Saturday, February 07, 2015

बालकी सांगतात म्हणून...... (शमिताभ - Movie Review - Shamitabh)

हमको आजकल हैं इंतज़ार
कोई आयें लेके प्यार....
'सैलाब' ह्या चित्रपटातलं हे गाणं म्हणजे माधुरीच्या करोडो चाहत्यांच्या गळ्यातला ताईत. चवळीच्या शेंगेसारखी माधुरी आणि तिच्या दिलखेच अदांनी आणि ठसकेबाज ठुमक्यांनी 'सिझलर' सारखं वाफाळत समोर येणारं हे गाणं. आता कल्पना करा की ह्या गाण्याचा रिमेक आला. व्हिडीओ तोच, तसाच. तीच माधुरी. पण चेहरा 'Morph' का काय करतात, तसं करून 'सोनाक्षी सिन्हा'. ही कल्पना केल्याबद्दल, इथे लिहिल्याबद्दल आणि त्यावर विचार करायला लावल्याबद्दल काही लोकांनी मनातल्या मनात किंवा कदाचित खुल्या आवाजातही मला दोन-चार कचकचीत शिव्या हासडल्या असतील. ह्याची पूर्वकल्पना असूनही मी हे लिहिलं कारण अक्षरश: असंच 'शमिताभ' बघत असताना अख्खा चित्रपटभर, धनुषच्या तोंडून अमिताभचा आवाज ऐकताना वाटत होतं. स्वत:साठी अमिताभचा आवाज घेण्याची किंवा अमिताभच्या आवाजाला स्वत:चा चेहरा देण्याची ऑफर स्वीकारण्याची हिंमत जर धनुष करू शकतो, तर मी नुसती एक किरकोळ कल्पना करण्याची हिंमत का करू नये ?

चित्रपटाची कहाणी तशी वेगळी आहे. महाराष्ट्राच्या एका छोट्याश्या गावातून एक तरुण मुलगा हीरो बनायचं स्वप्न घेऊन मुंबईत येतो. लहान वयापासून चित्रपटाचं प्रचंड आकर्षण असणारा हा मुलगा - दानिश (धनुष) - मुका असतो. अतिसामान्य देहयष्टी, सामान्य चेहरा आणि आवाज नाही, हे कॉम्बीनेशन निश्चितच त्याला 'हीरो' बनवू शकणारं नसतंच. पण नशीब योग्य वेळी मेहरबान होतं आणि त्याची भेट 'अक्षरा' (अक्षरा हासन) शी होते. जी एक सहाय्यक दिग्दर्शक असते. ती 'ही गवताच्या काडी नसून गौती चहा आहे' असं जाणते (प्रत्यक्षात तसं पडद्यावर आपल्याला तरी जाणवत नाही.) आणि 'आउट ऑफ द वे'च्याही बाहेर जाऊन दानिशला मदत करते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर त्याला दुसऱ्या कुणा व्यक्तीचा आवाज बेमालूमपणे देता येईल, अशी व्यवस्था होते. दानिशचा आवाज म्हणून एक दारुडा सापडतो. जोरदार पंख्याखाली असलेला एक कागदाचा तुकडा त्यावर पेपर वेट ठेवल्याने सर्व बाजूंनी फडफडला तरी उडत नाही, तसा ह्या दारुड्या अमिताभ सिन्हा (अमिताभ बच्चन) चा आवाज दानिशवर पडतो आणि तो तग धरतो. पुढे अमुक अमुक होतं, तमुक तमुक होतं आणि शेवटी ढमुक होऊन चित्रपट संपतो. ह्यातलं हे 'ढमुक' तर इतकं अनावश्यक, अनाठायी आहे की त्या पांचट चवीने तोंड आंबावं.


खरं तर हाच, अगदी फ्रेम टू फ्रेम सेम चित्रपट जर 'बालकी'ऐवजी इतर कुणाच्या नावे आला असता, तर कदाचित 'सर्व युनिटची अक्कल एका छोट्याश्या काडेपेटीच्या डब्यात भरून अरबी समुद्रात फेकून दिली होती की काय?' असा काहीसा सवाल केला गेला असता. पण फक्त हे 'बालकी' सांगतात म्हणून आपण त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहू शकतो.

