Tuesday, April 29, 2014

१९९२

दुपारची वेळ होती. आम्ही जेवायला बसलो होतो. त्या काळी आमच्याकडे डायनिंग टेबल वगैरे नव्हतं. घरात तेव्हढी जागाही नव्हती. नाकपुडीएव्हढ्या दोन खोल्या, एक हॉल आणि एक आतली. आणि त्यांच्या साधारण एक तृतीयांश स्वैपाकघर. असं ते सरकारी क्वार्टर होतं.
अचानक एक मोठ्ठा आवाज झाला आणि जमिनीवर, पुढ्यात ठेवलेलं जेवणाचं ताट थरथरलं.
का कुणास ठाऊक.. काही विशेष वाटलं नाही. ते दिवसच तसे होते. - १९९२ चा डिसेंबर. त्याच वर्षी आम्ही बदलापूरहून मुंबईत आलो होतो. मुंबईची पहिली ओळख मला झाली ती काविळीने आणि दुसरी ओळख झाली दंगलीने. - त्या आवाजाचं नेमकं कारण आम्हाला कळलं नव्हतं. पण इतका अंदाज आला की कुठे तरी काही तरी 'उडवलं' आहे.
नंतर कळलं. पारकर हॉटेल. घरापासून काही मीटर अंतरावर होतं. ते पेटवलं होतं. अजून काही स्फोट झाले. तिथले सिलेंडर फुटत होते. सामानाचे तुकडे हवेत उडून घराजवळ पडले होते.

दंगलीचे दिवस फार विलक्षण होते.
आज लोक तावातावाने गुजरात दंगलींबद्दल बोलतात. तेव्हा मला ते दिवस आठवतात.
पश्चिम द्रुतगती मार्गावर लष्कराचं ध्वजसंचालन आठवतं.
वातावरणातली एक कर्कश्य शांतता आठवते.
आज पुढच्या गल्लीत एकाला जाळलं. परवा समोरच्या चौकात एकाला भोसकलं. रात्री दोन जणांना बस स्टॉपवर पोलिसांनी हत्यारांसह पकडलं. अश्या बातम्या रोजच्याच होत्या.
आठवतं की १२ मार्चला सिरीयल बॉम्बस्फोट झाले तेव्हा शाळा अर्ध्यात सोडली होती. बाबा ऑफिसमध्येच राहिले होते आणि दुसऱ्या दिवशी परतले होते.

आमच्या कॉलनीच्या आजूबाजूला अनेक संवेदनशील, अति-संवेदनशील भाग होते. बेहरामपाडा, भारतनगर, टाटानगर, खेरवाडी, निर्मलनगर आणि कलानगरपासून जवळच असलेलं धारावी. अफवांचं नुसतं पीक आलेलं होतं त्या दिवसांत.
एक दिवस संध्याकाळी कुणी तरी म्हणालं की रात्री कॉलनीवर हल्ला करायचा प्लान केला आहे 'त्यांनी'. लगेच कॉलनीतल्या तरुण मुलांनी दगड, सोडावोटरच्या, इतर काचेच्या बाटल्या आणि मिळेल, जमेल ती सामुग्री घेऊन गच्चीवर दबा धरला. सगळ्यांना घरात काही न काही 'संरक्षक' सामान जवळ बाळगायला सांगितलं.
झालं काहीच नाही. पण रात्र प्रचंड बेचैनीची होती.

अश्या अनेक बेचैन रात्री आणि तणावपूर्ण दिवस त्या दोन तीन महिन्यात अनुभवले.
आमच्या कॉलनीत, अगदी शेजारी अन्यधर्मीय लोक होते. ह्या सगळ्या काळात ना त्यांना असुरक्षित वाटलं, ना आम्हाला विचित्र. दंगलीच्या दिवसांत आम्ही सगळे घराबाहेरच असलेल्या मैदानात क्रिकेट खेळायचो. जे काही विद्वेषाचं वातावरण इतरांना जाणवत असे, ते आम्हाला कधीच जाणवलं नाही. आमच्यासाठी ते दिवस शाळेला सुट्टीचे आणि क्रिकेट खेळण्याचे होते.
पुढच्या वर्षीच्या ईदला कदीर मुलानीच्या घरचा शीर कोर्मा आम्ही नेहमीच्याच चवीने ओरपला होता आणि गणपती-दिवाळीला फराळही पोहोचवला होता.

