Tuesday, October 28, 2014

अल्ताफ चाचा - मंदिर वोही बनायेगा !


मिचमिचे डोळे. गालांपासून हनुवटीवर येऊन एखाद इंच लोंबणारी काळी-पांढरी दाढी. मिशी स्वच्छ. डोक्यावर दाढीच्या केसांपेक्षा जरा जास्त पांढरे बारिक केस. त्यांच्या मधोमध टक्कल होतं, हे मला एकदाच दिसलं. आजी गेली, त्या वेळी तो स्मशानापर्यंत गेला होता आणि परत आल्यावर त्याने अंघोळ केली तेव्हा डोक्यावरची गोल टोपी काढली होती, तेव्हा. 
साधारण ६५ ते ७० वयाचा असेल अल्ताफ चाचा. उज्जैनहून आत्या त्याला घेऊन आली होती, आमच्या नवीन घरात साधारण पाच बाय सहाचं देवघर बांधण्यासाठी. 

आत्याने जेव्हा उज्जैनच्या तिच्या घराचं काम काढलं होतं, तेव्हा सलीम म्हणून कंत्राटदार होता. 'यहाँ मुझे एक छोटा मंदिर जैसा बाँधना हैं' असं ती सलीमला म्हणाली आणि तो क्षणभर विचार करून उत्तरला,'फ़िक्र मत करो माँजी, मैं कारागीर ले आता हूँ.' दुसऱ्या दिवशी सलीमसोबत अल्ताफ चाचा हजर. त्याला जरा कमी दिसत असे म्हणून डोळे बारिक करत बोलायचा. बारिक डोळे, बारिक अंगकाठी आणि बारिकच आवाज. शांतपणे तो त्याचं काम करत राही. नमाजाच्या वेळेस नमाज पढे, जेवणाच्या वेळेस जेवे आणि चहाच्या वेळेस चहा घेई. कुठलाही अनावश्यक वेळकाढूपणा नाही. वेळच्या वेळी येणं, वेळच्या वेळी जाणं. ह्या शिस्तीत त्याचं काम चाले. 
घराची एक भिंत तोडावी लागली होती. ती तोडल्याच्या दिवशी काम पूर्ण होऊ शकलं नाही. उरलेलं भगदाड अल्ताफ चाचाने त्याच्या सोबतच्या माणसाच्या मदतीने विटा गच्च कोंबून घट्ट बंद केलं आणि आत्याला म्हणाला, 'बहनजी, यह अच्छे से बंद किया हैं. डरने की बात नहीं हैं. आप बिलकुल फ़िक्र मत करना. यह लड़का आज रात इधर ही सोयेगा.' 
देवघराचं काम पूर्ण झाल्यावर त्याने स्वत:च जाऊन एक फुलांची माळ आणली आणि ती तिथे दरवाज्याच्या वर लावली. त्याच्या चेहऱ्यावर ख्वाजा मोइनुद्दिन चिश्तीचं दर्शन झाल्याचा आनंद आत्याला दिसला होता. 

अल्ताफ चाचाचं कसब, त्याची शिस्त व अतिशय अदबशीर वागणं ह्या सगळ्याने आत्या प्रभावित झाली होती, त्यामुळे जेव्हा आम्ही बदलापूरला घर बांधायचं ठरवलं तेव्हा 'देवघर बांधायचं आणि ते अल्ताफ भाईकडूनच बांधून घ्यायचं' असं तिने जाहीर करून टाकलं ! तिने अल्ताफ चाचाला विचारलं, तो तयार झाला खरा; पण दुसऱ्या दिवशी चाचा आणि त्याचा मुलगा पुन्हा आले. मुलगा म्हणाला, 'माँजी, अब्बू को ठीक से दिखाई देता नहीं. और तबियत भी ठीक नहीं होती. दो-एक रोज़ की बात होती तो मैं उनके साथ चलता. लेकिन अब काम के लिए जाना मतलब काफी दिन लगेंगे. वो कैसे रह पायेंगे. हमें फ़िक्र हो रही हैं..'
आत्याने त्याला कसंबसं समजावलं आणि अल्ताफ चाचालासुद्धा मुंबईला यायची प्रचंड इच्छा होती म्हणून त्याने होकार दिला. निघायच्या दिवशी तो चाचाला गाडीत बसवायला आला तेव्हा पुन्हा आत्याला हात जोडून म्हणाला, 'माँजी, आप साथ में हो, बस इसी लिए मैं अब्बू को भेज रहा हूँ. वरना नहीं जाने देता.'

