Saturday, June 28, 2014

मुझे चलते जाना हैं, पंचम !

जुन्या जीन्सच्या खिश्यातुनी, जशी मिळावी नोट जुनी
तसाच आनंद लाभतो, तुझा शोध पण खरा हवा

अनपेक्षितपणे मिळालेली एखादी दहाची नोटही आनंदाच्या उकळ्या आणते. असाच एक काल अनुभव आला.
एके ठिकाणी बरेच दिवस पैसे अडकून राहिले होते. एखादा मध्यमवर्गीय सुशिक्षित माणूस जितक्या तीव्रतेने भांडू शकतो, तितकं भांडून झाल्यावरही काही परिणाम झाला नव्हता. शेवटी अक्कलखाती नुकसान जमा करून मी नाद सोडून दिला होता.
अचानक काल ते पैसे मिळाले. तो काही हजारांचा चेक मला काही करोडोंचा वाटत होता !
आता शुक्रवारच्या दिवशी असं काही अनपेक्षित आनंददायी घडणं म्हणजे अपरिहार्यपणे सेलिब्रेशन करावंच लागतं ! आरक्षण मिळाल्यावर आपल्यासाठी आपणच राखून ठेवलेल्या रंगाचा झेंडा फडकवावा, तसा घरी आल्याबरोब्बर मी तो चेक घरच्यांसमोर फडकवला आणि 'झिंदाबाद'च्या आविर्भावात एक घोषणाही करून टाकली की.. 'आज पार्टी करायची!' सहसा झेंडा आणि त्याखाली आवाज असेल, तर मध्यमवर्गीय माणूस जास्त डोकं लावत नाही. घरच्यांनीही तेच केलं आणि मी परवानगी गृहीत धरून तयारीला लागलो.
पण बायकोच्या कपाळावर एक अस्पष्टशी आठी दिसत होती आणि बारीक पंक्चर असलेल्या टायरमधून जशी थोडी थोडी हवा कमी होत जात असते, तसंच काहीसं मला जाणवू लागलं. माझं पंक्चर मी शोधत होतो, पण मिळत नव्हतं. उत्साहाची हवा उतरत होती आणि माझ्याच दोन मनांचं आपसांत होकार-नकाराचं एक द्वंद्व जुंपलं होतं.
इतक्यात फोन वाजला. ताई होती.
'आज आरडीचा प्रोग्राम आहे, लक्षात आहे नं ?'

आह्ह !
एक ठोका चुकला. त्या चुकलेल्या ठोक्याचा हिशोब जुळवण्यात दोन मनं गुंतली आणि त्याच बेसावधपणी मी टीव्ही लावला. प्रोग्राम सुरु होत होता.
'ब्रम्हानंद सिंग' ह्यांनी 'राहुलदेव बर्मन'वर बनवलेली एक फिल्म - "पंचम - मुझे चलते जाना हैं".अमीन सयानी बोलत होता.
'घर आजा घिर आये' मधला लताबाईंचा आवाज.. रखरखाटात पोळलेल्या अंगावर पावसाचे थेंब पडावे, तसं मला मोहरल्यासारखं वाटलं, अंकुरल्यासारखं वाटलं.
मग शम्मी कपूर आला. आशाताई मस्टच होत्या. मन्ना डे आले. मनोहारी सिंग, भूपिंदर, पंचमचे सहाय्यक, मित्र, अनेक जण आले. आजच्या पिढीचे काही संगीतकार आले. विशाल भारद्वाजने जेव्हा म्हटलं की, 'माझी अर्धी उर्जा माझ्या संगीतातून पंचमदांना वेगळं करण्यात जाते'; तेव्हा त्याच्या डोळ्यातली कृतज्ञता तीच होती जी शांतनू मोइत्राच्या डोळ्यात 'पियू बोले'वर पंचमची छाप कशी आहे, हे सांगताना होती. शंकर महादेवनने अगदी मनातलं वाक्य म्हटलं.. 'He was ahead of time.'

गाण्यांच्या जन्मकथा उलगडल्या जात होत्या. किस्से सांगितले जात होते. काही ऐकलेले, माहित असलेले; तर काही नवीन होते. सगळेच भरभरून बोलत होते. त्या त्या काळात, त्या त्या दिवसांत प्रत्येक जण घेऊन जात होता आणि परत आणत होता. मी झोके घेत होतो. शब्द वेचत होतो.
गुलजार आणि जावेद अख्तरचे शब्द मात्र वेचावे लागले नाहीत. ते रुतलेच काळजात.
'आयुष्यातल्या सर्वोत्तम सृजनात्मक दिवसांत जेव्हा एक कलाकार स्वत:च्या शोधात असतो तेव्हा तो मला भेटला होता.' हे म्हणणारा गुलजार स्वत:च एक कविता झाला होता. ती त्याची कविता त्याच्या नकळत, त्याच्या डोळ्यांतून, त्याच्या राखाडी मिशीपर्यंत वाहिली. कॅमेरा फार क्रूर असतो. त्याने ती टिपलीच.
कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात, पंचमला इंडस्ट्रीने कसं नाकारलं हे ऐकताना - 'सच कहता हूँ सारी दुनिया दुश्मन हो जाती हैं' - आठवलं.
पंचम गेल्यावर लोकांना पंचम दुप्पट, चौपट, किती तरी पट आवडायला लागला. त्याची उणीव जाणवायला लागली. एक पोकळी कायमस्वरूपी निर्वात झाल्याचं कळायला लागलं. जावेद अख्तरने त्याच्या काव्याच्या 'थेट'पणाप्रमाणेच अगदी सरलतेने म्हटलं, 'Time is kind with great people.' आणि क्षणभर मला सचिनदांनी सजवलेले नीरजचे अप्रतिम शब्द आठवले -

