Tuesday, April 29, 2014

१९९२

दुपारची वेळ होती. आम्ही जेवायला बसलो होतो. त्या काळी आमच्याकडे डायनिंग टेबल वगैरे नव्हतं. घरात तेव्हढी जागाही नव्हती. नाकपुडीएव्हढ्या दोन खोल्या, एक हॉल आणि एक आतली. आणि त्यांच्या साधारण एक तृतीयांश स्वैपाकघर. असं ते सरकारी क्वार्टर होतं.
अचानक एक मोठ्ठा आवाज झाला आणि जमिनीवर, पुढ्यात ठेवलेलं जेवणाचं ताट थरथरलं.
का कुणास ठाऊक.. काही विशेष वाटलं नाही. ते दिवसच तसे होते. - १९९२ चा डिसेंबर. त्याच वर्षी आम्ही बदलापूरहून मुंबईत आलो होतो. मुंबईची पहिली ओळख मला झाली ती काविळीने आणि दुसरी ओळख झाली दंगलीने. - त्या आवाजाचं नेमकं कारण आम्हाला कळलं नव्हतं. पण इतका अंदाज आला की कुठे तरी काही तरी 'उडवलं' आहे.
नंतर कळलं. पारकर हॉटेल. घरापासून काही मीटर अंतरावर होतं. ते पेटवलं होतं. अजून काही स्फोट झाले. तिथले सिलेंडर फुटत होते. सामानाचे तुकडे हवेत उडून घराजवळ पडले होते.

दंगलीचे दिवस फार विलक्षण होते.
आज लोक तावातावाने गुजरात दंगलींबद्दल बोलतात. तेव्हा मला ते दिवस आठवतात.
पश्चिम द्रुतगती मार्गावर लष्कराचं ध्वजसंचालन आठवतं.
वातावरणातली एक कर्कश्य शांतता आठवते.
आज पुढच्या गल्लीत एकाला जाळलं. परवा समोरच्या चौकात एकाला भोसकलं. रात्री दोन जणांना बस स्टॉपवर पोलिसांनी हत्यारांसह पकडलं. अश्या बातम्या रोजच्याच होत्या.
आठवतं की १२ मार्चला सिरीयल बॉम्बस्फोट झाले तेव्हा शाळा अर्ध्यात सोडली होती. बाबा ऑफिसमध्येच राहिले होते आणि दुसऱ्या दिवशी परतले होते.

आमच्या कॉलनीच्या आजूबाजूला अनेक संवेदनशील, अति-संवेदनशील भाग होते. बेहरामपाडा, भारतनगर, टाटानगर, खेरवाडी, निर्मलनगर आणि कलानगरपासून जवळच असलेलं धारावी. अफवांचं नुसतं पीक आलेलं होतं त्या दिवसांत.
एक दिवस संध्याकाळी कुणी तरी म्हणालं की रात्री कॉलनीवर हल्ला करायचा प्लान केला आहे 'त्यांनी'. लगेच कॉलनीतल्या तरुण मुलांनी दगड, सोडावोटरच्या, इतर काचेच्या बाटल्या आणि मिळेल, जमेल ती सामुग्री घेऊन गच्चीवर दबा धरला. सगळ्यांना घरात काही न काही 'संरक्षक' सामान जवळ बाळगायला सांगितलं.
झालं काहीच नाही. पण रात्र प्रचंड बेचैनीची होती.

अश्या अनेक बेचैन रात्री आणि तणावपूर्ण दिवस त्या दोन तीन महिन्यात अनुभवले.
आमच्या कॉलनीत, अगदी शेजारी अन्यधर्मीय लोक होते. ह्या सगळ्या काळात ना त्यांना असुरक्षित वाटलं, ना आम्हाला विचित्र. दंगलीच्या दिवसांत आम्ही सगळे घराबाहेरच असलेल्या मैदानात क्रिकेट खेळायचो. जे काही विद्वेषाचं वातावरण इतरांना जाणवत असे, ते आम्हाला कधीच जाणवलं नाही. आमच्यासाठी ते दिवस शाळेला सुट्टीचे आणि क्रिकेट खेळण्याचे होते.
पुढच्या वर्षीच्या ईदला कदीर मुलानीच्या घरचा शीर कोर्मा आम्ही नेहमीच्याच चवीने ओरपला होता आणि गणपती-दिवाळीला फराळही पोहोचवला होता.

दंगल करणारे काही मोजके लोक असतात. सामान्य माणसाला फक्त आपल्या सभोवतालच्या शांततेविषयी देणं-घेणं असतं. तणाव ओसरला, कर्फ्यू उठला की प्रत्येकाला आपापल्या कामधंद्यावर रुजू व्हायचं असतं. कामावर जाताना, लोकल/ बसमध्ये पोटाला पोट, पाठीला पाठ, खांद्याला खांदा लावून बाजूला उभा असलेला 'सुधीर' आहे की 'कदीर' ह्याने श्याटभरही फरक पडत नसतो.

पण ह्या नको त्या घटनांना, ज्या पूर्णपणे विस्मृतीत जाऊ शकतात, काही सो कॉल्ड सेक्युलर किंवा देशाभिमानी लोक विसरू देत नाहीत. जखमेवर खपली धरली की पुन्हा पुन्हा ती खरवडून काढत राहतात.
एक फंडा आहे. 'Material Handling' मध्ये.
"The best way of Material Handling is NO HANDLING."
सामान आलं की डायरेक्ट प्रोडक्शनला घेणं किंवा त्याच्या नियोजित जागी, सुयोग्य पद्धतीने ठेवणं व त्यानंतर तेव्हाच हलवणं जेव्हा प्रोडक्शन लाईनवर जाणार असेल.
'सेक्युलरिझम' वगैरे गोंडस शब्दही असेच.
सेक्युलरिझम म्हणजे काय ?
शब्दश: अर्थ नकोय. तो तर कुठल्याही डिक्शनारित मिळेल.
विविध सामाजिक घटकांशी सुरुवातीपासूनच समभाव असायला हवा. फक्त काही तरी अप्रिय, अयोग्य घडलं की गोंजारुन 'मी सेक्युलर आहे' असा ऊर बडवणं म्हणजे सेक्युलरिझम नाही. खरा सेक्युलर तोच असतो, ज्याला कधी सांगावं लागत नाही की तो सेक्युलर आहे.
दुसऱ्याला धर्मवेडा, जातीयवादी आणि स्वत:ला सेक्युलर म्हणणारा कधीच सेक्युलर असू शकत नाही कारण तो भेदभावाचा कीडा त्याच्या मनात, डोक्यात वळवळला असतो, म्हणूनच तो असं बोलत असतो.

असो.

जातीय, धार्मिक दंगली हा भारताचा इतिहासच आहे. इथली Unity in Diversity अशीच आहे. महत्वाचे हेच की जेव्हा अश्या घटना घडतील, तेव्हा लहान मुलांनी त्या दिवसांना 'शाळेला सुट्टी' ह्याच विचाराने अनुभवलं पाहिजे. कारण त्या मागचं 'राजकारण' त्यांच्या बालबुद्धीच्या पुढचं असतं, नेहमीच. किंबहुना, त्यांच्या आई-वडिलांनाही अनेकदा ते समजलेलं नसतं.

- रणजित
(लोकलच्या गच्च भरलेल्या डब्याच्या दरवाज्यातल्या तीन इंची पट्टीवर लोंबकळताना आयुष्यातील परमोच्च सुख अनुभवणारा एक मुंबईकर.) 

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...