मग बदलापूरला आल्यावर उज्जैनच्या शिस्तीतच त्याचं काम सुरु झालं. आमच्या राहत्या घरून, डबा घेउन तो सकाळी 'साईट'वर जात असे, तो थेट संध्याकाळी अंधार झाला की मगच परतत असे. काम जवळजवळ पूर्ण झालं आणि तो बाबांना हळुच म्हणाला, 'हाजी अली दर्गाह पास में ही हैं क्या ?'
बाबाही हसून म्हणाले, 'हाँ. बहुत दूर नहीं हैं. मैं आपको कल ले जाऊँगा'

दुसऱ्या दिवशी सकाळी अल्ताफ चाचा लहान मुलासारखा तयार होऊन बाबांची वाट पाहत बसला. त्या वेळी आमच्याकडे 'साईड कार' लावलेली स्कूटर होती. बाबांनी त्याला साईड कारमध्ये बसवलं आणि दोघं हाजी अलीच्या दर्शनासाठी बदलापूरहून मुंबईला निघाले. रस्त्यात चाचाने पुन्हा पुन्हा विचारलं, 'और कितना दूर हैं.. और कितना दूर हैं ?' 
बाबा म्हणत, 'बस.. थोडासाही!'
शेवटी एकदाचे ते पोहोचले. हाजी अलीच्या दर्शनाने चाचा कृतकृत्य झाल्याचं पाहुन बाबाही कृतकृत्य झाले. चाचाच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. त्याने हाजी अलीच्या भोवतीचं पाणी चाखलं आणि म्हणाला 'यह तो खारा है !' त्याच्या अज्ञानातला निरागसपणा त्याच्या डोळ्यांत ओथंबला होता. त्याच्या मुलाच्या वयाच्या माझ्या बाबांच्या पाया पडावं की मिठी मारावी की काय हे त्याला आनंदातिशयाने कळतच नव्हतं. संध्याकाळी दोघे जेव्हा परत आले तोपर्यंत त्याचे डोळे पाणावलेलेच होते. तो पुन्हा पुन्हा बाबांचे 'शुक्रिया अता' करत होता. 

दोन दिवसांनी आत्या चाचाला घेऊन उज्जैनला परत गेली. आम्ही महिनाभराने नवीन घरात राहायला आलो. चाचाने बांधलेल्या देवघरात आमचे देव स्थानापन्न झाले. नियमितपणे त्याची आठवण यायची. आत्याशी पत्रव्यवहारात त्याची ख्यालीखुशाली विचारली, कळवली जायची. 

कालांतराने आत्याने उज्जैन सोडलं. अल्ताफ चाचाशी संपर्कही तुटला. 
बऱ्याच वर्षांनी, बहुतेक २००८/०९ मध्ये तिचं उज्जैनला जाणं झालं. महांकाळाचं दर्शन घेतलं. तिथे जवळच अल्ताफ चाचाचं घर आहे, हे तिला माहित होतं. शोधून काढलं. घरी मुलगा, सून होते. त्यांनी आत्याला बघता क्षणी ओळखलं. खूप खूष झाले. जुजबी विचारपूस झाल्याबरोबर आत्याने मुख्य मुद्द्याला हात घातला. 'अल्ताफ भाई किधर हैं ?' मुलगा व सून एकमेकांकडे बघत असतानाच आतल्या खोलीतून जमिनीवर स्वत:ला ओढत, खुरडत अल्ताफ चाचा आला. पंचेऐंशीच्या पुढचा चाचा आता हिंडू, फिरू तर शकत नव्हताच, बोलणंही बंद झालं होतं. भरल्या डोळ्यांनी त्याने दुवा दिली, खुशाली सांगितली. आत्याला त्याच्या डोळ्यांत बाबा हाजी अलीचा दर्गाह तरळल्यासारखं वाटलं. 
निरोप घेऊन आत्या तिथून निघाली. तिच्या डोळ्यांसमोर चाचाने मोठ्या मेहनतीने उभारलेली दोन्ही देवघरं पुन्हा पुन्हा येत होती. 

आता तर आम्हीही बदलापूर सोडलं आहे. आता ते घरही नाही आणि ते देवघरही नाही. पाच सहा वर्षांपूर्वी ज्या अवस्थेत अल्ताफ चाचा दिसला होता, त्यावरून कुणास ठाऊक तो तरी आहे की नाही...

अल्ताफ चाचा... मंदिर वोही बनायेगा.

....रसप....

प्रसिद्धी - मासिक 'श्री. व सौ.' - जुलै २०१५

Sunday, October 26, 2014

क्रॅपी न्यू इअर - (Movie review - Happy New Year)

