Saturday, February 02, 2013

छोटीशीच गोष्ट, बडबड जास्त ! - 'प्रेमाची गोष्ट' !! (Movie Review - Premachi Gosht)


नळातून पडणारं थेंब थेंब पाणी.. त्या थेंबा-थेंबाचा आवाज.. 'ट्रिप्.. टप्..' मला तर फार आवडतो. एक वेगळाच गोडवा जाणवतो त्या आवाजात. पण किती वेळ ? १५-२० मिनिटं.. अर्धा तास.. नंतर मात्र तोच आवाज त्रास द्यायला लागतो. कंटाळा येतो.. च्यायला ! बादली पण भरत नाही, आवाज पण थांबत नाही ! किंवा... एखाद्या अत्यंत गोड बोलणाऱ्या व्यक्तीचं घ्या. सुरुवातीस त्याचं ते मधाळ बोलणं खूप छान वाटतं.. मग मात्र त्या 'गोडबोले'गिरीचा कंटाळा येतो, जरासा रागही.. येतो ना ? तो खोटेपणाही वाटायला लागतो.. हो ना ?

'प्रेमाची गोष्ट' मधली पात्रंही अशीच 'थेंबुडी गोग्गोssड' आहेत. ही पात्रं शेजारच्यांच्या सुनेच्या भावाच्या मुलाला गणितात अपेक्षेपेक्षा २ गुण कमी मिळाले, ह्या कारणासाठीही चिंताक्रांत होतील, इतकी हळवी आहेत. सिनेमाची कहाणी स्वत: दिग्दर्शकाने/ पटकथाकारानेच एकाच दृश्यात सांगितली आहे. कसं असतं... 'A' चं 'C' वर प्रेम असतं.. 'C' मात्र 'A' ला सोडून जातेय. 'B' चं 'A' वर प्रेम आहे.  पण 'A' ला ते कळत नाहीये.. आणि हे सगळं अजिबातच माहित नसलेला 'D', 'B' च्या मागे आहे. सर्वसुखकारक शेवट होण्यासाठी कोणाला कोण मिळणार, कोणाला कोण नाही मिळणार आणि कोणाला काहीच नाही मिळणार हे सगळं काही तत्क्षणी समजतं. ह्यातले A, B, C आणि D म्हणजे -
A = राम (अतुल कुलकर्णी)
B = रागिणी (सुलेखा तळवलकर
C = सोनल (सागारिका घाटगे)
D = समीत (अजय पूरकर)
आणि सोबत 'चवीपुरतं मीठ' म्हणून स्वराज (सतीश राजवाडे) - रामचा लंगोटीयार म्हणून.

किंचित सविस्तर -

'राम' हा एक चित्रपटकथा-पटकथा-संवाद लेखक. रागिणी' एक उदयोन्मुख अभिनेत्री, लग्नाच्या दोन वर्षांनंतर विभक्त होतात. तसंच, सोनल आणि समीतही अयशस्वी लग्नानंतर वेगळे होतात. 'राम' नावाप्रमाणेच मर्यादा पुरुषोत्तम, सरळमार्गी, समजूतदार वगैरे. त्याची खूप इच्छा असते की तुटणाऱ्या नात्याला अजून एक संधी द्यावी, पण रागिणी मात्र ठाम असते. तसंच, समीतचीही इच्छा असते की सोनलशी सगळं पूर्ववत व्हावं, पण सोनल कंटाळलेली असते. घर सोडून बाहेर पडलेल्या सोनलला 'राम' स्वत:कडे त्याची लेखन सहाय्यक म्हणून नोकरी देतो आणि rest is something OBVIOUS!सपक संवाद आणि कमजोर पटकथा असल्याने चित्रपट विशेष पकड घेतच नाही. त्यात सागारिका घाटगे तर सहनशक्तीचा अंत पाहते. तिच्या मराठीला 'दिव्य' म्हटलं तर एखादं वृत्तपत्र माझ्यावर अब्रूनुकसानीचा डावा ठोकेल. पण ह्या मेमसाहेब चित्रपटभर पडलेली जिवणी आणि ओढलेला चेहरा घेऊन 'न'चा 'ण', 'ण'चा 'न', 'श'चा 'स', 'स'चा श', 'द'चा 'ध', 'ध'चा द', 'म्ह'चा 'म', 'म'चा 'म्ह' करून अत्याचार करतात आणि राग येतो सतीश राजवाडेचा. त्याला तरी कळायला हवं होतं ना? की हिला सरळ दुसऱ्या कुणाचा आवाज तरी देऊन टाकावा. पण त्यापेक्षा सतीशभाऊंवर चित्रपटाच्या रटाळ गतीसाठी चिडायला हवं. अतुल कुलकर्णी स्वत:च्या नावाला जागून, जीव तोडून काम करतो, म्हणून ठीक. जर त्याच्याजागी दुसरा कुणी असता तर ही गोष्ट संपायच्या आधीच, शंभर जणांच्या चित्रपटगृहात बसलेले मोजून १८ जण माझ्यासह उठून बाहेर पडले असते नक्कीच.