दंगल करणारे काही मोजके लोक असतात. सामान्य माणसाला फक्त आपल्या सभोवतालच्या शांततेविषयी देणं-घेणं असतं. तणाव ओसरला, कर्फ्यू उठला की प्रत्येकाला आपापल्या कामधंद्यावर रुजू व्हायचं असतं. कामावर जाताना, लोकल/ बसमध्ये पोटाला पोट, पाठीला पाठ, खांद्याला खांदा लावून बाजूला उभा असलेला 'सुधीर' आहे की 'कदीर' ह्याने श्याटभरही फरक पडत नसतो.

पण ह्या नको त्या घटनांना, ज्या पूर्णपणे विस्मृतीत जाऊ शकतात, काही सो कॉल्ड सेक्युलर किंवा देशाभिमानी लोक विसरू देत नाहीत. जखमेवर खपली धरली की पुन्हा पुन्हा ती खरवडून काढत राहतात.
एक फंडा आहे. 'Material Handling' मध्ये.
"The best way of Material Handling is NO HANDLING."
सामान आलं की डायरेक्ट प्रोडक्शनला घेणं किंवा त्याच्या नियोजित जागी, सुयोग्य पद्धतीने ठेवणं व त्यानंतर तेव्हाच हलवणं जेव्हा प्रोडक्शन लाईनवर जाणार असेल.
'सेक्युलरिझम' वगैरे गोंडस शब्दही असेच.
सेक्युलरिझम म्हणजे काय ?
शब्दश: अर्थ नकोय. तो तर कुठल्याही डिक्शनारित मिळेल.
विविध सामाजिक घटकांशी सुरुवातीपासूनच समभाव असायला हवा. फक्त काही तरी अप्रिय, अयोग्य घडलं की गोंजारुन 'मी सेक्युलर आहे' असा ऊर बडवणं म्हणजे सेक्युलरिझम नाही. खरा सेक्युलर तोच असतो, ज्याला कधी सांगावं लागत नाही की तो सेक्युलर आहे.
दुसऱ्याला धर्मवेडा, जातीयवादी आणि स्वत:ला सेक्युलर म्हणणारा कधीच सेक्युलर असू शकत नाही कारण तो भेदभावाचा कीडा त्याच्या मनात, डोक्यात वळवळला असतो, म्हणूनच तो असं बोलत असतो.

असो.

जातीय, धार्मिक दंगली हा भारताचा इतिहासच आहे. इथली Unity in Diversity अशीच आहे. महत्वाचे हेच की जेव्हा अश्या घटना घडतील, तेव्हा लहान मुलांनी त्या दिवसांना 'शाळेला सुट्टी' ह्याच विचाराने अनुभवलं पाहिजे. कारण त्या मागचं 'राजकारण' त्यांच्या बालबुद्धीच्या पुढचं असतं, नेहमीच. किंबहुना, त्यांच्या आई-वडिलांनाही अनेकदा ते समजलेलं नसतं.

- रणजित
(लोकलच्या गच्च भरलेल्या डब्याच्या दरवाज्यातल्या तीन इंची पट्टीवर लोंबकळताना आयुष्यातील परमोच्च सुख अनुभवणारा एक मुंबईकर.) 

Sunday, April 27, 2014

प्रकाशदान

निर्जीव सुखाची जागा
प्राजक्तव्यथांच्या ओळी
ही रंगमाखली वेळ
अंगणवेडी रांगोळी

आकाशकोपरा माझा
अंधार जिथे विरघळला
तो दहिवर-गहिवर होउन
पानोपानी साकळला

शीतल वाऱ्याची शाल
गुरफटून घेतो आहे
मी ज्योत आतली माझ्या
रात्रीला देतो आहे

प्रत्येक कालचे स्वप्न
क्षितिजावर खोळंबावे
हे दु:खयुगांचे भोग
इतक्यात कसे संपावे ?

