणे
शिक्षा होणे
पट्ट्या खाणे
उठा-बश्या अन्
कान पकडणे
तरी आणखी
फिरून हसणे
मजाच होती !!

गृहपाठाची
वही भरतसे
लाल शाइने
पानोपानी
शेरे-शेरे
पुन्हा एकदा
शिक्षा होणे
फिरुन आणखी
पुन्हा हासणे !

तरी लाडका
मी बाईंचा
शिक्षा करती
तरी शेवटी
डोक्यावरुनी
हात फिरवती
गहिवरलेला

समोर माझ्या
आत्ता आहे
जी शाळा ती
माझी नाही
उंच इमारत
प्रशस्त प्रांगण
यांत्रिक सारे
मुले नि शिक्षक
असे न होते
माझ्या वेळी

छोटीशी ती
होती शाळा
एक इयत्ता-
एकच तुकडी
एकच बाई
एकच पट्टी
एकच शिक्षा
अन् डोक्यावर
हात फिरे तो
गहिवरलेला

....रसप....
२८ फेब्रुवारी २०१३

उदासीनता

कुसुमाग्रजांच्या 'तुर्क' ह्या कवितेच्या आकृतीबंधापासून प्रेरणा घेऊन ही रचना लिहिली आहे.

उदासीनता
एकदाच दे
एका रंगी
कभिन्न काळ्या
जशी रंगते
धुंद होउनी
रात्र रोजची
तशीच अस्सल

शुद्ध वेदना
खरीखुरी दे
कळू नये की
कुठे ठणकते
खपलीखाली
भळभळणाऱ्या
जखमेचीही
नकोच नक्कल

नको आणखी
काही दुसरे
एकटाच मी
माझ्यासोबत
नको आठवण
नकोच वास्तव
कठोर किंवा
दाहक सारे
नको कुणाचे
अलिप्त सांत्वन
थेंब सांडता

फक्त असू दे
डोळ्यावरती
निव्वळ माझी
श्रांत पापणी
बोजड ओली
थोपवेल ती
तिथेच सारी
गाभाऱ्यातुन
व्यक्त व्हावया
उफाळणारी
....... उदासीनता.......... !!

....रसप….
२७ फेब्रुवारी २०१३

Tuesday, February 26, 2013

एक पंचतारांकित पतंग - कायपो छे ! (Movie Review - Kai Po Che!)


पतंग....
हा असा खेळ/ करमणूक/ कला (नक्की काय असतं पतंग उडवणं ? हा प्रश्न मला कधीचा पडलेला आहे.....) आहे की एकदा त्यात रमलेला माणूस तहान-भूक, काळ-वेळ, शत्रू-मित्र सगळं विसरूनच जातो. संक्रांतीला, खासकरून गुजरातेत, पतंगांनी भरून गेलेलं आभाळ पाहाणं, हा एक अद्भुत अनुभव! आबालवृद्ध गच्ची, माड्या गाठून दिवसभर पतंग उडवतात. लहान-मोठे, शेपटी असलेले/ नसलेले, जाड-पातळ, स्वस्त-महाग..... आणि निरनिराळ्या रंगांचेही.... जसं, भगवा-हिरवा ? अमुक रंगाचा पतंग माझा, तमुक रंगाचा तुझा.... दोस्ती गेली तेल लावत, मला तुझा पतंग कापायचाय आणि ओरडायचंय.... 'कायपो छे !!' [(तुझा पतंग) कापला रे !! (बस बोंबलंत आता !)] अशी ईर्ष्या मी पाहिली आहे, अनुभवली आहे.
पतंगांची ही चढाओढ आपण खरं तर सगळीकडेच पाहात, करत असतो ना? शाळेत, कॉलेजात, नोकरीत, व्यवसायात.. आणि नात्यांतही ! मनात आपल्याच नकळत एक सुप्त इच्छा असते, आपलाच पतंग उंच असावा अशी... आणि जवळपास येणाऱ्याचा मांजा कापून 'कायपो छे!!' ओरडायची !

'कायपो छे' ची कहाणी २०००-०१ मधली. आयुष्यातली बहुतांश चढाओढ (शिक्षणाची!) गुण्यागोविंदाने पार करून, जबाबदारीची जाणीव होऊ लागण्याच्या वयात आलेले तिघे जिगरी मित्र - इशान/ ईश (सुशांतसिंग राजपूत), गोविंद/ गोवी (राजकुमार यादव) आणि ओम्कार/ ओमी (अमित सध). इशान जिल्हा पातळीपर्यंत क्रिकेट खेळलेला असतो. पण बेभरवश्याच्या स्वभावामुळे पुढे काही करत नाही आणि नाकर्ता म्हणवला जात असतो. किंबहुना, कमी-अधिक प्रमाणात तिघंही, आयुष्यात 'लूजर्स'च ! इशान शीघ्रकोपी, तर गोविंद शांत. आणि ओम्कार दोघांचा मध्य ! तिघे मिळून, खेळाच्या वस्तूंचे दुकान आणि स्पोर्ट्स अकादमी सुरू करायचं ठरवतात. त्यासाठी लागणारे पैसे, नाईलाजाने, ओमीच्या राजकारणी मामाकडून घेतात. दुकान, अकादमी सुरळित चालू असते. ईशानच्या टॅलेण्ट हंटला 'अली हाश्मी' हा अल्पवयीन मुलगा सापडतो. तडाखेबंद फलंदाज!

