Wednesday, May 22, 2013

अबोली


अबोलीच्या फुलांचे
तुझ्या-माझ्या मनांचे
घरांच्या अंगणांचे
कुणी ऐकायचे ?

छतांच्या झुंबरांशी
कड्यांच्या बंधनांशी
जवळच्या अंतरांशी
किती भांडायचे ?

स्मृतींच्या पाउलांना
पसरत्या सावल्यांना
तरल कातर छटांना
कसे वाचायचे ?

तुझे येणे न होते
तुझे जाणे न होते
तुझे असणे न होते
कधी सांगायचे?

इथे सारा पसारा
अनावर कोंडमारा
छुप्या पाऊसधारा
कसे टाळायचे ?

तरीही हाक द्यावी
उरी आशा रुजावी
नजर ओली थिजावी
कुणी समजायचे ?

....रसप....
२२ मे २०१३

Sunday, May 19, 2013

विचारा..


तुझी साथ वाटे मला शाश्वताची तुझ्यावर मला हक्कही वाटतो
तसे ह्या जगाशी जुळवले कितीही तरी रोज हटकून मी भांडतो

क्वचित एकदा तू असा मूर्त होऊन येतोस, होतोस अक्षरफुले
तुझा हाच दुर्दम्य विश्वास माझ्यात आशा उद्याची बनुन किलबिले

छुप्या पावलांनी कधी भ्याड हल्ले, कधी वार होतील पाठीवरी
लढू सोबतीने जगाशी, तुझ्या सत्यतेची असे ही लढाई खरी

विचारा, तुझ्यावर अजुन ठाम मी तू नको धीर सोडूस इतक्यात रे
प्रवासास आरंभ केला कधीचा नको थांबणे व्यर्थ अर्ध्यात रे

....रसप....
१९ मे २०१३

Thursday, May 16, 2013

केस पांढरा (तरूण कविता !)


पुन्हा पुन्हा मी भांग पाडतो
केस पांढरा तरी न लपतो
मनात अजुनी विशीतला मी
हा नालायक वय दाखवतो !

प्रवासात शेजारी माझ्या
असते जेव्हा सुंदर तरुणी
डोळ्यांवर गॉगल लावुन मी
चोरुन बघतो नजर फिरवुनी
संवादाच्या सुरुवातीला
तीही हसते, मीही हसतो
मग ती म्हणते 'अंकल' जेव्हा
सारा उत्साहच गळपटतो
मनात अजुनी विशीतला मी
केस पांढरा वय दाखवतो

फेसबूकवर चिकना मुखडा
मित्र विनंती मला पाठवे
जुन्या काळची अवखळ वृत्ती
क्षणात फिरुनी मनी जागवे
त्या ललनेशी चॅट कराया
असा उचंबळ दाटुन येतो
आणि तिचा संदेश वाचता
सुरुवातीला 'दादा' असतो !
मनात अजुनी विशीतला मी
केस पांढरा वय दाखवतो

किती जरी दिलफेक वागलो
जाणिव एकच मनात असते
गेले आता ते दिन गेले
फिरून त्यांचे येणे नसते
पिकल्या केसाला ना औषध
तरुण मनाला मी सावरतो
जरी उधळले मनात वारू
लगाम घालुन मी आवरतो
मनात अजुनी विशीतला मी
केस पांढरा वय दाखवतो..

....रसप....
१६ मे २०१३

Thursday, May 09, 2013

पावती


ती हसली..
मीही हसलो..
ती हसली म्हणून नाही,
दुसरं काही सुचलंच नाही, म्हणून..
काय करणार ?
माझ्या हातात होती 'बालवाडी'च्या फीची पावती
"रुपये तीस हजार फक्त!"
आणि तिच्या डोळ्यांत होती भूक
अन् रेखाटलेलं रक्त..

"तुम्ही तिला पन्नास रुपये का दिले?"
"ती त्याचं काय करणार?"
"'क्रेयॉन्स' घेणार की 'चॉकलेट' खाणार?"

..... हे प्रश्न मला ऐकूच येत नव्हते..
आणि मला पडलेले प्रश्न
मलाच समजत नव्हते..

घरी जाता जाता सिगरेटचं पाकिट घेण्याचं
आज पहिल्यांदाच विसरलो..

