Sunday, August 31, 2014

शुभ्र आभाळाचा एक तुकडा....

आदरपूर्वक, प्रेमपूर्वक एकेरी उल्लेख आपण सहसा मित्र, आई आणि देव ह्यांचा करत असतो. पण काही लोक असे असतात की त्यांच्यात कधी आपल्याला मित्राच्या खांद्याप्रमाणे आधार मिळतो. कधी आईच्या मायेचा ओलावा लाभतो. तर कधी एखाद्या दैवी अनुभूतीने प्रचंड बळही मिळतं. ह्या लोकांशी आपला वैयक्तिक परिचय नसतो. ते असतात कुणी खेळाडू, कलाकार, लेखक, नेते वगैरे. कदाचित, वैयक्तिक परिचय नसल्यामुळेच आपण त्यांना आपल्या नकळतच आपल्या मनात एक असं स्थान देऊन मोकळे होतो, जे आकाशातील ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ असतं. कोंदणातील हिऱ्याप्रमाणे खास, सुरक्षित असतं. असे काही लोक माझ्यासाठीही आहेत. त्यांतील प्रत्येक जण अनोखा हीरा आहे. ज्याच्या तेजाने मी पुन्हा पुन्हा दिपून जातो आणि कधी त्या जादुई प्रभेपुढे अभावितपणे नतमस्तक होतो, हात जोडतो, तर कधी त्यांच्या इतक्या जवळ ओढला जातो की त्यांना स्वत:चा किंवा स्वत:ला त्यांचा एक भागही समजू लागतो. ह्या सर्वांचा उल्लेख मी नेहमी एकेरीच करत असतो. त्यात मला त्यांचा अवमान केल्यासारखं वाटत नाही आणि इतका विश्वासही वाटतो की त्यांनाही त्यात गैर असं काही वाटणार नाही. कारण मित्र मित्राचा, मूल आईचा आणि भक्त देवाचा उल्लेख एकेरीच करत असतो.

'चित्रपट' हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. मला त्यातलं तांत्रिक व ऐतिहासिक ज्ञान फारसं नाही. पण मला चित्रपट व्हिस्की प्यायल्याप्रमाणे बघता येतो आणि आवडतंही. व्हिस्कीप्रमाणे म्हणजे घोट-घोट. पानांपानांवरून दवाचे थेंब जसे ओघळतात तशी चांगली व्हिस्की जिभेवर क्षणभर रेंगाळून गळ्यातून पोटात उतरते आणि तसाच चांगला चित्रपट कान व डोळ्यांद्वारे एकेका दृश्यातून माझ्या मनात झिरपतो.
ह्या चित्रपटाच्या आभाळाचा एक तुकडा असा आहे की त्याने शिंपडलेल्या दवाने माझ्या अंतरांगणाचा एक मोठा भाग ओथंबलेला आहे.
हा आभाळाचा तुकडा कधी 'मुसाफिर' बनतो अन् माझा हात पकडून 'मुझे चलते जाना है..' म्हणून अश्या दुनियेत फिरवून आणतो, जिथे -
दिन ने हाथ थाम कर इधर बिठा लिया
रात ने इशारे से उधर बुला लिया
- अश्याप्रकारे त्याला दिवस-रात्र खुणावतात. तर कधी 'यादों पे बसर' करणारा तो मला 'बस्तियों तक आते आते रस्ते मुड़ गयें' म्हणत 'उजडे हुये आशियाने' दाखवतो. कधी 'इक पल रातभर नहीं गुजरा'च्या भयाण व्यथेसोबतच तो 'तुम अकेलेही नहीं हो, सभी अकेले है' असा 'हाल मिल गया तुम्हारा अपने हाल से'चा दिलासा देतो, तर कधी 'सुस्तक़दम' रस्त्यांवरून 'पत्थर की हवेली से तिनको के नशेमन तक़' घेउन जातो. कधी तो एक मूक-बधीर अव्यक्त भावना कॅमेऱ्यात बांधतो, तर कधी रेल्वे स्टेशनच्या एका वेटिंग रूममध्ये भूतकाळाला उजळणी देतो. कधी रोगराईपुढे गुडघे टेकणाऱ्या मानव्याला हात देऊन उभं करणाऱ्या डॉक्टरची घुसमट दाखवतो, तर कधी राजकारण व सामाजिक आयुष्यामुळे वैयक्तिक आयुष्याची वाताहत करणारं वादळ दाखवतो.

