Saturday, July 13, 2013

न धावणारा मिल्खा सिंग (Bhaag Milkha Bhaag - Movie Review)

राकेश ओमप्रकाश मेहरा, फरहान अख्तर आणि मिल्खा सिंग ह्या तिघांसाठी हा चित्रपट पाहायला गेलो. तिथे गेल्यावर दिसलं, मीच नाही शेकडो लोक आले होते, ह्याच तिघांसाठी. प्रवेशद्वाराबाहेर तोबा गर्दी होती. अशी गर्दी मी फक्त 'वाँटेड', 'एक था टायगर' ह्या सलमानपटांसाठी पाहिली होती. दरवाजा उघडण्यासाठी सगळेच आतुर होते. शर्यत सुरु होण्यापूर्वी 'गेट सेट गो' च्या वेळी सगळे स्पर्धक जसे असतात तसेच होते का? कदाचित ! कारण मी तर होतोच. दरवाजा उघडला. गर्दी इतकी होती की आम्ही - आई, बाबा, बायको, मी आणि मित्र विनायक - जागेवर पोहोचेपर्यंत नामावली सुरूही झाली.

वर्ष १९६०. रोम ऑलिम्पिक्सचे दृश्य. पिळदार शरीरयष्टीचा मिल्खा सिंग - द फ्लाईंग सिख - बाणासारखा सुटतो. पण फिनिशिंग लाईनजवळ आल्यावर, 'भाग मिल्खा भाग' च्या आरोळ्या मिल्खाला विचलित करतात. जुने काही तरी आठवते आणि शर्यतीतील लक्ष उडते. मिल्खा जिंकता जिंकता मागे पडतो, हरतो. देशभरात नैराश्य, संतापाची लाट येते. ही एक मोठी बातमी असते. 'मिल्खा हरला.' अशी चित्रपटाची रोमांचक सुरुवात होते. किंचितशी 'चक दे' ची आठवण होते. पण किंचितशीच आणि थोडा वेळच. कारण ह्या रोमांचक व वेगवान सुरुवातीनंतर चित्रपट पुन्हा हा वेग पकडत नाही. आपण 'भाग मिल्खा भाग' बघत असतो, पण मिल्खा रमतगमत चालतो. मध्येच थोडासा धावतो, पण लगेच पुन्हा थांबतो. संपूर्ण पुढचा प्रवास असाच 'थांबा - पहा - पुढे जा' आहे.

'मिल्खा सिंग' भारतीय क्रीडाजगतातील एक अविस्मरणीय व्यक्तिमत्व. आज क्रिकेटव्यक्तिरिक्त कुठल्याही क्षेत्रात भारताला अजिबात भाव मिळत नाही. पण एके काळचा हॉकीतला दादा भारत, त्याच काळात अभिमानाने एक खेलरत्न मिरवत होता. 'धावपटू मिल्खा सिंग'.

