Monday, December 23, 2013

दीड दमडीचा धुमड्या (Movie Review - Dhoom - 3)

"ट्रकच्या मागे लिहिलेली वचनं" हा तत्वज्ञानाचा एक अविरत स्त्रोत आहे. द व्हेरी फेमस 'बुरी नजरवाले, तेरा मूह काला' पासून अनेक उत्तमोत्तम शेरही मी तिथे वाचलेत. पण अगदी हल्लीच, काही दिवसांपूर्वीच एका ट्रकवर वाचलेलं वचन मात्र सगळ्यांवर कडी असावं -

"भाई हो तो ऐसा, ना मांगे हिसाब ना मांगे पैसा !!"

ह्याच उदात्त विचारसरणीचा एक जादूगार नव्वदच्या दशकात शिकागोमध्ये होऊन गेला, हे काल धूम-३ पाहिल्यावर समजलं. पण हा जादूगार तर ट्रकवाल्या पेक्षाही उदात्त विचारसरणीचा असतो. तो अशी अपेक्षा स्वत:च्या भावाकडून नव्हे, तर बँकेकडून ठेवतो आणि कर्ज घेतो. पण ती बँक म्हणजे महाराष्ट्र सरकार नसतं आणि कर्ज घेणारा कुणी शेतकरीही नसतो. त्यामुळे व्यवहारास चोख बँक, हफ्ते चुकवणाऱ्या जादूगाराला नोटिशीची जादू दाखवते आणि हबकलेला हताश जादूगार आत्महत्या करतो. त्याने आत्महत्या केल्यावरही बँकेच्या अधिकाऱ्याचं हृदय द्रवत नाही. बिच्चाऱ्याला ट्रकवाला व जादूगाराचे उदात्त विचार माहित नसतात. तो जादूगाराची तारण मालमत्ता जप्त करवतो आणि त्या जादूगाराचा लहान मुलगा, मोठा झाल्यावर बँकेच्या कायदेशीर कारवाईचा बेकायदेशीर बदला घेतो. मायला ! चोर तो चोर, वर शिरजोर ? ही तर खोब्रागडेगिरी झाली ! असाच आहे धुमड्या, अर्थात धूम - ३.

धुमड्याची सुरुवात आश्वासक होते. आमिरची सनी लिओनीश पाठ दिसेपर्यंतची पहिली काही मिनिटं आपल्या अपेक्षा उंचावतात. नंतर कैच्याकै भंकस सुरु होते. बाईक चालवणारा चोर आमिर स्वत:चे तोंडही लपवत नाही आणि अमेरिकेचे पोलिस इतके दुधखुळे असतात की ते त्याला ओळखू शकत नाहीत. लगेच पुढच्या दृश्यात अभिषेक आणि उदय चोप्रा कृत गुंडांची पिटाई दाक्षिणव्रात्य सिनेमाला लाजवेल अशी आहे. पुढल्या चाकावर गोल गोल फिरणारी रिक्षा पाहिल्यावर तिचा स्टिअरिंग कॉलम बनवाणाऱ्या कंपनीच्या मालकाचा उर अभिमानाने भरून आला नसेल, तरच नवल !
केवळ दोन चोऱ्या करून अमेरिकन पोलिसदलास हवालदिल करणाऱ्या एक अज्ञात चोरास पकडण्यासाठी, दोन धुमड्यांतील सुपरफ्लॉप कामगिरीनंतरही आंतरराष्ट्रीय 'सुपरकॉप' ठरलेल्या 'जय दीक्षित'ला (अभिषेक बच्चन) खास भारतातून बोलावले जाते. कारण कदाचित हे असावं की, हा चोर (आमिर खान) चोरी केल्यावर हिंदीत निरोप सोडत असतो - "तुम्हारी ऐसी की तैसी." गाड्याबरोबर नळ्याची यात्रा होते, तसा जयबरोबर 'अली'ही (उदय चोप्रा) येतोच !
पुढे काही बाही होत राहतं आणि सगळ्याचा हिशोब थोडक्यात मांडायचा झाल्यास - सुमारे ३ तासाच्या धुमड्यात तासभर बाईक्स व्रुमव्रुमत राहतात. तासभर आमिरवरून कॅमेरा हलत नाही. अर्धा तास गाणी, नाच, सर्कशीत जातो. १५ मिनिटं अभिषेक बच्चनच्या नाकावरील माशी उडवण्याच्या असफल प्रयत्नात जातात आणि उर्वरित १५ मिनिटं उदय चोप्रा प्रेक्षकांना वात आणण्यासाठी वापरतो. कतरिना पानात कतरी सुपारी असते, तशी हरवते किंवा पोह्यांवर भुरभुरवलेल्या खोबऱ्यासारखी नुसतीच दिसते.आमिरचे बचकांडेपण कधी नव्हे इतकं धुमड्यात जाणवतं. त्या बाईक्सचा धुडांवर बसल्यावर त्याचे पाय खाली कसे पोहोचत असतील, हा एक संशोधनाचा विषय आहे.
दोरावरून बाईक चालवून एका बिल्डिंगमधून दुसऱ्या बिल्डींगमध्ये जाणे असो की चालू-चालूमध्ये बाईक बोटमध्ये कन्व्हर्ट होणं असो की दोन बाईक्स एकमेकांना खटाखट जोडल्या जाऊन त्यांची एक चार चाकी बनून तिने उडी मारणं असो, सगळंच आजच्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीतील असामान्य बुद्धिमानांसाठी एक जबरदस्त 'फूड फॉर थॉट' ठरायला हरकत नाही.
एकंदरीतच सगळे पाठलाग, स्टण्ट्स बॉन्ड-फॉण्ड, स्पायडर-वायडर मॅनांनी शिकवणी लावावी असेच.