घराजवळ एक हॉटेल आहे. साधंसंच. तिथले कटलेट मला जाम आवडतात. परवा मी माझे आवडते 'कटलेट' खात असताना एक मित्र आला. मी त्याला म्हटलं की 'तूही घे, मस्त असतात.' पण त्याने नाही म्हटलं.
नंतर माझं खाऊन झाल्यावर म्हणाला की, 'तुला माहित आहे का हॉटेलात कटलेट कसे बनवतात ?'
मी म्हटलं, 'नाही !'
'इतर भाज्या वगैरे बनवताना गॅस शेगडीजवळ जे सांडलेलं असतं ना ? ते गोळा करतात अन् देतात 'कटलेट' म्हणून शिजवून. आणि तुझ्यासारखे मूर्ख मस्त मिटक्या मारत खातात !'
हे खरं की खोटं, माहित नाही. पण आता मी आयुष्यात कधी 'कटलेट' हा प्रकार खाऊ शकणार नाही. काय सांगावं ! भटारखान्याच्या बंद दरवाज्याआड काय काय चालत असेल ! आपण शुद्धतेची खात्री मानून जे खातो, त्याच्याकडून किमान स्वच्छतेची अपेक्षा करावी, इतपत तरी त्याची योग्यता असेल का ?
अपेक्षा ! खरं तर अपेक्षा करणंच कधी कधी चूक असतं. इतकेच चोचले असतील तर जावंच कशाला थेटरात ? सॉरी.. हॉटेलात !
Actually थेटरात पण. हो ना ! 'मैं हूँ ना' आवडला म्हणून 'ओम शांती ओम' पाहिला. ठीक वाटला. तरी 'तीस मार खान' पाहिला. भंकस वाटला. त्या नंतरही मी अपेक्षा ठेवली की फराह खान भावापेक्षा बरी असेल आणि 'हॅपी न्यू इअर' पाहिला.
तर काही इंग्रजी सिनेमांच्या भटारखान्यात जमिनीवर सांडलेलं, पाय पडलेलं खरकटं कथानक आणि 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'मैं हूँ ना', 'चक दे इंडिया' वगैरे बनवताना शेगडीबाहेर जे सांडलं होतं ते गोळा करून संवादाचे कटलेट्स माझ्यासमोर आले. गेल्या कित्येक सिनेमांत निव्वळ धांगडधिंगा शिजवताना विशाल-शेखरकडून जे ओघळ उतरून खरपुड्या झाल्या होत्या, त्यांची गाणी बनवलीत.
खरं तर गेल्या काही काळापासून, खास करून धूम -३ नंतर आमीर खान जाम डोक्यात जायला लागला आहे. सलमान खान तर इतका दाक्षिणात्य झाला आहे की आता त्याच्या तोंडी हिंदी डायलॉग (जे त्याला असंही येतच नाही) अजिबातच शोभेनासे झालेत. त्यामुळे आत्ता कुठे मला खानांतला शाहरुखच त्यातल्या त्यात बरा आहे असं वाटायला लागलं होतं. म्हणून हा 'क्रॅपी न्यू इअर' बघायला गेलो, तर 'जतहैंजा'चा ओंगळवाणा गेट-अप शिजवून झाल्यावर जी बरबट भांड्यांना राहिली होती, ती थापलेला अगदी रोगट दिसणारा शाहरुख समोर आला.
बरं हे सगळं तब्बल तीन तास सहन करावं लागलं. कटलेटवर कटलेट, कटलेटवर कटलेट डोक्यावर थापत जाऊन डोक्याचं भलं मोठं भजं झालं आणि पायाच्या करंगळीच्या नखापर्यंत तेलकट ओघळ घेऊन मी जेव्हा घरी परतलो, तेव्हा मी परत आल्यासारखा परतलेला नव्हे तर कढईत परतल्यासारखा परतलेला दिसत होतो.

मित्राने कटलेटची रेसिपी माझं खाऊन झाल्यावर सांगितली, पण मी ती चूक करणार नाही. म्हणून मी फराह खानच्या कटलेटची रेसिपी आधीच सांगून ठेवतो.

उदरनिर्वाहासाठी 'स्ट्रीट फाईट्स' करणारा 'चार्ली' (शाहरुख) वडिलांना - मनोहरला - (अनुपम खेर) त्यांच्या हाय एंड तिजोऱ्या बनवण्याच्या धंद्यात फसवणाऱ्या चरण ग्रोव्हर (जॅकी श्रॉफ) चा वचपा काढण्यासाठी आसुसलेला असतो. वडिलांचे मित्र टॅमी (बोमन इराणी) आणि जॅग (सोनू सूद) सुद्धा त्याच बदल्याच्या आगीत होरपळत असतात. ती संधी त्यांना मिळते. ग्रोव्हरने ३०० कोटीचे हीरे, मनोहरकडून घेतलेल्या 'शालीमार' तिजोरीत ठेवले असतात. ही तिजोरी लुटायचा प्लान बनवला जातो. पण तिजोरी लुटण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात.
१. तिथपर्यंत जाणे फक्त ग्रोव्हर व त्याचा मुलगा विकी( अभिषेक बच्चन)लाच शक्य असते. म्हणून विकीचा डुप्लिकेट नंदूला उचललं जातं.
२. तिजोरीभोवती असलेलं लेजर किरणांचे संरक्षक कडं भेदायला एक हॅकरही हवा असतो म्हणून अजून एक मेंबर 'रोहन' (विवान शाह) हा (बहुतेक) जॅगचा पुतण्या (की भाचा) टीममध्ये घेतला जातो.
जिथे हीरे ठेवलेले असतात तिथे 'वर्ल्ड डान्स चॅम्पियनशिप' होणार असते. मग डान्स शिकवण्यासाठी मोहिनी (दीपिका) हेरली जाते.
अशी ही सहा जणांची टीम बनते. ती आचरट चाळे करून वात आणते.