....रसप....
९ मे २०१३

Tuesday, May 07, 2013

शून्य स्थिती


मी आल्या, गेल्या, केल्या अन् झाल्याचा
झटकून निराशा हिशेब जेव्हा करतो
छोट्यातुन मोठी शून्ये उमलत जाती
मी पुन्हा एकदा माझ्यासोबत नसतो

ओठांना तृष्णा शब्दांची मग असते
हृदयास शांतता हवीहवीशी थोडी
ही द्विधा अशी की संचित विसरुन जावे
गुंते ना सुटती, पडती नवीन कोडी

जो समोर असतो रस्ता, समुद्र बनतो
गाड्यांच्या अगणित लाटांमागुन लाटा
दृष्टीस किनारा ना कुठलाही जवळी
संतत आवाजाचा असतो सन्नाटा

ही शून्य स्थिती ना उदास ना आनंदी
मी माझ्यापासुन मुक्त, नसे मी बंदी
मी समोर माझ्या क्षण असतो मग नसतो
जणु दुरून कोणी गाभाऱ्याला वंदी..

....रसप....
०६ मे २०१३

Saturday, May 04, 2013

एक वेगळाच 'फोर स्क्रीन' अनुभव (Bombay Talkies - Movie Review)


नियम आणि संकेत ह्यात फरक आहे. कायदा आणि संस्कार ही दोन वेगळी बंधनं आहेत. माणूस, विशेषकरून भारतीय माणूस अश्या द्विधेत बऱ्याचदा असतो. काही गोष्टी कायद्याने प्रतिबंधित असतात पण संस्कारात मुरलेल्या असतात आणि काही गोष्टी संस्कार करू देत नाहीत, पण कायद्याने त्या स्वीकारार्ह असतात ! आयुष्यभर आपण ह्या द्विधेतच राहातो. शेवटपर्यंत, दोन पर्यायांपैकी अचूक कुठला होता, हे लक्षात येतच नाही. मग परिस्थितीच्या हेलकाव्यासोबत, आपणही झुलत राहातो, भरकटत राहातो. मध्येच विरोध करायचा प्रयत्न करतो, पण तो टिकतोच असं नाही..... विचित्र आहे, पण खरं आहे.


'बॉम्बे टॉकिज' मधली पहिली कहाणी ह्याच द्विधेत अडकलेल्या व्यक्तींची आहे. 'अविनाश' (साकीब सलीम) हा एक समलिंगी आकर्षण असलेला तरूण असतो. त्याच्या ह्या वास्तवाला तो लपवत नसतो. आणि त्यामुळे अर्थातच घरातूनही त्याला प्रखर विरोध व संघर्षाला सामोरं जावं लागतं. घर सोडावं लागतं. पुढे नवीन नोकरीत, त्याची ओळख गायत्री (राणी मुखर्जी) शी होते. गायत्री आणि देव (रणदीप हूडा) आर नॉट लिव्हिंग अ व्हेरी हॅपी मॅरीड लाईफ. ही ओळख वाढल्यावर कहाणी एका विचित्र वळणावर येते आणि असे काही प्रश्न प्रेक्षकाला विचारते, ज्यांची उत्तरं न देणं, त्यांना टाळणंच आपण जास्त सोयीचं समजतो.
एक अतिशय नाजूक विषय, ज्यावर खाजगीत बोलणेही बहुतेक लोक टाळतात, असा विषय करण जोहरनी खूप चांगल्या प्रकारे हाताळला आहे. रेल्वेच्या पुलावर गाणी म्हणणार्‍या लहान भिकारी मुलीचे पात्र का कुणास ठाऊक लक्षात राहाते. तिने गायलेली दोन्ही जुनी गाणी (लग जा गले... आणि अजीब दास्तां...) व काही संवाद सांकेतिक भाषेत खूप काही बोलतात. राणी मुखर्जी आता स्थूल दिसायला लागली आहे किंवा तिला मुद्दामच तसं दाखवलं असावं. एका दृष्यात अविनाश तिला म्हणतो, 'गले में मंगलसूत्र और आंखों में कामसूत्र !' - ते मात्र पटतं.
इतक्या परिपक्वपणे एक दिग्दर्शक एक समाजाने नाकारलेला विषय हाताळतो, तेव्हा प्रश्न पडतो हाच दिग्दर्शक फुटकळ प्रेमत्रिकोण रंगवण्यात स्वतःचा वेळ, पैसा आणि संवेदनशीलता वाया घालवतो आहे का ? पण ह्याही प्रश्नापासून आपण दूर राहिलेलंच बरं ! कारण उत्तर मिळणारच नाहीये !


