Saturday, September 06, 2014

नो गोल्ड फॉर 'मेरी कोम' (Mary Kom - Movie Review)

'चक दे इंडिया' मध्ये एक दृश्य आहे. मिझोरमहून दिल्लीला भारतीय महिला हॉकी संघाच्या निवड चाचणीसाठी दोन हॉकीपटू येतात. आधी रस्त्यावरची मुलं, त्यांना चीनी समजून छेड काढतात आणि नंतर असोसिएशनचा अधिकारी त्यांना 'पाहुण्या' म्हणतो. ईशान्येकडील राज्यांतल्या भारतीयांची मूळ व्यथा हीच आहे. भारताच्या इतर प्रांतातील लोक त्यांना स्वत:सारखे मानत नाहीत आणि नकाश्यानुसार तर ते भारतात आहेतच ! एक प्रकारचा आयडेन्टीटी क्रायसिस. ह्याच्या जोडीला भौगोलिक मर्यादा आणि सततचे राजकीय व सामाजिक अस्थैर्य, असुरक्षितता. नुकतीच सुटका होऊन पुन्हा अटक झालेल्या इरोम शर्मिलांना पहा. गेल्या एका तपाहून अधिक काळ शर्मिला उपोषण करत आहेत. 'मणिपूर'मध्ये लष्कराकडून होणाऱ्या जाचाविरुद्ध, तिथे शांती नांदावी म्हणून.
असुरक्षित वातावरणात रोजगार, दळणवळण सुविधा सगळ्याचीच उणीव. त्यामुळे नजीकचे भविष्यच काय, हातावरचा आजसुद्धा अनिश्चित ! म्हणूनच राजकीय व सामाजिक अस्थैर्य असलेल्या प्रांतात सगळ्यात आधी भरडला व भरकटत जातो तो तिथला तरुण वर्ग.
अश्या एका अस्थिर वातावरणातून वर आली एम. सी. मेरी कोम. 'मेरी कोम' मधून तिच्या ह्या संघर्षावर व एकूणच बऱ्याच लोकांना बऱ्याच अंशी अनभिज्ञ असलेल्या ईशान्येकडील राज्यांतल्या विचित्र परिस्थितीवर भाष्य होईल, अशी एक माफक अपेक्षा घेऊन मी चित्रपट पाहायला गेलो आणि लक्षात आलं की कदाचित ही अपेक्षा माफक नव्हती, खूपच जास्त होती.

धावपटू मिल्खा सिंगवरील 'भाग मिल्ख भाग'मध्ये भारत-पाकिस्तान फाळणीच्या रक्तपातात, संहारात बालपण उद्ध्वस्त झाल्यावरही अथक मेहनतीच्या जोरावर परिस्थितीवर मात करून देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या एका खेळाडूची कहाणी होती. 'मेरी कोम'ची सुरुवातही एक प्रखर संघर्षमय वाटचाल दाखविली जाणार आहे, असा एक आभास निर्माण करते. दुर्दैवाने, शेवटपर्यंत तो आभास, आभासच राहतो आणि ही कहाणी एका महिला क्रीडापटूच्या कौटुंबिक संघर्ष व फेडरेशनच्या अधिकाऱ्यांशी होणाऱ्या संघर्षापुढे जातच नाही. मध्यंतरापर्यंत चित्रपट सतत अशी आशा दाखवत राहतो की १०० वर्षांत ज्या विषयाला, ज्या संघर्षाला हिंदी चित्रपटात कुणी स्पर्शही केला नाही, तो इथे दाखवला जाईल, पण तसं होत नाही आणि चित्रपटाचा पूर्वार्ध केवळ एक डॉक्युमेंटरी वाटतो.
उत्तरार्धात कहाणीत जरा 'कहाणी' येते. पण कथानकाची सगळी वळणं नेहमीचीच असतात आणि अपेक्षाभंगाची पूर्तता होते.