हमसे है ज़िंदा वफ़ा और हम ही से है तेरी महफ़िल जवाँ
जब हम न होंगे तो रो रो के दुनिया ढूँढेगी मेरे निशाँ

रडले. सगळे रडले.
तो गेला. वयाच्या ५५ व्या वर्षी.
आपल्या आजूबाजूला देशाला, समाजाला जळू किंवा वाळवीसारखे लागलेले अत्यंत नालायक लोक मरता मरत नसताना आयुष्यभर लोकांना फक्त आनंदच देणारा एक कलाकार मात्र फुंकर मारून पणती विझवावी, तसा संपला ?
तो एकटाच नाही, तो गेल्यानंतरच्या ह्या काळातली किती तरी गाणी न जन्मता मेलीत. अस्वस्थ विचार भंडावून सोडत होते.

गुलजार साहेब,
तुमचा हात अचानक सोडून निघून गेलेल्या मित्रासाठी तुम्ही म्हणता 'मैं अकेला हूँ धुंद में पंचम'. तुम्ही म्हणाल हो ! अगदी सहज म्हणाल. कारण म्हणायची, लिहायची आणि त्या शब्दांनी इतरांना झपाटायची तुम्हाला सवयच आहे. पण आम्ही ? आम्ही ज्या पोकळीत दिशाहीन झालो आहोत, त्यातून बाहेर कसे येणार ? आमची व्यथा आम्हाला सांगताच येत नाही. बस्स, फक्त पिळवटलेलं काळीज घेऊन, अनाहूत आसवं गिळून आम्ही पुन्हा आमचा गाडा ढकलत जात राहतो. Because this life just moves on and on and on..

ह्या सगळ्या वैचारिक आवर्तांत हेलकावत सोडून ती फिल्म संपली.

घर, आंधी, गोलमाल, आप की कसम, किनारा, हम किसीसे कम नहीं, यादों की बारात, दीवार वगैरे सुटलेले धागे मी विणत बसलो. इक दिन बिक जायेगा, मेरा कुछ सामान, तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी वगैरे राहिलेले सूर आळवत राहिलो.
पंचम उलगडायला दोन अडीच तास खूपच कमी आहेत. आभाळ पसरायला अंतराळाचा पट हवा. जमीन फक्त आभास देते. क्षितिजाचे कुंपण जसे फसवे असते, तसेच वेळेच्या बंधनामुळे येणारे 'The End' हे शब्दही खोटारडे असतात विषयांच्या बाबतीत. विषय अर्धाच ठेवून फिल्म संपली.
पार्टीही संपली होती. डोळ्यांतच ग्लास भरले, रिचवले आणि रितेही झाले होते. पण तहान शमली नव्हती. ही तहान कदाचित शमणारही नाही, आयुष्यभर किंवा तो परत आल्याशिवाय.

कालचा दिवस नेहमीसारखाच सुरु झाला होता. संध्याकाळ अनपेक्षित धनलाभाने झाली होती. रात्र 'फिर वोही रात हैं' पासून सुरु झाली आणि पहाट 'बीती ना बिताई रैना' ला झाली. सकाळी नेहमीच्या कोरडेपणाने मी 'रोजमर्रा'चं ओझं पाठीवर घेतलं.

क्यूँ की, मुझे भी चलते जाना हैं...........

....रसप....

Tuesday, June 24, 2014

एकतर्फी प्रेम - मुंबई

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्समधलं काम दुपारीच संपलं. मित्राला फोन केला. त्याला संध्याकाळशिवाय ऑफिसातून निघणं शक्य नव्हतं. जवळजवळ ३ तास होते. लगेच बस पकडली आणि चर्चगेटला आलो. 'सुखसागर' मधला 'नीर डोसा' हादडला आणि जवळच असलेल्या मरीन ड्राईव्हला आलो. कट्ट्यावर चढून ओबेरॉय हॉटेलपर्यंत चालत गेलो आणि परत आलो. मोकळी जागा बघून बसलो.
त्या अनंत जलाशयाच्या लाटा फेसाळत समोरच्या उभट, गोलसर, त्रिकोण वगैरे आकाराच्या सिमेंटच्या दगडांवर फुटत होत्या.
मुंबईला येऊन, मरीन ड्राईव्हला बसून स्वत:शी, हवेशी, समुद्राशी गप्पा मारायची आजकाल अनेकांची एक काव्यात्म इच्छा असते. पण खरं तर इथे बसल्यावर मला काहीच सुचत नाही. कदाचित तो भन्नाट वारा सगळे विचार उडवून नेत असावा. औरंगाबादला राहून ह्याच समुद्रासाठी मी लिहिलं होतं -

तूच घे माझ्या प्रियेची काळजी आता
सागरा, मी मुंबईचा राहिलो नाही

आता काही सुचत नव्हतं. सुचावं, असं वाटतच नव्हतं.
जून महिन्याचा उत्तरार्ध होता. आत्तापर्यंत पाऊस मुंबईला दोन-तीनदा तरी स्वच्छ धुवून काढतो. पण ह्यावेळी पाऊस नव्हता. हवा मात्र ढगाळ होती, त्यामुळे उन्हाचा त्रास नव्हताच. त्यामुळे माझ्यासारखे बरेच जण दुपारच्या वेळीही शांतपणे बसून होते.
ह्या मुंबईची अनन्वित घाण पोटात घेऊनही खिदळणारा तो समुद्र रोज काय काय बघत असेल ?
त्याच्या मर्जीविरुद्ध त्याचा वापर करून बधवार पार्कच्या किनाऱ्यावर कसाब आणि त्याचे साथीदार आले होते.
कफ परेड, मरीन ड्राईव्ह, नेपियन सी सारखे उच्चभ्रू भाग आणि वरळी कोळीवाडा, माहीमची खाडी सारखे निम्नमध्यमवर्गीयांची खुराडी असलेले भाग हा समुद्र एकाच वेळी बघतो.

