Sunday, August 30, 2015

फेसबुक फॅण्टसी (Movie Review - Phantom)

सध्या विचारवंत व विविध जाणकारांचं एक भलं मोठं पीक सोशल नेटवर्किंगवर आलेलं दिसतं. आणि ह्यांचं सगळ्यात आवडतं 'विचारकुरण' आहे 'भारत-पाकिस्तान संबंध व सीमाप्रश्न' ! पाकिस्तानकडून सीमेवर काही हालचाल जरी झाली तरी हजारो मैलांवरील सुरक्षित एअरकन्डीशंड खोल्यांत बसून काही फेसबुकवीर आर्मीला ऑर्डर्स देतात की, 'घुसा पाकिस्तानात आणि मारा एकेकाला!' कुठे दहशतवादी हल्ला झाला की लगेच फतवे निघतात की, 'आपणही त्यांच्या शहरांवर असेच हल्ले करायला हवे !' कुणी म्हणतं, 'अमेरिकेने कसं ओसामा बिन लादेनला आत घुसून मारलं, तसंच आपणही दाऊदला मारायला हवं, हाफिज सईदला टिपायला हवं, वगैरे'.
सर्वसामान्य माणसांनी भावनेच्या भरात असं काही लिहिणं, बोलणं हे अगदी स्वाभाविक आहे. ह्या सगळ्या 'फेसबुक फॅण्टसीज'ना जास्तच मनावर घेऊन साजिद नाडियादवाला नामक नियमितपणे सामान्य चित्रपट बनवणाऱ्या निर्मात्याने काही कोटी रुपये ओतून एक चित्रपट बनवावा, हेही एक वेळ समजून घेता येईल. पण सिद्धार्थ रॉय कपूरसारखा सहसा बाष्कळपणा न करणारा निर्माताही त्या चित्रपटाची सह-निर्मिती करतो आणि 'काबुल एक्स्प्रेस', 'एक था टायगर', 'बजरंगी भाईजान' सारखे अचूक नस पकडणारे चित्रपट बनवणारा दिग्दर्शक कबीर खानही ह्यावर वेळ वाया घालवतो तेव्हा मात्र आश्चर्य वाटतं.

पूर्वी हजारो, लाखो लोक केवळ सचिनसाठी क्रिकेट पाहायचे. तो नक्कीच चांगला खेळेल, अशी प्रत्येक वेळेस त्या भाबड्या रसिकांना खात्रीच असायची आणि जेव्हा सचिन विशेष काही न करता माघारी येई, तेव्हा स्टेडियममधून प्रेक्षक बाहेर पडत आणि घरा-घरातले टीव्ही बंद होऊन लोक काम-धंद्याला लागत. 'फॅण्टम'च्या सुरुवातीला २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईवर कसाब व साथीदारांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्याची पार्श्वभूमी सांगितली जाते. ओम पुरींचा धीरगंभीर आवाज काळजाला डागण्या देणाऱ्या अप्रिय स्मृती जागृत करतो. पुढच्या ५-१० मिनिटांत अपेक्षा थोड्या अजून वाढतात. आणि मग परदेशात राहत असताना शिस्तीचे धडे गिरवलेला भारतीय परत आपल्या देशात आल्यावर ज्याप्रकारे सर्रास सिग्नल तोडणे, कचरा करणे, वगैरे सुरु करतो, त्याचप्रकारे कबीर खान सारासारविचारशक्तीची विकेट भावनावेगाला अलगदपणे बहाल करून टाकतात आणि मध्यंतरापर्यंत आपल्यालाही सचिन बाद झाल्यावर निराश होणाऱ्या प्रेक्षकांप्रमाणे बाहेर पडायची इच्छा होते. पण आपण थांबतो. कारण कधी तरी आपणही काही 'वैचारिक तारे' तोडलेले असतात ! आपली लुकलुक कुठे तरी झगमगाटात बदलेल अशी एक वेडी आशा बाळगून आपण हा सगळा पोरखेळ शेवटपर्यंत सहन करतो. अखेरीस आपल्या हाती ना दोन घटिका मनोरंजन येतं, ना कुठला थरारक अनुभव.

आर्मीतून हकालपट्टी झालेल्या 'दानियाल खान' (सैफ अली खान) ला भारतीय गुप्तचर विभाग एका अनधिकृत मोहिमेसाठी पाठवतो. २६/११ च्या हल्ल्याच्या सूत्रधारांना अमेरिका, लंडन व पाकिस्तानात शिरून अश्या प्रकारे मारायचं की दिसायला तो अपघात दिसला पाहिजे आणि समजायला समजूनही आलं पाहिजे की त्यांना मारण्यात आलं आहे ! ह्या कामात त्याला एक एजंट नवाझ मिस्त्री (कतरिना कैफ) मदत करते आणि हा सगळा प्लान गुप्तचर विभागातला एक कनिष्ठ अधिकारी 'समित मिश्रा' (मोहम्मद झीशान अय्युब) च्या सुपीक डोक्यात पिकला असतो.
पुढे काय होतं, कसं होतं हे सांगायची आवश्यकता नसावी आणि ते न सांगितल्याने काही फरक पडेल असंही वाटत नाही. त्यामुळे इतकंच !


कतरिना कैफला इंडस्ट्रीत १२ वर्षं झालीत. तिला हिंदी येण्यासाठीचं इंडस्ट्रीचं हे तप वाया गेलं आहे. आजही तिचे वाईट उच्चार चालवून घेण्यासाठी तिची व्यक्तिरेखा युरोप/ अमेरिकेत वगैरे वाढलेली दाखवायला लागते. हे कशासाठी ? तर फक्त ती सुंदर दिसते म्हणून ! कारण कतरिना कैफ आणि अभिनय ह्यांच्यात एक तर काही नातंच नाही आहे किंवा असलं तरी खूप दूरचं असावं. फार क्वचित ते दोघे एकत्र दिसतात आणि कसलासा तीव्र मतभेद असल्याप्रमाणे एकत्र दिसले तरी विसंवाद पाळतात.

दुसरीकडे नवाब सैफ अली खान आणि अभिनय म्हणजे श्रावणातला उन्हं-पावसाचा खेळ असावा. त्याचा मध्येच एखादा 'कॉकटेल'सारखा चित्रपट येतो आणि आपल्या अपेक्षा वाढल्या की तो 'हमशकल्स' मध्ये झळकतो. 'फॅण्टम' सैफ गेल्या काही काळातल्या सततच्या अपयशाची मालिका तोडत नाही. त्याच्या गालांवरची दाढी आणि नाकावरची माशी काही केल्या जात नाही. कतरिनाची अभिनयमर्यादा उघडी पडू नये, ह्याची खबरदारी त्याने स्वत:ला त्या मर्यादेपलीकडे न जाऊ देता घेतली आहे.

