Sunday, October 26, 2014

क्रॅपी न्यू इअर - (Movie review - Happy New Year)

घराजवळ एक हॉटेल आहे. साधंसंच. तिथले कटलेट मला जाम आवडतात. परवा मी माझे आवडते 'कटलेट' खात असताना एक मित्र आला. मी त्याला म्हटलं की 'तूही घे, मस्त असतात.' पण त्याने नाही म्हटलं.
नंतर माझं खाऊन झाल्यावर म्हणाला की, 'तुला माहित आहे का हॉटेलात कटलेट कसे बनवतात ?'
मी म्हटलं, 'नाही !'
'इतर भाज्या वगैरे बनवताना गॅस शेगडीजवळ जे सांडलेलं असतं ना ? ते गोळा करतात अन् देतात 'कटलेट' म्हणून शिजवून. आणि तुझ्यासारखे मूर्ख मस्त मिटक्या मारत खातात !'
हे खरं की खोटं, माहित नाही. पण आता मी आयुष्यात कधी 'कटलेट' हा प्रकार खाऊ शकणार नाही. काय सांगावं ! भटारखान्याच्या बंद दरवाज्याआड काय काय चालत असेल ! आपण शुद्धतेची खात्री मानून जे खातो, त्याच्याकडून किमान स्वच्छतेची अपेक्षा करावी, इतपत तरी त्याची योग्यता असेल का ?
अपेक्षा ! खरं तर अपेक्षा करणंच कधी कधी चूक असतं. इतकेच चोचले असतील तर जावंच कशाला थेटरात ? सॉरी.. हॉटेलात !
Actually थेटरात पण. हो ना ! 'मैं हूँ ना' आवडला म्हणून 'ओम शांती ओम' पाहिला. ठीक वाटला. तरी 'तीस मार खान' पाहिला. भंकस वाटला. त्या नंतरही मी अपेक्षा ठेवली की फराह खान भावापेक्षा बरी असेल आणि 'हॅपी न्यू इअर' पाहिला.
तर काही इंग्रजी सिनेमांच्या भटारखान्यात जमिनीवर सांडलेलं, पाय पडलेलं खरकटं कथानक आणि 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'मैं हूँ ना', 'चक दे इंडिया' वगैरे बनवताना शेगडीबाहेर जे सांडलं होतं ते गोळा करून संवादाचे कटलेट्स माझ्यासमोर आले. गेल्या कित्येक सिनेमांत निव्वळ धांगडधिंगा शिजवताना विशाल-शेखरकडून जे ओघळ उतरून खरपुड्या झाल्या होत्या, त्यांची गाणी बनवलीत.
खरं तर गेल्या काही काळापासून, खास करून धूम -३ नंतर आमीर खान जाम डोक्यात जायला लागला आहे. सलमान खान तर इतका दाक्षिणात्य झाला आहे की आता त्याच्या तोंडी हिंदी डायलॉग (जे त्याला असंही येतच नाही) अजिबातच शोभेनासे झालेत. त्यामुळे आत्ता कुठे मला खानांतला शाहरुखच त्यातल्या त्यात बरा आहे असं वाटायला लागलं होतं. म्हणून हा 'क्रॅपी न्यू इअर' बघायला गेलो, तर 'जतहैंजा'चा ओंगळवाणा गेट-अप शिजवून झाल्यावर जी बरबट भांड्यांना राहिली होती, ती थापलेला अगदी रोगट दिसणारा शाहरुख समोर आला.
बरं हे सगळं तब्बल तीन तास सहन करावं लागलं. कटलेटवर कटलेट, कटलेटवर कटलेट डोक्यावर थापत जाऊन डोक्याचं भलं मोठं भजं झालं आणि पायाच्या करंगळीच्या नखापर्यंत तेलकट ओघळ घेऊन मी जेव्हा घरी परतलो, तेव्हा मी परत आल्यासारखा परतलेला नव्हे तर कढईत परतल्यासारखा परतलेला दिसत होतो.

मित्राने कटलेटची रेसिपी माझं खाऊन झाल्यावर सांगितली, पण मी ती चूक करणार नाही. म्हणून मी फराह खानच्या कटलेटची रेसिपी आधीच सांगून ठेवतो.