फक्त हा आचरटपणाच जर त्यांनी ग्रोव्हरसोबत केला असता, तरी त्याने त्यांना स्वत: होऊन ३०० कोटीचे हीरे दिले असते आणि माफीही मागितली असती. पण त्यांना त्याला वात आणायचा नसतो, तर त्याची वाट लावायची असते म्हणून ते तसं न करता चोरीच करायचं ठरवतात. त्या चोरीचं पुढे काय होणार, 'वर्ल्ड डान्स चॅम्पियनशिप'चं काय होणार, हे सगळं आपल्याकडे बॉलीवूडी कटलेट्सचा तगडा अनुभव असल्याने कुठलाही आश्चर्याचा धक्का वगैरे देत नाही.विनोद म्हणून नंदूला हुकमी उलटी करणारा दाखवणं, हा विनोदाचा ओकारी आणणारा किळसवाणा प्रकार आणि 'वर्ल्ड डान्स चॅम्पियनशिप' बोलताना तोंडावर हात फिरवणं, तोंडात ब्रश केल्यासारखं बोट फिरवणं वगैरे तर पांचटपणाचा कळसच होता ! एकंदरीतच विनोदाचे सगळेच प्रयत्न एक तर केविलवाणे किंवा हिणकस आहेत.
झगमगाट आणि भडक रंगांची उधळण काही जणांचे डोळे सुखावते, दीपवते. मला तर ते पैश्याचं विकृत प्रदर्शन वाटलं. सौंदर्याला मेक अप आणि दागदागिन्यांनी मढवल्यासारखं मला वाटलं नाही, तर त्याच्या बोज्याखाली दबल्यासारखं वाटलं.

ओरिजिनल असलं, नसलं तरी एक बरं कथानक होतं. पण केवळ ढिसाळ हाताळणी आणि प्रदर्शनाच्या आहारी गेलेली कल्पकता ह्यामुळे तीन तासाचं वाटोळं होतं.
'मनवा लागे..' आणि 'इंडियावाले' ही दोन गाणी फक्त मुखड्यात छान आहेत. त्यानंतर विशाल-शेखर 'ये रे माझ्या मागल्या' करत नेहमीचीच ओढाताण किंवा धिंगाणा करतात.

कोरड्या दुपारच्या रखरखाटात अचानक कुठूनशी एखादी थंड हवेची झुळूक यावी, तशी अधूनमधून दीपिका दिसते आणि क्षणभराचा दिलासा मिळतो.
बोमन इराणी शेवटी 'बोमन इराणी' आहे, त्यामुळे सगळ्या हाराकीरीतही तो तग धरतोच.
अभिषेक बच्चन कबड्डी आणि फुटबॉलच्या मैदानावरच चांगला अभिनय करत असतो का ?
शाहरुखने सलमान किंवा आमीर बनायचा प्रयत्न न करता शाहरुखच राहावं, असं माझं प्रांजळ मत आहे. पोटावर अठ्ठावीस पॅक्स आणले तरी आधी 'हेल्दी' दिसणं महत्वाचं असतं. सोनू सूद आणि शाहरुख दोघेही ह्या सिनेमात भरपूर अंगप्रदर्शन करतात. पण ते फक्त एकालाच 'शोभतं'.

असो.
थेटरमध्ये उसळलेली गर्दी, हॉलमध्ये शिट्ट्या आणि हाळ्यांचा पाऊस ह्यावरून हे तर निश्चित की कितीही भिकार असलं तरी हे कटलेट 'कोटीचं उड्डाण' करेलच, पण म्हणून त्याला चविष्ट म्हटलंच पाहिजे असं थोडीच आहे ?

रेटिंग - धूम -३ पेक्षा जरासा बरा

Monday, October 20, 2014

अस्वस्थ

खिडकीत अवेळी रात्र थबकली आहे
क्षणभरास अविरतता व्याकुळली आहे
हा दूर सांडला निर्जन काळा रस्ता
उद्विग्न दिव्यांची रांग लागली आहे

फुटपाथावर खुरट्या गवताची पाती
अन् इमारतींतुन मिणमिणणाऱ्या वाती
जगण्याची आवड कधी न सुटली आहे
लाचार जिवांची रांग लागली आहे

दगडांसम इकडे-तिकडे मनुष्य केवळ
मानवतेचा सर्वत्र कोरडा ओघळ
झोपड्या, घरांची रेल चालली आहे
भरगच्च डब्यांची रांग लागली आहे

प्रत्येक मनाची केली लाही लाही
आयुष्याची ना कळे अपेक्षा काही
ना धूर दिसे पण आग पेटली आहे
बस् अवशेषांची रांग लागली आहे

कुणि नजर एकटी स्तब्ध गोठली आहे
पडद्यामागे अगतिकता अडली आहे
कित्येक 'आज' डोळ्यांच्या देखत गेले
कित्येक उद्यांची रांग लागली आहे