व्यावसायिक जीवन व कौटुंबिक जीवन ह्यातला संघर्ष कमी अधिक प्रमाणात आपण सगळेच करत असतो. व्यावसायिक आयुष्य जितकं विशाल होतं, तितकाच हा संघर्षही प्रखर होतो आणि तो प्रत्येकालाच करावा लागतो. एक उदाहरण अगदी लगेच आठवलं. १९९९ च्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान सचिन तेंडूलकरच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी सचिन इंग्लंडहून मुंबईला आला आणि अंत्यविधी पूर्ण झाल्यावर लगेच परतलासुद्धा ! तो परत आल्यावर दुसऱ्या दिवशी भारताचा झिम्बाब्वेशी सामना होता. त्या सामन्यात त्याने शतक झळकावले. सतत फिरतीवर असणाऱ्या खेळाडूंना 'वर्क-लाईफ' बॅंलन्स जुळवणं नेहमीच कठीण असतं. मेरी कोम ह्यांच्या लग्नामुळे त्यांच्या बॉक्सिंग कारकीर्दीत आलेला एक स्वल्पविराम, नंतर त्यांच्या जुळ्या मुलांच्या संगोपानामुळे होणारी ओढाताण, त्यावेळी पतीने दिलेला आधार, मुलाच्या आजारपणामुळे जीवाला लागलेला घोर ह्या बाबींवर चित्रपट केंद्रित केल्याने, चित्रपटाच्या विषयामुळे एका अत्यंत संवेदनशील समस्येला वाचा फोडण्याची संधी माझ्या मते वाया गेली आहे.


प्रियांका चोप्राने एक सुजाण अभिनेत्री म्हणून गेल्या काही वर्षांत स्वत:ला वारंवार सिद्ध केले आहे. ह्या भूमिकेतही ती जीव ओतते. तिची मेहनत खांदे, दंड व हाताच्या टरटरलेल्या स्नायूंतून रसरसून दिसते. भाषेचा लहेजाही तिने चांगलाच आत्मसात केला आहे (असावा). एका आव्हानात्मक भूमिकेला तिने पूर्णपणे न्याय दिला आहे आणि पटकथेत, संवादांत असलेल्या काही उणीवांना एक प्रकारे भरून काढलं आहे.

मेरी कोमच्या पतीच्या भूमिकेत 'दर्शन कुमार' आणि प्रशिक्षकाच्या भूमिकेत 'सुनील थापा' लक्षात राहतात.
भाजणीचं थालीपीठ तव्यावर असताना त्याचा एक मस्त खमंग सुवास घरभर पसरतो, पण पहिला घास घेतल्याबरोबर ती चव वासाच्या खमंगपणासमोर कमी पडते आणि माझा तरी अपेक्षाभंग होतो. आवडत नाही, असं नाही. पण अजून खूप काही तरी हवं असतं. 'मेरी कोम' हा विषय व चित्रपटाचे ट्रेलर ह्यांमुळे एक वेगळी अपेक्षा मनात घेऊन गेलो होतो आणि असाच एक अपेक्षाभंग वाट्यास आला. ईशान्येकडील भागाचं सुंदर दर्शन (तिथेच चित्रीकरण झाले असावे, असे गृहीत धरून) घडतं, पण त्या सौंदर्याच्याआड असलेलं एक अप्रिय वास्तव समोर येत नाही. आपण चित्रपटगृहातून एम. सी. मेरी कोम ह्या स्त्रीच्या 'स्त्री' म्हणून वैयक्तिक संघर्षाला बघून हळहळत बाहेर येतो आणि पुन्हा एकदा सेव्हन सिस्टर्सबद्दल औदासिन्यच मनात रुजवतो.

एक वेगळा विषय, त्याला पूर्णपणे न्याय दिला गेला नसला तरी, हाताळल्याबद्दल बहुतेकांना हा चित्रपट आवडेल. त्याला समीक्षकांकडून चांगले शेरेही मिळतील, पण माझ्या डोळ्यांसमोर मात्र असह्य प्रसववेदना सुरु झालेल्या असताना, बाहेरील अशांत वातावरणात लपतछपत हॉस्पिटलला जाण्याचा प्रयत्न करणारे सुरुवातीच्या दृश्यातील नवरा-बायकोच आत्तासुद्धा येत आहेत. त्यांना न्याय मिळाला नाही.

रेटिंग - * * *

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...