Sunday, October 05, 2014

हैदर - एक अश्वत्थामा ? (Movie Review - Haider)

बर्फाचा रंग कोणता ?
पांढरा ?
असेल. पण काश्मीरच्या बर्फाचा रंग लाल आहे. रक्ताचा लाल. १५-२० वर्षांपूर्वीपर्यंत तर काश्मीरचे रस्ते, झाडं, घरं सगळंच लाल होतं. वर्षानुवर्षं, पिढ्यान् पिढ्या धुमसत राहिलेला हा भाग. त्याला नंदनवन म्हणून अभिमानाने शिरपेचातल्या तुऱ्याप्रमाणे मिरवतो आपण, पण ह्या नंदनवनात शांतता व सुरक्षित वातावरण अभावानेच नांदलं. असुरक्षिततेच्या झाडाला असंतोषाची विषारी फळं येत असतात आणि हिंसेच्या उष्ण हवेने बदल्याच्या भयंकर आगी भडकत असतात. हा इतिहास आहे आणि एक वैश्विक सत्यही. पाचही इंद्रियांच्या जाणिवांतून एका निष्पाप मनांत जेव्हा असंतोषाचं विष झिरपतं आणि डोक्यात बदल्याची आग पेट घेते, तेव्हा एक 'हैदर' बनत असतो.

हैदर.
शेक्सपियरच्या सुप्रसिद्ध 'हॅम्लेट'वर आधारलेला आहे, हे आपल्याला माहित असतंच. पण बहुतेकांनी फक्त 'हॅम्लेट' हे नाव ऐकलेलं असतं, त्याचं कथानक काय आहे, हे खरं तर बऱ्याच जणांना माहित नसतं. त्यामुळे 'हैदर' बघत असताना आपण पूर्वतयारीनिशी नसतो. 'हॅम्लेट' ही सत्तेच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर झालेली एक भावनिक व नात्यांची ओढाताण होती. दोन शत्रूराष्ट्रे, त्यातील एकाच्या राजाचा त्याच्याच भावाकडून खून, मग राणीशी त्याने लग्न करणं आणि मग खून झालेल्या राजाच्या मुलाचं परतणं, अश्या वळणांनी 'हॅम्लेट' एका शेक्सपियरियन शोकांतापर्यंत जातं. विशाल भारद्वाजने ह्या कहाणीचे भारतीयीकरण करताना निवडलेली काश्मीरची पार्श्वभूमी 'काश्मीर, १९९५' ह्या इतक्याच शब्दांतून अर्धी कहाणी सांगते. उरतो तो फक्त भारतीय हॅम्लेटचा - 'हैदर'चा - सिस्टीमशी, कुटुंबाशी, मित्रत्वाशी, प्रेमाशी आणि स्वत:शी संघर्ष.