पुढे, एका मोठ्ठ्या दुकानासाठी पैसे घालणं, मग भूकंपात सगळं काही गमावणं, त्यातूनही पुन्हा उभं राहाणं आणि अखेरीस गोध्रा हत्याकांड व धार्मिक दंगलींच्या पार्श्वभूमीवर ईश-गोवी-ओमी ची दोस्ती वेगवेगळ्या ओढाताणींना अनुभवते. ह्याहून अधिक कहाणी सांगणं कदाचित बरोबर नसेल. पण त्यांचे वाद, भांडणं, पुन्हा एकत्र येणं, एकमेकांसाठी काहीही करायची तयारी असणं, बदलते राजकीय व सामाजिक वातावरण हा सगळा प्रवास अतिशय अप्रतिम मांडण्यात आला आहे.
दोस्तीवर 'य' सिनेमे झाले आहेत. राजकीय/ सामाजिक भाष्य करणारे 'क्ष' सिनेमे झाले आहेत. पण व्यक्तिरेखांचे सामान्यत्व ग्राह्य धरून, ते टिकवून, संयतपणे नाजूक विषय कसा मांडावा, तर 'कायपो छे' सारखा. (माझ्या गुजराथी मित्राने सांगितलं की मूळ शब्द 'काय पो छे' असा नसून 'कायपो छे' असा आहे.) कुठेही अवास्तव रंजकता, उदात्तीकरण नाही. पांचटपणा, चावटपणा नाही, शिवराळपणा नाही. एका संवादात जेव्हा ओमी 'झाटभर' हा असभ्य शब्द वापरतो, तेव्हा त्याने शिवी दिल्याचं आपल्याला जरा वेळाने जाणवतं, इतकं ते ओघवतं आहे.

वाचवलेले-साठवलेले पैसे ईशान परस्पर भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी देतो, त्यानंतर क्वचितच बिथरणारा गोवी थयथयाट करतो तो प्रसंग आणि शेवटाकडची काही दृश्यं मनात घर करून राहातात. 'शेवट' इज सर्टनली नॉट फॉर वीक हार्ट्स. तो ताण सहन न होऊन माझ्या समोर ४-५ जण चित्रपटगृहातून शेवटाआधीच बाहेर निघून गेले !एकही अभिनेता/ अभिनेत्री परिचयाची नाही. पण पहिल्या काही मिनिटातच सगळी पात्रं आपलीशी वाटतात. त्यांच्याशी आपली नाळ जुळते. शितावरून भाताची परीक्षा होते, तसं पहिल्या काही मिनिटातच आपण जे काही पाहाणार आहोत, ते दर्जेदार असणार आहे, हे समजूनच येतं ! तिघा प्रमुख अभिनेत्यांपैकी कुणी सगळ्यात चांगलं काम केलंय, हे ठरवणं निव्वळ अशक्य ! तिघंही आपापली छाप सोडतात. मनाला स्पर्श करतात. चित्रपटाच्या पोस्टरवरूनही त्या तिघांच्या व्यक्तिरेखा समजून येतात, ह्यावरूनच त्यांचं सादरीकरण किती ताकदीचं आहे/ करवून घेतलं आहे, हे समजावं !

अमित त्रिवेदीचं संगीत कर्णमधूर आहे. पण त्याकडे विशेष लक्ष जात नाही, इतकी ताकद पडद्यावरील नाट्यात, व्यक्तिरेखांत व त्या साकारणाऱ्या कलाकारांत आहे. तरी, मन लावून अभ्यास करणाऱ्या मुलाला कुणी तरी टपली मारून छळावं, तसं चित्रपटात रमलेल्या प्रेक्षकाला, कहाणीत जागा असताना वाजणाऱ्या गाण्यानेही छळावं, असं संगीत देण्याची चढाओढ आजकाल दिसते, तसं तरी जाणवलं नाही. गुड जॉब डन !

चेतन भगत ह्यांच्या 'थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाइफ' ह्या पुस्तकावर आधारलेली ही कहाणी. पण मूळ कहाणीत काही मोक्याच्या ठिकाणी महत्वाचे बदल केले गेले आहेत. पटकथा अगदी बांधीव आहे. अजिबात फुटकळ गप्पांना स्थान नाही !

एकंदरीत, शोधूनही काही वावगं न सापडावं असा चित्रपट हिंदीत बनला आहे, हे मी सानंदाश्रू नयनाने म्हणत आहे ! आत्ताच्या आत्ता, ताबडतोब, मिळेल त्या शोचं तिकिट काढून बघावा असा हा 'कायपो छे' कुणीही चुकवू नये, असं मनापासून वाटतं.

हॅट्स ऑफ अभिषेक कपूर ! (होप युवर सिस्टर लर्न्स अ लेसन फ्रॉम यू !! 'कायपो छे !!' ;-) )

रेटिंग - * * * * * (इट कान्ट गेट बेटर दॅन धिस !)
 

Sunday, February 24, 2013

मनाचे सांगताना फक्त सुचती दोन ओळी.. (संकेत तरही)


'मायबोली'च्या 'संकेत तरही' उपक्रमात माझा सहभाग..

मला ना त्रास होतो स्वप्नही तू टाळण्याचा
मनाला क्लेश असतो रात्रभर मी जागल्याचा

समज आली तशी आई मला सोडून गेली
तरीही भास का होतो कुणी कुरवाळल्याचा ?

तिच्या मी बंगल्याला पाहतो चोरून थोडे
पुन्हा निर्धार करतो झोपडी शाकारण्याचा

कुणी विध्वंस केल्यावर किती संताप येतो
मला आनंद मी त्यातून सुखरुप वाचल्याचा !

मनाचे सांगताना फक्त सुचती दोन ओळी
'जितू' तो काळ सरला मुक्त कविता वाहण्याचा !

