Thursday, April 23, 2015

शून्याचं महत्व - 'कोर्ट' (Court - Marathi Movie)

सेकंद काटा १२ वर आला. घड्याळात ८ वाजून २५ मिनिटं झाली. सेकंद काटा १० वर आला. मी माझी नजर माझ्यासमोर असलेल्या ताटलीतील इडलीच्या शेवटच्या चतकोर तुकड्याकडे वळवली. त्यात काटा खुपसला. सांबारात बुचकळला. दुसऱ्या हातातील चमच्याने छोट्या वाटीतील चटणी घेतली. आधी ओली इडली आणि मग चटणी असं दोन्ही स्वत:च्या तोंडात भरवलं. लहान असताना आईने शिकवलं होतं. प्रत्येक घास ३२ वेळा चावायचा. ३२ मोजले. गिळलं. पाणी प्यायलो. आता घड्याळ्यात ८ वाजून पावणे सव्वीस मिनिटं झाली. मी उठलो. घराबाहेर येऊन माझ्या जुन्याश्या मोटरसायकलला कीका मारल्या. पाच कीका मारल्या. मग चोक दिला. त्यानंतर तिसऱ्या कीकला माझी फटफटी सुरु झाली. हेल्मेटच्या आत नकारात्मक हललेलं माझं डोकं, हेल्मेटसुद्धा हलल्यामुळे समोरच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्याच्या बाल्कनीत उभं राहून ब्रश करणाऱ्या माणसाने पाहिलं आणि तो हिरवट दाढी वाढलेल्या गालांतल्या गालांत छद्मी हसला.
मग माझी मोटरसायकल ऑफिसच्या दिशेने.. काटा ४५ वर स्थिर...

अरे ऐका ना.. I mean वाचा ना..! माझं रोजचं आयुष्य आहे हे ! ह्यातल्या प्रत्येक डीटेलिंगला महत्व आहे.इडलीचा शेवटा चतकोर तुकडा माझ्या एकटेपणाचं प्रतीक आहे. त्यात घुसणारा काटा, सांबारातली डुबकी आणि चटणीसोबतचं चर्वण हे परिस्थितीच्या अत्याचाराचं प्रतीक आहे. मोटरसायकल चटदिशी चालू होत नाही, चोक दिल्यावरच चालू होते, त्यावर मी डोकं हलवतो, ह्याचा अर्थ मला कुठलीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही. समोरच्या इमारतीतील मनुष्य माझ्यावर हसतो, तो हरामखोर, विघ्नसंतोषी दुनियेचा चेहरा आहे. हिरवट दाढी वाढलेला ओंगळवाणा. - इत्यादी.
पण तुम्ही हे वाचणार नाही. वाचलंत तरी तुम्हाला हे पटणार नाही. का? कारण हे वाचायला मिळावं ह्यासाठी मी तुमच्याकडून पैसे घेतलेले नाहीत. फुकट आहे ना हे. मग निरर्थकच असणार.

बरं. अर्थपूर्ण बघायचंय? मग जवळच्या चित्रपटगृहात जा. 'कोर्ट'चं तिकीट काढा. त्यातली पात्रं वेगळी आहेत, कथानक(?) सुद्धा वेगळं आहे. पण अभिव्यक्ती वरील परिच्छेदांतलीच. एकदम भारी! आता तुम्ही बरोबरच्या व्यक्तीशी चर्चा कराल - "किती रियालिस्टिक दाखवलंय ना सगळं? ते कोर्टातलं कामकाज तर अगदी जसंच्या तसंच. त्या वकिलांच्या लाईफ स्टाईल्समधला फरक पण छान दाखवलाय. म्हणजे तो पुरुष वकील एकटा राहत असतो. घरात मस्तपैकी दारू पिऊन टुन्न होतो. कधी मित्रांसोबत जाझ बारमध्ये जातो. आणि ती महिला वकील मात्र घरी आल्यावर नवरा-मुलांना स्वयंपाक करून जेवायला वाढते आहे. कधी बाहेर गेलेच तर 'सत्कार' खानावळीत.. वगैरे. सुंदर डीटेलिंग."