मोहम्मद झीशान अय्युब, हा एक गुणी अभिनेता. त्याने 'रांझणा', 'तनु वेड्स मनू - रिटर्न्स' मध्ये अक्षरश: धमाल केली होती. त्याचा अत्युत्साही गुप्तचर विभाग अधिकारी अत्यंत उथळ वाटतो. पण त्यात त्याची काही चूक नसावी. ती व्यक्तिरेखाच अतिशय ढिलाईने रेखाटलेली आहे. तो एक ज्युनियर आहे, ज्याचं डोकं इतर सर्व सिनियर्सपेक्षा वेगळं आणि चांगलं चालतं, हे आपल्याला स्वीकारता येण्यासाठी काहीही घडत नाही. केवळ इतर लोक म्हणत आहेत, म्हणून आपण हे मान्य करायचं आहे.

'फॅण्टम'मध्ये खऱ्या अर्थाने कथालेखक आणि दिग्दर्शक 'फॅण्टम' आहेत. त्यामुळे एक 'अतिरंजित बाष्कळ मेलोड्रामा' ह्यापुढे ही कहाणी जात नाही. कुठेही ती प्रेक्षकाची पकड घेतच नाही. चित्रपटगृहातून बाहेर पडताना आपल्या मनात चित्रपटातलं कुठलंही दृश्य, कुठलाही डायलॉग राहत नाही. ना कुणी व्यक्तिरेखा लक्षात राहते, ना अभिनेता. सुमार व्हीएफएक्ससुद्धा आपण विसरुन जातो. मात्र मनात एक दु:ख राहते. एक चांगला 'प्लॉट' वाया गेला ह्याचं नव्हे, तर पण दु;ख अजून एका गोष्टीचं होतं -
'फॅण्टम' ची 'टॅगलाईन' आहे "A Story You Wish Were True!" ह्या ओळीतच हे अध्याहृत आहे की, 'हे असं काही घडू शकणार नाही!' पण आपली लाचारी इतकी आहे की आपण चित्रपटातसुद्धा 'हाफिज सईद' हे नाव घेऊ शकत नाही. ते आपल्याला 'हारीस सईद' असं करायला लागतं. 'झकीउर रहमान लखवी' हे नाव आपण घेऊ शकत नाही. त्याऐवजी आपल्याला 'सबाउद्दीन उमवी' घ्यायला लागतं. आणि असे सगळे बदल करूनही चित्रपटावर पाकिस्तानात बंदी असतेच. कारण आपण काही करू शकत नाही, हे कडवट सत्य जसं आपल्याला पचत नाही, तसंच 'आपण बरंच काही केलंय' हे कडवट सत्य त्यांनाही पचत नसावं !
असो.

To cut the long story short, काही वर्षांपूर्वी 'धमाल' हा 'एसएमएस जोक्स' चा मिळून एक चित्रपट इंदरकुमारनी बनवला होता. तसंच  'फॅण्टम' ही एक 'फेसबुक फॅण्टसी' आहे. पण 'धमाल'मधले विनोद थरारक होते. 'फॅण्टम'चा थरार हास्यास्पद आहे, हाच काय तो फरक. 'धमाल'मध्ये सगळ्यांनीच अभिनयही कमाल केला होता आणि 'फॅण्टम'मध्ये तीच सगळ्यात मोठी बोंब आहे !

रेटिंग - *  

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये ३० ऑगस्ट २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-


Sunday, August 23, 2015

सानदार, जबरजस्त, जिन्दाबाद ! (Movie Review - Manjhi The Mountain Man)

१९६०. चीनबरोबर वादाच्या ठिणग्या उडत होत्या आणि ह्या लबाड शेजाऱ्याशी भारताचे संबंध बिघडत चालले होते. 
१९६०. दशरथ मांझीचा दैवाशी वाद सुरु झाला होता आणि त्याने त्याच्या खडूस शेजाऱ्याला - एका डोंगराला - एकट्यानेच तोडायचा विडा उचलला होता.
१९६२ सगळा देश अनुक्रमे चीन युद्धाच्या जखमांनी व्यथित होता आणि १९६५, सगळा देश पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या युद्धातल्या जय-पराजयाचे आडाखे बांधत होता.
दशरथ मांझी निश्चल डोंगराशी असहाय्य झुंजताना पुन्हा पुन्हा हरत होता आणि पुन्हा पुन्हा त्याला भिडत होता.
१९७१. भारताने पाकिस्तानात रणभूमीवर चारी मुंड्या चीत केले आणि देशाने सोहळा साजरा केला, पण दशरथ मांझी अकरा वर्षांनंतरही यशाची चव चाखण्यापासून दूरच होता.
१९७५. देशात आणीबाणी लागू झाली. पण मांझी ? त्याच्या आयुष्यात पंधरा वर्षांपासून आणीबाणीच सुरु होती.
ज्या काळात देशातला तरुण अत्यंत समृद्ध अश्या सिनेसंगीताच्या आस्वादात धुंद होता, त्या काळात 'बिहार'च्या 'गया' जिल्ह्यातल्या 'गेहलौर' गावातला दशरथ मांझी दगडांशी झुंजत धूळ चाखत होता. बावीस वर्षांनी, १९८२ साली डोंगरातून आरपार रस्ता बनला. ह्या बावीस वर्षांत देशाने अनेक सांस्कृतिक, सांगीतिक, राजकीय, आर्थिक बदल पाहिले. एक दुष्काळ सहन केला. पण मांझी तिथेच राहिला, तेच काम करत राहिला. १९८२ साली डोंगर फुटला, चालत जाण्याचा रस्ता बनला. पण तरी गेहलौरला जाण्यासाठी पक्का रस्ता अजून २९ वर्षांनंतर २०११ साली बनला. तो रस्ता मांझी पाहू शकला नाही, कारण चार वर्षांपूर्वीच तो कॅन्सरशी झुंज हरला होता.

दशरथ मांझीची कहाणी बहुतेकांना माहित असेलच. एका टीव्ही शोमध्ये जेव्हा ही कहाणी दाखवली गेली, तेव्हा ती अनेक लोकांपर्यंत पोहोचली. 'माऊण्टन मॅन' अशी उपाधीही त्याच्या नावासमोर लागली. एक माणूस आयुष्यभर राबला, झिजला आणि अथक तब्बल बावीस वर्षांच्या परिश्रमानंतर जिंकला. एका पहाडाशी एका पहाडाची एकमेवाद्वितीय टक्कर होती ही. कदाचित म्हणूनच वेगळे चित्रपट बनवण्यात रमणाऱ्या केतन मेहतांचं ह्या विषयाकडे लक्ष ओढलं गेलं आणि त्यांनी अजून एक चरित्रपट साकार केला. 