-------------------------------------------------------------

मला ना त्रास होतो भोवती अंधारल्याचा
मनाला क्लेष वाटे सावलीने टाळण्याचा

फुले ही पारिजाताची सुगंधाला उधळती
असावा शाप त्यांना पण लगेचच वाळण्याचा


….रसप….
२ फेब्रुवारी २०१३

Monday, February 18, 2013

श्वास उरलेला..


समजून मनाला घेत
दिलासा देत
सराव्या राती
शब्दांत जुनीशी ओल
जिला ना मोल
तरीही गाती

खिडकीत चंद्र हो दंग
शुभ्रसा रंग
दु:ख उजळावे
डोळ्यांतुन येई गाज
खोल आवाज
कुणी ऐकावे ?

हा रोज चालतो खेळ
सरे ना वेळ
हताशा वाटे
अज्ञात व्यथांचे पूर
वृथा हुरहूर
भोवती दाटे

हा भोग भोगणे भाग
कपाळी डाग
मीच लिहिलेला
मृत्यू न मिळे दानात
आर्त प्राणात
श्वास उरलेला..

....रसप....
१८ फेब्रुवारी २०१३

Saturday, February 16, 2013

हत्यासत्र


जपलेल्या दु:खाची ओल
तप्त वर्तमानाच्या झळांनी सुकते
आणि लोकांना मात्र
माझी कोरडी पापणीच दिसते

गळ्यात हुंदका दाटलेला असताना
शब्द फुटत नाही
काळजावरचे व्रण दाखवताना
कविता सुचत नाही

माझ्या खंबीर 'पुरुष'पणाने हत्या केलीय
अनेक नि:शब्द कविताभ्रूणांची
त्या रक्ताने माखली आहेत वस्त्रं
अनेक निर्ढावलेल्या क्षणांची

शब्दबद्ध वेदनेला मिळणारी दाद
ह्या अमानुष हत्यासत्राची शिक्षा असते
ऐकणाऱ्यांच्या 'वाह'पासून 'आह'पर्यंत
माझी पापणी पुन्हा पुन्हा भिजते, पुन्हा पुन्हा सुकते..
.......... पुन्हा पुन्हा भिजते, पुन्हा पुन्हा सुकते..

....रसप....
१६ फेब्रुवारी २०१३

Thursday, February 14, 2013

तुझाच मी !


माझा मीच न आता उरलो, तुझाच मी
तुझ्यात बघता मला, समजलो - तुझाच मी !

अनेक प्रेमाच्या शब्दांना तूच उधळले
मी तर केवळ वेचुन-वेचुन त्यांस जमवले
तू कविता मी कवी जाहलो, तुझाच मी
........... तुझ्यात बघता मला, समजलो - तुझाच मी !

जुन्या-जुन्या दु:खांनी होतो गलितगात्र मी
तू येण्याच्या आधी होतो शून्यमात्र मी
माझ्या नकळत तुला गवसलो, तुझाच मी
........... तुझ्यात बघता मला, समजलो - तुझाच मी !

इथून पुढचा प्रवास अपुला बराच आहे
तुझी साथ हा एक दिलासा खराच आहे
तुझ्या प्रकाशामधे उजळलो, तुझाच मी
........... तुझ्यात बघता मला, समजलो - तुझाच मी !

....रसप....
व्हॅलेन्टाईन्स डे, २०१३

Wednesday, February 13, 2013

शेर तुझ्यावर जेव्हा एकच सुचला होता..


शेर तुझ्यावर जेव्हा एकच सुचला होता
थवा आठवांचा डोळ्यातच दडला होता

रोज सकाळी जगास वाटे 'उजाडले की!'
लपलेला अंधार तेव्हढा दिसला होता

छान वाटले आरश्यास बोलून तुझ्याशी
तो माझ्याशी गप्पा मारुन थकला होता

मनात नसतानाही रडलो आज सकाळी
अर्घ्यासाठी सूर्य कधीचा अडला होता

कधीच माझे दु:ख कुणाला सांगत नाही
कारण पूर्वी ऐकुन जो-तो हसला होता

नकोस पाहू 'जितू' चेहरे हरलेले तू
हरलेलाही हरण्याआधी लढला होता


....रसप....
१३ फेब्रुवारी २०१३

Monday, February 11, 2013

नशीबाचं घर


बऱ्याच दिवसात भेट नव्हती झाली
तेव्हा मला नशीबाची आठवण आली

मित्र नाही, पण कधी शत्रूही मानलं नव्हतं त्याला
म्हणून म्हटलं, जरा विचारपूस करून यावं
थोडं त्याचं ऐकावं,
थोडं आपलं ऐकवावं !

वेळही होता जरासा, तडक नशीबाचं घर गाठलं
पण दारावर लटकलेलं भलंमोठं कुलूप दिसलं !
'हे कुलूप 'ओळखीचं' आहे', मला जाणवलं
काही दिवसांपूर्वी माझ्या घरालाही हेच कुलूप होतं की !!
एकदम आठवलं !

नशीबाच्या कुलुपाला मी कर्माच्या किल्लीने उघडलं होतं
आणि तेव्हापासून किल्लीला जिवापाड जपलं होतं
किल्ली खिश्यातच होती, लगेच कुलूप उघडलं
आणि उंबऱ्याच्या आत मी पाउल टाकलं.