....रसप....
२० ऑक्टोबर २०१४

Thursday, October 16, 2014

क्षणैक कवडसा (डॉ. प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो)

कुठलाही चित्रपट, जर प्रदर्शित झाल्यापासून पहिल्या २-३ दिवसांत वेळ मिळाला, तरच मी थियेटरमध्ये जाऊन बघत असतो. त्यातही मराठी चित्रपटांच्या खेळांच्या वेळा अक्कलहुशारीने निवडलेल्या असल्याने (जर तो बहुचर्चित नसेल तर) अनेकदा जुळून येत नाहीत. त्यामुळे ते पाहिले जात नाहीत. 'डॉ. प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो' हा चित्रपट पहिल्या दोन दिवसांत बघता आला नाही. पण नंतरच्या दोन दिवसांत अत्यंत टोकाचे दोन रिव्ह्यू, दोन विश्वासार्ह मित्रांकडून ऐकण्यास आले आणि मग चित्रपट बघायचं ठरवलं. मतदानाच्या सुट्टीचा योगही जुळून आला आणि प्लान आखला गेला.

चित्रपटगृहाच्या आवारात असलेल्या पार्किंगमध्ये गाडी नेत असताना प्रचंड गर्दी दिसून आली. प्रथम मला असं वाटलं की बाजूलाच एका पक्षाच्या नेत्याचे संपर्क कार्यालय असल्याने ही गर्दी असावी. पण गाडी लावेपर्यंत समजुन आलं की ही चित्रपटासाठीचीच गर्दी आहे. दुसरा अंदाज असा होता की कदाचित ही गर्दी 'हैदर'साठी असेल. पण तिकीट खिडकीवर गेल्यावर कळलं की 'डॉ. प्रकाश आमटे'चीच ही गर्दी आहे आणि शो हाउसफुल आहे ! माझं तिकीट आधीच काढलं असल्याने मला चिंतेचं कारण नव्हतं, पण अनेक जण तिकीट न मिळाल्याने परत फिरत होते.

एखाद्या वनराईतून डोकं वर काढणारं एखादं उंच झाड असतं किंवा लांबच लांब पसरलेल्या खडकाळ, ओसाड भूभागावर एखादंच झाड निर्धाराने उभं असतं, त्या प्रमाणे लाखो करोडो लोकांच्या भाऊगर्दीतून एखादीच व्यक्ती असते जी स्वत:चं वेगळं अस्तित्व सिद्ध करते, वेगळा ठसा उमटवते आणि स्वत:च्या मानुषतेचं सार्थक करते. प्रसिद्धीच्या अत्युच्च शिखरावर पोहोचलेले खेळाडू असोत किंवा रसिकांच्या हृदयात वास करणारे कलाकार असोत किंवा लाखो लोकांचे पोशिंदे बनलेले कुणी उद्योजक असोत किंवा पराकोटीचा संघर्ष करून परिस्थितीशी झगडा करत तिला झुकण्यास भाग पाडणारे कुणी समाजसेवक. असे सगळेच लोक स्वकर्तृत्वाच्या जोरावर असं स्थान प्राप्त करतात की खुद्द ह्या सृष्टीच्या निर्मात्यालाही स्वत:च्या ह्या सृजनाचा गर्व व्हावा. अशीच दोन नावं म्हणजे' डॉ. प्रकाश आमटे' आणि 'डॉ. मंदाकिनी आमटे'.

ज्या काळात वैद्यकीय सेवा, ही सेवा न होता मेवा खाण्याचा एक बाजार झाला आहे, त्या काळात एक डॉक्टर जोडपं भयानकतेची पातळी गाठलेल्या प्रतिकूल परिस्थितीशी, ती परिस्थिती ओढवलेली नसताना लढा देतं, ही बाब जितकी वाटते, त्यापेक्षा किती तरी अधिक पटींनी कठीण आहे. 'पाण्यात पडलं की पोहता येतं', 'आली अंगावर, घेतली शिंगावर', 'आलिया भोगासी असावे सादर' वगैरे वचनं आपण ऐकतो, वाचतो आणि ऐकवतही असतो. कठीण परिस्थितीवर मात करण्याचं बळ ती परिस्थिती स्वत:च देते. पण, जेव्हा हे भोग आपल्या वाट्याचे असतात, तेव्हा ह्या सगळ्या वचनांचं मोल आहे. लष्करच्या भाकऱ्या भाजणाऱ्यांना प्रतिकूल परिस्थितीबद्दल निराशा व्यक्त करण्याचासुद्धा अधिकार नसतो कारण त्यांनी ती आपण होऊन स्वीकारलेली असते. म्हणूनच कुठल्याही लहान मोठ्या शहरात स्वत:ची वैद्यकी सुरु करता येत असतानाही आणि एक सुरक्षित सुखकर आयुष्य मिळण्याची शाश्वती असतानाही त्याचा त्याग करून स्वत:चे आयुष्य दुर्गम भागातील आदिवासींच्या उत्कर्षासाठी वाहून घेणारे डॉ. आमटे पती-पत्नी सृष्टीच्या असामान्य सृजनाचे जिवंत रूप आहेत. अशी असामान्य कहाणी ऐकताना, पाहताना जर काळीज हेलावलं नाही, तरच नवल ! सर्वसभवती एकाहून एक भ्रष्ट, नतद्रष्ट व दुष्ट प्रवृत्तींचेच दर्शन होत असताना, त्याच वेळी त्याच भागाच्या कुठल्याश्या एका कोपऱ्यात एक प्रवृत्ती सर्वसमर्पण भावाने कार्य करते आहे; ह्याची जाणीव जेव्हा होते, तेव्हा समजुन येतं की हजारो वाईटांना पुरून उरेल इतकं काम एकेक चांगली व्यक्ती करत असते म्हणूनच सृष्टीचा समतोल ढळून अजून तरी विनाश ओढवलेला नसावा.