दशरथ मांझीची व्यक्तिरेखा उभी करण्यासाठी एक अशी व्यक्ती हवी, जी गर्दीतल्या कुणाही व्यक्तीचा चेहरा वाटायला हवी. इथे पिळदार यष्टी, उंची, गोरा रंग, बोलके डोळे, तजेला वगैरे बाबी नकोच होत्या. हवी होती, ती केवळ जीव ओतणारी अभिनय कुशलता. एक अफलातून जिद्द साकार करायची होती, ती साकार करण्यासाठी तश्याच जिद्दीच्या जोरावर परिस्थितीवर मात करून पुढे आलेल्या नवाझुद्दिन सिद्दिकीला निवडणं म्हणजे 'मास्टर स्ट्रोक'च ! नवाझुद्दिन हा मूर्तिमंत दशरथ मांझी आहे. जो दशरथ मांझी त्याने उभा केला आहे, तो त्याच्याशिवाय केवळ एकच व्यक्ती उभी करू शकली असती. ती म्हणजे स्वत: 'दशरथ मांझी.' तो आता हयात नाही, त्यामुळे नवाझुद्दिनला पर्यायच नाही. पत्नीवर जीवापाड प्रेम करणारा अगदी टिपिकल फिल्मी ग्रामीण तरुण, ग्रामीण भागातल्या जाचक, जातीभेदयुक्त समाजव्यवस्थेचा शोषित, पत्नीच्या विरहाने वेडसर झालेला पती, पेटून उठून आजवरच्या सगळ्या असंतोषाला एकवटून हातात छिन्नी, हातोडा आणि पहार उचलून एक अतिदीर्घकालीन लढा एकट्यानेच लढणारा पहाडाएव्हढा मर्द असे सगळे दशरथ मांझी तो लीलया साकारतो. दुष्काळी स्थितीत पाणी व अन्नासाठी बेचैन झाल्यावर त्याने 'जे काही' केलं आहे, ते केवळ पाहण्यासारखं आहे, वर्णन करता येण्यासारखं नाहीच. त्याचं हे काम माझ्यासाठी तरी आजवरचं त्याचं सर्वोत्कृष्ट काम आहे आणि जेव्हा नवाझुद्दिनसारख्या अभिनेत्याचं 'आजवरचं सर्वोत्कृष्ट काम' असेल, तेव्हा ते कदाचित इतिहासातल्या 'सर्वोत्कृष्ट कामांपैकी एक' ठरेल. 

मांझीची पत्नी 'फागुनिया'च्या भूमिकेत 'राधिका आपटे' मात्र थोडी कमी पडते. तिचे उच्चार सहज वाटत नाहीत. दिसते छान, वावर (स्क्रीन प्रेझेन्स) सुद्धा मस्त. पण ती 'फागुनिया' न वाटता 'राधिका'च वाटत राहते. हे कदाचित तिच्यासमोर असलेला अभिनेता एक अत्युच्च सादरीकरण करत असल्याने तुलनात्मक दुर्दैव असू शकतं, पण जाणवतं नक्कीच.

इतर भूमिकांमध्ये अश्रफुल हक़ (मांझीचे वडील), प्रशांत नारायणन (झुमरू - मांझीचा मित्र), तिगमांशु धुलिया (गावचा जमीनदार), पंकज त्रिपाठी (जमीनदाराचा मुलगा) हे लोक लक्षात राहतात. 

'भगवान के भरोसे मत बैठो. का पता भगवान् तुम्हारे भरोसे बैठा हो !' असे अनेक अर्थपूर्ण संवादसुद्धा लक्षात राहतात. शहजाद अहमद आणि वरदराज स्वामींनी संवादलेखनाबरोबर कथेसाठीचं संशोधनही केलं आहे. 

'केतन मेहता' हे नाव सन्मानाने घेतले जाते. त्यांनी कधी तिकीटबारीवर खोऱ्याने पैसा ओढणारा चित्रपट बनवलेला नाही. 'मंगल पांडे'सारखा चित्रपट मात्र तिकीटबारीवरही फसला आणि रसिकांच्या पसंतीसही उतरला नव्हता. मांझीच्या कहाणीस आवश्यक तसं जोडकथानक देऊन त्यांनी इथे मात्र एक अप्रतिम कलाकृती निर्माण केली आहे. काही गोष्टी 'प्रेडिक्टेबल' ठरतात. उदा. मांझीच्या जीवनावर चित्रपट येतो आहे म्हटल्यावर मला वाटलं होतं की चित्रपटाचं सुरुवातीचं दृश्य 'डोंगरासमोर उभा असलेल्या संतापाने पेटून उठलेला नवाझुद्दिन' असेल. ते तसंच झालं. मात्र अनेक जागांवर अतिरंजन करण्याचा कुठलाही मोह केतन मेहतांना पडलेला नाही, हेही तितकंच खरं. संदेश शांडिल्यांच्या गाण्यांचाही त्यांनी चांगला उपयोग केला आहे. गाणी लुडबुड करत नाहीत आणि ती तुकड्यांतही आहेत, त्यामुळे कथा व संगीत ह्यांची जी वीण आवश्यक असते, ती नक्कीच जमून आलेली आहे.

सुरुवातीच्या दृश्याला लागून पुढे डोंगरावर आग लागण्याचं जे दृश्य घेतलं आहे, त्यातले स्पेशल इफेक्ट्स सुमार दर्ज्याचे आहेत. ह्या एका बाबतीत हिंदी चित्रपटाने आता शम्भ वर्षांनंतर तरी अधिक आग्रही व चोखंदळ भूमिका घेण्यास हरकत नसावी. हे एक खर्चिक काम असेल, पण आता बजेटची चणचण नक्कीच नसते. हे कठीण काम असेल, पण मांझीच्याच शब्दांत सांगायचं झाल्यास 'पहाड़ तोड़े से भी मुस्किल है का?'

जुन्या काळचा भारत दाखवण्यासाठी इथे फार विशेष काही करावं लागलं नसावं. कारण सगळं चित्रण एका दुर्गम गावाचं आहे. त्यामुळे ना तिथे गाड्या, ना इमारती, ना चित्रपटांची पोस्टर्स, ना वेशभूषा. तरी, मेळे, रेल्वे स्टेशन आणि बस व एकंदर लोकांचे राहणीमान ह्या गोष्टींतून सारं काही व्यवस्थित उभं राहिलं आहे. 
इंदिरा गांधींच्या 'ओझरत्या' भूमिकेत दिसलेली 'दीपा साही' हुबेहूब इंदिरा दिसली आहे ! 

दशरथ मांझीने डोंगर तोडायला सुरुवात केल्यानंतर ५१ वर्षांनी त्या जागी पक्का रस्ता बनला. आता त्या रस्त्याला 'मांझी'चं नावही दिलं गेलं असावं. तो मांझी काही आता आपल्याला दिसणार नाही, भेटणार नाही. पण 'नवाझुद्दिन मांझी' मात्र नक्कीच भेटू शकतो. त्याची भेट नक्की घ्या. त्याचे हे शब्द तुमच्या मनात, डोक्यात, कानांत घुमत राहतील - 'सानदार, जबरजस्त, जिन्दाबाद !'