एकाच खोलीचं घर होतं, अगदी छोटंसं
सारं सामान व्यवस्थित लावलेलं, अगदी नेटकं

समोरच्या भिंतीवर आई-बाबांच्या फोटोला
घातला होता हार
बाजूच्याच फोटोत होता
गावाकडचा पिंपळपार
टेबलावर होत्या, फुटक्या काचा
एकावर एक रचलेल्या
शोकेसमध्ये काही कळ्या
फुलण्याआधीच सुकलेल्या
एक बाटली अर्धी रिकामी, एक पेला उपडा
दुसऱ्या एका बाटलीमध्ये, एक चंद्रतुकडा

खुंटीवर लटकत होता एकच कोट..
आतून रात्र-काळा
बाहेरून पिवळसर ढवळा
कोटाच्या खिश्यांत गच्च भरले होते
क्षण चमचमणारे
मला हुलकावणी देऊन गेलेले
पण अजूनही आठवणारे
खोलीत नव्हती एकही खुर्ची आणि नव्हता पलंग
फक्त दरवळत होता सुखाचा मोहक सुगंध

मला कळेना असं काय झालं ?
की सावलीसारखा पिच्छा पुरवणारं नशीब पळून गेलं !
तितक्यात कोपऱ्यातल्या आरश्याखाली
एक चिठ्ठी दिसली
लगबगीने घडी उघडून
मी वाचायला घेतली
एकच वाक्य लिहिलं होतं...
"कर्माची किल्ली मिळते तेव्हा नशीबाची काठी लागत नाही"
.
.
.
.
चिठ्ठी ठेवली... कुलूप लावलं..
आताशा मी त्या खोलीचं कुलूप परत उघडत नाही.

....रसप....
११ फेब्रुवारी २०१३

Friday, February 08, 2013

नक्कीच 'स्पेशल' - स्पेशल छब्बीस - (Movie Review - Special 26)


Truth is stranger than fiction, but it is because Fiction is obliged to stick to possibilities; Truth isn't.
- Mark Twain

अश्या खरोखर अनेक गोष्टी असतील, ज्या आपल्याला माहित तर नाहीतच, पण आपण 'असं काही असू शकेल' असाही विचार केलेला नसेल. जसं पाण्याच्या वर दिसणारं हिमनगाचं टोक, छोटंच असलं, तरी ते पाण्याखाली किती असेल, हे आपल्याला कळत नाही, तसंच सत्याचं दर्शनी रूप असावं. 'अ वेनस्डे' मध्ये 'नीरज पांडे' नी अशीच एक कथा मांडली होती, जिच्या सत्यतेचा पुरावा कुठेच नाही. ती कहाणी, कल्पनाविष्कार असेल पण, तसे खरोखरही कशावरून घडले नसेल ? त्याचप्रमाणे 'स्पेशल छब्बीस' मधूनही पांडे अशीच एक कथा मांडतात, जी कदाचित खरीही असू शकते. किंबहुना, चित्रपटाच्या सुरुवातीस 'Base on true incidents' असे दाखविलेही जाते. पण, असे नुसते सांगणे, श्रेय नामावलीच्या वेळेस वृत्तपत्रांतील बातम्या दाखवणे ई. दिखाव्यांतून कुठलीही कहाणी 'खरी' वाटत नसते, ते प्रेक्षकापर्यंत 'पोहोचवायला' लागते. ती पोहोचली तर, अतर्क्यसुद्धा खरे वाटते आणि नाही पोहोचवता आल्यास एखादी साधी सरळ प्रेमकहाणीही भंकस वाटते. पांडे 'स्पेशल छब्बीस'ची कहाणी 'पोहोचवतात', ती खरी वाटते आणि इथेच चित्रपट यशस्वी ठरतो.

चित्रपटाच्या जाहिरातींतून, त्याची कहाणी बहुतांशी कळलेलीच आहे. म्हणजे, मला तरी ती आधी माहीतच होती, पण औपचारिकता म्हणून थोडासा आढावा..

१९८७ चा काळ. अजय (अक्षय कुमार), शर्माजी (अनुपम खेर), इक़्बाल (किशोर कदम) आणि जोगिंदर (राजेश शर्मा) ही चौकडी नकली सी.बी. आय./ इन्कम टॅक्स ऑफिसर्स बनून, नकली धाडी घालून लोकांना लुटत असते. ह्यांचे टार्गेट्स असतात राजकीय नेते, मोठे उद्योजक, दलाल आणि इतर काळा पैसावाले. अश्या अनेक जणांचा काळा पैसा लुटूनही त्यांच्या विरोधात पोलिसात एकही तक्रार नसते कारण लुटलेला पैसा बेकायदेशीर असतो आणि ह्याचाच फायदा घेऊन ही टोळी देशातील अनेक लहान-मोठ्या शहरांत आपली कांडं करत असते. दिल्लीतील एका राजकीय नेत्याच्या घरावरील धाडीत हे चौघे जण इन्स्पेक्टर रणवीर सिंग (जिमी शेरगिल) व त्याची सहकारी शांती (दिव्या दत्ता) ह्यांना समाविष्ट करतात, अर्थातच 'सी.बी.आय. ची रेड आहे, तुमची मदत हवी आहे' अशी खोटी बतावणी करून. आपण आपले कर्तव्य बजावत आहोत, ह्या गैरसमजात राहून रणवीर सिंग त्यांना मदत करतो आणि सर्व माल लुटून, ते त्याच्या डोळ्यांदेखत पसारही होतात. ह्यानंतर मात्र खरी सी. बी. आय. ह्या प्रकरणाची दखल घेते आणि वसीम खान (मनोज वाजपेयी) रणवीर सिंगच्या मदतीने छाननीस सुरुवात करतो. ह्यानंतर काय आणि कसं होतं त्यासाठी चित्रपटच पाहायला हवा. तेव्हाच 'स्पेशल छब्बीस' म्हणजे काय हेही समजून येईल.