उदरनिर्वाहासाठी 'स्ट्रीट फाईट्स' करणारा 'चार्ली' (शाहरुख) वडिलांना - मनोहरला - (अनुपम खेर) त्यांच्या हाय एंड तिजोऱ्या बनवण्याच्या धंद्यात फसवणाऱ्या चरण ग्रोव्हर (जॅकी श्रॉफ) चा वचपा काढण्यासाठी आसुसलेला असतो. वडिलांचे मित्र टॅमी (बोमन इराणी) आणि जॅग (सोनू सूद) सुद्धा त्याच बदल्याच्या आगीत होरपळत असतात. ती संधी त्यांना मिळते. ग्रोव्हरने ३०० कोटीचे हीरे, मनोहरकडून घेतलेल्या 'शालीमार' तिजोरीत ठेवले असतात. ही तिजोरी लुटायचा प्लान बनवला जातो. पण तिजोरी लुटण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात.
१. तिथपर्यंत जाणे फक्त ग्रोव्हर व त्याचा मुलगा विकी( अभिषेक बच्चन)लाच शक्य असते. म्हणून विकीचा डुप्लिकेट नंदूला उचललं जातं.
२. तिजोरीभोवती असलेलं लेजर किरणांचे संरक्षक कडं भेदायला एक हॅकरही हवा असतो म्हणून अजून एक मेंबर 'रोहन' (विवान शाह) हा (बहुतेक) जॅगचा पुतण्या (की भाचा) टीममध्ये घेतला जातो.
जिथे हीरे ठेवलेले असतात तिथे 'वर्ल्ड डान्स चॅम्पियनशिप' होणार असते. मग डान्स शिकवण्यासाठी मोहिनी (दीपिका) हेरली जाते.
अशी ही सहा जणांची टीम बनते. ती आचरट चाळे करून वात आणते.

फक्त हा आचरटपणाच जर त्यांनी ग्रोव्हरसोबत केला असता, तरी त्याने त्यांना स्वत: होऊन ३०० कोटीचे हीरे दिले असते आणि माफीही मागितली असती. पण त्यांना त्याला वात आणायचा नसतो, तर त्याची वाट लावायची असते म्हणून ते तसं न करता चोरीच करायचं ठरवतात. त्या चोरीचं पुढे काय होणार, 'वर्ल्ड डान्स चॅम्पियनशिप'चं काय होणार, हे सगळं आपल्याकडे बॉलीवूडी कटलेट्सचा तगडा अनुभव असल्याने कुठलाही आश्चर्याचा धक्का वगैरे देत नाही.विनोद म्हणून नंदूला हुकमी उलटी करणारा दाखवणं, हा विनोदाचा ओकारी आणणारा किळसवाणा प्रकार आणि 'वर्ल्ड डान्स चॅम्पियनशिप' बोलताना तोंडावर हात फिरवणं, तोंडात ब्रश केल्यासारखं बोट फिरवणं वगैरे तर पांचटपणाचा कळसच होता ! एकंदरीतच विनोदाचे सगळेच प्रयत्न एक तर केविलवाणे किंवा हिणकस आहेत.
झगमगाट आणि भडक रंगांची उधळण काही जणांचे डोळे सुखावते, दीपवते. मला तर ते पैश्याचं विकृत प्रदर्शन वाटलं. सौंदर्याला मेक अप आणि दागदागिन्यांनी मढवल्यासारखं मला वाटलं नाही, तर त्याच्या बोज्याखाली दबल्यासारखं वाटलं.

ओरिजिनल असलं, नसलं तरी एक बरं कथानक होतं. पण केवळ ढिसाळ हाताळणी आणि प्रदर्शनाच्या आहारी गेलेली कल्पकता ह्यामुळे तीन तासाचं वाटोळं होतं.
'मनवा लागे..' आणि 'इंडियावाले' ही दोन गाणी फक्त मुखड्यात छान आहेत. त्यानंतर विशाल-शेखर 'ये रे माझ्या मागल्या' करत नेहमीचीच ओढाताण किंवा धिंगाणा करतात.

कोरड्या दुपारच्या रखरखाटात अचानक कुठूनशी एखादी थंड हवेची झुळूक यावी, तशी अधूनमधून दीपिका दिसते आणि क्षणभराचा दिलासा मिळतो.
बोमन इराणी शेवटी 'बोमन इराणी' आहे, त्यामुळे सगळ्या हाराकीरीतही तो तग धरतोच.
अभिषेक बच्चन कबड्डी आणि फुटबॉलच्या मैदानावरच चांगला अभिनय करत असतो का ?
शाहरुखने सलमान किंवा आमीर बनायचा प्रयत्न न करता शाहरुखच राहावं, असं माझं प्रांजळ मत आहे. पोटावर अठ्ठावीस पॅक्स आणले तरी आधी 'हेल्दी' दिसणं महत्वाचं असतं. सोनू सूद आणि शाहरुख दोघेही ह्या सिनेमात भरपूर अंगप्रदर्शन करतात. पण ते फक्त एकालाच 'शोभतं'.

असो.
थेटरमध्ये उसळलेली गर्दी, हॉलमध्ये शिट्ट्या आणि हाळ्यांचा पाऊस ह्यावरून हे तर निश्चित की कितीही भिकार असलं तरी हे कटलेट 'कोटीचं उड्डाण' करेलच, पण म्हणून त्याला चविष्ट म्हटलंच पाहिजे असं थोडीच आहे ?

रेटिंग - धूम -३ पेक्षा जरासा बरा

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...