सध्याच्या पाकिस्तानातील मुलतान भागात मिल्खा सिंगचा जन्म होतो. फाळणीची भयंकर झळ लागलेल्या हजारो निरापराध कुटुंबांपैकी एक मिल्खाचं कुटुंब होतं. बालवयातच बेघर, अनाथ झालेला मिल्खा दिल्लीत आला. दिल्लीच्या गल्ल्यांत उलटसुलट धंदे करणारा मिल्खा सिंग एकेक पायरी चढत आंतरराष्ट्रीय ख्यातीचा धावपटू बनला. एक असामान्य प्रवास ! हाच प्रवास, त्यातील अनेक अडथळे, वळणे 'भाग मिल्खा भाग' मांडतो. अर्थातच ह्यात बऱ्यापैकी सूट घेऊन काही काल्पनिक भागही आहेच. ह्यातील काही काल्पनिक व सत्यकथन थरारक आहे, तर काही मनोरंजक. पण काही भाग दिग्दर्शकाला अपेक्षित थरार व मनोरंजन करण्यात कमी पडतो. काही भाग तर अगदीच अनावश्यक वाटतो. उदा. सोनम कपूरची व्यक्तिरेखा. कुठलाही आगा-पिछा न दाखवलेली ही व्यक्तिरेखा चित्रपटात येते आणि जाते. कहाणीत विशेष फरक पडत नाही. असे लहान-मोठे तुकडे मिल्खाला धावूच देत नाहीत. चित्रपटभर प्रेक्षक मिल्खाच्या वेगाची अपेक्षा करत राहातो. सव्वा तीन तास उलटून जातात, पण वेग सापडत नाही. सुरुवातीच्या दृश्यात मिल्खा हरतो आणि शेवटच्या दृश्यात चित्रपट. अगदीच शेवटचा वगैरे येत नाही, पण पदकही मिळत नाही व नैराश्य पदरी पडतं.मिल्खा सिंगना ऑलिम्पिक पदक मिळालं नव्हतं. तरी त्यांची कामगिरी अद्वितीयच होती. ज्या परिस्थितीवर मात करून व जी मेहनत करून त्यांनी ऑलिम्पिकेतर स्पर्धांत भारताचं नाव केलं, ते निश्चितच 'क़ाबिल-ए-तारिफ़' होतंच. तद्वतच, चित्रपट चांगला असला तरी अपेक्षेइतका चांगला नसला तरी, 'मिल्खा' मन जिंकतो. फरहान अख्तरची मेहनत फक्त त्याच्या 'पॅक्स'वरूनच दिसत नाही. तर त्याची देहबोलीसुद्धा एखाद्या सैनिकाची व खेळाडूचीच वाटते. शर्यतींत धावणारा फरहान अख्तर खरोखर एखाद्या व्यावसायिक धावपटूसारखा, ते तंत्र समजून घेऊन, धावत असतो. त्याचं चालणं, बोलणं आणि आपल्या लक्ष्याला वाहून घेणं कधीच हे जाणवू देत नाही की हा 'फरहान अख्तर' आहे. आपण पूर्ण वेळ फक्त आणि फक्त 'मिल्खा'च पाहात असतो. तरुणपणी स्वतःच्या मूळ गावी आल्यावर हमसून हमसून रडणारा मिल्खा मात्र जरा कमी पडल्याचं प्रकर्षाने जाणवतं.

सोनम कपूर एका छोट्या व अनावश्यक भूमिकेत आहे. ती अभिनयाचा मनापासून प्रयत्न करते. पण ती 'मनापासून प्रयत्न करत आहे' हेच जाणवत राहतं.

दिव्या दत्ता ह्या गुणी अभिनेत्रीला अखेरीस बऱ्यापैकी वाव मिळाला आहे, ह्याचा मला खूप आनंद झाला. मिल्खावर आईसारखी माया करणारी मोठी बहिण तिने अप्रतिम साकारली आहे. तिचं प्रत्येक दृश्य ती जिंकते. दिग्दर्शक दिव्या दत्ता पडद्यावर असताना इतर कुणाला मुद्दामच जास्त वाव देत नाही. कारण इथे कदाचित फरहानचा मिल्खा कमी पडलाच असता. त्यामुळे जिथे जिथे दिव्या दत्ता आहे, तिथे तिथे ते ते दृश्य तिच्यावरच जणू एकवटलं आहे.

पवन मल्होत्रा हाही एक अत्यंत गुणी कलाकार. त्यालाही इथे बराच वाव मिळाला आहे. त्याच्यातला सैनिक त्याने खूप भावनिक बनवला आहे मात्र. दिव्या दत्ता आणि पवन मल्होत्रा निम्म्याहून अधिक दृश्यात गहिवरतात व गहिवरवतात.

इतर भूमिकांतून दिलीप ताहिलने साकारलेले पं. नेहरू लक्षात राहतात. फार काही काम नाहीये. पण एकदम डिट्टो वाटतात !