अमुक कहाणी अमुक काळातच का घडावी, असे प्रश्न मुद्दाम विशिष्ट कालखंड दाखवल्यावर पडतातच. ही कहाणी ८० च्या दशकात का घडावी ? कारण सरळ आहे. आजच्या, 'मोबाईल' जमान्यात, इतक्या राजरोसपणे टोप्या घालणं पटलंच नसतं. तसेच, लुटलेला पैसा काळा होता हे उघड होईल म्हणून आजचे धनदांडगे मूग गिळून गप्प बसणे शक्य वाटत नाही. करोडोंचे घोटाळे उघड करूनही उजळ माथ्याने फिरण्याचे धार्ष्ट्य असलेल्या निर्ढावलेल्या लोकांचा व त्यांना फिरू देणाऱ्या व्यवस्थेचा हा काळ आहे. म्हणून ८० चे दशक योजले असावे.'नीरज पांडे' हे नाव वाचल्यावर 'अ वेनस्डे' आठवणारच आणि त्याच्या प्रत्येक चित्रपटाची वेनस्डेशी तुलना होणारच. तशी इथेही होईलच. वेनस्डे खूप जलद चित्रपट होता. स्पेशल छब्बीस तसा नाही. अर्थात, दोन्हीच्या कहाणीत फरक असल्याने अशीच गती अपेक्षितही होती. पण तरी, काही भाग अनावश्यक वाटले. अजयची प्रेमिका 'प्रिया' (काजल अगरवाल) हे पात्र कहाणीस काहीही हातभार लावत नाही. पण काजल अगरवालच्या चेहऱ्यात तजेला व गोडवा असल्याने आणि ती संयतपणे वावरल्याने तिचा त्रास अजिबातच होत नाही. एम. एम. करीम कडून अजून मधुर संगीत आपण ऐकलेलं असल्याने, जरा निराशाच पदरी येते. हिमेश रेशमियाचं गीत हा ह्या चित्रपटातील एकमेव अत्याचार आहे, पण तोही 'एकमेव'च असल्याने आपण तितपत सूट देऊ शकतोच ! (Having said this, 'धर पकड' ही गाणं छान आहे, पण ते सिनेमा संपल्यावर आहे.)

स्टार कास्ट उत्तम आहे. प्रत्येक भूमिकेसाठी केलेली निवड एकदम चपखल वाटते. अक्षय कुमार चौकडीचा मास्टर माइण्ड शोभतो आणि निडर, धूर्त 'अजय' तो व्यवस्थित साकारतो. शर्माजीच्या भूमिकेत अनुपम खेर फिट्ट. प्रत्येक मोहीम संपल्यानंतरचा घाबराघुबरा शर्मा 'खोसला'ची आठवण करून देतो. एकदम परफेक्ट. राजेश शर्मा आणि दिव्या दत्ता ह्यांना मर्यादित वाव आहे पण तेही आपापल्या भूमिकेस न्याय देतात. किशोर कदमला अश्या महत्वाच्या भूमिकेत पाहून माझा मराठी उर अभिमानाने फुलला. त्याला अजून 'मोठ्या' भूमिका मिळतील, अशी आशा वाटते. जिमी शेरगिल मला नेहमीच एक 'अंडर रेटेड' अभिनेता वाटला आहे. त्याच्यातला अभिनेता फक्त सपोर्टिंग रोलकरण्यापेक्षा जास्त ताकदीचा आहे, हे त्याचा प्रत्येक सपोर्टिंग रोल बघितल्यावर जाणवतं, इथेही जाणवलं. मनोज वाजपेयी परत एकदा त्याची 'उंची' दाखवून देतो. एक उत्कृष्ट कलाकार, मेहनतीच्या व त्याच्या गुणांच्या जोरावर तरू शकतो, त्यासाठी चिकना चेहरा, दणकट देहयष्टी आवश्यक नसते. हे त्याचा, सडपातळ सी.बी.आय. ऑफिसर जाणवून देतो.

चित्रपटात, कच्चा दुवा विशेष जाणवत नाही. वर लिहिल्याप्रमाणे काही अनावश्यक भाग, पात्रं आणि संगीत नको होतं, पण सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय, चांगली पटकथा व सूचक दिग्दर्शन ह्या कच्च्या दुव्यास झाकतं.

जरासे(च) प्रेडिक्टेबल कथानक असले तरीही, 'स्पेशल छब्बीस' नक्कीच 'स्पेशल' आहे आणि त्यामुळे त्यासाठी स्पेशली वेळ काढावा व पैसा खर्च करावा. दोन्हीही वसूल होईलच, माझे तरी झाले !

रेटिंग - ४.०

Thursday, February 07, 2013

उधार सारे फिटेल नक्की..


उधार सारे फिटेल नक्की
तुझे तुलाही मिळेल नक्की

नसेल प्राजक्त अंगणी पण
जुनी जखम दरवळेल नक्की

म्हणे निसर्गच हसून छद्मी -
'फुलास काटा छळेल नक्की!!'

भकास झाली जमीन आता
नभास पान्हा फुटेल नक्की

अजूनही वाटते मला की
दुरूनही ती बघेल नक्की

जिथे जिथे तू, तिथे तिथे मी
कधी तरी जाणवेल नक्की

'जितू', मंदिरी कशास जाऊ ?
मिळेल तितके पुरेल नक्की !

....रसप....
७ फेब्रुवारी २०१३

Monday, February 04, 2013

हातावरील रेषा जावे बघून मागे..