....रसप....
२७ एप्रिल २०१४

Monday, April 21, 2014

फेसबुक फटका

फेसबूकचे नवे कुरण तू बघून येडा बनू नको
रान मोकळे समजुन येथे सैरावैरा पळू नको

मिळेल त्याला टॅग लावण्याचा चाळा तू करू नको
समोरच्याने हाकलले तर नंतर तू चरफडू नको

डोळ्यांमध्ये लाळ आणुनी चिकना मुखडा बघू नको
अपुला चिकना फोटो पाहुन स्वत:च हुरळुन फुगू नको

मित्र विनंत्या धुडकावुन तू माज फुकाचा करू नको
होयबांस मागे अन् पुढती घेउनिया बागडू नको

अपुल्या भिंतीवर सरपट तू कुंपण तोडुन फिरू नको
फेसबूक ही भाडेपट्टी, मालक इथला बनू नको

ताई, माई, दादा, बाबा अगतिकतेने म्हणू नको
गळेपडू म्हणतात लोक तू विषय विनोदी बनू नको

दु:खाचा बाजार मांडुनी ज्याला त्याला पिडू नको
प्रत्येकाची एक कहाणी असते हे विस्मरू नको

वाद कुणाशी झाला तर तू डूख कुणावर धरू नको
खोडकराला झोडण्यातही कधीच मागे हटू नको

उचलाउचली करू नको तू 'कॉपी'मास्तर बनू नको
मनातले तू लिही भावड्या भीडभाड बाळगू नको

अभिप्राय-लाईक मोजुनी लायकीस ओळखू नको
अज्ञातातिल विश्व विलक्षण, आभासाला भुलू नको

....रसप....
२१ एप्रिल २०१४

Wednesday, April 16, 2014

शब्द

सुधीर मोघ्यांची 'शब्दधून' मनावर मोहिनी करून आहे. तिच्याच प्रभावातून हे लिहिले गेले असावे - 

संपते जिथे दृष्टी दृश्यादृश्याची
पाहते पुढे तेथून नजर शब्दाची
शब्दाला नाही जमिनीवरची सीमा
शब्दाला अंगणमाया आभाळाची

पसरते कधी मोत्यांच्यासोबत काजळ
निश्चेष्ट राहतो फुटल्यावरही कातळ
अव्यक्त व्यथांचा जिथे साचतो डोह
शब्दाची गंगा तिथुन वाहते खळखळ

उद्ध्वस्त समाधी कुणी बांधली नसते
स्वेच्छेने कुठले झाड कधी ना वठते
सत्याला असते अदमासाची जोड
ही भेट अनोखी शब्दपुलावर घडते

शब्दाला जाती, धर्म नि पंथ न ठावे
शब्दाला सगळे रंग नि गंध मिळावे
शब्दाचे चाले भ्रमण दिशांतुन दाही
शब्दाचे पाउल शब्दालाच दिसावे

....रसप....
१६ एप्रिल २०१४ 

Saturday, April 12, 2014

तमाम उम्र का तनहा सफ़र - उमराव जान

रात्रीच्या मंद थंड हवेत तरळणारा रातराणीचा सुवास ज्याला भुलवत नाही असा माणूस विरळाच. दिवसभराचा थकवा, मरगळ दूर करणारा हा सुगंध. खिडकीत डोकावणारी रातराणीची फांदी आणि त्या फांदीच्या आडून चोरून पाहणारा चंद्र ही तर रोमान्सची परिसीमा असावी. सौंदर्याचा कडेलोट असावा.
पण प्रत्येक दैवी सौंदर्याला काही न काही शापच असतो.
कदाचित ज्याप्रमाणे अनेक घाव सोसून पैलू पाडले गेल्यावर हीरा तयार होतो, आगीतून पोळून निघाल्यावर सोन्याची परीक्षा होते तसंच नशीबाचे भोग भोगणारेच चेहरे सौंदर्याची व्याख्या ठरत असावेत.
रातराणीला शाप आहे, झाडापासून वेगळे झाल्याबरोबर सुगंधास मुकण्याचा, चंद्राला शाप आहे डागांचा आणि फक्त रात्रीच्या अंधारातच दृष्टीस लुभावण्याचा.
अन् 'अमीरन'ला शाप आहे 'उमराव जान' असण्याचा....