शंकर-एहसान-लॉयला बऱ्याच दिवसांनी ऐकलं का ? बहुतेक हो. हवन करेंगे, घुलमिल घुलमिल आणि रंगरेज ही गाणी छान आहेत. खासकरून 'घुलमिल घुलमिल' ऐकत असताना मनातल्या मनात आपण जरासं नाचूनही घेतो ! गाण्यांचे शब्द समजत नाहीत. पण आजकाल बहुतांश गाण्यांचं तसंच असतं !

राकेश मेहरा, आशुतोष गोवारीकर, संजय लीला भन्साळी अशी काही नावं आहेत ज्यांचे चित्रपट तीन - साडेतीन तास चालतातच. जातानाच त्याची मानसिक तयारी करून जायला हवे. ती कदाचित मी केली नव्हती म्हणून असेल पण मला असं वाटलं की इतपत कहाणी अडिच तासात सांगता येऊ शकली असती. फ्लॅशबॅक्समधून कहाणी उलगडत जाण्याचं तंत्र, कॅमेऱ्याचे विशिष्ट कोण मेहरा सुंदर वापरतात. त्यांची मेहनत व त्यांचं 'व्हिजन' दिसून येतं. पण ह्या सगळ्यावर चित्रपटाची लांबी व वेग मात करतात. चित्रपट अगदीच कंटाळवाणा नसला तरी कमी रंजक करतात.

संवाद लेखनाची बाजू ह्या चित्रपटात सगळ्यात कमकुवत असावी. हवा तर अशी होती की काही वादग्रस्त संवाद आहेत. पण एकही ओळ लक्षात राहात नाही. सपक संवादांमुळेही अपेक्षित नाट्यनिर्मिती काही ठिकाणी मार खाते.

एखादा अंतिम सामना, आपल्या आवडीच्या संघ जिंकतो. निकाल आपल्या पसंतीचा लागतो, पण सामन्यात रंजकता कमी असते. अगदीच एकतर्फी झाला असतो. अश्या सामन्याने जितका आनंद मिळतो; तितका आनंद 'भामिभा' देतो.

रेटिंग - * * *

4 comments:

 1. रसप
  आजचं रेटिंग झेपत नाहीये मनाला :(
  यार ! तुझं परीक्षण पहिल्यांदाच अत्यंत डिप्लोम्याटिक वाटतंय रे ...
  म्हणजे तुला शिव्या घालायच्या आहेत पण असं काहीतरी छान होतं की ज्यामुळे तू शिव्या हासडत नाहीयेस आणि असं काहीतरी दळभद्री होतं की जे तुला चांगल्याबाबत मनापासून आवडला हे सांगू देत नाहीये ...
  आणि यालाच दुजोरा देतंय तुझं रेटिंग ...
  अश्या धेडगुजरी परीक्षणामुळे मी तुझी निरीक्षणं बघून बघायचं ठरवणं बंद करेन बरं कां ...
  एकंदर माझ्यामते (म्हणजे तुझ्यामते) हा पिक्चर शंभर रुपये घालून एका डीव्हीडीमध्ये चार पाच पिक्चर घरी बघावा दोन तीन आठवड्यानी असा आहे.

  ReplyDelete
  Replies
  1. "एखादा अंतिम सामना, आपल्या आवडीच्या संघ जिंकतो. निकाल आपल्या पसंतीचा लागतो, पण सामन्यात रंजकता कमी असते. अगदीच एकतर्फी झाला असतो. अश्या सामन्याने जितका आनंद मिळतो; तितका आनंद 'भामिभा' देतो."

   Does this not sum it up, Prasad dada ?

   Delete
 2. Bhau tumahla kadachit truti disat astil,pn mala aawadala rao picture.mi donda pahila asa akahi prasanga navhata ki jo mala anavashyak vatla,review lihitana akaangi vichar karane tala.thx

  ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...