'द रियल हीरो' बघताना अनेक प्रसंग अंतर्मुख करतात, अंगावर काटा आणतात, नि:शब्द करतात, विस्मयचकित करतात, कारण हा चित्रपट डॉ. आमटे पती-पत्नीची कहाणी सांगतो. पूर्ण नाही, तरी बहुतांश सांगतो. त्यापुढे तो जात नाही.
सर्व कलाकारांचा सशक्त अभिनय ही ह्या चित्रपटाची एक अविभाज्य जमेची बाजू आहे. डॉ. आमटेंची भूमिका नाना पाटेकर जगला आहे. एरव्ही अत्यंत आक्रमक अभिनय करणारा नाना इथे मात्र कुठल्याच प्रसंगात अंगावर येत नाही. एका आदिवासी महिलेची प्रसूती शस्त्रक्रिया केल्यानंतरच्या एका दृश्यात दिसलेल्या नानाला बघताना आपल्या नकळतच आपण मनातल्या मनात एक सलाम ठोकतो किंवा दंडवत करतो.

तीच कथा सोनाली कुलकर्णीची. (वैयक्तिक मत सांगायचे झाल्यास मला सोनाली कुलकर्णी अतिप्रचंड आवडते. ती नुसती पडद्यावर दिसली तरी तिने माझ्यासाठी अर्धी बाजी मारलेली असते.) डॉ. मंदाकिनी आमटेंनी ज्या समर्थपणे डॉ. प्रकाश आमटेंची साथ त्यांच्या आयुष्यात दिली असावी, त्याच समर्थपणे सो-कुल नानाची साथ पडद्यावर करते. कहाणीत साहजिकच डॉ. आमटेंच्या भूमिकेतील नानाला अधिक वाव आहे, पण तरी तिची भूमिका सहकलाकाराची न राहता, प्रत्येक प्रसंगात तीसुद्धा जान आणतेच.

इतर सहकलाकारांची नावं मला माहित नाहीत. पण प्रत्येक लहान-मोठ्या व्यक्तिरेखेला साकारणारा प्रत्येक कलाकार स्वत:चं काम अत्यंत चोखपणे वठवतो. आदिवासींच्याच भूमिकेत वावरणारे आदिवासीही खूपच सहज वाटले.

संगीत व गीतांना मर्यादित वाव आहे. पण प्रार्थना अप्रतिम जुळून आली आहे.

पटकथा, दिग्दर्शन व चित्रणात मला पूर्णपणे समाधान मिळालं नाही. आधीच सांगितल्याप्रमाणे ही कहाणीच एका महान व्यक्तिमत्वाची आहे, त्यामुळे त्या कहाणीत जात्याच दम आहे. पण तिला अजूनही खूप चांगल्याप्रकारे सादर करता आलंच असतं. उदाहरणार्थ - आदिवासींना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी झगडणारे डॉ. आमटे पती-पत्नी दोन वर्षांच्या अथक प्रतीक्षा व परिश्रमांनंतर विश्वास निर्माण करण्यात यशस्वी होतात आणि नंतर त्यांना वैद्यकीय सुविधा पुरवण्याचं काम करतात. ही कहाणी सुरु असताना अचानक त्यांनी अनेक पशुंचे पालन, संवर्धन केलं असल्याचं समोर येतं. हे प्राणी कसे आले, कुठून आले ह्याचं काहीही चित्रण चित्रपटात नाही. सुरुवातीस, 'जखमी प्राण्यांना घेउन आलो' वगैरे किरकोळ उल्लेख आहे, पण प्रत्यक्ष कथनात मात्र एकदम अनेक मोठे मोठे पिंजरे, त्यात चित्ते, वाघ, हरणं, माकडं अचानकपणे येतात. तसंच, वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी सरकारकडून पैसे मिळाले असावेत, मात्र ह्या पशूसंवर्धनासाठी लागणारा प्रचंड मोठा निधी उभारणेही एक खूप मोठा संघर्ष असला असणार आहे. ह्या संघर्षाला कहाणीमध्ये पूर्णपणे फाटा देण्यात आला आहे.