कवी, गीतकार, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथालेखक अशी त्याची अनेक रूपं आहेत. मला मात्र 'कवी'पेक्षा त्याची इतर रूपं अधिक भावली. एक दिग्दर्शक म्हणून सत्तरच्या दशकापासून जवळजवळ ३० वर्षांत त्याने केलेल्या चित्रपटांना कधीच गल्लाभरू रूप नव्हतं. He was always ahead of his time. इजाजत, आंधी, कोशिश, मौसम, खुशबू सारख्या चित्रपटांद्वारे त्याने स्पर्श केलेले विषय कुणाही साध्या-सुध्याच्या कुवतीचे नव्हते. त्याच्यातला कवी त्याच्या दिग्दर्शनातून मला जास्त उत्कटतेने भेटला आहे.

शुभ्र, स्वच्छ कुडता-पायजमा आणि निर्विकार चेहऱ्यावर एक निर्मळ स्मितरेषा. एखाद्या योगी पुरुषाप्रमाणे वाटणारा 'गुलजार'. हाच तो आभाळाचा मूर्त तुकडा.
ती मूर्ती डोळ्यांसमोर आल्यावर असंच वाटतं की हा माणूस सुख-दु:खाच्या पुढे गेला असावा. कुठलंच दु:ख ह्याला तोडू, मोडू शकत नाही आणि कुठलंच सुख त्याला भुरळ पाडू शकत नाही. त्याची कविताही त्याच्या ह्या व्यक्तिमत्वासारखीच ! तटस्थ. भावनेच्या गुंत्यात शब्द गुरफटत नाहीत आणि शब्दांच्या विळख्यात भावना गुदमरत नाहीत. एखाद्या राजहंसाच्या नीर-क्षीर विवेकाप्रमाणे गुलजारसुद्धा स्वत:च्या कवितेतून शब्द आणि भावना वेगळ्या करू शकत असेल, इतकं ते लिखाण मला सुटसुटीत वाटतं. इथे 'कविता' म्हणजे, त्याच्या गीतांमधली कविता. पुस्तकांतला गुलजार मला -

=> इन उम्र से लम्बी सड़कों को मंज़िल पे पहुँचते देखा नहीं
=> रात की बात हैं और ज़िन्दगी, बाकी तो नहीं..
=> होठों पे लिए हुए दिल की बातें हम, जागतें रहेंगे और कितनी रातें हम
=> पास नहीं तो दूर ही होता, लेकिन कोई मेरा अपना
=> अपना किनारा नदिया की धारा हैं
=> नाम गुम जाएगा, चेहरा यह बदल जाएगा, मेरी आवाज़ ही पहचान हैं
=> आपसे भी खूबसूरत आपके अंदाज़ हैं..
=> इक बार वक़्त से लम्हा गिरा कहीं, वहाँ दास्ताँ मिली लम्हा कहीं नहीं
=> मुस्कुराऊँ कभी तो लगता हैं, जैसे होठों पे क़र्ज़ रखा हैं
=> तुम्हारी पलकों से गिरके शबनम हमारी आँखों में रुक गयी है
=> गीला मन शायद बिस्तर के पास पडा हो, वो भिजवा दो मेरा वो सामान लौटा दो
=> दिन का जो भी पहर गुजरता हैं, कोई एहसान सा उतरता हैं
=> आसमां के पार शायद और कोई आसमां होगा !

- ह्या गुलजारइतका भिडत नाही.

आज गुलजारचा वाढदिवस नाही. त्याला कुठला पुरस्कार जाहीर झाल्याची बातमीही नाही. पण, कधी कधी रात्री, अर्धवट झोपेत असतानाही एखादं गाणं आपल्याला आठवतं, कधी कधी काही कारण नसतानाही एखाद्या जुन्या मित्राची आठवण येते, अचानक कधी एखाद्या विचित्र वेळी चहा पिण्याची लहर येते किंवा एकदम हुक्की येते आणि बाईक काढून रिमझिम पावसात एक लांब फेरफटका मारावासा वाटतो, तसंच काहीसं झालं आणि झिरपलेला गुलजार पेरलेल्या बीने अंकुरावं, तसा मनातून उमलून येतो आहे असं वाटलं. आणि मग हळूहळू बरंच काही आठवलं. काहीच कारण नसताना 'आनंद, बावर्ची, चुपके चुपके, अंगूर, चाची ४२०' चे डायलॉग्स आठवले. 'मेरे अपने'मधले विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, 'परिचय'मधला जितेंद्र, 'मौसम'मधली शर्मिला, 'खुशबू'मधली हेमा मालिनी, 'आंधी'मधली सुचित्रा सेन, 'नमकीन', 'अंगूर'मधला संजीवकुमार, 'कोशिश'मधली जया भादुरी, 'इजाजत'मधले नसीर-रेखा सगळे आठवले. खास गुलजारसाठी चाली राखून ठेवणारा 'पंचम' आठवला आणि मग पुन्हा 'मैं अकेला हूँ धुंद में पंचम' म्हणणारा 'गुलजार' आठवला.