रेटिंग - * * * * *

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये २३ ऑगस्ट २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-


Tuesday, August 18, 2015

चांगल्या गाडीवरचा रोजचा प्रवास - डबल सीट (Movie Review - Double Seat)

वीज, नोकरी, निवास, रोजगार, भाकरी
त्याच त्याच अडचणी व तेच ते निराकरण

- डॉ. कैलास गायकवाड

एक 'मध्यमवर्गीय घुसमट' ह्या दोन ओळींतून डॉ. गायकवाड खुबीने मांडतात. अख्खी हयात ह्या मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी झिजत झिजत निघून जावी, ही एक शोकांतिकाच ! मुंबईसारख्या महानगरात टीचभर घरात राहणारी ७-८ जणांची कुटुंबं वर्षानुवर्षं ह्या प्राथमिक गरजांवर तीच ती वेळ मारून नेणारी उपाययोजना करत आहेत. समस्या बदलत नाहीत आणि उपाययोजनाही ! आणि हे एक प्रकारचे दुष्टचक्र थांबवण्यासाठी, परिस्थितीला भिडण्याची हिंमत, डोक्या-खांद्यावर असलेला जबाबदारीचा डोलारा करू देत नाही. ह्या विवंचनेत, घुसमटीत लोक जगत नसतात, फक्त जिवंत राहत असतात. दोन दोन पिढ्या तेच हाल काढून दिवस ढकलत असताना, विकासाच्या चक्राच्या गतीला जवळून पाहणारी नवी पिढी मात्र ही फरफट नाकारते आणि जबादारीच्या डोलाऱ्यासकट परिस्थितीशी झगडा करायची हिंमत करते. 'हिंमत-ए-मर्दा तो मदद-ए-खुदा' म्हणतात आणि एक दुष्टचक्र थांबतं. घाण्याला जुंपलेले बैल मुक्त होतात आणि एक मोठ्ठा मोकळा श्वास घेतात.
तर कधी ही हिंमत अंगाशीही येते आणि डोलारा कोसळून त्या ढिगाऱ्याखाली दबण्याचीही वेळ येते. रक्ताचं पाणी करून, पोटाला चिमटा काढून, अनन्वित कष्ट उपसून केलेली जमवाजमव हातातून निघून जाते आणि पटावर सोंगट्या पुन्हा एकदा पहिल्या घरांत येतात. परत एकदा -
त्याच त्याच अडचणी व तेच ते निराकरण
- सुरु होतं. दुष्टचक्र थांबत नाही. आता ते भरडायलाही लागतं.


लखलखत्या मुंबापुरीच्या अस्मानी श्रीमंतीच्या पायाशी अश्या अनेक घुसमटी मूकपणे सगळा झगमगाट बघत असतात. त्यांपैकीच एक आहे लालबागमधल्या एका चालीत राहणारं 'नाईक' कुटुंब. थोरल्या मुलाचं - अमितचं (अंकुश चौधरी) - लग्न होऊन घरात 'मंजिरी' (मुक्ता बर्वे) येते आणि आयुष्याची ३१ वर्षं केवळ तडजोडी करत घालवलेल्या अमितला राहण्यासाठी एका मोठ्या घराची गरज प्रकर्षाने जाणवायला लागते. समजूतदार मंजिरी, घरी मसाले बनवून विकणारी आई (वंदना गुप्ते) आणि धाकटा हिप-हॉपर भाऊ अशी चौघांची टीम नव्या घराच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी झटायला लागते. अल्पसंतुष्ट वडिलांना हा 'उपद्व्याप' वाटत असतो, पण चौघांना ह्या एकाच ध्येयाने जणू झपाटलंच असतं.

एका मध्यमवर्गीय कुटुंबाची धडपड आपण ह्यापूर्वीही पाहिलेली आहे. अडचण, त्यातून बाहेर पडत असताना नवीन संकट अशी सगळी कहाणी आपल्याला तोंडपाठ असते. चित्रपटाचं नाव - 'डबल सीट' - सुद्धा आपल्याला पुढे होऊ घातलेल्या तथाकथित नाट्याची कल्पना देते. जो अंदाज आपण मनाशी बांधतो, त्यापेक्षा वेगळं काही होत नाही. एका पतपेढीत जेव्हा अमित सगळी मिळकत जमा करत असतो, तेव्हाच आपल्याला माहित असतं की ही 'पतपेढी' आहे म्हणजे ही बुडणार आहे, बुडतेच !

अक्षरश: काहीही अनपेक्षित न घडणारं कथानक केवळ आणि केवळ चारही प्रमुख कलाकारांच्या लाजवाब कामामुळे बघावंसं वाटतं. अंकुश चौधरीने डॅशिंग भूमिका अनेक केल्यात. 'दुनियादारी'तला त्याचा दिग्या लोकांनी खूप डोक्यावर घेतला. पण खऱ्या अर्थाने जर तो कुठल्या भूमिकेत शोभला असेल तर ती 'अमित नाईक' ह्या सोशिक, समजूतदार मध्यमवर्गीय सरळमार्गी तरुणाची ठरावी. एकाही फ्रेममध्ये तो मिसफिट वाटत नाही की 'अमित नाईक' व्यतिरिक्त इतर कुणी वाटत नाही, तो स्वत:सुद्धा नाही.
'मंजिरी'च्या भूमिकेत मुक्ता बर्वे अशी दिसली आणि वावरली आहे की कुणाही अविवाहिताने ताबडतोब सांगावं, 'मला अशीच बायको हवी!' तिचं सौंदर्य ईश्वरी नाही. पण साधेपणातल्या सौंदर्याची ती परिसीमा असावी. ती अगदी सेंट पर्सेंट 'गर्ल नेक्स्ट डोअर' वाटते. सहजाभिनय हा काही तिच्यासाठी नवीन नाही. (अवांतर - मिलिंद जोशींसोबतचा तिचा 'रंग नवा' हा कवितांचा आगळावेगळा कार्यक्रम पाहिल्यानंतर तर मला तिच्याविषयी प्रचंड आदर वाटायला लागला आहे. 'मुक्ता बर्वे' हे एक अभ्यासू, तल्लख, चतुरस्र व्यक्तिमत्व आहे ह्याबद्दल अजिबातच शंका नाही.)

विद्याधर जोशी व वंदना गुप्ते ह्यांना प्रत्येकी एक दृश्य असं मिळालं आहे, ज्यात त्यांना आपली 'सिग्नेचर' सोडायची संधी होती. अशी संधी असे कसलेले अभिनेते सोडतील, हे अशक्यच ! तो बाप आणि ती आई मन जिंकतात.

मराठी नाट्यसृष्टीचा मराठी चित्रपटसृष्टीवर जो संस्कार आहे, त्यामुळे सामान्यातले सामान्य मराठी चित्रपटही उत्तमातल्या उत्तम हिंदी चित्रपटांपेक्षा सरस ठरतात. ताकदीचे नवे-जुने अभिनेते ही रंगमंचाचीच देणगी. त्यामुळे इथे कलाकारांकडून उत्तम काम काढून घेताना दिग्दर्शकाची नक्कीच दमछाक होत नसावी. अश्या वेळी दिग्दर्शक इतर गोष्टींवर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकत असेल का ? म्हणजे, मला असं म्हाणायचं आहे की जरी संकलन, छायाचित्रण, लेखन, पटकथालेखन, संगीत वगैरे सगळं सांभाळणारे जरी ते ते लोक असतील, तरी त्यांच्याकडूनही हवं ते करवून घेण्याची अंतिम जबाबदारी दिग्दर्शकाचीच ना ? मग ते बाप-मुलाच्या भांडणावेळी धाडकन झूम इन, झूम आउट होणारं कॅमेरावर्क का ? आरडाओरड्याने संपृक्त गाणी का ? अशक्य पांचट डायलॉग्स का ? कहाणीची तीच ती साचेबद्ध वळणं का ? त्यांची हाताळणीही अगदी नेहमीसारखीच का ?