'माहीम' म्हटल्यावर मित्र आठवला. तो चर्चगेटला भेटणार होता, तिथून आम्ही माहीमपर्यंत एकत्र जाणार होतो. चर्चगेट स्टेशनला आलो. एक नंबरच्या फलाटावर एका चौथऱ्यावर बसून मी येणाऱ्या, जाणाऱ्या, गाडीतून उतरणाऱ्या, गाडीत शिरणाऱ्या लोकांना न्याहाळत बसलो. पुरुष, बायका, मुलं, मुली, म्हातारे, अपंग, भिकारी, मालवाहक, तिकीट असलेले, विनातिकीट पकडलेले, पोलीस, नोकरदार, व्यापारी, विद्यार्थी, रिकामटेकडे, मवाली, तृतीयपंथी, सुंदर, कुरूप वगैरे हजारो चेहरे. हजारो ते, जे मी पाहिले. त्यापेक्षा किती तरी पट माझ्या नजरेतून सुटलेही असावेत. माणसांची एक फळी जात होती, दुसरी येत होती. समुद्राच्या एकामागून एक लाटा याव्यात तश्या. अविरत.
मनात क्षणाक्षणाला वेगवेगळे विचार येत होते.
ह्या प्रत्येक चेहऱ्याची किमान एक वेगळी समस्या असेल. प्रत्येकाची एक कहाणी असेल. एक विचारसरणी असेल. ह्या जागेवर कुणाचा प्रवास संपला असेल, कुणाचा सुरु होत असेल, तर कुणाचा अजून बराच बाकी असेल. कुणी आज प्रचंड आनंदी असेल, कुणी अतिशय दु:खी असेल.. पण तरी वेळ थांबत नाहीये. आयुष्य पुढे जातच आहे. जिथे नेईल तिथे हे सगळे मुकाटपणे जात असावेत.

अपनी मर्जी से कहाँ अपने सफ़र के हम हैं
रुख हवाओं का जिधर है उधर के हम है

निदा फाजलींनी हे शब्द ह्या चाकरमान्यांसाठीच लिहिले असणार, नक्कीच.

'शहर' असलेले काही शेर उगाच आठवले. इतर काही गाणी आठवली. कविता आठवल्या. मनात सगळ्यांनी एकत्र येऊन एक कल्लोळ केला. मनात हा कल्लोळ आणि बाहेर माझ्या भोवताली नुसती धावपळ. उद्घोषणा, धाडधाड गाड्या, त्यांचे भोंगे.
कर्कश्श्य !
अनेक अस्वस्थ चेहऱ्यांमध्ये माझाही एक भेदरलेला चेहरा त्या क्षणी मिसळला असावा. कुणी उशीर होतोय म्हणून बेचैन होता, तर कुणी अंगातल्या घामाच्या धारांनी बेचैन होता, कुणी अजून कशाने, पण मी विचारांच्या थैमानाने अस्वस्थ होतो.

लोक म्हणतात, मुंबई थकत नाही, हरत नाही. बरोबर आहे, हे शहर थकत नाहीच. पण लोक मात्र थकतात. अश्याच एखाद्या ट्रेनमध्ये स्फोट झाला असेल. अश्याच एका स्टेशनवर गोळीबार झाला असेल. प्रत्येक आघाताने लोकांची एक फळी बाद होत असते. काही गडप्प होतात तर काही गप्प होतात. गेलेल्या फळीच्या जागी दुसरी फळी मोर्चा सांभाळते. शहर थकत नाही, थांबत नाही, हरत नाही. कारण लोक बदललेले असतात.

मित्राची गाडी आली. मित्रही आला. समोरच्याच गाडीत शिरून दरवाजा पकडला. गाडी सुरु झाली. गप्पा सुरु होत्याच. चालत्या लोकलच्या दरवाज्यात लागणारी हवा आणि मघाची मरीन ड्राईव्हची हवा ह्यातला फरक मी शोधत होतो.
माहीम स्टेशनच्या बाहेरील टपरीवर आम्ही एकेक कटिंग प्यायलो आणि गप्पा मारत चालत निघालो. माहीम टी-जंक्शनपर्यंत आलो. इथून तो त्याच्या घरी आणि मी चेंबुरला. समोर कलानगरहून येणारा सहा पदरी रस्ता आणि पुढ्यात आडवा सायनहून माहीमकडे जाणारा दुसरा सहा पदरी रस्ता. दोन्ही रस्ते एखाद्या कोसळत्या धबधब्याप्रमाणे अंगावर येत होते. ह्या 'T' च्या दोन्ही कोनांत माहीमच्या खाडीला जाऊन मिळणारी गलिच्छ 'मिठी' नदी आणि माझ्या पाठीमागच्या बाजूस एक मोठा कत्तलखाना अन् दुतर्फा विस्तारलेली धारावी. ही मिठी नदी तीच, जिचं एक भलंमोठं गटार केलं जाऊन कागदोपत्री तिचा उल्लेख 'नाला' करून तिला हिणवलं गेलं आणि २००५ साली जिने त्याचा बदला घेतला.
दोन्हीकडून येणारे घाणेरडे वास नाकातले केस जाळत होते. रस्ता क्रॉस करून मी त्या गटाराच्या जवळजवळ मिठीत असलेल्या बस थांब्यावर गेलो. बस लगेच आली. सायनपर्यंत जाऊ शकत होतो. तिथून रिक्षा केली आणि घरी पोहोचलो.