कब मिली थी कहाँ बिछड़ी थी हमें याद नहीं
ज़िंदगी तुझको तो बस ख़्वाब में देखा हमने

'अमीरन'ची व्यथा शहरयार साहेबांनी ह्या शेरात, चिमटीत फुलपाखरू पकडावं इतक्या अचूक व नाजूकपणे मांडली आहे.
वडिलांच्या दुश्मनीची किंमत बालवयातील अमीरनला मोजावी लागते, ते स्वत:चं अख्खं आयुष्यच गहाण टाकून. पोरवयात अपहरण करून कोठ्यांवर विकल्या जाणाऱ्या अनेक मुलींपैकी एक फैझाबादची अमीरन लखनौला येते आणि 'उमराव जान' (रेखा) बनते.
जवारीदार आवाज, आरस्पानी सौंदर्य आणि तरलपणे हृदयास भिडणारी शायरी ह्यांमुळे 'उमराव जान अदा' लखनौच्या अनेक नवाबजाद्यांना जिंकते. तिच्या मनाला जिंकणारा नवाब मात्र तिला 'सुलतान' (फ़ारूक़ शेख) मध्येच दिसतो. प्रेम फुलतं. पण कसं ?

तुझको रुसवा न किया खुद भी पशेमाँ न हुये
इश्क़ की रस्म को इस तरह निभाया हमने

जे हवं, ते न मिळण्याची; सर्वात आवडत्या गोष्टींना त्यागण्याची उमरावला तिच्या जिंदगानीने सवयच लावलेली असते. पण आयुष्याशी ही पाठशिवणी किती खेळायची ? हा प्रश्न उमरावला पडणार असतोच. पडतोच.
ती ह्या चक्रव्यूहातून बाहेर पडायचा प्रयत्न करते. पण चेहऱ्यावर गोंदवलेलं सत्य आरसा बदलल्याने जात नसतं.

तमाम उम्र का हिसाब मांगती है ज़िन्दगी
यह मेरा दिल कहे तो क्या, यह खुद से शर्मसार है

हे कडवट सत्य उमगलेली उमराव, जेव्हा उध्वस्त झालेल्या आपल्या जुन्या कोठ्यावर परत येते, तेव्हा समोर असलेल्या जुन्या आरश्यात स्वत:चं उध्वस्त झालेलं आयुष्यच पाहते. तीच नव्हे, तिला बघणारे आपणही तेच बघत असतो. इथेच उमराव हरते.
पण सिनेमा जिंकतो.
आणि आपल्याला प्रश्न पडतो की एक अप्रतिम सिनेमा पाहिल्याचा आनंद मनात जपावा की एक अभेद्य शून्य आमरण जगणाऱ्या अनेक 'अमीरनां'चं प्रतीक म्हणून दिसलेल्या 'उमराव जान'च्या व्यथेने व्याकुळ व्हावं ?एक संवेदनशील मन काही वेळ हळहळतं. मग मनाच्या कुठल्याश्या कोपऱ्यात, सरकारी कचेरीत धूळ खात पडणाऱ्या फायलींच्या गठ्ठ्याप्रमाणे जपलेल्या अनेक 'पीड पराईं'च्या ढिगाऱ्यात अजून एक निस्तेज रातराणी पडते.

यह किस मुकाम पर हयात, मुझको लेके आ गई
न बस खुशी पे कहां, न ग़म पे इख्तियार है

ही उदासीनता उमरावला येणं स्वाभाविक पण आपल्याला का यावी ?
खरंच आली आहे का ?
हे प्रश्न पडणे म्हणजेच उदासीनता आलेली नाही असे नाही का ? आपली हताशा आपणच आपल्यापासून लपवण्यासाठी हे उदासीनतेचं नाटक करतो आहे का ?