आपल्याकडे 'टू हंड्रेड फॉर एफर्ट' नको तिथे देण्याची सवय असते. 'आपल्या फडफडत्या देहयष्टीला अमिताभचा आवाज शोभणार नाही, हे धनुषला माहित नसेल का? नक्कीच असेल, पण तरी त्याने ही रिस्क घेतली. आजच्या घडीचा इतर कुणीही अभिनेता अशी रिस्क घेऊ शकणार नाही', वगैरे युक्तिवाद करून धनुषचे आणि बालकीचेही कौतुकसोहळे चालतील. चालोत. त्याने हे सत्य बदलणार नाही की हा सगळा प्रकार अजिबात पचनी पडलेला नाही. खरं तर धनुष+अमिताभ हे 'शमिताभ'चं 'युनिक सेलिंग प्रपोझीशन' होतं, कदाचित असेलही. पण प्रत्यक्षात हेच त्याचं 'युनिक स्टुपिड प्रपोझीशन'ही झालं आहे. धनुषच्या एन्ट्रीला तो 'तुम लोग मुझे ढूंढ रहे हो और मैं तुम्हारा यहाँ इंतज़ार कर रहा हूँ' हा 'दीवार'मधला अमिताभचा डायलॉग अमिताभच्याच आवाजात मारतो. मला तर तिथे हसावं की रडावं, हेच कळेना.

एम एफ हुसेन जसे माधुरीमुळे फॅसिनेट झाले होते, तसे बालकी अमिताभमुळे इम्प्रेस झाले असावेत. त्यांच्या चित्रपटाचं प्रमोशन चित्रपटाच्या 'कंटेंट'पेक्षा त्यातल्या अमिताभला विकण्याच्या दृष्टीने केलं जातं. हे तर सगळेच करतात म्हणा. पण 'शमिताभ'ऐवजी दुसरं एखादं नाव असतं, ज्यात 'अमिताभ' नसतं, तर मी इतका आवर्जून चित्रपट पाहायला गेलो असतो का ? माझी उत्कंठा ह्या नावातच जास्त होती. इथे चित्रपट आणि त्यातली व्यक्तिरेखा ह्यांच्याही वर 'अमिताभ' हा अभिनेता, हा स्टार जाऊन बसतो आहे. ही गोष्ट चांगली की वाईट, हा ज्याच्या त्याचा दृष्टीकोन. (एके काळी स्वत:च्या सुपरस्टार इमेजच्या प्रेमात आकंठ बुडलेल्या राजेश खन्नाला ही कल्पना त्याच्या काळात सुचली नाही, हे चित्रपटाचं सौभाग्य आहे.)


अमिताभ चित्रपट एकहाती उचलून धरतो, हे मात्र निश्चित. 'शमिताभ' हा 'अमिताभ'चाच चित्रपट आहे, लोकांनी कितीही गोडवे गायले तरी अमिताभसमोर धनुषच्या सर्व मर्यादा स्पष्टपणे उघड्या होतात. एका दृश्यात जेव्हा धनुष अमिताभला ठोसे मारतो, तेव्हा फक्त मारणारा धनुष दाखवला आहे, मार खाणारा अमिताभ दाखवला नाही. कारण ते दृष्टीस पटलंच नसतं. निव्वळ अभिनयाच्या जोरावरही धनुष विशेष असा वाटत नाही. 'रांझणा'मधला बेचैन प्रियकर त्याने जितक्या सफाईने उभा केला होता, त्या तुलनेत मुका दानिश किंवा सुपरस्टार 'शमिताभ' खूपच कमजोर वाटला.


चित्रपटात 'अमिताभ'नंतर लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे 'अक्षरा हासन'. ही एक साखरेची बाहुली आहे. पण ती बाहुली वाटत असली, तरी शेवटी वडिलांचा अंश तिच्यात उतरला आहेच. तिचा वावर खूप आल्हाददायक व आश्वासक आहे. ती पडद्यावर येते तेव्हा एक थंडगार झुळूक आल्याचा भास होत राहतो.

शमिताभ, एक 'बालकी आणि अमिताभ प्रोडक्ट' म्हणून खूप सामान्य वाटला. त्यात अमिताभ होता आणि अधूनमधून 'अक्षरा' नावाचं एक मोरपीस होतं म्हणून अडीच तास सहन करता आला. दुसरे कुणी असते, तर कदाचित मध्यंतरात बाहेर पडलो असतो.

रेटिंग - * *

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...