पावसाळ्यातल्या एका भल्या सकाळी घराबाहेर झाडं, घरं, रस्ते, माती, दगड सगळं काही पावसाने चिंब झालं होतं आणि मी माझ्यातच फार पूर्वीपासून साठवून ठेवलेल्या दवात....

छोटासा साया था, आँखों में आया था
हमने दो बूंदो से मन भर लिया
हमको किनारा मिल गया है ज़िंदगी__/\__

- रणजित पराडकर 

Thursday, August 28, 2014

आनंद - कभी तो हसाएँ, कभी यह रुलाएँ

कविता करणं सोपंय. 'कवी' असणं अवघड. गाणं सोपंय, 'गायक' बनणं अवघड. चित्र काढणं सोपंय, 'चित्रकार' होणं अवघड.
ऑन अ लार्जर कॅनव्हास, जर 'जगणं' म्हणजे 'जिवंत राहणं'च असेल, तर 'जगणं' खूप सोपंय, हृषिदांचा, गुलजारचा, राजेश खन्नाचा, सलील चौधरीचा 'आनंद' जगणं............?


खरं सांगायचं तर 'आनंद'बद्दल सविस्तर लिहिण्याचा हा माझा पहिला प्रयत्न नाही. ह्या लेखाची अनेकदा सुरुवात झाली आहे. पण लिहिता लिहिताच एक विचित्र दडपण येऊन मी प्रत्येक वेळी लिखाण अर्धवट सोडून दिलं आहे. लिहिलेलं खोडून टाकलं आहे. कारण माझ्या मते ही एक सर्वोत्कृष्ट कलाकृती, निर्मिती होती. 'हिंदी चित्रपटाचा सर्वोच्च बिंदू कोणता होता ?' असे कुणी विचारलं तर माझं तरी उत्तर 'आनंद' हेच असेल. इतक्या अप्रतिम कलाकृतीबद्दल लिहिताना, मी तिच्यासोबत न्याय करू शकेन असं मला वाटत नाही. त्यामुळे लेख पूर्ण करण्याची हिंमत अनेकदा झालीच नाही. आजही हे लिहितो आहे ते जरी पूर्ण करू शकलो, तरी ते 'पुरेसं' नसेलच. 'आनंद'बद्दल पुरेसं लिहिणं कुणाच्याही आवाक्यातील गोष्ट नसावीच. माझ्या तर नाहीच नाही.

आजवर अगणित वेळा 'आनंद' बघून झाला असेल. ही कहाणी जरी 'आनंद सेहगल'ची असली, तरी तिला 'डॉ. भास्कर बॅनर्जी'च्याच नजरेतून पाहणे अतिशय आवश्यक आहे असं मला वाटतं. खरं तर ही ह्या दोघांची कहाणी आहे.

कविमनाचा पण नैराश्याच्या गर्तेत रुतत चाललेला एक डॉक्टर. डॉ. भास्कर बॅनर्जी. नावाजलेला कर्करोग तज्ञ. लहानपणापासूनच तसा एकालकोंडा असलेल्या भास्करचे डॉ. प्रकाश कुलकर्णीशिवाय फार कुणी मित्र नाहीत. त्याच्या सगळ्यात जवळ आहे त्याची डायरी आणि त्याची कविता. कॉलेजच्या गुलाबी दिवसांतसुद्धा भास्कर -

