Monday, April 29, 2013

आजही..


पहिल्या स्पर्शाला ओझरते आठवतो आजही
शेवटच्या स्पर्शास विसरताना रडतो आजही

सोबत असते निरिच्छ काळी रात्रच ही नेहमी
मी पणतीसम शांतपणे जळतो विझतो आजही

कुणीच फिरकत नाही येथे, भेटणार ना कुणी
माझ्या अस्तित्वाची आशा बाळगतो आजही

कुठे झोपड्या, इमारती वा महाल वा बंगले
माणुस असलेला माणुस ना आढळतो आजही

एक महात्मा जो सत्याच्या कामी आला कधी
नोटेवरचा फोटो सारे आठवतो आजही

झळा सोसतो, वार झेलतो, कधी न हरतो 'जितू'
आशिक़ केवळ नकार ऐकुन तडफडतो आजही

 ....रसप....
२८ एप्रिल २०१३

Monday, April 22, 2013

आरोह अवरोह तुझ्या श्वासांचे


तू मुग्ध मदमस्त कळी स्पर्शोत्सुक
मी धुंद बेफाम भ्रमर प्रणयोत्सुक
प्राशून मकरंद मधुर लपलेला
मी रोज असतोच पुन्हा मिलनोत्सुक

स्पर्शून रेशीम शहारा यावा
हृदयातला ताल दुहेरी व्हावा
मग भान कुठलेच नसावे दोघां
अन् खेळ जोमात खुला खेळावा

आरोह अवरोह तुझ्या श्वासांचे
ओठांत अव्यक्त बहर शब्दांचे
ऐकायचे राग मला अनवट ते
देतात जे भास नव्या स्वर्गांचे

चाखून सौंदर्य तुझे अमृतसम
बहरून गंधात तुझ्या अद्भुततम
मी स्वर्ग भोगून असे इहलोकी
मी एक आहे इथला पुरुषोत्तम

....रसप....
२१ एप्रिल २०१३

Sunday, April 21, 2013

किळस न वाटेल असा चांगला भयपट - एक थी डायन (Ek Thi Daayan - Movie Review)


कुत्रा स्वत:चं शेपूट पकडू शकत नाही. हे नॉर्मली कुत्र्याला माहित असतं. पण कधी तरी त्याला हुक्की येते आणि तो स्वत:भोवती जोरात फिरून शेपूट धरण्याचा प्रयत्न करतो, अखेरीस हरतो, थकतो आणि गप्प बसतो. माणसाला शेपूट नाही, पण 'भूतकाळ' आहे आणि हुक्की आली की आपणही त्याला मुठीत घेण्यासाठी गोल-गोल फिरतो. तो कधीच हातात येणार नसतो. त्यामुळे त्याच्या मागे लागण्यापेक्षा त्याला आपल्या मागे लागू द्यावं आणि आपण मात्र आज व उद्यावर लक्ष केंद्रित करावं, जेणेकरून हे शेपूट आपल्याच पायात वळवळ करून आपल्यालाच तोंडावर पाडणार नाही.
पण 'एक थी डायन' मधल्या जादुगार 'बोबो' (इम्रान हाशमी) चं (बोबो ? काहीही काय ? मग त्याच्या कुत्र्याचं नाव काय आहे ? - असे प्रश्न विचारू नका ! तुम्हाला कितीही हसू आलं तरी त्याचं नाव हेच आहे, जादूगारांची नावं अशीच असतात.) भूतकाळाचं शेपूट वळवळ करणारं नसतं, तर 'सळसळ' करणारं असतं, किंबहुना ते शेपूट नसतं, 'शेपटा' असतो, 'डायन'चा ! बालवयापासून जादूची आवड असलेला बोबो, तऱ्हेतऱ्हेच्या पुस्तकांतून क्लृप्त्या शिकत असतो. ह्याच त्याच्या वाचनातून त्याला 'डायन'बद्दल - हडळींबद्दल कळतं. आणि एक हडळ त्याच्या आयुष्यात येतेही, त्याची आणि लहान बहिण 'मीशा'ची'केअर टेकर' म्हणून. ह्या केअर टेकर 'डायना' उर्फ 'लिसा दत्त' (कोंकणा सेन-शर्मा) वर बोबोचे वडील (पवन मल्होत्रा) लट्टू होतात आणि नंतर तिच्याशी लग्नही करतात. नाखुषीने, हे सगळं स्वीकारण्याचं बोबो नाटक करत असतो, पण त्याला डायनातील गडबड जाणवत असते. तो तिचं खरं रूप उघडकीस आणायचा खूप प्रयत्न करतो. त्यात त्याला थोडंफार यशही मिळते. तरी, अघटित घडतेच. डायन ज्यासाठी आलेली असते, ते ती करतेच आणि हाच भूतकाळ त्याला वारंवार सतावत असतो.
पुढे तीच हडळ 'लिसा दत्त', बोबोच्या आयुष्यात पुन्हा येते. का येते ? ती नेमकं काय करते ? हे चित्रपट पाहूनच कळावं, असं वाटतं. कारण ते पाहाण्यात जी मजा आहे, ती वाचण्यात किंवा ऐकण्यात नाहीच.सर्व पात्रांचा उत्कृष्ट अभिनय आणि उत्कंठावर्धक सादरीकरण ह्यामुळे 'एक थी डायन' लक्षात राहतो. अनेक ठिकाणी आपल्या हृदयाचे ठोके वाढतात, मुठी आवळल्या जाऊन घाम येतो. आपण खुर्चीच्या टोकापर्यंत पुढे सरकतो, डोळे फाडून बघतो.

