Monday, March 18, 2013

Jolly - Lovely, Laudable, Bright (Movie Review - Jolly LLB)


आयुष्य म्हणजे एका सोप्प्या वाटेवरील अवघड प्रवास असावा. इथे प्रत्येक गोष्ट 'मिळवावी' लागते आणि जी सहजगत्या हाताला लागते, ती फसवी तरी असते किंवा क्षणभंगुर. आता, अंबानीच्या पोरांकडे भरमसाट पैसा (व सत्ताही) आपसूक आहे, त्यांना ती मिळविण्यासाठी काही कष्ट करावे लागणार नाहीत; पण तरीही ह्या नाही तर त्या प्रकारे, कुठे तरी 'झिजावं' लागेलच. नथिंग कम्स फॉर फ्री इन लाईफ. प्रेम, पैसा, सत्ता, मान, नाव सगळं काही इथे मिळवावं लागतं. अगदी न्यायसुद्धा ! मी कुणी मोठा व्यक्ती नाही. पण शाळेत असताना लोकमान्य टिळकांची, ते शाळेत असतानाची, एक गोष्ट वाचली होती. ती मनात घर करून राहिली. काही दिवसांनी मला सरांनी माझी काहीही चूक नसताना शिक्षा केली. सर जेव्हा पट्टी घेऊन माझ्याकडे आले आणि म्हणाले, 'हात पुढे कर', तेव्हा मी टिळकांना आठवलं आणि म्हटलं, 'मी बोलत नव्हतो, माझी काहीही चूक नाहीये, मी पट्टी खाणार नाही!' सर हबकले. पण खूषही झाले आणि त्यांनी मला मी न केलेल्या चुकीसाठी क्षमा केलं. असंच आहे. इथे न्याय मागावा लागतो. त्यासाठी लढावं लागतं. इथे नाव कमवावं लागतं, त्यासाठी झिजावं लागतं.
पण असं असलं तरी, आयुष्य म्हणजे कुठली घनघोर लढाई किंवा अनंत रडगाणंही नाहीच ना ? अवघड असला तरी हा प्रवासही हसत हसत करता येऊ शकतो. किंबहुना, तो तसाच करायला हवा. तेव्हाच लोक तुम्हाला पाहून म्हणतात - 'He's a JOLLY good fellow!!'

'जॉली एल.एल.बी.' ही कहाणी एका धडपड्या वकिलाची आहे. देशात ज्युनियर वकिलांची काय अवस्था आहे, हे पाहायचं असेल तर कुठल्याही न्यायालयाच्या समोरून जा. तुमच्या मागे लागणाऱ्या वकिलांच्या विझलेल्या चेहऱ्यावरून, मळकट कपड्यांवरून तुम्हाला त्यांची अवस्था सहज समजून येईल. असाच एक 'केविलवाणा' वकील 'जगदीश त्यागी' उर्फ 'जॉली' (अर्शद वारसी) मेरठमध्ये झिजत असतो. रोजच्या झिजण्याने  त्याची डाळ शिजत नसते आणि तो मात्र पकत असतो. अखेरीस, तो दिल्लीस जाऊन नशीब आजमावण्याचे ठरवतो आणि खटारा स्कूटर व किडुकमिडुक सामानासह दिल्ली गाठतो. पण इथेही तीच कहाणी, फक्त नव्याने सुरू होते.
अश्यातच, स्टार वकील 'राजपाल' (बोमन इराणी) ह्यांची एक केस पाहाण्याची संधी त्याला मिळते. केस असते 'हिट अ‍ॅण्ड रन' ची. एका रईसजाद्या तरूणाने - 'राहुल दिवाण'ने - दारूच्या नशेत बेदरकारपणे 'लॅण्ड क्रूझर' गाडी फुटपाथवर चढवून तिथे झोपलेल्या ६ मजुरांना चिरडलं असतं. टिपिकल पुराव्यांचा अभाव वगैरे सिद्ध करून राजपाल त्या मुलाला निर्दोष सिद्ध करतो आणि केस जिंकतो. हे सगळं पाहून प्रचंड प्रभावित झालेला जॉली, नाव कमावण्यासाठी एक प्लान करतो. तो संबंधित केसविषयी जुजबी माहिती गोळा करून न्यायालयात ह्या प्रकरणी 'जनहितार्थ याचिका' (Public Interest Litigation) दाखल करतो.
सुरुवातीस केवळ सवंग प्रसिद्धीकरिता हा उपद्व्याप करणारा जॉली, त्याची प्रेयसी 'संध्या' (अमृता राव) आणि त्याच्यावर माया करणारा कोर्टातील कॅन्टिन चालक 'कौल' (रमेश देव) मुळे संवेदनशील होतो आणि अपघातात दगावलेल्या गरिबांच्या न्यायासाठी लढू लागतो.चित्रपट सुरू होतो, तेव्हापासूनच आपल्याला शेवट समजलेला असतो आणि कहाणीचा प्रवासही साधारणपणे आपल्या अंदाजानुसारच घडत जातो. कोर्टातील चढाओढी ह्यापूर्वी असंख्य सिनेमांत दाखविल्या गेल्या आहेत. पण 'जॉली' मध्ये दाखवलेलं कोर्ट 'पटणारं' आहे. ही हाताळणी वेगळी आहे.

मी चित्रपट पाहायला गेलो, त्याची दोन कारणं होती. एक - अर्शद वारसी. आणि दुसरं - बोमन इराणी.
अर्शद वारसीला संधी मिळाल्या नाहीत, असे नाही. कदाचित उशीराने मिळण्यास सुरुवात झाली आहे. पण त्याच्या भूमिका वैविध्यपूर्ण असतात नक्कीच. मला तरी तो आजच्या घडीस, हिंदी चित्रपट सृष्टीत असलेल्या उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक वाटतो. 'सहर' पाहिल्यापासून तर माझे हे मत अधिकच पक्कं झालं. 'जॉली'च्या भूमिकेतही तो जान ओततो. तो 'जॉली' जगतो.
बोमन इराणी, खरं सांगायचं तर विशेष असं काही करत नाही. तो फक्त सहज वावरतो. त्याच्यापेक्षा अर्शद वारसीच लक्षात राहातो.

पण…… ही कोर्ट केस जिंकतो 'न्यायाधीश त्रिपाठी' बनलेला 'सौरभ शुक्ला' ! अफलातून काम ! हाही एक अत्यंत ताकदीचा अभिनेता आहे, जो 'सत्या'पासून 'बर्फी'पर्यंत अनेकविध भूमिकांना न्याय देत आहे. 'जॉली'मधला त्याचा जजसुद्धा एक लक्षवेधी पात्र आहे. खूप मोठा रोल नसला, तरी काही मोक्याच्या क्षणी शुक्लाजी कमाल करतात !

'अमृता राव' इतकी मरतुकडी दिसते की तिचं नाव 'मृता राव' आहे की काय असा संशय यावा. बाकी तिला पडद्यावर फक्त 'दिसण्या'साठीच ठेवलेले आहे.
इतर लहान मोठ्या भूमिकांतून, सगळेच लहान मोठे अभिनेते चोख काम करतात.
अजनबी, दारू पीके नचणा आणि हंस की चाल ही तिन्ही गाणी बऱ्यापैकी जमली आहेत.

चित्रपटाचा शेवटही खूप प्रॅक्टीकल घेतला आहे. त्यामुळे ही केस लेखक-दिग्दर्शक सुभाष कपूर जिंकलेत, असं म्हणायला आणि पदरमोड करून थेटरात जाण्यासही हरकत नाही !

रेटिंग - * * *

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...