असे सगळे 'का?' घेऊन आपण बाहेर येतो. खूप आनंददायी नसलेला, पण अगदीच कंटाळवाणाही नसलेला एखादा प्रवास संपावा आणि सगळ्या लहानश्या बऱ्या-वाईट स्मृती तिथेच त्या टप्प्यावर आपण अगदी सहजपणे सोडून द्याव्यात, तसाच हा 'डबल सीट' प्रवास संपतो. मनाची पाटी कोरीच राहते. कारण हा चांगल्या बाईकवरचा हा रोजचा प्रवास असतो. तेच खड्डे, तीच वळणं आणि त्याच जागेपासून त्याच जागेपर्यंत.

रेटिंग - * * १/२

Monday, August 17, 2015

'ब्रदर्स' हरले, 'बाप' जिंकला! (Movie Review - Brothers)

पूर्वी शाळेत मराठी, हिंदीप्रमाणेच इंग्रजीच्या पेपरमध्येसुद्धा पाठ्यपुस्तकातील धड्यांवरचे प्रश्न असायचे. नंतर ही पद्धत बदलली आणि इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतच एक उतारा दिला जाऊ लागला, ज्यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ लागले. अर्थात, हे प्रश्न त्या त्या वर्षाच्या अभ्यासक्रमानुसार, पाठ्यपुस्तकानुसारच असत. पण मुलांना इंग्रजीत अधिक गुण मिळायला लागले. चित्रपटांचे रिमेक करणं, हे असंच काहीसं वाटतं मला. पूर्णपणे वेगळी कथा, विषय घेऊन त्यावर चित्रपट बनवणे, त्यातही आव्हानं स्वीकारणे आणि ती पेलणेही, हे करणारे नवीन दिग्दर्शक मला दिसतात आणि त्याच वेळी प्रश्नपत्रिकेतच येणाऱ्या उताऱ्यावर आधारित प्रश्न अचूक सोडवणारे, रिमेक्स करण्यावर अधिक भर देणारे दिग्दर्शकही दिसतात. ह्यातले काही जण दक्षिणेकडे गाजलेल्या मसालापटांना त्यांच्या पांचटपणा, बिनडोकपणा आणि भडकपणासकट पुनर्चित्रित करतात, तर करण मल्होत्रासारखे काही जण पूर्वी येऊन गेलेल्या चित्रपटांना नव्याने सादर करतात. करण मल्होत्रा ह्यांनी दिग्दर्शक म्हणून पहिलं पाऊल टाकताना नव्वद सालच्या सुपर फ्लॉप 'अग्निपथ'चा रिमेक केला होता आणि आता २०११ चा हॉलीवूड चित्रपट 'वॉरियर'चा रिमेक. संदर्भाचा उतारा समोर असल्यामुळे जसे मुलांचे गुण वाढले, तसे 'अग्निपथ' सोडवताना मल्होत्रानी चांगले गुण मिळवले. 'वॉरियर' सोडवताना मात्र मल्होत्रा तितके गुण मिळवू शकत नाहीत, पण अगदी नापासही होत नाहीत किंवा काठावर पासही. सरासरी गाठतात !
मूळ इंग्रजी 'अ‍ॅक्शन स्पोर्ट मूव्ही'चा हिंदीतला रिमेक म्हटल्यावर 'अ‍ॅप्पल टू अ‍ॅप्पल' तुलनेत हिंदी कमी पडणारच, कारण चित्रपटातल्या 'अ‍ॅक्शन'कडे पाहायचा आपला दृष्टीकोनच भिन्न आहे. तसेच, चित्रपटात म्हटल्याप्रमाणेच, 'फायटिंग' कडे एक 'खेळ' म्हणून पाहणे आपल्याकडे मर्यादितच आहे. त्यामुळे एक इंग्रजी 'अ‍ॅक्शन स्पोर्ट मूव्ही' आणि एक हिंदी 'अ‍ॅक्शन स्पोर्ट मूव्ही' ह्यांच्यात तोच फरक आहे जो घरच्या मैदानावर खेळणारा भारतीय क्रिकेट संघ आणि परदेशात खेळणारा तोच संघ ह्यांच्यात असावा. त्यातही, जर तो 'रिमेक' असेल, तर पितळच उघडं पडतं. त्यामुळे शक्यतो ही तुलना न करता ह्या चित्रपटाकडे पाहायला हवं. ते शक्य होणार नाहीच आणि वाईट गोष्टींना आपण 'हा हिंदीचा एकंदरच प्रॉब्लेम आहे' म्हणून ठळक करू आणि चांगल्या गोष्टींना 'मूळ चित्रपटामुळे हे सोपं झालं' असं म्हणून पुसट करू. काय करणार मल्होत्रा साहेब, तुम्ही रिमेक केला आहे तर आता हे त्याचे 'बाय-प्रोडक्ट'च समजा !भारतात प्रतिबंधित असलेल्या 'स्ट्रीट फाईट्स' महानगरी मुंबईत रात्रीच्या काळोखात आणि पोलिसांना चुकवून किंवा 'मॅनेज' करून चालत असतात. ही एक समांतर इंडस्ट्रीच असते समजा. ज्यावर अनेक फायटर्स, सटोडिये व इतर काही लोक गुजराण करत असतात आणि शेकड्याने लोक ह्या मनोरंजनासाठी पैसाही टाकत असतात. ह्या 'स्ट्रीट फायटिंग इंडस्ट्री'तला एके काळचा एक स्टार 'गॅरी फर्नांडीस' (जॅकी श्रॉफ) तुरुंगातून, आपल्या एका गुन्ह्याची शिक्षा भोगून बाहेर पडतो. (कुठला गुन्हा, हे सांगणे जाणीवपूर्वक टाळतो आहे.) बाहेरच्या जगात त्याचे दोन मुलगे आपापलं आयुष्य जगत असतात. मोठा 'डेव्हिड' (अक्षय कुमार) आणि लहान 'मॉण्टी' (सिद्धार्थ मल्होत्रा). गॅरी तुरुंगात गेल्यापासून एकटाच राहणारा मॉण्टी, बापाप्रमाणेच एक 'स्ट्रीट फायटर' असतो आणि भाऊ व बापापासून वेगळा राहणारा, त्यांचा तिरस्कार करणारा 'डेव्हिड' पत्नी 'जेनी' (जॅकलिन फर्नांडीस) आणि सहा वर्षांची मुलगी 'मारिया'सोबत एक पूर्णपणे वेगळं आयुष्य जगत असतो. एका शाळेत शिक्षकाची नोकरी करणारा डेव्हिड आणि त्याची पत्नी जेनी कर्ज घेऊन, पै पै जोडून, वाचवून मुलीच्या किडनीच्या इलाजासाठी आणि भविष्यातल्या अटळ 'ट्रान्स्प्लॅण्ट' साठी सोय करत असतात. डेव्हिडही पूर्वी 'स्ट्रीट फायटर'च असतो, पण जेनीसोबत नवं आयुष्य सुरु करताना त्याने 'फायटिंग' सोडलेली असते.
दुसरीकडे, पीटर ब्रागेन्झा (किरण कुमार) हा एक मोठा उद्योगपती, आंतरराष्ट्रीय लोकप्रियता मिळवलेल्या 'राईट टू फाईट' (R2F) ह्या 'फायटिंग चॅम्पियनशिप' ला भारतात घेऊन येतो. बापाच्या नजरेत डेव्हिडपेक्षा जास्त किंवा त्याच्याइतकीच आपली कुवत सिद्ध करण्यासाठी 'मॉण्टी' ह्या चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतो आणि नोकरी सुटलेला, बँकेने कर्ज नाकारलेला डेव्हिड मुलीच्या इलाजासाठी पैसा उभारण्यासाठी पुन्हा रिंगणात उतरतो.
पुढे काय होणार हे सांगायची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही. कारण इंग्रजी असो वा हिंदी, चित्रपट काही बाबतींत एकसूत्रीपणा अवलंबतात आणि एका विशिष्ट वळणावर कथानक आलं की पुढची वळणं तसेच अंतिम स्थानसुद्धा बहुतेक वेळी लक्षात येतंच.