दिवसभराच्या पळापळीने अंगाचा चिकचिकाट झाला होता. भूक लागावी, तशी अंघोळ 'लागली' होती. स्वच्छ झालो आणि त्या सातव्या मजल्यावरील घराच्या मोठ्या ७ फुटी खिडकीत येऊन उभा राहिलो.
पूर्व द्रुतगती महामार्ग अजगरासारखा पसरला होता. त्या विशाल अजगराच्या सुस्त शरीरावरून निरनिराळ्या रंगांच्या लहान-मोठ्या मुंग्या एका शिस्तीत पुढे पुढे जात होत्या. रस्त्याच्या पलीकडे एक १७ मजली आणि एक अजून किती तरी मजली टॉवर अत्यंत माजोरड्या नजरेने सभोवताल पाहत होते. मघाची 'धारावी' कुठल्या कुठे होती. पण ह्या माजोरड्यांच्या मागे, डावी-उजवीकडेही एक बकाल वस्ती सांडलेली होती. रस्त्यावरच्या झगमगाटाच्या अर्धवट उजेडात मला त्या झोपड्यांच्या डोक्यांवर लागलेल्या केबल टीव्हीच्या छत्र्या दिसत होत्या. धारावी, बेहरामपाडा ह्या व अश्या भागात मी अनेकदा फिरलेलो असल्याने मला समोरच्या वरवर बकाल दिसणाऱ्या वस्तीतही काही घरांत एसी लावलेले असावेत, हे जाणवत होतं.
असो.

मी डोक्यावर घरघरणारा पंखा बंद केला आणि बाहेरच्या खोलीत येऊन तिथल्या पंख्याखाली डोळे मिटून सोफ्यावर बसलो. मिटलेल्या डोळ्यांसमोरून 'टी-जंक्शन' चे दोन विस्तीर्ण रस्ते आणि आत्ताही कानांना मरीन ड्राईव्हच्या समुद्राच्या गाजेप्रमाणे जाणवणारा पूर्व द्रुतगती महामार्ग हलत नव्हता.
आता गुलजारनी छेडलं..

इन उम्रसे लम्बी सड़कों को मंजिल पे पहुँचते देखा नहीं
बस दौड़ती फिरती रहती हैं हमने तो ठहरतें देखा नहीं
इस अजनबी से शहर में जाना-पहचाना ढूँढता हैं......

चार-सहा महिन्यांतून जेव्हा कधी मुंबईची वारी होते, कमी-अधिक फरकाने हा अनुभव येतोच येतो. मी मुंबईचा असलो, तरी मुंबई माझी नाही झाली. माझीच काय ? ती कधीच कुणाचीच नाही झाली. नामदेव ढसाळ तिला 'रांड' म्हणतात, तेव्हा मला आवडत नाही. पण तिला फार तर 'प्रेयसी'च म्हटलं जाऊ शकेल. अर्धांगिनी नाही. आई, बहिण नाही. आणि मैत्रीणही नाहीच. हिचं रोजचं रूप वेगळं असलं तरी नखरा तोच. ही नादाला लावते. ही बोलावते, पण स्वत: येत नाही. ही भेटली, तरी समाधान होत नाही.

रात्रीच्या बसने मी परत औरंगाबादला जाणार. ह्याही वेळी अर्धवट समाधान आणि बाकी हुरहूर उरात घेऊन. पुढच्या भेटीपर्यंत मी पुन्हा व्याकुळ होईन. असे माझ्यासारखे लाखो असतील. पण मुंबईला फरक पडत नाही. ती वाहतच राहील, धावतच राहील, थकणार नाही, हरणार नाही आणि थांबणारही नाही. ती साद देईल आणि मी पुन्हा एकदा मूर्ख प्रेमिकासारखा ओढला जाईन.
पुढच्या वेळेसही हे समोरचे माजोरडे टॉवर असेच छद्मी हसतील. कदाचित त्यांच्या जोडीने अजून दोन उभे राहिलेले असतील.

....रसप....
२४ जून २०१४

Wednesday, June 18, 2014

माझे विस्मृतीत गेलेले निकाल

परीक्षा म्हणजे माझ्यासाठी नेहमीच एक सोहळाच असायचा. माझी प्रत्येक परीक्षा अत्युत्कृष्ट व आनंददायीच गेली. गडबड फक्त निकालात व्हायची. पण अतीव क्लेश दिलेल्या घटना लक्षात न ठेवता पुढे जात राहावे, ह्या विचारावर माझा दृढ विश्वास असल्याने आता मला माझ्या कुठल्याही परीक्षेतले गुण आठवत नाहीत. एव्हढे नक्की की, प्रत्येक वेळी ते नेत्रदीपकच होते.

घटना लक्षात नसल्या तरी काही क्षण मात्र आपल्या नकळतच आपल्या मन:पटलावर कोरले जातात. दहावीच्या निकालाचा क्षणही असाच काहीसा होता.
परीक्षा संपल्यापासून मला एकच आनंद होता की, 'परीक्षा संपली !'
दहावीची परीक्षा होऊन, निकाल लागून, मिळेल त्या मार्कांसह, मिळेल त्या कॉलेजात प्रवेश घेणेच मला जास्त महत्वाचे वाटत होते. कारण वर्गातल्या प्रत्येक मुलीकडून जबरदस्तीने राखी बांधून घ्यायला लागणाऱ्या काळात माझे शालेय शिक्षण झाले. माझ्या मनात मी एक वैश्विक भाऊ त्याच्या मर्जीविरुद्ध मारून मुटकून कोंबला होता. निकालपत्र हाती पडताच त्यातील आकड्यांपेक्षा Passed ह्या शेऱ्याचे मला कौतुक होते. आता घुसमट होणार नाही, हाच एक मोठा आनंद माझ्या मनातून वाकड्या झालेल्या टिफिनमधून बाहेर येणाऱ्या भाजीच्या रश्श्याप्रमाणे हळूहळू ओघळत होता. मिळालेल्या गुणांचं मला सुतक वगैरे अजिबात नव्हतं.