हातावरील रेषा जावे बघून मागे
वेचून राहिलेले यावे फिरून मागे

अर्धा तुझा भरावा पेला म्हणून आलो
पाहून धुंद तुजला फिरलो तिथून मागे

दु:खांस अडविण्याला मी लावली कवाडे
फिरली सुखेच सारी दारावरून मागे

आता तुला न माझी येईल आठवणही
मीही कशास आता पाहू वळून मागे ?

माझी मलाच 'जीतू' सोबत न राहिली रे !
माझीच सावली बघ.. हसते बघून मागे

....रसप....
३ फेब्रुवारी २०१३

Sunday, February 03, 2013

वळणा-वळणावरचा 'डेव्हिड' (Movie Review - David)


किशोरदाचं यॉडलिंग... पंचमदाचं संयोजन... गुलजार साहेबांच्या काव्यातील जगावेगळी प्रतीकं.. नाना पाटेकरांची विशिष्ट आक्रस्ताळी संवादफेक.. अश्या अनेक गोष्टी आहेत, ज्या मला जाम आवडतात.. मलाच नव्हे, अनेकांना आवडतात. का ? किशोर/ पंचम/ गुलजार/ नाना ह्यांपेक्षा मोठे किंवा त्या तोडीचे दुसरे कुणीच नाहीत/ नव्हते ? होते की आणि आहेतही ! तरी हेच आवडतात कारण - 'वेगळेपण'. आणि ते सादर करण्याची हिंमत, आत्मविश्वास.
तेव्हढी नाही, पण त्याच पठडीतली हिंमतवान, आत्मविश्वासू प्रयोगशीलता जेव्हा कुणी एखाद वेळेसही दाखवतं, तेव्हा तेही आवडून जातं. बिजॉय नांबियार तेच दाखवतो... 'डेव्हिड' मधून. 'समथिंग डिफरंट'.

'डेव्हिड' ही एक कहाणी नाही. 'डेव्हिड' हे एक पात्र नाही. ह्या तीन कहाण्या आहेत, तीन पात्रांच्या, तीन वेगवेगळ्या ठिकाणी आणि तीन वेगवेगळ्या कालखंडात घडणाऱ्या.
एक -
१९७५, लंडन.
इथे एक 'घनी' नामक माफिया असतो. त्याच्या दहशतवादी कारवायांची भारी किंमत चुकवलेले भारत सरकार, तीन जणांना त्याचा खातमा करण्यासाठी लंडनला पाठवते. हे तिघे भारतीय गुप्तचर/ सुरक्षा खात्याचे लोक, घनीची माहिती काढतात. त्याच्या भोवताली, अत्यंत विश्वासू लोकांचे अभेद्य कवच असल्याचे त्यांना समजून येते. ह्या विश्वासू लोकांपैकी एक, घनीचा 'उजवा हात' म्हणजे 'डेव्हिड' (नील नितीन मुकेश).
घनीला मारायचे असेल, तर आधी 'डेव्हिड'ला मारले पाहिजे. पण ह्या कथेचा हाच एक कोन नाही. घनीच्या घरीच राहाणारा, त्याच्या मुलासारखाच असणारा 'डेव्हिड' नक्की कोण आहे? ह्याबाबत संभ्रम आहे. ही कथा, घनीच्या खऱ्या, व्यसनाधीन चरसी मुलाचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी जेव्हा डेव्हिड-नूरची जोडी तोडून, जबरदस्तीने नूरशी त्याचे लग्न लावले जाते... तेव्हा एक वेगळे वळण घेते, पण त्या वळणाच्याही पुढे अजून वळणं घेऊन संपते.

दोन -
१९९९, मुंबई.
बांद्र्याच्या एका निम्न मध्यमवर्गीय वस्तीत राहाणारा फादर नोएल. त्याची तीन मुलं. दोन मुली आणि एक मुलगा - 'डेव्हिड' (विनय विरमानी).
हा डेव्हिड एक गिटारवादक आहे. घरोघरी जाऊन गिटार शिकवणारा.. संगीतकारांचे उंबरठे झिजवणारा एक 'स्ट्रगलर'. फादर नोएल, लोकांना श्रद्धेची शिकवण देणारा एक सच्च्या दिलाचा धार्मिक माणूस. त्याच्या ह्या शिकवणीमुळे, कर्मठ धर्मांधांच्या रोषाला तो नकळत ओढवून घेतो. आपल्या संगीतक्षेत्रातील भवितव्याच्या 'गोल्डन ब्रेक'च्या उंबरठ्यावर डेव्हिड असताना एक प्रचंड मोठी उलथापालथ होते आणि एकमेकांशी क्षणभरही न पटणाऱ्या बाप-मुलाचं नातंच बदलून जातं. डेव्हिडच्या आयुष्याला एक कधी मनातही न आलेलं वळण मिळतं आणि तो अखेरीस अश्या एका जागी पोहोचतो, जिचा विचार त्यानेच काय, ही कहाणी पाहाणाऱ्यानेही केलेला नसतो !