संपूर्ण चित्रपटभर एका राखाडी छटेचा झाकोळ आहे. ही छटा रंगाची नाही, तर 'मूड'ची आहे. कुठेही त्याचा मूड फारसा बदलत नाही. ना कुठे काही हास्यविनोद आहेत, ना अनपेक्षित धक्क्याने येणारी अगतिकता आहे, ना नाट्यमयतेचा कडेलोट करणारे संवाद कुणी एकमेकांच्या तोंडावर मारतं. एका संयमित गतीने चित्रपट पुढे सरकत राहतो आणि अध्येमध्ये रखडतोही. खासकरून मध्यंतरानंतर, जेव्हा 'R2F' सुरु होते, तेव्हा रटाळपणा वाढतो. चक दे इंडिया, मेरी कोम, लगान, भाग मिल्खा भाग वगैरेंमध्ये दिसलेली पायरी-पायरीने चढत जाणारी उत्कंठा आता आपल्याला इतकी सवयीची झालेली असते की चॅम्पियनशिप सुरु झाल्या झाल्याच आपल्याला वाटतं की, 'डायरेक्ट दोन भावांमधली अटळ फायनल सुरु करा यार!'

सिद्धार्थ मल्होत्राने 'नकटं असावं पण धाकटं असू नये' ह्या उक्तीतली धुसफूस चांगली दाखवली आहे. त्याला दाढी शोभते आणि अक्षय कुमारची दाढी मात्र 'दाढी' न वाटता हिरवट, पांढरट, पिवळसर 'बुरशी' वाटते. तो पडद्यावर आला की पडद्यालाही अंघोळ घालावीशी वाटते, इतका तो कळकट दिसतो. त्यात परीक्षेला कॉपी करणारी पोरं जशी अंगावर टिप्पण्या लिहितात, तसलं ते गोंदकाम (Tattoo) त्याच्या कळकटपणाला आणखी कळकट बनवतं. सिद्धार्थसाठी अभिनयाच्या संधी म्हणजे वडिलांसाठीची तळमळ आणि मोठ्या भावाशी होणाऱ्या तुलनेने होणारी कुचंबणा आणि अक्षयसाठी अभिनयाच्या संधी म्हणजे आपल्या लहानग्या मुलीला वाचवण्यासाठी परिस्थितीशी झगडा, ह्याच आहेत. दोघांनी त्या त्या संधींना न्याय नक्कीच दिलेला आहे.
जॅकलिन फर्नांडीसला खूप छोटीशी भूमिका आहे. ती पुन्हा एकदा सुंदर दिसते आणि दिलेलं काम पूर्ण करते.

मात्र, चित्रपट खिश्यात घालतो तो जॅकी श्रॉफ. गॅरीच्या व्यक्तिरेखेला अनेक कोन आहेत, छटा आहेत. एक फायटर, एक बाप, एक व्यसनाधीन, एक पश्चात्तापदग्ध अपराधी ह्या सगळ्या छटा त्याने खुबीने रंगवल्या आहेत. बेचैनी, नैराश्य आणि एकूणच मानसिक असंतुलन दाखवताना जॅकीने आजवर त्याच्यात क्वचितच दिसलेल्या उत्तम अभिनेत्याचं दर्शन घडवलेलं आहे. आजपर्यंतच्या त्याच्या कारकीर्दीतली ही त्याची सर्वोत्तम कामगिरी असू शकते. अर्थात, मूळ चित्रपट 'वॉरियर' मध्ये 'निक नोल्टे' ला ह्याच भूमिकेसाठी अकादमी पुरस्काराचे नामांकन मिळाले असल्याने, ते काम कदाचित जॅकीला संदर्भ म्हणून समोर ठेवता आलं असेल, तरीही त्याचं श्रेय कमी होणार नाहीच.

शेफाली शाहने गॅरीच्या पत्नीची व्यक्तिरेखा अप्रतिम उभी केली आहे. 'दिल धडकने दो' मधली उच्चभ्रू आई आणि इथली आई ह्यांत जमीन-अस्मानाचा फरक आहे. ह्या दोन्ही भूमिका एकच अभिनेत्री करते आहे आणि एकाच ताकदीने, हे निश्चितच वाखाणण्यासारखं आहे. एका प्रसंगात तिने चेहऱ्याच्या सावलीतूनही भावना दाखवल्या आहेत.

अजय-अतुलचं संगीत श्रवणीय आहे. मात्र 'ये गो ये, ये मैना' चं हिंदीकरण 'मेरा नाम मेरी है' साफ फसलं आहे. 'मेरी सौ टक्का तेरी है' ही हास्यास्पद ओळ लिहिल्याबद्दल अमिताभ भट्टाचार्यला, नेहमीच्या गुणी विद्यार्थ्याने चुकीचं उत्तर दिल्यावर जसं रागे भरलं जातं, तसं कुणी तरी अधिकारवाणीने रागवायला हवं. त्या गाण्यावरचं करीना कपूरचं भिकार नृत्य अविस्मरणीय आहे. 'चिकनी चमेली' ची नक्कल म्हणून हे गाणं घुसडलं आहे. पण त्याला ना श्रेया घोशालची सर आहे ना कतरिनाची. करीनाने ह्या गाण्यावर जे काही केलं आहे, त्यावरून तिला नृत्यासाठी एक जीवनगौरव पुरस्कार देऊन टाकावा, जेणेकरून ती परत नृत्य करणार नाही.