तो नेमका काय व कसा ? हे पडद्यावर बघत असताना काश्मीरचे बर्फाळ पर्वत, झुळझुळ वाहणारी झेलम, लाकडी घरं प्रत्येक फ्रेममध्ये सौंदर्याची भीषणता ठळकपणे दाखवत राहतात. चित्रपट जरासा रेंगाळतो, पण तिथल्या आयुष्याच्या एका मंद तणावपूर्ण गतीशी त्याचं नातं तुटत नाही. तरी एक गाणं व काही दृश्यं वगळता आली असती; हे मात्र नक्कीच.सुरुवातीच्या काही चित्रपटांत शाहरुख खानची सही सही नक्कल करणारा शाहीद कपूर हळूहळू एक अभिनेता म्हणून परिपक्व होत जातो आहे. 'हैदर' ही त्याची आजवरची सगळ्यात आव्हानात्मक भूमिका, आणि ती त्याने जीव ओतून साकारली आहे. वेडेपण, संताप, निराशा वगैरे भावना त्याच्या डोळ्यांत पाण्याने रंग बदलावा त्या सहजतेने येतात. हरणारा हैदर साकारणारा शाहीद जिंकला आहे.
श्रद्धा कपूरला फारसा वाव नसला, तरी तिचा वावर आश्वासक आहे. 'एक व्हिलन'मधली तिची छोटीशी भूमिका तिने महत्प्रयासाने मोठी इरिटेटिंग केली होती. पण इथे मात्र विशाल भारद्वाजने तिच्यातली अभिनेत्री हुडकून वर आणली आहे.
इरफान खानची भूमिकाही लहानशी आहे, पण कितीही लहान असला तरी खरा हीरा लक्ष वेधून घेतोच. त्याची भूमिका जरा जास्त हवी होती, अशी चुटपूट मनाला लागते.
के के मेनन हा मला का कुणास ठाऊक पण ह्या काळातला बलराज साहनी वाटत आला आहे. उत्कटतासुद्धा संयतपणे सादर करता येऊ शकते, हे मेननचा अभिनय वारंवार सिद्ध करत आला आहे. हा एक असा अभिनेता आहे, जो कुठल्याही भूमिकेत अगदी सहज फिट्ट बसतो आणि कोणतीही व्यक्तिरेखा ताकदीने उभी करू शकतो. खरं तर, मी 'हैदर' बघण्याचं मुख्य कारण मेनन होता.
तब्बूला बऱ्याच दिवसांनी पडद्यावर पाहिलं आणि क्षणार्धात तिच्यात शबाना आझमीच दिसली. तिची अर्धवट विझलेली नजर चित्रपटभर छळते. तिची व्यक्तिरेखा एका गोंधळलेल्या असुरक्षित व्यक्तीची आहे. जिला नेमकं काय हवं आहे, हेच समजत नसावं आणि हवेवर उडणाऱ्या वाळलेल्या पानाप्रमाणे आयुष्य नेईल तशी स्वत:ची फरफट ती निर्विकारपणे सहन करत असते. हे अतिशय गुंतागुंतीचं भावविश्व तिने समर्थपणे आपलंसं करून प्रेक्षकापर्यंत पोहोचवलं आहे.

प्रत्येक चांगल्या कहाणीत एक अव्यक्त, अदृश्य उद्गार असतो. गंगा, यमुनेच्या संगमात सरस्वतीचाही प्रवाह मिसळत असतो, पण तो दिसत नाही. ही सरस्वती ओळखणं आणि तिच्या अदृश्यतेला हात न लावता तिचं अस्तित्व जपणं, कुठल्याही चांगल्या कहाणीला सादर करताना दिग्दर्शकासाठी खूप महत्वाचं असावं. 'हॅम्लेट'मधला अव्यक्त उद्गार विशाल भारद्वाजने ऐकला, समजुन घेतला आणि म्हणूनच 'हैदर' बनला आहे. मध्यंतरानंतरची धीमी गती व काही अनावश्यक दृश्यं हे जर गालबोट मानलं तर This is a monumental effort by Vishal Bhardwaj.

अखेरीस, हैदरच्या वडिलांना असलेलं गझल व शायरीचं वेड, हा भाग एका वेगळ्या अंगाने मस्त फुलवता आला असता. चित्रपटात 'हैदर'च्या तोंडी शायरी मिसिंग वाटली. 'हैदर' ही एक जखम आहे. न भरलेली, न भरणारी. अनेक हैदर अश्वत्थाम्यासारखे अशी एक जखम जपून आहेत आणि ठसठसत असूनही जपलेल्या जखमेतून मूकपणे कविता जन्म घेत असते. हैदरचीही एक कविता असणार, असायला हवी होती.

Having said this, 'हैदर' कदाचित बॉक्स ऑफिसवर कमाल करणार नाही पण चोखंदळ प्रेक्षकासाठी नक्कीच कमाल करेल. सर्वांनी बघावा, असं मी म्हणणार नाही; पण 'सर्वांनी' मध्ये जे स्वत:ला समजत नाहीत, त्यांनी मात्र नक्कीच बघायला हवा.

रेटिंग - * * * *

3 comments:

 1. खूप आवडला.
  नक्कीच पाहीन.

  ReplyDelete
 2. हैदर पहायचा विचार केला नव्हता पण आपला Review वाचून वाटतंय बघावं आता....
  धन्यवाद.

  ReplyDelete
 3. दोनदा पाहिला, सुंदर आहे

  ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...