तीन -
२०१०, गोवा.
इतर दोन कहाण्या खूप गंभीर.. आणि ही कहाणी, खूपच हलकी-फुलकी !
इथला डेव्हिड (विक्रम) एक दारूचं पिंप आहे. आपल्या आईसोबत राहाणारा डेव्हिड, लग्नाचं वय सरून गेलेला, अख्ख्या गावात नालायक, पनौती म्हणून कुप्रसिद्ध असतो. त्याला तीन मित्र - 'पीटर' (निशान नानैया), फ्रेनी (तब्बू) आणि त्याच्या वडिलांचं (सौरभ शुक्ला) भूत ! मुलाच्या लग्नासाठी आईने अनेक उंबरठे झिजवले असतात, पण काही केल्या ते जुळत नसतं. पूर्वी जेव्हा एकदा लग्न ठरलेलं असतं, तेव्हा डेव्हिडची होणारी बायको तिच्या बॉयफ्रेंडसोबत आयत्या वेळी पळून गेलेली असते. अश्या सगळ्या पार्श्वभूमीवर गावात 'रोमा' (ईशा शेरवानी) ही एक मूक-बधिर मुलगी येते. तिची आणि डेव्हिडची ओळखच मुळी पीटरची गर्लफ्रेंड, जिच्याशी तो लग्न करणार असतो, अशी होते. पण तरीही डेव्हिड फॉल्स इन लव्ह ! एकीकडे त्याला असं वाटत असतं की रोमाही त्याच्यावर प्रेम करते... दुसरीकडे त्याची 'बेस्ट फ्रेंड' फ्रेनी, त्याला 'भीड बिनधास्त' म्हणून रोमाशी बोलायला भाग पाडत असते आणि... दुसरीकडे बापाचं भूत त्याला त्यापासून रोखत असतं.. शेवटी पीटर-रोमाच्या लग्नात BEST MAN बनलेला डेव्हिड एक निर्णय घेतो. निर्णय घेतो खरा, पण आयत्या वेळी तोही एक वेगळंच वळण घेतो.

अश्या ह्या तीन स्वतंत्र कथा, एकाच वेळी आलटून पालटून पडद्यावर दाखवल्या जात असतात आणि तरीही त्यात आपला कुठलाही गोंधळ होत नाही. कहाणी बदलल्यानंतर, पहिल्याच फ्रेममध्ये आपण लंडनला आहोत, मुंबईला आहोत की गोव्याला हे लगेच समजून येतं. त्यासाठी दिग्दर्शकाने सगळ्यात सोप्प्या पद्धतीचा वापर केला आहे. लंडनची कहाणी कृष्ण-धवल, मुंबईतली कहाणी रंगीत आणि गोव्यातली जरा पिवळसर छटेत दाखवली आहे. तीन कहाण्यांमधल्या पात्रांच्या वेशभूषा, केशभूषाही लगेच फरक स्पष्ट करतात आणि प्रत्येक वेळेस, कहाणी बदलल्यानंतरच्या पहिल्याच फ्रेममध्ये दिग्दर्शक 'सीनारीओ' स्पष्ट करण्याचे व्यवधान पाळतोच.
तसेच, विनाकारण त्या काळचं लंडन... त्या काळातली मुंबई वगैरे दाखवण्यावर वेळ व पैसा खर्च केलेला नाही. नाही तर त्याच त्या 'एरिअल दृश्यांनी' कंटाळा आला असता.तिन्ही 'डेव्हिडां'नी आपापल्या भूमिकेस न्याय दिला आहे.
नील नितीन मुकेश खूप ग्रेट अभिनेता नाहीच. पण तो त्याचा वावर सहज असतो आणि त्याचा परफॉर्मन्स अवार्ड विनिंग नसला तरी हार्ट विनिंग असतो, असं माझं एक वैयक्तिक मत.
विनय विरमानी खूप टवटवीत चेहरा वाटतो. आतल्या आत घुसमटणारा तरुण त्याने चांगलाच साकारला आहे.
गोव्यातला 'विक्रम' भाव खाऊन जातो. भावनिक, विनोदी आणि हाणामारीच्या दृश्यातही तो अति अभिनय करत नाही. त्याचा संयतपणा लक्षात राहाण्याजोगा.
इतर भूमिकांमध्ये, धार्मिक भावनांना भडकावणारी 'मालती ताई' म्हणून 'रोहिणी हत्तंगडी, पिअक्कड डेव्हिडच्या पिअक्कड बापाच्या भूताच्या भूमिकेतील सौरभ शुक्ला आणि फादर नोएलच्या भूमिकेतील 'नासेर' चोख काम करतात. तब्बूही व्यवस्थित.
डेव्हिडच्या वडिलांच्या भूताने वेगवेगळ्या लोकांच्या अंगात शिरणे अतिशय गंमतशीर आहे... प्रत्येक वेळी हमखास हशा पिकतो.
फादर नोएल दाढी करतानाचे दृश्य अंगावर काटा आणते..

ह्या तिन्ही कहाण्या अखेरीस एका धाग्याने एकमेकांशी जोडल्या जातात. ते आवश्यकही होतं, अन्यथा त्यांना एकत्र दाखवण्यात काही अर्थ नसता. पण तीन-तीन कहाण्या असूनही सिनेमाची लांबी (साधारण अडीच तास) जरा कमी करणे शक्य होते, असंही वाटलं. संगीत विशेष परिणामकारक नाही, पण अत्याचारीही नाही.. (सध्याचा ट्रेण्ड पाहाता, हेही नसे थोडके!)
'विश्वरूपम' पाहावा की 'डेव्हिड' ? ह्या द्विधेत असताना माझ्या विचारांनी एक वेगळंच वळण घेतलं आणि मी 'डेव्हिड' निवडला and I think, it was a smart choice !
 