'मिर्झा हादी रुसवा' ह्यांच्या 'उमराव जान अदा' ह्या कादंबरीवर आधारलेला 'मुझफ्फर अली' ह्यांचा 'उमराव जान' त्या कहाणीसोबत, पात्रांसोबत न्याय करतो. पण प्रेक्षकांसोबत नाही. त्यांना तो फार त्रास देतो. बेचैन करतो. आपल्याच प्रतिबिंबावरून हात फिरवून जेव्हा उमराव ते न बदललेलं प्रतिबिंब स्वीकारते, तेव्हा समाजाने नाकारलेल्या तिने आपलं संपूर्ण मन व्यापलेलं असतं. काही क्षण तर इतकं व्यापलेलं असतं की एक विलक्षण घुसमट जाणवते.

हा त्रास मुझफ्फर अलींसह तीन व्यक्ती देतात.

रेखा - तिच्याशिवाय उमराव कुणी साकारू शकलं असतं का ? अवघडच होतं ! रेखा ही चालती-बोलती शायरी दिसते. तिच्या डोळ्यांतून दु:ख, व्यथेचा सुगंधित पाझर सतत होत असावा असं वाटतं. पण असं असतानाही ती 'पाकिजा'सारखी सदैव रडीयल दिसत नाही. आपण कुणी नवाब-बिवाब नसलो, तरी नकळत तिच्यावर किंचित का होईना भाळतोच.

शहरयार -
इस अंजुमन में आपको आना है बार बार
दीवार-ओ-दर को गौर से पहचान लीजिये
कहिये तो आसमान को ज़मीन पर उतार लाएं
मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिये

हर मुलाक़ात का अंजाम जुदाई क्यूँ है
अब तो हर वक़्त यही बात सताती है हमें

ऐ 'अदा' और सुनाये भी तो क्या हाल अपना
उम्र का लम्बा सफ़र तय किया तनहा हमने

अश्या अशआरांतून शहरयार ती-ती भावना ज्या नजाकतीने मांडतात त्याला तोड नाही. 'तमाम उमर का हिसाब मांगती है जिंदगी' किंवा 'जिंदगी तुझको तो बस ख्वाब में देखा हमने' असे त्यांचे शब्द तर काळजात रुततात.

खय्याम - खय्याम साहेबांनी प्रत्येक गाणं म्हणजे एकेक अध्याय केला आहे. सारंगीचा इतका अप्रतिम वापर फार क्वचितच आढळतो. उमरावची व्यथा व शहरयारच्या शब्दांतल्या आर्ततेला साजेसा आवाज आशा बाईंचाच आहे, हे त्यांच्या चाणाक्षतेने अचूक ताडलं आणि प्रत्येक गाणं म्हणजे २४ कॅरेट सोनं बनलं आहे.

'उमराव जान' इतक्यात तरी पुन्हा पाहायची हिंमत माझ्यात नाही. अजून काही दिवसांनी/ महिन्यांनी जेव्हा ती हिंमत परत येईल तेव्हा मी कदाचित अजून काही लिहू शकीन.
तूर्तास इतकेच.

रेटिंग - __/\__

Wednesday, April 09, 2014

स्वप्नरंजन

ती मला विसरते तेव्हा हसून म्हणते..
"मी गंमत म्हणून तुझी परीक्षा घेते!"

प्राजक्तक्षणांनी अंगण मी सजवावे
ती पदर लहरुनी फुलांस साऱ्या नेते

निघण्याचा क्षण बसतो जेव्हा बाजूला
तेव्हाच नेमकी भेटण्यास ती येते

मन भरेल तोवर तिला बघू दे देवा
तू बोल तुला मी देतो काय हवे ते

वेदना लपवण्या जागा उरली नाही
अन् ती तळहाती पापणपारा देते

ह्या स्वप्नरंजनासाठी केवळ निजतो,
जाणीव तिच्या नसण्याची मन पोखरते

....रसप....
९ एप्रिल २०१४ 
Related Posts Plugin for WordPress, Blogger...