चित्रणाच्या बाबतीतही खूप कमतरता वाटल्या. अगदी सुरुवातीला नानासोबत चालणारा वाघ दाखवला आहे. त्या दृश्याचा खोटेपणा ठळकपणे जाणवतो. डॉ. आमटे अमेरिकेत जातात, तेव्हा तिथल्या उंच इमारती व रस्त्यांवर फिरवलेला कॅमेरा तर अक्षरश: चुकून फिरल्यासारखा वाटला ! अश्याच प्रकारे अजूनही काही जागी चित्रणातील उणीवा खटकतात. हे कदाचित उपलब्ध आर्थिक निधीच्या मर्यादांमुळे असलं, तरी 'आहे' हे नाकारता येत नाही आणि खटकणेही दुर्लक्षता येत नाही.

दोन टोकाच्या प्रतिक्रिया ऐकल्यावर माझी स्वत:ची प्रतिक्रिया दोन्हींच्या मधली असणं, हे कदाचित संयुक्तिकही आहे आणि तसंच झालं आहे. मला हा चित्रपट एक शिकवण म्हणून एकदा पाहावा, आपल्या लहानग्यांना दाखवावा असा वाटला. पण मी माझ्या संग्रहात हा ठेवणार नाही, मला तो अप्रतिम, अद्वितीय असा वाटला नाही. डॉ. आमटेंचं जीवन एक प्रकाशवाट असेल, तर हा चित्रपट केवळ एक कवडसा आहे आणि तोही क्षणैक.

रेटिंग - * * १/२

....#रसप....

Sunday, October 12, 2014

ती माझ्याशी बोलत नाही

ती माझ्याशी बोलत नाही
मी माझ्याशी बोलत नाही

तिची छबी दाखवा मलाही
जी माझ्याशी बोलत नाही

देव मुका अन् बहिरा आहे
की माझ्याशी बोलत नाही ?

छत्रपती मावळ्यांस म्हणतो
श्री माझ्याशी बोलत नाही

स्वप्न एव्हढे रोज पाहतो
'ही' माझ्याशी बोलत नाही ! :P

....रसप....
११ ऑक्टोबर २०१४

Sunday, October 05, 2014

हैदर - एक अश्वत्थामा ? (Movie Review - Haider)

बर्फाचा रंग कोणता ?
पांढरा ?
असेल. पण काश्मीरच्या बर्फाचा रंग लाल आहे. रक्ताचा लाल. १५-२० वर्षांपूर्वीपर्यंत तर काश्मीरचे रस्ते, झाडं, घरं सगळंच लाल होतं. वर्षानुवर्षं, पिढ्यान् पिढ्या धुमसत राहिलेला हा भाग. त्याला नंदनवन म्हणून अभिमानाने शिरपेचातल्या तुऱ्याप्रमाणे मिरवतो आपण, पण ह्या नंदनवनात शांतता व सुरक्षित वातावरण अभावानेच नांदलं. असुरक्षिततेच्या झाडाला असंतोषाची विषारी फळं येत असतात आणि हिंसेच्या उष्ण हवेने बदल्याच्या भयंकर आगी भडकत असतात. हा इतिहास आहे आणि एक वैश्विक सत्यही. पाचही इंद्रियांच्या जाणिवांतून एका निष्पाप मनांत जेव्हा असंतोषाचं विष झिरपतं आणि डोक्यात बदल्याची आग पेट घेते, तेव्हा एक 'हैदर' बनत असतो.

हैदर.
शेक्सपियरच्या सुप्रसिद्ध 'हॅम्लेट'वर आधारलेला आहे, हे आपल्याला माहित असतंच. पण बहुतेकांनी फक्त 'हॅम्लेट' हे नाव ऐकलेलं असतं, त्याचं कथानक काय आहे, हे खरं तर बऱ्याच जणांना माहित नसतं. त्यामुळे 'हैदर' बघत असताना आपण पूर्वतयारीनिशी नसतो. 'हॅम्लेट' ही सत्तेच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर झालेली एक भावनिक व नात्यांची ओढाताण होती. दोन शत्रूराष्ट्रे, त्यातील एकाच्या राजाचा त्याच्याच भावाकडून खून, मग राणीशी त्याने लग्न करणं आणि मग खून झालेल्या राजाच्या मुलाचं परतणं, अश्या वळणांनी 'हॅम्लेट' एका शेक्सपियरियन शोकांतापर्यंत जातं. विशाल भारद्वाजने ह्या कहाणीचे भारतीयीकरण करताना निवडलेली काश्मीरची पार्श्वभूमी 'काश्मीर, १९९५' ह्या इतक्याच शब्दांतून अर्धी कहाणी सांगते. उरतो तो फक्त भारतीय हॅम्लेटचा - 'हैदर'चा - सिस्टीमशी, कुटुंबाशी, मित्रत्वाशी, प्रेमाशी आणि स्वत:शी संघर्ष.