रेटिंग - ३.५

Saturday, February 02, 2013

छोटीशीच गोष्ट, बडबड जास्त ! - 'प्रेमाची गोष्ट' !! (Movie Review - Premachi Gosht)


नळातून पडणारं थेंब थेंब पाणी.. त्या थेंबा-थेंबाचा आवाज.. 'ट्रिप्.. टप्..' मला तर फार आवडतो. एक वेगळाच गोडवा जाणवतो त्या आवाजात. पण किती वेळ ? १५-२० मिनिटं.. अर्धा तास.. नंतर मात्र तोच आवाज त्रास द्यायला लागतो. कंटाळा येतो.. च्यायला ! बादली पण भरत नाही, आवाज पण थांबत नाही ! किंवा... एखाद्या अत्यंत गोड बोलणाऱ्या व्यक्तीचं घ्या. सुरुवातीस त्याचं ते मधाळ बोलणं खूप छान वाटतं.. मग मात्र त्या 'गोडबोले'गिरीचा कंटाळा येतो, जरासा रागही.. येतो ना ? तो खोटेपणाही वाटायला लागतो.. हो ना ?

'प्रेमाची गोष्ट' मधली पात्रंही अशीच 'थेंबुडी गोग्गोssड' आहेत. ही पात्रं शेजारच्यांच्या सुनेच्या भावाच्या मुलाला गणितात अपेक्षेपेक्षा २ गुण कमी मिळाले, ह्या कारणासाठीही चिंताक्रांत होतील, इतकी हळवी आहेत. सिनेमाची कहाणी स्वत: दिग्दर्शकाने/ पटकथाकारानेच एकाच दृश्यात सांगितली आहे. कसं असतं... 'A' चं 'C' वर प्रेम असतं.. 'C' मात्र 'A' ला सोडून जातेय. 'B' चं 'A' वर प्रेम आहे.  पण 'A' ला ते कळत नाहीये.. आणि हे सगळं अजिबातच माहित नसलेला 'D', 'B' च्या मागे आहे. सर्वसुखकारक शेवट होण्यासाठी कोणाला कोण मिळणार, कोणाला कोण नाही मिळणार आणि कोणाला काहीच नाही मिळणार हे सगळं काही तत्क्षणी समजतं. ह्यातले A, B, C आणि D म्हणजे -
A = राम (अतुल कुलकर्णी)
B = रागिणी (सुलेखा तळवलकर
C = सोनल (सागारिका घाटगे)
D = समीत (अजय पूरकर)
आणि सोबत 'चवीपुरतं मीठ' म्हणून स्वराज (सतीश राजवाडे) - रामचा लंगोटीयार म्हणून.

किंचित सविस्तर -

'राम' हा एक चित्रपटकथा-पटकथा-संवाद लेखक. रागिणी' एक उदयोन्मुख अभिनेत्री, लग्नाच्या दोन वर्षांनंतर विभक्त होतात. तसंच, सोनल आणि समीतही अयशस्वी लग्नानंतर वेगळे होतात. 'राम' नावाप्रमाणेच मर्यादा पुरुषोत्तम, सरळमार्गी, समजूतदार वगैरे. त्याची खूप इच्छा असते की तुटणाऱ्या नात्याला अजून एक संधी द्यावी, पण रागिणी मात्र ठाम असते. तसंच, समीतचीही इच्छा असते की सोनलशी सगळं पूर्ववत व्हावं, पण सोनल कंटाळलेली असते. घर सोडून बाहेर पडलेल्या सोनलला 'राम' स्वत:कडे त्याची लेखन सहाय्यक म्हणून नोकरी देतो आणि rest is something OBVIOUS!सपक संवाद आणि कमजोर पटकथा असल्याने चित्रपट विशेष पकड घेतच नाही. त्यात सागारिका घाटगे तर सहनशक्तीचा अंत पाहते. तिच्या मराठीला 'दिव्य' म्हटलं तर एखादं वृत्तपत्र माझ्यावर अब्रूनुकसानीचा डावा ठोकेल. पण ह्या मेमसाहेब चित्रपटभर पडलेली जिवणी आणि ओढलेला चेहरा घेऊन 'न'चा 'ण', 'ण'चा 'न', 'श'चा 'स', 'स'चा श', 'द'चा 'ध', 'ध'चा द', 'म्ह'चा 'म', 'म'चा 'म्ह' करून अत्याचार करतात आणि राग येतो सतीश राजवाडेचा. त्याला तरी कळायला हवं होतं ना? की हिला सरळ दुसऱ्या कुणाचा आवाज तरी देऊन टाकावा. पण त्यापेक्षा सतीशभाऊंवर चित्रपटाच्या रटाळ गतीसाठी चिडायला हवं. अतुल कुलकर्णी स्वत:च्या नावाला जागून, जीव तोडून काम करतो, म्हणून ठीक. जर त्याच्याजागी दुसरा कुणी असता तर ही गोष्ट संपायच्या आधीच, शंभर जणांच्या चित्रपटगृहात बसलेले मोजून १८ जण माझ्यासह उठून बाहेर पडले असते नक्कीच.

संगीत श्रवणीय आहे. खासकरून 'कधी तू..' चा दुसरा भाग 'ओल्या सांजवेळी..'
खरं सांगायचं तर कुणालाच काही विशेष छाप सोडण्याएव्हढा वावच नाहीये, तरी सुलेखा तळवलकर सहज वावरते. सतीश राजवाडे आणि रोहिणी हट्टंगडी अप टू द मार्क.

थोडक्यात, एक प्रचंड लांबवलेली आणि उगाचच (कन्या राशीचे असल्यासारखं) घोळ घालत राहून सांगितलेली अगदीच छोटीशी गोष्ट, म्हणजे 'प्रेमाची गोष्ट' अशी एक व्याख्या मी माझ्यापुरती मांडतो.

रेटिंग - २
Related Posts Plugin for WordPress, Blogger...