संगीत श्रवणीय आहे. खासकरून 'कधी तू..' चा दुसरा भाग 'ओल्या सांजवेळी..'
खरं सांगायचं तर कुणालाच काही विशेष छाप सोडण्याएव्हढा वावच नाहीये, तरी सुलेखा तळवलकर सहज वावरते. सतीश राजवाडे आणि रोहिणी हट्टंगडी अप टू द मार्क.

थोडक्यात, एक प्रचंड लांबवलेली आणि उगाचच (कन्या राशीचे असल्यासारखं) घोळ घालत राहून सांगितलेली अगदीच छोटीशी गोष्ट, म्हणजे 'प्रेमाची गोष्ट' अशी एक व्याख्या मी माझ्यापुरती मांडतो.

रेटिंग - २

3 comments:

 1. तिच्या मराठीला 'दिव्य' म्हटलं तर एखादं वृत्तपत्र माझ्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकेल................:))))) मस्तच परीक्षण...

  ReplyDelete
 2. अमान्य ! रसप ...
  एका विशिष्ठ दृष्टीकोनातून हा चित्रपट तू पाहिलास असं वाटतंय मित्रा !
  समीक्षण अथवा परीक्षण फक्त काही सुट्टे दुवे शोधून काढण्यासाठीच आहेत असं नाहीये यार !
  तू मांडलेले कच्चे धागे नाहीयेत असं मी नाही म्हणणार पण आज इतर आणि मराठी या सगळ्या भाषातून आपण जेव्हा चित्रपट पाहतो तेव्हा आपण आरडओरड करतो की बासुदा आणि हृषीदा सापडत नाहीत ...
  पण त्याच धर्तीवर " प्रेमाची गोष्ट " आली की आपण त्याला हाणून पाडतो .. हे कितपत योग्य ?
  एक कथा जिचा शेवट सुरुवातीपासून आपल्याला ठाऊक आहे आणि तरी आपण ते २ तास खुर्ची नाही सोडत हेच या चित्रपटाचे गमक आहे !

  ReplyDelete
 3. अमान्य ! रसप ...
  एका विशिष्ठ दृष्टीकोनातून हा चित्रपट तू पाहिलास असं वाटतंय मित्रा !
  समीक्षण अथवा परीक्षण फक्त काही सुट्टे दुवे शोधून काढण्यासाठीच आहेत असं नाहीये यार !
  तू मांडलेले कच्चे धागे नाहीयेत असं मी नाही म्हणणार पण आज इतर आणि मराठी या सगळ्या भाषातून आपण जेव्हा चित्रपट पाहतो तेव्हा आपण आरडओरड करतो की बासुदा आणि हृषीदा सापडत नाहीत ...
  पण त्याच धर्तीवर " प्रेमाची गोष्ट " आली की आपण त्याला हाणून पाडतो .. हे कितपत योग्य ?
  एक कथा जिचा शेवट सुरुवातीपासून आपल्याला ठाऊक आहे आणि तरी आपण ते २ तास खुर्ची नाही सोडत हेच या चित्रपटाचे गमक आहे !

  SAHI HATS OF SATISH RAJWADE rasaP TUMCHYTALA raS KAMICH ZALAY KI KAY

  ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...