मौत तू एक कविता है,
मुझसे एक कविता का वादा है, मिलेगी मुझको

- अश्या तत्ववेत्त्याच्या ओळी लिहितो, ह्यावरून त्याचा अंतर्मुख स्वभाव समजून येतो. त्याच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा पैलू म्हणजे त्याचा नास्तिकतेकडे झुकणारा मनुष्याच्या कुवतीवरचा, विज्ञानावरचा विश्वास. परंतु, भोवताली पसरलेल्या रोगराई, गरिबीच्या बीभत्स ओंगळवाण्या वास्तवात गुदमरलेले हताश मानव्य त्याच्या ह्या विश्वासाला रोजच्या रोज हादरवत असतं.
'कॉलेज से डिग्री लेते वक़्त ज़िन्दगी को बचाने की कसम खायी थी, अब ऐसा लग रहा हैं की जैसे कदम कदम पर मौत को ज़िंदा रख रहा हूँ......'
असं म्हणणारा सधन, बुद्धिमान, संवेदनशील व अंतर्मुख भास्कर वास्तविकत: मानसिकदृष्ट्या अगदी व्हल्नरेबल असतो. अळवाच्या पानावरच्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे हळवा. आणि अश्या मनस्थितीत असताना त्याच्या आयुष्यात एक वादळ येतं. 'आनंद सेहगल'. एक जिवंत वादळ. किंबहुना, रोज थोडं थोडं मरत असलेलं एक जिवंत वादळ. असाध्य कर्करोगाने अक्षरश: पोखरलेला आनंद मुंबईत येतो, ते आयुष्याचे शेवटचे ३-४ महिनेच मुठीत घेऊन. ह्या शेवटच्या मोजक्या दिवसांत भास्करवर त्याचा होणारा परिणाम, त्याच्या व्यक्तिमत्वात घडणारा बदल म्हणजे हे कथानक.
आनंद मरतो आहे, तो मरणार आहे, हे आपल्याला आधीपासूनच माहित असतं. पण तराजूचं एक पारडं खाली जाताना दुसरं जसं अपरिहार्यपणे वर येत राहतं, तसं आनंदचं एकेका दिवसाने कमी होत जाणारं आयुष्य भास्करला नैराश्याच्या गर्तेतून वर खेचत आयुष्याशी गळाभेट घडवण्यापर्यंत नेत असतं.

कहीं तो ये, दिल कभी, मिल नहीं पाते
कहीं से निकल आए, जनमों के नाते

अश्याप्रकारचं एक वेगळंच नातं, ह्या दोघांत निर्माण होऊन दृढ होत असतं. 'मृत्यू'ला कविता संबोधणाऱ्या बाबू मोशाय भास्करला जगण्याला कविता मानणारा आनंद एक वेगळाच प्रवास घडवतो. स्वत:पासून स्वत:पर्यंतचा. ह्या प्रवासात त्याचे काही सहप्रवासी असतात. त्याचा जिवलग मित्र डॉ. प्रकाश व त्याची पत्नी सुमन, मेट्रन डिसा, रघू काका, ईसाभाई सुरतवाला आणि रेणू.

पहिल्याच भेटीत शाब्दिक कोट्या व शब्दांच्या फिरवाफिरवीतून आनंद त्याच्या आयुष्याविषयीच्या तत्वज्ञानाचा एक ठसा भास्करच्या व पर्यायाने आपल्याही मनावर उमटवतो.
ज़िन्दगी बड़ी होनी चाहिए, लम्बी नहीं.
मौत के डर से अगर जीना छोड़ दिया तो फिर मौत किसे कहतें हैं ?
जब तक जिंदा हूँ, मरा नहीं; जब मर गया तो साला मैं ही नहीं !
हम आनेवाले गम को खिंच तानकर आज की ख़ुशी में ले आते हैं और उसमे ज़हर घोल देतें हैं !
असे संवाद अधून मधून पेरले जात असतातच आणि हा ठसा अधिकाधिक ठळक होत जातो.

आनंद मोजक्या काही दिवसांच्या सहवासातच प्रत्येकाशी एकेक नाते जोडतो आणि आपला स्वत:चा एक छोटासा परिवार बनवतो. भास्कर - भाऊ, रेणू - वहिनी, सुमन - बहिण, मेट्रन - मम्मी, ईसाभाई - गुरु आणि दोस्त तर सगळेच. अनोळखी व्यक्तीलाही 'मुरारीलाल' म्हणून मित्र बनवण्याचा छंद!