तो नेमका काय व कसा ? हे पडद्यावर बघत असताना काश्मीरचे बर्फाळ पर्वत, झुळझुळ वाहणारी झेलम, लाकडी घरं प्रत्येक फ्रेममध्ये सौंदर्याची भीषणता ठळकपणे दाखवत राहतात. चित्रपट जरासा रेंगाळतो, पण तिथल्या आयुष्याच्या एका मंद तणावपूर्ण गतीशी त्याचं नातं तुटत नाही. तरी एक गाणं व काही दृश्यं वगळता आली असती; हे मात्र नक्कीच.सुरुवातीच्या काही चित्रपटांत शाहरुख खानची सही सही नक्कल करणारा शाहीद कपूर हळूहळू एक अभिनेता म्हणून परिपक्व होत जातो आहे. 'हैदर' ही त्याची आजवरची सगळ्यात आव्हानात्मक भूमिका, आणि ती त्याने जीव ओतून साकारली आहे. वेडेपण, संताप, निराशा वगैरे भावना त्याच्या डोळ्यांत पाण्याने रंग बदलावा त्या सहजतेने येतात. हरणारा हैदर साकारणारा शाहीद जिंकला आहे.
श्रद्धा कपूरला फारसा वाव नसला, तरी तिचा वावर आश्वासक आहे. 'एक व्हिलन'मधली तिची छोटीशी भूमिका तिने महत्प्रयासाने मोठी इरिटेटिंग केली होती. पण इथे मात्र विशाल भारद्वाजने तिच्यातली अभिनेत्री हुडकून वर आणली आहे.
इरफान खानची भूमिकाही लहानशी आहे, पण कितीही लहान असला तरी खरा हीरा लक्ष वेधून घेतोच. त्याची भूमिका जरा जास्त हवी होती, अशी चुटपूट मनाला लागते.
के के मेनन हा मला का कुणास ठाऊक पण ह्या काळातला बलराज साहनी वाटत आला आहे. उत्कटतासुद्धा संयतपणे सादर करता येऊ शकते, हे मेननचा अभिनय वारंवार सिद्ध करत आला आहे. हा एक असा अभिनेता आहे, जो कुठल्याही भूमिकेत अगदी सहज फिट्ट बसतो आणि कोणतीही व्यक्तिरेखा ताकदीने उभी करू शकतो. खरं तर, मी 'हैदर' बघण्याचं मुख्य कारण मेनन होता.
तब्बूला बऱ्याच दिवसांनी पडद्यावर पाहिलं आणि क्षणार्धात तिच्यात शबाना आझमीच दिसली. तिची अर्धवट विझलेली नजर चित्रपटभर छळते. तिची व्यक्तिरेखा एका गोंधळलेल्या असुरक्षित व्यक्तीची आहे. जिला नेमकं काय हवं आहे, हेच समजत नसावं आणि हवेवर उडणाऱ्या वाळलेल्या पानाप्रमाणे आयुष्य नेईल तशी स्वत:ची फरफट ती निर्विकारपणे सहन करत असते. हे अतिशय गुंतागुंतीचं भावविश्व तिने समर्थपणे आपलंसं करून प्रेक्षकापर्यंत पोहोचवलं आहे.

प्रत्येक चांगल्या कहाणीत एक अव्यक्त, अदृश्य उद्गार असतो. गंगा, यमुनेच्या संगमात सरस्वतीचाही प्रवाह मिसळत असतो, पण तो दिसत नाही. ही सरस्वती ओळखणं आणि तिच्या अदृश्यतेला हात न लावता तिचं अस्तित्व जपणं, कुठल्याही चांगल्या कहाणीला सादर करताना दिग्दर्शकासाठी खूप महत्वाचं असावं. 'हॅम्लेट'मधला अव्यक्त उद्गार विशाल भारद्वाजने ऐकला, समजुन घेतला आणि म्हणूनच 'हैदर' बनला आहे. मध्यंतरानंतरची धीमी गती व काही अनावश्यक दृश्यं हे जर गालबोट मानलं तर This is a monumental effort by Vishal Bhardwaj.

अखेरीस, हैदरच्या वडिलांना असलेलं गझल व शायरीचं वेड, हा भाग एका वेगळ्या अंगाने मस्त फुलवता आला असता. चित्रपटात 'हैदर'च्या तोंडी शायरी मिसिंग वाटली. 'हैदर' ही एक जखम आहे. न भरलेली, न भरणारी. अनेक हैदर अश्वत्थाम्यासारखे अशी एक जखम जपून आहेत आणि ठसठसत असूनही जपलेल्या जखमेतून मूकपणे कविता जन्म घेत असते. हैदरचीही एक कविता असणार, असायला हवी होती.

Having said this, 'हैदर' कदाचित बॉक्स ऑफिसवर कमाल करणार नाही पण चोखंदळ प्रेक्षकासाठी नक्कीच कमाल करेल. सर्वांनी बघावा, असं मी म्हणणार नाही; पण 'सर्वांनी' मध्ये जे स्वत:ला समजत नाहीत, त्यांनी मात्र नक्कीच बघायला हवा.

रेटिंग - * * * *
Related Posts Plugin for WordPress, Blogger...