माझे गुण मला नेमके आठवत नसले तरी त्यांचं एक चांगलं होतं. ते अश्या टप्प्यातले होते की माझ्यासमोर शाखा व कॉलेज ह्यांचे फार मोजकेच पर्याय होते. इतर अनेक मुलांना विशिष्ट शाखा व विशिष्ट कॉलेज निवडण्यासाठी करावा लागलेला संघर्ष मला अजिबात करावा लागला नव्हता. मी जी शाखा व जे कॉलेज निवडले, तिथे माझा नंबर शेवटच्या यादीत अगदी सहज लागला. 'कॉलेजला जाणार' ह्याच आनंदात हुरळून गेलेल्या आपल्या निरतिशय निरागस मुलाच्या चेहऱ्यावरचे निष्पाप हसू माझ्या आई, वडील व ताईला मी सदासुखी होणार असल्याची ग्वाही देत होते.

हिरवट मिसरूड फुटलेला पंधरा-सोळा वर्षांचा मी पहिल्या दिवशी कॉलेजला मोठ्या टेचात गेलो होतो. नवा कोरा शर्ट आणि जीन्स, हँगरला लटकवलेल्या कपड्यांसारखे दिसत असले तरी माझा तोरा मात्र मी स्कीनफिट्ट टी-शर्ट घातल्यासारखाच होता. तेल थापून चापून बसवलेले आणि कोंबडा काढलेले केस मला जॉय मुखर्जीसारखा लुक देत असले तरी माझ्या नजरेत मात्र मी तुरा काढलेला आमीर खानच होतो.
लौकरच मी माझ्या भोवतालच्या माधुरी दीक्षित्स, काजल्स, राणी मुखर्जीज चाणाक्ष नजरेने हेरल्या. पण मी जिथे जिथे नेम लावायचो, ते ते लक्ष्य माझा बाण सुटायच्या आतच दुसऱ्याच एखाद्या बाणाने उडवले जात असे. मग हळूहळू मी नेम धरणंच सोडून दिलं. तरी अंदाधुंद तिरंदाजी चालूच ठेवली.
स्वभावत:च खोलाकडे वाहत जाणाऱ्या पाण्याप्रमाणे मीही दुसऱ्या मजल्यावरील अकरावीच्या वर्गाकडून कॉलेजबाहेरच्या रस्त्याकडेच्या कट्ट्यावर लौकरच वाहत पोहोचलो. देशासमोर असलेल्या खेळ, राजकारण, सुरक्षा, सामाजिक व्यवस्था, आर्थिक परिस्थिती ई. आणि इतर मुलांसमोर असलेल्या प्रेम, शिक्षण, तात्विक मतभेद, घरच्यांचा त्रास, आर्थिक चणचण ई. गहन प्रश्नांवर मी रोज, माझ्यासारख्याच इतर काही हौशी स्वयंसेवकांसह चर्चा, मार्गदर्शन करत असे. आमच्या चर्चांतून मौलिक ते शिकून बरेच जण पुढे गेले पण आम्हाला कधी त्याचायत्किंचितही मत्सर वगैरे वाटला नाही. परंतु, ह्या सगळ्या व्यापात माझी कनिष्ठ महाविद्यालयातली दोन वर्षं विदर्भ, मराठवाड्याच्या आकाशातल्या ढगांप्रमाणे चुटकीसरशी निघून गेली आणि समोर बारावीची परीक्षा रुक्ष दुष्काळासारखी 'आ' वासून उभी राहिली. वर्षातले बहुतेक दिवस कॉलेजबाहेरील कट्ट्यावर मीच इतरांचा क्लास घेत असल्याने मला स्वत:ला अभ्यासासाठी वेळ मिळणं कठीण होतं. पण माझी ही प्रामाणिक अडचण बोर्ड समजून घेणार नव्हतंच आणि ज्याप्रकारे मला पाचवीत असताना नृत्यकौशल्याच्या नावाने बोंब असतानाही केवळ उंची कमी असल्याने पुढच्या ओळीत राहून ग्रुप डान्स करावा लागला होता, त्याच प्रकारे ह्या परीक्षेलाही बसावंच लागलं.
अखेरच्या षटकात ४० धावा हव्या असताना, अखेरचा खेळाडू प्रत्येक चेंडूला ज्या तावातावाने टोलवत अशक्यप्राय आव्हानाचाही पाठलाग करतो, त्याच लढाऊ बाण्याने मी प्रत्येक पेपर टोलवला होता, इतकंच मला लक्षात आहे. आधीच म्हटल्याप्रमाणे प्रत्यक्ष निकाल मी कधीच विसरून गेलो आहे.

आजकालच्या मुलांना, एक डोळा बंद करून पेपर लिहिला तरी नव्वद-बिव्वद टक्के मिळतात. मला त्यांची एकच काळजी वाटते की इतके मार्क्स मिळाल्यावर पुढे नक्की काय करायचं ह्या विचाराने ते किती गोंधळत असतील. Thank god, मला असा प्रश्न कधी पडलाच नाही. कारण हा प्रश्न माझ्यासाठी माझ्या निकालानेच निकालात काढलेला असायचा.