धुमड्या संपल्यावर जरा वेळाने शांतपणे विचार केल्यावर लक्षात आलेल्या चार गोष्टी -

१. आमिर आणि शाहरुखमध्ये काही फारसा फरक नाही. दोघेही स्वत:च्या प्रेमात आकंठ बुडलेले आहेत. 'जतहैंजा' मधला समर आणि धुमड्यातला समर दोघेही सारखेच पकवतात.
२. उदय चोप्रा हे यश चोप्रांना पडलेलं एक भयानक स्वप्न असावं, जे खरं झालंय.
३. प्रत्येक सिनेमागणिक अभिषेक बच्चन एक लांबलचक ठोकळा बनत चालला आहे.
४. रोहित शेट्टी, तू एकटा नाहीस.  

साधारण साडे नऊला धुमड्या संपला. माझ्या सुदैवाने दहा वाजता कलर्सवर '24' चा शेवटचा भाग होता. आमिरने केलेल्या घोर अपेक्षाभंगावर अनिल कपूरने अप्रतिम साकारलेला 'जयसिंग राठोड' एक उत्कृष्ट उतारा होता. त्यामुळे पराकोटीचा निराश झालेलो असतानाही मी शांतपणे झोपी जाऊ शकलो आणि सुचलेल्या बऱ्याच शिव्या विसरू शकलो !
थँक यू, अनिलकाका !

रेटिंग = जतहैंजा  

2 comments:

 1. रसप
  आयला हे माझ्याकडून कसं काय सुटलं होतं रे लेका ?
  एक नम्बरी लिहीलं आहेस " जतहैंजा " नामक एक श्रेणी तयार झाली दोस्ता !!! ख़ास

  ReplyDelete
 2. कर्जबुडव्यांची तुलना शेतकऱ्यांशी करणे हे काही पटले नाही. एखाद्या विषयाची काहीच जाण नसताना केवळ ऐकीव माहितीवरून अशा प्रकारे तुलना करण्यापूर्वी सर्वसामान्य नागरिकांना अन्नधान्य कमीत कमी किंमतीत उपलब्ध करून देण्यासाठी अस्तित्वात आणलेल्या जीवनावश्यक वस्तू च्या जाचक कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या परीस्थिती ची कल्पना नाही तुम्हाला. कृपा करून यापुढेही ह्याची जाणीव ठेवा. बाकी तुमचे परिक्षण मात्र नेहमीप्रमाणेच उत्तम👍, अगदी अमीर चा चाहता असूनही अमीर वरील तुमचे भाष्य पटले.
  अभिजीत देशमुख.

  ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...