मुंबई..... जितकी यशस्वी व्यावसायिकांची आहे, त्याहून जास्त डब्यात गेलेल्यांची; जितकी चमकणार्‍या सितार्‍यांची आहे, त्याहून जास्त तोंडावर आपटलेल्यांची; जितकी टोलेजंग इमारतींची आहे, त्याहून जास्त खुराड्यासारख्या चाळींची..... जितकी गडगंज श्रीमंतांची आहे, त्याहून जास्त निम्नमध्यमवर्गीयांचीही....
अश्याच एका तोंडावर आपटलेल्या अभिनेत्याची - जो एका नाकपुडीएव्हढ्या निम्नमध्यमवर्गीय घरात राहाणारा, डब्यात गेलेला व्यावसायिक असतो - कहाणी 'दीबाकर बॅनर्जी' सादर करतो. ही कहाणी आहे 'पुरंदर' (नवाझुद्दीन सिद्दि़की) ची. आजारी लहान मुलगी आणि समजूतदार बायकोसोबत राहाणारा पुरंदर एक दिवस त्याच्या भूतकाळाला अचानकच सामोरा जातो. पण त्याला सामोरं जातानाही त्याचा बावळट, आत्मविश्वासशून्य मध्यमवर्गीयपणा त्याला जाणवतो. फार काही होत नाही, पण स्वतःसाठी मूठभर स्वाभिमान आणि आजारी लहान मुलीला सांगण्यासाठी एक नवीन गोष्ट घेऊन तो संध्याकाळी घरी येतो. घराच्या चार फुटाच्या गॅलरीत रोज झोपणारा 'पुरंदर', त्या रात्री जरा जास्तच समाधानी चेहर्‍याने निजतो........
दीबाकर बॅनर्जी आणि नवाझुद्दीन सिद्दीकी - सिनेसृष्टीतील दोन अतिशय आश्वासक नावं. ह्या कहाणीत दोघंही अजिबात निराश करत नाहीत. २५-३० फूट दूर कॅमेरा लावूनही अभिनय कसा करतात, हे एक ह्यापूर्वी न पाहिलेलं प्रात्यक्षिक ही कहाणी दाखवते.
बर्‍याच काळानंतर हिंदी पडद्यावर दिसणारे सदाशिव अमरापूरकर, मध्यंतरी एका मराठी सिरियलमध्ये केलेला पिचकवणी अभिनय न करता, जुने 'सदाशिव अमरापूरकर' दाखवतात, हेही एक विशेष आकर्षण !!


बालपण.... बालपण हे एखाद्या झर्‍यासारखं असावं. त्याला फक्त खळखळ वाहाणं, मागचा-पुढचा विचार न करता उड्या मारणं हेच माहित असतं. पुढे जाऊन त्या पाण्याचं डोहात रुपांतर होतं, मोठ्या पात्रात रुपांतर होतं आणि त्याला एक खोली, दिशा मिळते. पण ह्या सुरुवातीच्या निरागस खळखळाटाला पर्याय नसतो. त्याला तेव्हापासूनच दिशा, खोली, ठहराव देण्याचा प्रयत्न करणे चूकच. त्यामुळे त्याचं नैसर्गिक सौंदर्य तर नासेलच, कदाचित वाढही खुंटेल, प्रगतीही थांबेल किंवा नको ती दिशा किंवा वेग मिळून वायाही जाईल. आपण झर्‍याला मुरड घालत नाही पण बाल्याला बंधनं घालतो. आपल्या अपेक्षांचे अवास्तव ओझे त्या नाजुक खांद्यांवर लादायचा प्रयत्न करतो. असेच नाजुक खांदे असतात 'विकी'चे (नमन जैन). वडिलांच्या (रणवीर शौरी) अवास्तव अपेक्षांचे ओझे नकोसे वाटत असतानाही वाहाण्याचा प्रयत्न करणारे. पण निरागस नमन, त्याच्या निरगसपणाच्याच जोरावर त्यातूनही मार्ग काढतो आणि आपलं स्वप्न सत्यात आणायचा निर्णय करतो. काय असतं त्याचं स्वप्न ? ते पाहूनच समजेल !
लहानग्या नमन जैनचं काम अप्रतिम सुंदर. त्याची जितकी दया येते, तितकंच त्याचं निरागस हसू भावतं.
झोया अख्तरनी छोट्यांचे भावविश्व सुंदर उभे केले आहे. विकीचे निष्पाप प्रश्न, मोठ्या बहिणीचं लहान भावाला सांभाळून घेणं, विकीला त्याची आवडती कॅटरिना परीच्या वेषात भेटणं, ई. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात राहातात.