जाता जाता एक विचार मनात आला. गुण लक्षात न राहण्यामागे अजून एक कारण असावं. गेल्या कित्येक वर्षांत मला कुणीही त्यांबद्दल विचारलंच नाहीये ! असं का बरं ?

....रसप....
१८ जून २०१४

Monday, June 16, 2014

माझी-तिची संभाषणे..

तू बालमन आहेस अन् हातातले मी खेळणे*
मर्जीप्रमाणे खेळलो तर ठीक, अथवा तोडणे

माझी-तिची संभाषणे बस्स् भांडणाची कारणे
ती टाळल्याचे बोलता मी बोलण्याचे टाळणे

असतात काही सांडलेले शब्द माझ्याभोवती
ज्यांना कधी ओळींमधे जमलेच नाही मावणे

ह्या जीवघेण्या शांततेला तोड जाताना तरी
जपण्यास दे जखमा उरी, इतकेच आहे मागणे

ओथंबल्या डोळ्यांत पाणी अडवणे सोपे नसे
ढगही जिथे भरतो तिथे नक्कीच असते सांडणे

भडिमार वेळेचा तुझा थोडाच थांबव, जीवना
जगलो कधी जे दोन क्षण राहून गेले वेचणे

'टेरेसवाले घर हवे' शहरात आहे मागणी
गावात त्यांच्या पसरली ओसाडलेली अंगणे

....रसप....
१४ जून २०१४

(* - हा शेर/ मतला वैभव कुलकर्णी (वैवकु)च्या 'खेळणे' कवितेसाठी. :-) )

Tuesday, June 10, 2014

खुशनुमा सहर !!

सकाळी ९:४२ ते ९:४७ च्या दरम्यानची वेळ.
ठाण्याहून दादर अन् दादरहून महालक्ष्मी ट्रेनने आणि महालक्ष्मीहून वरळी बसने, अश्या उड्या मारत आणि नेहरू सेंटरच्या स्टॉपवर उतरून रस्ता क्रॉस करून पलीकडच्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावरील ऑफिसकडे, लिफ्टचा नाद सोडून, धाव घेत कसं-बसं ९:४५ चं 'पंचिंग' गाठायचं किंवा एखाद्या मिनिटाने चुकल्याने चुकचुकत ऑफिसमध्ये, आपल्या डिपार्टमेंटमध्ये शिरायचं, की उजवीकडच्या कोपऱ्यातून आवाज यायचा -

"खुशनुमा सहर, रणजित भाई !"

व्होराजी.
साधारण माझ्या वडिलांच्या वयाचे असतील. पण गुजराती परंपरेप्रमाणे ते सगळ्यांना 'भाई'च म्हणत, अगदी आमच्या 'हेड'लाही.

प्रचंड धावपळ करून, कावलेल्या चेहऱ्याने आम्ही ऑफिसला पोहोचायचो आणि व्होराजींचा प्रसन्न चेहरा एका क्षणात आमचा सगळा वैताग दूर करायचा.
'खुशनुमा सहर' हे ते फक्त मलाच म्हणत. बाकी सर्वांना 'गुड मॉर्निंग'. मी किंचित कवी आणि गायक आहे, हेच त्यांना मला जराशी स्पेशल ट्रीटमेंट देण्यासाठी पुरेसं होतं.
व्होराजी खरं तर निवृत्तीचं वय गाठलेले होते. त्यांना निवृत्तही व्हायचं होतं. पण कंपनीतील एक सर्वात जुना माणूस होता तो. त्यांना मालकांनी फक्त येत जा, जितकं जमेल तितकं काम करा, अशी मुभा दिली होती. व्होराजींचं म्हणणं एकच होतं. 'सर, अब मुझे म्युझिक सुनना है. जी भर के मुकेश सुनुंगा और गाऊँगा. यहाँ आऊंगा तो वक़्त नहीं मिलेगा !' सरांनी आयटीला ताबडतोब आदेश सोडला की, व्होराजींना फुल्ल इंटरनेट, साउंड कार्ड वगैरे जे काही लागेल सगळं देणे.
बस्स. काम उरकल्यावर उरलेल्या वेळात इतर लोक टवाळक्या करत, व्होराजी युट्युबवर मुकेश ऐकत. ऐकता ऐकता गुणगुणत...

'संग तुम्हारे दो घडी बीत गयें जो पल
जल भर के मेरे नैन में आज हुएँ ओझल
सुख लेके दुःख दे गयी दो अँखियाँ चंचल'

सुंदर गात. एकदम 'व्हॉइस ऑफ मुकेश'च. त्यांचं गाणं, गाणी ऐकणं सर्वांना मान्य होतं. मालकाने अप्रूव्ह केलं होतं म्हणून नाही. मनापासून. आमचा हेड ऑफ द डिपार्टमेंट त्यांच्या अर्ध्या वयाचा असेल. त्याने मुकेशच काय, कुमार सानुच्या आधीचं काही ऐकलेलंच नव्हतं आणि इतर बहुतेक जणांनीही. पण तरी, व्होराजींचा 'चार्म' असा काही होता की लोक त्यांचा आवाज कानात साठवून घ्यायचे.

खरं तर मला मुकेश कधीच आवडला नाही. पण मुकेश गाणारे व्होराजी आवडायचे. जीवापाड प्रेम होतं त्यांचं मुकेशवर. आणि मग कधी जरा फुरसत मिळाली, मीही मोकळा असलो की लगेच एखादा नग्मा मलाही ऐकवायचे. अधूनमधून बाबूजीही ऐकत असत ते. 'सखी मंद झाल्या तारका..' त्यांनी गुजराती उच्चारांत मला ऐकवलं आहे. 'बोलावल्या वाचूनही मृत्यू जरी आला इथे..' नंतरचं त्यांचं 'वाह, क्या बात है' नेहमी लक्षात राहील.