कोंकणा सेन-शर्मा, आजच्या घडीच्या सर्वोत्कृष्ट अभितेत्रींपैकी - ज्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच असाव्यात - आहे, ह्यावर तिची 'लिसा दत्त' शिक्कामोर्तब करते. साध्या साध्या संवादांत ती प्रचंड जान आणते. तिचे डोळे तिच्या शब्दांहून खूप जास्त बोलतात.

शाळेत एखादा हुशार मुलगा असतो, पण डफ्फळ मुलांच्या संगतीत राहून, तो द्वाड बनतो. त्याची हुशारी व्रात्यपणामध्ये खर्च होते. तसं काहीसं इम्रान हाशमीचं झालं आहे. मला आठवतंय, त्याचा 'फुटपाथ' मी माहीमच्या 'सिटीलाईट'मध्ये पाहिला होता, तेव्हा मला तो आवडला होता आणि मी मित्राला म्हणालो होतो की, "ह्याचे सगळे पिक्चर मी बघणारच !" पण पुढच्याच सिनेमापासून त्याने असा काही आचरट व्रात्यपणा सुरू केला की मी ताबडतोब माझे शब्द मागे घेतले होते. 'डायन'मधला जादुगार बोबो, इम्रानने चांगला वठवला आहे. पण तरी जित्याची खोड असल्यागत तो जरासं 'तोंड मारतो'च !  

छोट्याश्या भूमिकेत कल्की कोचलिन छाप सोडते. मला तिचा तो उसवलेला चेहरा आणि एनिमिक शरीरयष्टी खरं तर पाहवत नाही, पण 'डायन'मध्ये ती खूपच सुसह्य वाटते.
हुमा कुरेशी सांगितलेलं काम चोख करते.

संगीत काही विशेष नाही. 'बेचारा दिल' ठीक-ठाक वाटतं.

आजपर्यंत अनेक भयपट, भूतपट आले आहेत. गेल्या काही वर्षांत - 'भूत'नंतर - बॉलीवूडमध्ये काही दिग्दर्शकांनी तर अश्या चित्रपटांसाठी स्वत:ला वाहूनच घेतलं आहे. पण ह्या सगळ्या भाऊगर्दीत 'डायन' सगळ्यात वेगळा आहे. का ? कारण, भयपट म्हणजे हिंसा किंवा बीभत्सपणा असंच नाही, हे 'डायन' सांगतो. ह्या चित्रपटात रक्ताचे पाट वाहात नाहीत. ज्यासाठी खरं तर प्रचंड 'स्कोप' होता. काही गोष्टी पटकथाकार-दिग्दर्शक न दाखवताच सांगून जातात ! इथे पडद्यावरील पात्रांना आरडाओरडा करावा लागत नाही. चित्रविचित्र चेहरे करावे लागत नाहीत. इथे निष्कारण, घणाघाती पार्श्वसंगीत नाही. हा चित्रपट एक 'जेन्युईन' भयपट आहे, जो प्रसंगांतून, घडणाऱ्या घटनांतून भयनिर्मिती करतो.

एकंदरीत, पटकथाकार व दिग्दर्शकाने खूप काळजीपूर्वक वेगळेपणा जपायचा प्रयत्न केला आहे, जो माझ्या मते यशस्वीही झाला आहे.

रेटिंग - * * *

Saturday, April 13, 2013

भावनांचा अंतराशी दाबतो उद्रेक मी


अंतरातच भावनांचा दाबतो उद्रेक मी
विझविण्या ती आग अश्रू सांडतो कित्येक मी

धुंद झाल्यावर ठरवतो 'सोडले आता तिला'
सांजवेळी रोज असतो एक ती अन् एक मी

संपला पेला तरीही कंठ आहे कोरडा
आज अश्रू एकही ना चाखला बहुतेक मी

लोकशाहीतील राजे खूप झाले आजवर
तप्त रक्ताचे अनन्वित पाहिले अभिषेक मी

चेहरा खोटा न माझा वाटतो कोणासही
सभ्यतेच्या नाटकाचा बोलका अतिरेक मी

कोण तू माझा, तुझा मी कोण आहे विठ्ठला ?
मागण्यांच्या पूर्ततेपुरताच आहे नेक मी

....रसप....
११ एप्रिल २०१३

Tuesday, April 09, 2013

घर वृंदावन गोकुळ


घर वृंदावन गोकुळ
घर पवित्रतम देउळ
घर मायेचा पाझर
घर अथांग सागरतळ

दुनियेचा भूलभुलैया
दररोजच शोधा रस्ता
काट्यांची पाउलसोबत
वळणावळणावर खस्ता
घर मिळता मिळता होते
गहिवरली संध्याकाळ
.... घर वृंदावन गोकुळ
.... घर पवित्रतम देउळ

आकाश कुंड अग्नीचे
झळ सोसेना डोळ्यांना
मृगजळ चाळवते तृष्णा
भेगा-चटके पायांना
घर निवांत शीतल छाया
भवताली रणरण माळ
.... घर वृंदावन गोकुळ
.... घर पवित्रतम देउळ

क्षितिजाहुन क्षितिजापाशी
मी शोध घेतला ज्याचा
तो कधी मिळाला नाही
मग ठाव लागला त्याचा
घर माझे आलय त्याचे
हृदयातुन वाजे टाळ
.... घर वृंदावन गोकुळ
.... घर पवित्रतम देउळ

....रसप....
९ एप्रिल २०१३
Related Posts Plugin for WordPress, Blogger...