Monday, February 11, 2013

नशीबाचं घर


बऱ्याच दिवसात भेट नव्हती झाली
तेव्हा मला नशीबाची आठवण आली

मित्र नाही, पण कधी शत्रूही मानलं नव्हतं त्याला
म्हणून म्हटलं, जरा विचारपूस करून यावं
थोडं त्याचं ऐकावं,
थोडं आपलं ऐकवावं !

वेळही होता जरासा, तडक नशीबाचं घर गाठलं
पण दारावर लटकलेलं भलंमोठं कुलूप दिसलं !
'हे कुलूप 'ओळखीचं' आहे', मला जाणवलं
काही दिवसांपूर्वी माझ्या घरालाही हेच कुलूप होतं की !!
एकदम आठवलं !

नशीबाच्या कुलुपाला मी कर्माच्या किल्लीने उघडलं होतं
आणि तेव्हापासून किल्लीला जिवापाड जपलं होतं
किल्ली खिश्यातच होती, लगेच कुलूप उघडलं
आणि उंबऱ्याच्या आत मी पाउल टाकलं.

एकाच खोलीचं घर होतं, अगदी छोटंसं
सारं सामान व्यवस्थित लावलेलं, अगदी नेटकं

समोरच्या भिंतीवर आई-बाबांच्या फोटोला
घातला होता हार
बाजूच्याच फोटोत होता
गावाकडचा पिंपळपार
टेबलावर होत्या, फुटक्या काचा
एकावर एक रचलेल्या
शोकेसमध्ये काही कळ्या
फुलण्याआधीच सुकलेल्या
एक बाटली अर्धी रिकामी, एक पेला उपडा
दुसऱ्या एका बाटलीमध्ये, एक चंद्रतुकडा

खुंटीवर लटकत होता एकच कोट..
आतून रात्र-काळा
बाहेरून पिवळसर ढवळा
कोटाच्या खिश्यांत गच्च भरले होते
क्षण चमचमणारे
मला हुलकावणी देऊन गेलेले
पण अजूनही आठवणारे
खोलीत नव्हती एकही खुर्ची आणि नव्हता पलंग
फक्त दरवळत होता सुखाचा मोहक सुगंध

मला कळेना असं काय झालं ?
की सावलीसारखा पिच्छा पुरवणारं नशीब पळून गेलं !
तितक्यात कोपऱ्यातल्या आरश्याखाली
एक चिठ्ठी दिसली
लगबगीने घडी उघडून
मी वाचायला घेतली
एकच वाक्य लिहिलं होतं...
"कर्माची किल्ली मिळते तेव्हा नशीबाची काठी लागत नाही"
.
.
.
.
चिठ्ठी ठेवली... कुलूप लावलं..
आताशा मी त्या खोलीचं कुलूप परत उघडत नाही.

....रसप....
११ फेब्रुवारी २०१३

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...