कुणाचा वाढदिवस वगैरे असेल, तर आम्ही केक आणायचो. तेव्हा व्होराजींचं गाणं ठरलेलंच असायचं. अश्या कुठल्या छोटेखानी फंक्शन, पार्टीमध्ये, केक कापण्यात त्यांना काही रस नसायचा. त्यांना नंतर एखादं गाणं ऐकवायचं असायचं आणि माझ्याकडून ऐकायचं असायचं, बस्स. मग मीही एखादा किशोर कुमार गाऊन घ्यायचो !

'ऐसे उजड़े आशियाने तिनके उड़ गयें
बस्तियों तक आते आते रस्ते मुड़ गयें'

व्होराजी खुश ! जागेवर परत आल्यावर लगेच मला त्यांनी गायलेलं आणि मी गायलेलं, अशी दोन्ही गाणी युट्युबवर ऐकवत. उरलेला अख्खा दिवस त्या गाण्यांतच जगत, जगवत.

पावणे दोन वर्षं तिथे काम केल्यावर मी नोकरी बदलली. औरंगाबादला आलो. पण तरी व्होराजी आठवत राहिले. कुणी 'गुड मॉर्निंग' म्हटलं की ते आठवत. कुठे मुकेश कानावर पडला की, व्होराजी आठवत.
त्यांचा नंबर मिळवला आणि परवाच, जवळजवळ साडे चार वर्षांनी त्यांना फोन केला. त्यांनीच उचलला. त्यांच्या 'हलो'ला मी 'खुशनुमा सहर, व्होराजी' इतकंच म्हटलं.
समोरून आवाज आला.. 'अरे कैसे हो रणजित भाई !!'
व्वाह ! मस्त वाटलं. तीन शब्दांत कुणी आपला आवाज इतक्या वर्षांनंतरही ओळखतंय. पुढची काही मिनिटं दिलखुलास गप्पांत गेली. त्यांनीही कंपनी सोडली आहे, हे मागेच एकदा कळलं होतं. आता त्यांचं 'रुटीन' त्यांच्या मनासारखं आहे. म्हणाले - 'अब सारा दिन सिस्टम पे गाने सुनता हूँ. वाईफ कभी कभी परेशान हो जाती हैं. मगर सह लेती हैं ! हाहाहाहा!'

काही वेळेस आपसांत काही नातं नसतं. मैत्रीही नसते. कुठलीही ओढ नसते. पण दोन व्यक्तींमध्ये एखादा असा बारीकसा धागा असतो, जो त्यांना जोडत असतो. पण हा बारीकसा धागा इतका मजबूत असतो की काळाचा ताण कितीही वाढला तरी तो जसाच्या तसाच राहतो. 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावक:' अश्या आत्म्याचाच तो धागा असावा बहुधा.
माझ्यात आणि व्होराजींत असाच एक धागा आहे. जो कधीच तुटणार नाही.
त्यांनी मला आग्रहाची विनंती किंवा विनंती वजा आज्ञा केली आहे की, 'रणजित भाई, अगली बार मुंबई आओ, तो एक पूरा दिन कांदिवली आना हैं, मेरे घर. पूरा दिन गायेंगे. महफ़िल जमायेंगे.'

ज़रूर व्होराजी.. मैं ज़रूर आउंगा. मुझे मुकेश पसंद नहीं मगर फिर भी सुनूंगा और हो सके तो एक-दो मुकेशी नग्मे मैं भी सुनाऊंगा !

- रणजित पराडकर

Monday, June 09, 2014

नाव आहे वेगळे वा बदलली आहे कथा

नाव आहे वेगळे वा बदलली आहे कथा
दु:ख ना सरले कुणाचे, संपली नाही व्यथा

मोहरे सगळे तुझे, हा पट तुझा, चाली तुझ्या
खेळतो मी, जिंकण्याची आसही आहे वृथा

आमच्या दु:खातही वाहे विनोदाची लहर
'शोक, पश्चात्ताप, अश्रू' आमची नाही प्रथा

स्थापली मूर्ती तुझी, तू जर इथे असलास तर
भग्नतेचा शाप दे चैतन्यमय कर अन्यथा

तळपत्या वाटेत दिसणारे जसे मृगजळ तसा
चालला हा खेळ आयुष्या तुझ्याशी सर्वथा

....रसप....
९ जून २०१४

Monday, June 02, 2014

हाथ आया, पर मूंह न लगा !

परविंदर अवानाने अजून एक मरतुकडा आखूड चेंडू टाकला आणि मनीष पांडेने तो सीमापार टोलवला. माझा संयम सुटला आणि मी हातातला रिमोट जोरात स्वत:च्याच मांडीवर हाणला आणि मग स्वत:च कळवळलो. मांडीवर वळ उठला. पंजाबच्या मनावरही असाच एक वळ उठला असणार कालची फायनल हरल्यानंतर. स्वत:च स्वत:ला मारून घेतल्याची खूण म्हणून.

वृद्धिमान साहाने त्याची आजवरची सर्वोत्कृष्ट ट्वेंटी२० खेळी करून, ह्या अत्यंत महत्वाच्या सामन्यात पंजाबला २०० पर्यंत नेलं होतं. खरं तर पहिल्या दहा षटकांनंतर केवळ ५८ धावा फलकावर असताना अंतिम धावसंख्या २०० पर्यंत जाईल अशी अपेक्षा धरणं म्हणजे लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने विजयाची आस ठेवण्याइतकं अशक्य वाटत होतं. पण मैदानात राहुल गांधी नव्हता, साहा होता आणि जोडीला अजून गुणवान खेळाडू मनन वोहरा. अशक्यप्राय वाटणारी धावसंख्या उभारून देऊन ह्या दोघांनी आपल्या संघाची बाजू मजबूत केली.
अंतिम सामन्यात २०० धावा पोतडीत असणं म्हणजे महिन्याच्या शेवटच्या तारखेस बँकेत अख्खा पगार तसाच असणे. पण गोलंदाजांनी पहिल्या षटकापासूनच उधळपट्टी सुरु केली आणि एका दिवसात अख्खा पगार खर्च केला.