असो.
'कोर्ट' ही कहाणी लोकशाहीर नारायण कांबळे ह्या व्यक्तिरेखेची कहाणी नाही. चित्रपटाच्या नावावरूनच ती कशाची कहाणी आहे, हे समजुन यावं. ह्यातलं कोर्ट हे आपण वर्षानुवर्षे, दशकानुदशके, सिनेमानुसिनेमे जसं पडद्यावर पाहत आलो आहोत, तसं अजिबात नाही. खऱ्या कोर्टाची पायरी ज्यांनी चढलेली आहे, त्यांना हे व्यवस्थित माहित आहे की प्रत्यक्षातलं कोर्ट तसं नसतंच, जसं आपण सिनेमा व सिरियलींमधून पाहत असतो. प्रत्यक्षातलं कोर्ट जे मी पाहिलं आहे, ते हुबेहूब दिसलं आहे ते 'कोर्ट' मध्ये. ह्या चित्रपटाशिवाय इतर कुठेही मी कोर्टाचं इतकं अस्सल चित्रण दुसरं पाहिलेलं नाही. इथले वकील न्यायाधीशांच्या उरावर चढून डायलॉग पे डायलॉग, डायलॉग पे डायलॉग मारत नाहीत की इथले न्यायाधीश चित्रगुप्ताच्या पवित्र्यात बसून चेहरा ओढून लांब करून बोजड उर्दूमिश्रित हिंदीत फैसला सुनावत नाहीत. हे सगळं वास्तववादी चित्रण उत्तम जमलं आहे, ह्याबद्दल वादच नाही.

मात्र कोर्ट व नारायण कांबळेंचा विषय बाजूला राहून चित्रपट दोन्ही वकिलांच्या व न्यायाधीशांच्या खाजगी आयुष्याचंही वास्तववादी चित्रण दाखवतो, तेव्हा गोंधळ उडतो. जर कीसच पाडायचा असेल, तर ह्यात बघणाऱ्यानेही कीस पाडायला हवा. स्त्री वकील ट्रेनमधून घरी जाताना सोबतच्या बाईशी साडीबद्दल गप्पा मारते. ते सगळं गॉसिप साहजिकच घरच्यांवर पोहोचतं. तेव्हा वकीलीणबाई नवऱ्याला मधुमेह असल्यामुळे गोड, तेलकट जवळजवळ बंदच केलं आहे घरात आणि नंतर लगेच कोशिंबीरीत वाटीवर फोडणी ओततात ! हा विरोधाभास मुद्दाम दाखवला असेल, जेणेकरून त्या वकीलीणबाईंचा खोटारडेपणा समोर यावा, तर मात्र मानलं ह्या दृष्टीला !

दुसरं म्हणजे पाण्यात बसलेली म्हैस किंवा गेंडा वगैरे कसे ढिम्म पडून/ बसून राहतात, तसा कॅमेरा प्रत्येक वेळी एका जागी बद्दकन् पडलेला राहतो. ज्या जागी पडद्यावरील पात्राला पोहोचायचं असतं, त्या जागेच्या बाजूलाच तो कॅमेरा असणार असतो, हे आपल्याला ते पात्र गल्ली/ बोळाच्या अगदी पार दुसऱ्या टोकापासून जेव्हा आत येतं तेव्हाच कळतं.

उन्हाळ्याच्या सुट्टीपूर्वीचा कोर्टाचा अखेरचा दिवस संपून न्यायाधीश उठून जातात. त्यानंतर एक-एक व्यक्ती न्यायालयातून बाहेर पडत जाते. आपल्याला तेव्हाच कळतं की सगळे बाहेर गेल्यावर एक जण सगळे दिवे एकेक करून बंद करेल, त्या खोलीचं दार लावेल, मग कॅमेरा हलेल. तसंच होतं. फक्त एकच अंदाज चुकतो. दार लावल्यावरही तो कॅमेरा जवळजवळ १०-१२ सेकंद अंधार चिवडत बसतो.

असे १०-१०, १२-१२, २०-२०, ३०-३० सेकंदांचे चिवडे गोळा केले तर सगळा निचरा करून चित्रपट, चित्रपट न राहता टीव्ही मालिकेचा एक भाग झाला असता. ह्यात कांबळेंचा वकील गाडी चालवताना स्टियरिंग व्हील व त्याच्या चेहऱ्यावर रोखलेल्या कॅमेऱ्याचे प्रत्येकी १०-१२ सेकंदांचे दोन शॉट्स, त्याची सुपर मार्केटमधली random खरेदी, तो पोलीस स्टेशनमध्ये जातो तेव्हाचा लांबलचक वॉक, कांबळेंना पोलिसांच्या गाडीतून कोर्टात नेल्यानंतर आवारात कामाची भिक मागणाऱ्या वकिलांचा वावर दाखवणारा शॉट, सगळ्यात शेवटी 'अर्नाळा बीच रिसॉर्ट'मध्ये शिरल्यावर न्यायाधीश महोदयांची दाखवलेली अनेक मिनिटांची अतिकंटाळवाणी सहल इ. अनेक दृश्यं समाविष्ट होऊ शकतात.