चित्रपट 'ब्रदर्स' असला, तरी तो आहे 'फादर'चाच आणि तो 'फादर'मुळेच लक्षात राहतो. ह्या निमित्ताने जॅकी श्रॉफ ह्यापूर्वीच्या क्रॅपी आठवणी पुसून ताकदीचा अभिनेता म्हणून पुढे येईल, असा विश्वास वाटतो. हा रिमेक तोकडा पडला असला, तरी स्वतंत्र चित्रपट म्हणून जेव्हढ्यास तेव्हढा तरी होतोच. 'ब्रदर्स' हरले, तरी 'बाप' जिंकतो, जॅकी लक्षात राहतो. त्याच्यासाठी तरी नक्कीच पाहता येईल.

रेटिंग - * * १/२


हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये १६ ऑगस्ट २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-


Sunday, August 09, 2015

'सिली कॉमेडी' - 'बँगिस्तान' (Movie Review - Bangistan)


आक्रमण हा उत्तम बचाव असतो आणि विनोद ही सर्वोत्तम टीका. टीकात्मक विनोद म्हणजेच 'उपहास'ही आणि 'टोमणेबाजी'ही ! एक चित्र एक हजार शब्दांच्या बरोबरीचं असतं, असं म्हणतात. कधी कधी असंही वाटतं की, एक विनोद हा हजार शब्दांच्या लेखाइतकंच उत्तम भाष्य असतो. बहुतेक वेळेस हे टीकात्मक विनोद म्हणजे 'सिली ह्युमर' असतात आणि त्यांचा आस्वाद घेण्यासाठी मानेच्या वरच्या अवयवाला काही काळ सुट्टी द्यावी लागते ! पण किंवा म्हणूनच ह्या तिरकस विनोदांचा सतत मारा झाला, तर मात्र त्याचा उबगही येतो. असे उबग आपल्याला आलोकनाथ, रजनीकांत, आफ्रिदी आणि सध्या 'ट्रेंडिंग' असलेल्या 'जान्हवी-श्री' चे येऊन गेले आहेत आणि येतही आहेत.
आजच्या जगासमोर असलेल्या सगळ्यात भयंकर समस्येवर 'बँगिस्तान' तिरकस विनोद करतो. हा विनोद 'सिली ह्युमर' म्हणता येईल. ह्याच्या आस्वादासाठी डोक्याची लुडबुड टाळायला लागेल आणि त्याचा 'उबग'ही येत नाही ! Sounds good ! Right ?
बहुतेक !

'बँगिस्तान' नावाचा एक देश ह्या भूतलावर आहे. कट्टर, धर्मांध लोकांच्या ह्या देशात मुसलमान वि. हिंदू हा संघर्ष आणि हिंसा अगदी रोजचीच गोष्ट आहे. इथले हिंदू आणि मुसलमान लहान-सहान गोष्टींवरुन हत्यारं उपसणारे आणि त्यातच आपापल्या धर्माची सेवा मानणारे असतात. सतत हिंसेत, द्वेषात धुमसणाऱ्या ह्या देशात मुसलमानांचे इमाम साब आणि हिंदूंचे शंकराचार्य हे दोघे सर्वोच्च धार्मिक नेते मात्र ह्या सगळ्या परिस्थितीमुळे अतिशय व्यथित असतात. आपसांत उत्तम मैत्रीपूर्ण संबंध असलेले हे दोघे सर्वोच्च नेते 'पोलंड'ला होणार असलेल्या १३ व्या जागतिक धार्मिक परिषदेच्या व्यासपीठावरून सर्व धर्म व देशबांधवांना शांतीसंदेश देण्याचं ठरवतात. ह्याची कुणकुण दोन्ही धर्मांच्या कट्टरपंथियांना लागताच, ते हा शांतीचा मार्ग बांधला जाण्याच्या आधीच उद्ध्वस्त करण्याचं कारस्थान आखतात. १३ व्या जागतिक धर्म परिषदेत बॉम्बस्फोट घडवून आणण्याचं दोन्ही धर्मांचे कट्टरपंथी ठरवतात. ह्या कार्यासाठी 'हाफिज बिन अली' (रितेश देशमुख) आणि 'प्रवीण चतुर्वेदी' (पुलकित सम्राट) ह्यांना निवडलं जातं. हाफिजला हिंदू भासवून 'ईश्वरचंद शर्मा' नावाने आणि प्रवीणला मुसलमान भासवून 'अल्लारखा खान' नावाने पोलंडला बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी पाठवलं जातं. जेणेकरून 'प्रतिस्पर्धी' धर्माची बदनामीसुद्धा होईल. हे दोघे 'होतकरु' कट्टरपंथी पोलंडला जातात, एकमेकांना भेटतात आणि दिलेल्या 'ईश्वरी' जबाबदारीला पूर्ण करण्यासाठी काम सुरु करतात.
पुढे काय होतं हे तितकंसं महत्वाचं नाही, 'कसं होतं' हे जास्त महत्वाचं आहे.दहशतवादासारख्या भयंकर विषयावर खुमासदार 'तेरे बिन लादेन' २०१० ला आला होता. 'बँगिस्तान' त्याच्या तुलनेत कमीच पडेल, पण विनोदाच्या नावाखाली असह्य आचरटपणा, चावटपणा किंवा पांचटपणा करणाऱ्या नेहमीच्या बिनडोकपटांपेक्षा निश्चितच उजवा ठरावा. फॅकडॉनल्ड्स, दाढीची लांबी, चायनीज बॉम्ब वगैरे फंडे धमाल आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चित्रपट कुठलाही संदेश देण्यासाठी गुळमुळीत धार्मिक सलोख्याची भाषणं झोडत नाही.

मात्र चित्रपटाचा आणि लेखक-दिग्दर्शकाचा हा दृष्टीकोन जसाच्या तसा रितेश देशमुखला कळला नाही की काय, असं वाटतं. एरव्ही 'कॉमेडी' मध्ये सहजाभिनय करणारा रितेश इथे मात्र वेगळ्याच जगात असल्यासारखा वाटतो. ह्या भूमिकेतल्या रितेशकडून आपल्याला खूप जास्त अपेक्षा असते, ती तो पूर्ण करत नाही. कुठल्या तरी जटील विवंचनेत गुंतला असल्याचे भाव पूर्ण वेळ त्याच्या चेहऱ्यावर दिसत राहतात.
तर दुसरीकडे, पुलकित सम्राट उगाच पॉपकॉर्नसारखा उडत राहतो ! ह्या दोघांना पाहून एक विनोद आठवतो.
एकदा दोघं मित्र महामंडळाच्या बसने जात असतात. तिकीट काढताना एक जण म्हणतो, 'हा माझा मित्र डोक्याने अर्धवट आहे, म्हणून आम्हाला एक फुल्ल एक हाफ तिकीट द्या!'
कंडक्टरसुद्धा महामंडळाचा असल्याने चतुर असतो. म्हणतो, 'तरी दोनच घ्यावी लागतील. मित्राचं अर्धं आणि तुमचं दीड!'
तसं काहीसं रितेश + पुलकित हे कॉम्बीनेशन झालं आहे. रितेश फिका वाटतो आणि पुलकित जास्तच रंगीन ! एक अर्धा, एक दीड ! पण कलेच्या क्षेत्रात १ + १ = २ इतकं सरळसोट गणित नसतं. त्यामुळे अर्धा + दीड = 'दोन' सोडून इतर सगळी उत्तरं मिळत राहतात.