किनारा पार करणे अशक्य असतानाही सागराच्या लाटा जश्या अविरत उसळत असतात, तसंच स्वत:च्या निश्चित अंताच्या अनिश्चिततेचं सावट सतत डोक्यावर असतानाही 'आनंद' अविरतपणे उत्साह व हास्यविनोदाच्या लहरींवर स्वार होऊन पुन्हा पुन्हा जीवनाच्या निश्चल किनाऱ्यावर जणू धडका देत -
'मौत तो इक पल हैं, आनेवाले दिनों में जो लाखो पल मैं जीनेवाला हूँ उनका क्या ?'
- असा एक रोखीचा सवाल शेवटपर्यंत करत राहतो.
'अगले जनम में मैं तुम्हारा बेटा बन के आ जाऊँगा' - ह्या मेट्रन डीसा (ललिता पवार) ला दिलेल्या त्याच्या आश्वासनपर शब्दांच्या मागे, हा जन्म संपत चालल्याची खंत म्हणूनच जाणवत नाही.
'फिर मिलेंगे' म्हणणाऱ्या 'इसाभाई'ला (जॉनी वॉकर) म्हणूनच तो श्वास अडकला असतानाही दिलखुलास हसून 'कहाँ ?' असा प्रश्न करू शकतो. ह्या दोन दृश्यांत कधीच न दिसलेले ललिता पवार व जॉनी वॉकर आपल्याला भेटतात. खडूस मेट्रन डीसाच्या डोळ्यांतील अश्रू आपल्या मनात जशी कालवाकालव करतात, तसंच बेरक्या इसाभाईचं हमसून हमसून रडणं काळीज पिळवटून जातं.

एक प्रकारची 'उदासी' कहाणीतील प्रत्येक पात्रासह आपलेही मन व्यापत असताना त्याच क्षणी आपल्याला 'आनंद'ने 'भास्कर'ला केलेला एक पारिजातकासारखा सुगंधी प्रश्न आठवतो - 'उदासी खूबसूरत नहीं होती, बाबू मोशाय?'


The woods are lovely dark and deep
But I have promises to keep
And miles to go before I sleep
And miles to go before I sleep

शाळेत असताना 'रॉबर्ट फ्रॉस्ट'च्या ह्या ओळी मोरपिसाच्या हळवेपणाने मनावर अलगद लिहिल्या गेल्या होत्या. अनेक कविता अश्याच हळवेपणाने मनात उतरल्या, झिरपल्या आहेत. प्रत्येकीची एक वेगळी जागा आहे. ह्या अनेक कवितांमध्ये एक जागा 'आनंद'चीही आहे. 'आनंद'ची बलस्थानं, प्रत्येक कलाकाराचं अप्रतिम काम, संगीत, संवाद, गीतं, लेखन, दिग्दर्शन, तांत्रिक बाजू वगैरेवर मी बोलणं टाळतोच. कारण माझ्या मते ही कलाकृती 'चित्रपट'पणाच्या पुढे गेली आहे. ती फक्त चित्रपट किंवा एक कहाणी नसून एक 'कविता' आहे. जिचं एकेक कडवं एकेकाने लिहिलं. हृषीकेश मुखर्जी, गुलजार, सलील चौधरी ह्यांनी पडद्यामागे आणि लहान-मोठ्या व्यक्तिरेखा साकारलेल्या राजेश खन्ना, अमिताभ, रमेश देव, जॉनी वॉकर, ललिता पवार, सीमा देव अश्या प्रत्येकाने ती कविता पडद्यावर पूर्ण केली. माझ्यासारख्या लाखोंनी ती पुन्हा पुन्हा ऐकली, वाचली अन् पाहिली आणि कदाचित जगाच्या अथांग पसाऱ्यात अनेकांनी अनुभवलीही असावी व अनुभवतही असावेत, कारण -

"आनंद मरा नहीं, आनंद मरतें नहीं."

....रसप....

Tuesday, August 26, 2014

नॉक आउट पंच - मर्दानी (Movie Review - Mardaani)

खरं तर ही कहाणी आजपर्यंत अनेक सिनेमांत मूळ कथानक किंवा उपकथानक म्हणून येऊन गेली आहे. टीव्हीवर, गुन्हेगारी सत्यघटनांवरील डॉक्युमेंटरी सिरियल्समध्येही अश्या प्रकरणांना पाहून झाले आहे. पण तरी डोळ्यांचं पातं लवू न देता पाहावंसं वाटतं, इथेच 'मर्दानी' जिंकतो.

सेन्सॉर सर्टिफिकेट दाखवणाऱ्या फ्रेमपासून, ते अगदी शेवटच्या दृश्यापर्यंत 'मर्दानी'त लेखक-दिग्दर्शकाने एक सूत्र १००% पाळलं आहे. 'नो नॉनसेन्स'. अनावश्यक दृश्यं, संवाद, गाणी, पात्रं, कॅमेरावर्क काही म्हणता काही नाही. फक्त तेच जे कथानकाला पुढे नेणार आहे, हातभार लावणार आहे. म्हणून साहजिकच चित्रपट दोन तासांपेक्षाही कमी लांबीचा आहे.