'कोर्ट'मधली सर्वोत्तम गोष्ट कुठली असेल तर दोन्ही पोवाडे आणि त्यांचं सादरीकरण. ढवळून काढणारे, चेव चढवणारे शब्द आणि ठसकेबाज सादरीकरण केवळ अप्रतिम आहे. पहिला पोवाडा खूप सुरुवातीला आहे. पण दुसरा बराच नंतर असल्याने तोपर्यंत मरगळ आलेली असते. तो पोवाडा गदागदा हलवून जागं करतो.


अगदी थोडक्यात सांगायचं झालं, तर 'कोर्ट' पाहिल्यावर मला शाळेतल्या परीक्षा आठवल्या. प्रश्न असायचा 'सविस्तर उत्तर द्या.' 'सविस्तर' म्हणजे किमान पानभर तरी झालंच पाहिजे, असं असायचं. मला येणारं उत्तर ३-४ ओळींत संपणारं असायचं. मग मी दोन शब्दांत जागा सोडायचो. एका ओळीत ४-५ च शब्द राहतील, असं पाहायचो. अक्षरसुद्धा जरा मोठं काढायचो आणि अनावश्यक वाक्यं कोंबून लांबी, रुंदी वाढवत न्यायचो. बऱ्याचदा भरायचं अख्खं पान, कधी कधी तर पुढच्या पानावरसुद्धा पोहोचायचो. कधी कधी मात्र इतकं सगळं करूनही पान भरायचं नाही. In any case, चार ओळींच्या उत्तराला मिळाणाऱ्या गुणांपेक्षा अर्धा-एक गुण तर जास्तीचा माझ्या वाट्याला येत असे.
ह्या चित्रपटाला मी रेटिंग वगैरे देणार नाही कारण त्याला आधीच सर्वोच्च रेटिंग मिळालेलं आहे. पण म्हणणं इतकंच आहे की शून्य संकलन, शून्य छायाचित्रण, शून्य पटकथा, शून्य अभिनय अश्या सगळ्या शून्यांच्या आधी फक्त संवेदनशील विषयाचा स्पर्श असलेला '१' आकडा लावला की चढणारं प्रत्येक शून्य हजार/ लाख/ करोडों मोलाचं होतं. शून्याचं महत्व 'कोर्ट'मुळे कळलंय.

- रणजित पराडकर

टीप :- प्रस्तुत लेखातील मतं माझी वैयक्तिक मतं आहेत. ती कुणाला पटावीत, अशी माझी अपेक्षा नाही, आग्रह तर नाहीच नाही. म्हणूनच त्यावर मी प्रतिवाद करीनच असेही नाही.
ह्या लेखावर, ह्यातील मतांवर टीका करावी. त्यांना विरोध करावा. स्वत:चे वेगळे मत अधिक ठामपणे मांडावे. ह्या सगळ्याने मला आनंद होईल. मात्र उपदेशकाचा वेश चढवू नये. मी कुणावर माझी मतं लादत नसल्याने, माझ्यावर काही लादायचा प्रयत्नही करू नये.

- रणजित पराडकर

1 comment:

  1. जरासं टोकदार झालं आहे परीक्षण. नाही म्हणजे तुमच्या मुद्यांशी सहमत आहे, पण तरीही पहिल्या प्रयत्नाला थोडी सूट द्यावी अश्या मताचा मी होतो. असो वैयक्तिक मतं खरी. आणि कॅमेरा बद्दल म्हणाल तर मला या विषयाच्या हाताळणीसाठी कॅमेराचे कोन अगदी चपखल वाटले. माझ्या मतामध्ये हेच लिहिलं आहे मी.

    The steady mounted camera and deep focus helps a lot in building a scene. It focuses on the setting and a narrative over people. It is a refreshing thing in Indian cinema. Long since we have been focusing on heroes, villains, and curvy bodies of industry bombshells. It feels nice to see the setting and the narrative taking priority and focus over those things. Although, I would have preferred some better editing. The long shots sometimes need a lot of patience.

    source: http://www.mercvision.com/blog/2015/04/19/court-2015/

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...