माझ्या आत्याचे यजमान नास्तिक होते. पण घरातल्या कुठल्याही कार्यात ते उत्साहाने सहभाग घेत. ते आत्याला म्हणायचे, "माझा देवावर विश्वास नाही, पण तुझ्या विश्वासावर विश्वास आहे!"  खरंच.. 'विश्वास' ही एक अनोखी चीज आहे. हा 'विश्वास' कधी कधी अशी काही शक्ती निर्माण करतो की, कुठल्याही खोल गर्तेतूनही माणूस बाहेर येऊ शकतो. असाच एक विश्वास घेऊन अलाहाबादहून एक तरूण - 'विजय' (विनीत कुमार) - मुंबईत येतो. 'अलाहाबादहून' आणि एक अचाट 'विश्वास' घेऊन.... म्हणजे काय ते कळलं असेलच! हो. तो अमिताभ बच्चनला भेटण्यासाठी येतो. पण इतर अनेक लोकांसारखा 'अ‍ॅक्टर' बनण्यासाठी नव्हे! त्याच्या आजारी वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी. आपल्या घरचा मोरावळा अमिताभला चाटवण्यासाठी!!
गंमतीशीर वाटेल वाचायला, पण ज्या सहजतेने आणि वास्तववादी दृष्टिने हे कथानक मांडले आहे, त्यासाठी दिग्दर्शक अनुराग कश्यपला मानावं ! विशेष हे की, ही कथा मांडताना त्याने कुठेही आई-बहीणीच्या शिव्या वापरल्या नाहीत !!
'विनीत कुमार'ला आपण 'वासेपुर - २' मध्ये नवाझुद्दीनच्या मोठ्या भावाच्या - दानिशच्या - भूमिकेत पाहिलं होतं. तिथे त्याला फारसा वाव नव्हता, पण इथे मात्र त्याने मिळालेल्या संधीचं अक्षरशः सोनं केलं आहे.

--------------------------------------------------

ह्या चार गोष्टींना मिळून 'बॉम्बे टॉकिज' हे नाव का ?
एक तर चारही गोष्टी मुंबईत घडतात आणि चारही गोष्टींत टॉकीजचा - सिनेमाचा, सिनेसृष्टीचा - काही ना काही संबंध आहे.


सरतेशेवटी, हिंदी चित्रपटसृष्टीची १०० वर्षं पूर्ण झाल्याचा जल्लोष म्हणून एक गाणं वाजतं. दोन तासात, चार कहाणींत जे काही ह्या सिनेमाने कमवलं असतं, ते सगळं ह्या ५ मिनिटांच्या गाण्यात मातीला मिळाल्यासारखं वाटतं. हिंदी सिनेसृष्टीची शतकपूर्ती झाल्याबद्दल ह्याहून वाईट मानवंदना एखादा 'RGV के शोले' वगैरे बनवूनच देता आली असती. ज्या जगतास अवर्णनीय सुंदर, मनमोहक संगीताचा अमूल्य ठेवा लाभला आहे, त्याला दिलेली ही मानवंदना निव्वळ 'द ळ भ द्री' आहे.... गाणं सुरू झाल्यापासून हे कधी संपतंय, ह्याचीच वाट मी तरी पाहात होतो. त्यात पडद्यावर ज्या बिनडोकपणाने ठिगळं जोडली होती आणि नंतर एकेक सितारे अवतरत होते, तेसुद्धा अत्यंत कंटाळवाणं होतं.

असो.
एकंदरीत हा 'फोर स्क्रीन' अनुभव नक्कीच एकदा घेण्यासारखा आहेच.
गो फॉर इट !!

रेटिंग - * * * १/२

Wednesday, May 01, 2013

गुलमोहर तो !


कोपिष्ट ऋषी
संतापावा
याव्यात झळा
त्या डोळ्यांतुन
अन् शाप झणी
उच्चारावा -
"नजरेत असे
जी आग तुला
ती भस्म करो !"

तैसेच जणू
आकाशाने
संतापावे
ह्या धरणीवर
सविता-नयनी
फुलता ज्वाळा
कणकण धरणी
पेटून उठे
पोळून बने
केविलवाणी

प्रत्येकाची
लाही लाही
पण एक तरू
खंबीर असे
जो ज्वाळेतुन
बहरून उठे
झाडुन पाने
ओकाबोका
झाला तरिही
अंगावरती
पसरून फुले
दु:खामध्ये
आनंदभरे
निर्व्याज हसे

षड्शत्रूंशी
विजयी होउन
कोsहम जाणुन
नि:संग बने
जणु एक ऋषी
गुलमोहर तो !
निर्व्याज हसे
गुलमोहर तो..!

....रसप....
२९ एप्रिल २०१३
Related Posts Plugin for WordPress, Blogger...