शिवानी रॉय (राणी मुखर्जी) निरीक्षक, मुंबई क्राईम ब्रांच. पती डॉ. बिक्रम रॉय व लहानग्या भाचीसह राहत असते. अनाथालयात राहणाऱ्या व फुलं विकणाऱ्या कुमारवयीन 'प्यारी'वर तिचा फार जीव असतो. मुलीसारखीच असते. इतकं कथानक पाहून झाल्यावरच पुढे काय घडणार आहे, ह्याची पुसटशी कल्पना आपल्याला येते.
एके दिवशी अचानक 'प्यारी' गायब होते आणि तिचा शोध घेताना शिवानीला अल्पवयीन मुलींची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचाच शोध लागतो. एका मोठ्या रॅकेटला उघड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यास ज्या किंमती मोजायला लागतात, त्या ती मोजते. धक्के पचवते, पुन्हा उभारी घेते, लढते, भिडते, हार मानत नाही.


रोहित शेट्टी, साजिद खानसारख्यांच्या अक्कलशून्य चित्रपटांमुळे बॉलीवूडला बौद्धिक दिवाळखोरीचं चालतं-बोलतं उदाहरण समजलं जात असताना 'प्रदीप सरकार'सारखा दिग्दर्शक समोर येतो. ज्या ताकदीने तो 'परिणीता'ची हळवी कहाणी सादर करतो, त्याच ताकदीने तो 'मर्दानी'ची लढत साकार करतो आणि मग शुजीत सरकार, विशाल भारद्वाज, नीरज पांडे, राजकुमार हिरानी, अभिषेक कपूर, झोया अख्तर सारखी काही गुणी नावं आठवून अवस्था इतकीही सुमार नसल्याची हमी मिळते. प्रत्येक छोट्या व्यक्तिरेखेकडूनही उत्कृष्ट कामगिरी करवून घेण्यात प्रदीप सरकार पूर्ण यशस्वी ठरले आहेत.

राणी मुखर्जीने दाखवलेली उर्जा 'मर्दानी'ची जान आहे. खरं तर ह्या भूमिकेला साकार करताना तिची देहयष्टी आड येऊ शकली असती, पण केवळ जबरदस्त उर्जेच्या जोरावर तिने ही उणीव भरून काढली आहे. आक्रमक देहबोली व अचूक संवादफेक, जोडीला खमकी नजर व जबरदस्त आत्मविश्वास अशी ही 'मर्दानी' राणीची आजवरची सर्वोत्कृष्ट भूमिका नक्कीच आहे.


राणीइतकंच लक्षात राहण्यासारखं काम केलंय नवोदित 'ताहीर भसीन'ने. सेक्स रॅकेटच्या मास्टर माइंडच्या भूमिकेतला भसीन अत्यंत संयतपणे अंगावर येणारा खलनायक साकार करतो. त्याच्या जवळजवळ प्रत्येक दृश्यात तो छाप सोडतो. इतक्या शांतपणे क्वचितच कुणी थरकाप उडवला असेल किंवा संताप आणला असेल.

आजच्या हिंदी चित्रपटावर आसूड ओढण्याच्या अहमहमिकेत उत्साहाने सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाने 'मर्दानी'सारखे चित्रपटसुद्धा पाहायला पाहिजेत. असे काही चित्रपट बघितले की हिंदी चित्रपटांचे काही अक्षम्य गुन्हे माफ करावेसे वाटतात.

रेटिंग - * * * * 

Wednesday, August 13, 2014

तुझी सावली होऊन..

'लिहा ओळीवर कविता - भाग ११६' मध्ये माझा सहभाग -

तुला रोज पाहतो मी
तुला रोज ऐकतो मी
आणि तुला भेटण्याची
रोज वाट बघतो मी

दिस हळूहळू जातो
रात वाढतच जाई
वारी चालली क्षणांची
नाही कुणालाच घाई

अनुभव पहिलाच
अशी ओढ लागण्याचा
जणू अनेक दिसांनी
आरश्यास बघण्याचा

कुणी म्हणे आदिशक्ती
कुणी म्हणे तुज काळा
माझा-तुझा अंश एक
पुरे इतकाच चाळा

तुझ्या मागून फिरावे
तुझी सावली होऊन
वीट सरकली वाटो
तुझे पाऊल पाहून

....रसप....
१३ ऑगस्ट २०१४

Related Posts Plugin for WordPress, Blogger...