आपल्या मर्यादा ओळखून गोलंदाजी करणे, हे ह्या आजच्या क्रिकेटमध्ये अत्यंत महत्वाचे झाले आहे.
फलंदाजांनी नवनवे फटके शोधून त्यावर हुकुमत मिळवली आहे. चेंडू टोलवत असताना मनात किंतु-परंतु नसतो. खेळपट्ट्या कतरिना कैफच्या गालांसारख्या चिकन्या असतात. सीमारेषा पूर्वी 'कानून के हाथ'सारख्या लांब असायच्या, आता घराच्या अंगणापेक्षाही लहान वाटतात. क्षेत्ररक्षणाच्या मर्यादा बैलाला मोकळं रान मिळावं, तसं फलंदाजांना मोकाट सोडतात. थोडक्यात गोलंदाजाची एकही चूक पोटात घालायचा मोठेपणा आता ह्या खेळात राहिलेला नाही. असे असतानाही अवानासारख्या गोलंदाजाने आखूड मारा करणे म्हणजे 'बजाज सनी'वर ट्रिपल सीट घेऊन घाट चढायचा प्रयत्न केल्यासारखंच !

दोन संघांतला महत्वाचा फरक त्यांच्या कर्णधारांत होता, असंही मला वाटलं. फिरकी गोलंदाजांना हाताळण्यासाठी कर्णधाराकडे सिंहाची हिंमत हवी आणि हत्तीचं काळीज. जॉर्ज बेली हा एक गुणी खेळाडू आहे, चांगला कर्णधारही आहे. पण एक कर्णधार म्हणून त्याचे शौर्य चित्त्यासारखं आहे. चित्त्याने शिकार केली, तरी ती त्याच्याकडून इतर शिकारी प्राणी हिसकावून घेतात आणि तेव्हा चित्ता लगेच माघारही घेतो.
लेगस्पिनर करणवीर सिंगला युसुफ पठाणने एक षटकार ठोकला. पुढच्याच चेंडूवर अजून एक षटकार ठोकण्याच्या नादात तो जवळजवळ बादही झाला होता, पण नशीब बलवत्तर म्हणून तो फटकाही थोडक्यात सीमारेषेवरून गेला. विकेट मिळवण्याची संधी निर्माण करत असूनही बेलीने सिंगला पुढचे षटक दिले नाही.
सर्व गोलंदाज मार खात असताना, कोलकाताच्या फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीने मदत केल्याचे पाहिलेले असताना, स्वत:चेही दोन्ही फिरकी गोलंदाज चांगले चालत असताना बेलीने १-२ षटकं मॅक्सवेलकडून करून बघायला हवी होती. २० षटकी क्रिकेटमध्ये धोका पत्करायची हिंमत असलेला कर्णधार जास्त यशस्वी ठरतो, असं मला वाटतं. काय झालं असतं ? मॅक्सवेलच्या लॉलीपॉप ऑफस्पिनवर पांडे, पठाण तुटून पडले असते ? ते तर सगळ्यांवरच तुटून पडत होते ना ! आणि ह्याच नादात एखादी महत्वाची विकेट हाती लागली असती तर ? आणि समजा मॅक्सवेलचे चेंडू वळले असते तर ? जर-तरचा हिशेब न संपणारा असतो. पण तो आजमावून पाहाणं जास्त आवश्यक असतं. इथेच धोनी सर्वश्रेष्ठ कर्णधार ठरतो. जुगार खेळायला तो नेहमीच उत्सुक असतो. इतक्या विश्वासाने तो 'ब्लाईन्ड' खेळतो की समोरच्याकडे तीन एक्के असले तरी तो क्षणभर बुचकळ्यात पडतो. गंभीरने संपूर्ण स्पर्धेत सुनील नारायणला अखेरच्या षटकांत गोलंदाजी दिली आहे. फिरकीपटूला, मग तो गूढ, अगम्य नारायण असला तरी मला नाही वाटत बेली किंवा इतर कुणाही परदेशी कर्णधाराने हाणामारीच्या षटकांत चेंडू सोपवला असता. पण हा धोका पत्करणे, ही गंभीरची सगळ्यात महत्वाची व यशस्वी खेळी ठरली. अनेक सामने कोलकाताने ह्या अखेरच्या षटकात नारायणने फलंदाजांची जी घुसमट केली, त्यामुळे जिंकले. तीन फिरकीपटू घेऊन जेव्हा एखादा कर्णधार उतरतो, तेव्हा त्याची आक्रमकताच अर्धी लढाई जिंकून जाते. जिगर लागते तीन फिरकीपटू खेळवायला.
And T20 is all about जिगर.

वाईट वाटलं पंजाबसाठी. अगदी मनापासून वाईट वाटलं. जीव तोडून खेळले होते. पण अखेरच्या टप्प्यात कमी पडले. आता पुन्हा पुढच्या वर्षी शून्यापासून सुरुवात करावी लागेल. तेव्हा तरी ह्यावेळी केलेल्या चुका परत होऊ नयेत. कारण एकही चूक पोटात घालण्याचं मोठेपण आता ह्या खेळात राहिलेलं नाही ! 
Related Posts Plugin for WordPress, Blogger...