Wednesday, July 01, 2015

एक जुनी कविता आठवली

ध्वस्त इमारत जुनी-पुराणी
तुटकी दारे फुटक्या खिडक्या
गळके छप्पर ओंगळ भिंती
कुरकुरणाऱ्या टेबल-खुर्च्या

इमारतीच्या पुढ्यात खंबिर
स्थितप्रज्ञ निश्चल गुलमोहर
वाताहतीस सांगत होता
कशी लागली होती घरघर

"कधी काळची हसरी फुलती
शाळा किलबिल, गोंगाटाची
अज्ञाताशी लढते आहे
एक लढाई अस्तित्वाची"

नकोनकोसे दाटुन आले
कृतज्ञतेला फुटला पाझर
चाचपले मी रित्या खिश्याला
माझी गरिबी झाली कातर

गुलमोहर बाबाला केवळ
डबडबलेली नजर वाहिली
ताठ कण्याने म्हटले त्याने
"एक जुनी कविता आठवली"

....रसप....
१ जुलै २०१५

2 comments:

  1. सुंदर...

    तुम्ही लिहिलेली ही कविता वाचून मला दोन कविता आठवल्या.
    बालकवींची पारवा, आणि मर्ढेकरांची पितात सारे गोड हिवाळा.

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...