इतर सहाय्यक अभिनेत्यांनी मात्र धमाल केली आहे. हफीजचे होतकरु 'सह-दहशतवादी' आणि प्रवीणचे होतकरु 'सह-माथेफिरू', पोलंडमधला बांगलादेशी इस्टेट एजंट, भडकावू अब्बाजान आणि गुरुजी वगैरे सगळ्यांनीच उत्तम काम केलं आहे.
इतकंच काय एरव्ही अभिनयाच्या नावाने शंख असणारी जॅकलीन फर्नांडीससुद्धा 'रोझी' म्हणून आवडून जाते !

आजकाल कानाला बरं संगीत वाटलं की 'ते प्रीतमचं असेल', अशी भीती वाटते. आनंदाची गोष्ट ही की बँगिस्तानला प्रीतमचं संगीत नसून 'राम संपत' चं आहे. ते चक्क 'उल्लेखनीय' वगैरे आहे. 'होगी क्रांती', 'इस दुनिया से लडना है', 'मौला' आणि 'सॅटरडे नाईट' ही गाणी लक्षात राहतात. गाण्यांच्या चाली जश्या प्रसंगांना साजेश्या आहेत आणि तसेच पुनीत कृष्णचे शब्दही. कुठलेच गाणे 'हे कधी संपणार आहे!' असा विचार मनात डोकावू देत नाही, ह्यासाठी खरोखर संगीतकार-गीतकार द्वयीचं अभिनंदन ! (ह्या निमित्ताने एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की आजकाल चित्रपटाच्या गीतकाराचं नाव बहुतेक ठिकाणी गाळलं जात आहे. हे निश्चितच स्वीकारार्ह नाही आणि ह्याचा निषेध व्हायलाच हवा.)

संवादलेखन फार काही ताकदीचे झालेले नाही. शाब्दिक कोट्यांतून विनोदनिर्मिती न होता परिस्थितीजन्य विनोदनिर्मितीवरच भर आहे. शेवटाकडे असलेल्या एका दृश्यात रितेश आणि पुलकितला अधिक चांगल्या संवादांची गरज होती, असे प्रकर्षाने जाणवते.

दिग्दर्शक करण अंशुमन ह्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. अश्या विषयावर विनोदी चित्रपट बनवणे म्हणजे शिवधनुष्य पेलणे. नवे दिग्दर्शक, नवीन चेहऱ्यांना घेऊन, आव्हानात्मक विषय हाताळतात, हे 'मसान'नंतर दुसऱ्यांदा दिसलं आहे.  'बँगिस्तान'चा मूड व विषय 'मसान'पेक्षा खूपच वेगळा असला तरी सरळसोट, सरधोपट वगैरे कॅटेगरीतला तर नाहीच आहे. त्यामुळे ह्या हिंमतीसाठी मनापासून दाद द्यायलाच हवी. फार सहजपणे ह्या कथानकाचा विचका होऊन 'बँगिस्तान' ऐवजी 'भंकस्तान' होऊ शकला असता, मात्र तसे झालेले नाही. कदाचित अजून सफाईदार झाला असता, मुख्य कलाकारांच्या अधिक चांगल्या प्रदर्शनाने आणखी खुमासदारही झाला असता, पण आधीच म्हटल्याप्रमाणे एरव्हीच्या पांचटपणापेक्षा कैक पटींनी हा तिरकसपणा चांगलाच आहे. 'सिली कॉमेडी' म्हणून एकदा नक्कीच पाहिला जाऊ शकतो !

रेटिंग - * * *

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज ०९ ऑगस्ट २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-


Monday, August 03, 2015

'जुलै'चा विजयी चौकार (Movie Review - Drishyam)

सध्या हिंदी चित्रपटाच्या सागरात दोन प्रकारच्या लाटाच जास्त उफाळून येत आहेत. रिमेक आणि चरित्रपट. कारण स्पष्ट आहे. अशीच एक लाट म्हणजे 'दृश्यम'. इथला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की ह्यापूर्वीच्या दृश्यमांत (मल्याळम - द्रिश्यम आणि तमिळ - 'पापनाशम') काम केलं होतं मोहनलाल (मल्याळम) आणि कमल हसन (तमिळ) ह्यांनी. त्यांच्यासमोर हिंदीने उभं केलं आहे 'अजय देवगण'ला. ही तिघांची तुलना अजय देवगणसाठी दुर्दैवी आणि अन्यायकारक होते.

प्रसिद्ध पटकथा-संवाद लेखक जोडी 'सलीम-जावेद' (सलीम खान आणि जावेद अख्तर) ह्यांनी एकदा एका मुलाखतीत म्हटलं होतं की, 'आमच्या स्क्रिप्ट्स इतक्या बारकाव्यांसकट लिहिलेल्या असतात की दिग्दर्शकाने फक्त जसं लिहिलंय तसं केलं तरी पुरेसं आहे.' हा खरं तर यशाचा उन्माद होता. पण एका अर्थी खरंसुद्धा होतं. शोले, दीवार, जंजीर, शान, डॉन, मजबूर आणि असे सलीम-जावेदचे अजूनही काही चित्रपट पाहताना ती कथानकं गच्च आवळलेली असल्याचं जाणवतंच. मात्र म्हणून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दिग्दर्शक दुय्यम ठरत नाही. उत्कृष्ट कथानकांची अनेकदा माती होत असते आणि उत्कृष्ट दिग्दर्शक सामान्य कथानकातूनही असामान्य चित्रपट बनवू शकतोच.

मूळ मल्याळम भाषेतल्या 'द्रिश्यम' चा हिंदी रिमेक 'दृश्यम' बघताना मला सलीम-जावेदचं वरील वक्तव्य आठवलं. गच्च आवळलेलं, वेगवान कथानक ज्यात बारीक-सारीक तपशिलांची बऱ्यापैकी काळजी घेतलेली आहे, हे 'दृश्यम'चं वैशिष्ट्य. पण चित्रपट हे तर दिग्दर्शकाचं माध्यम मानलं जातं. मग ह्यात निशिकांत कामतांचं योगदान काय ? कदाचित हेच की त्यांनी त्या कथानकाची माती होऊ दिली नाही. मात्र त्याच वेळी, ते वेगळ्या उंचीवर नेलं का ? ह्या प्रश्नाचं उत्तर अप्रिय असू शकतं.

गोव्यात एका 'पोंदोलिम' नावाच्या लहानश्या गावात विजय साळगांवकर (अजय देवगण) पत्नी नंदिनी (श्रिया सरन) आणि दोन मुलींसोबत राहत असतो. त्याचा केबल टीव्हीचा व्यवसाय असतो. सुस्वभावी विजयचे गावांतल्या सगळ्याच लोकांशी चांगले संबंध असतात, अपवाद भ्रष्ट पोलीस इन्स्पेक्टर गायतोंडे. विजयची एकच वाईट सवय असते. आपल्या केबल टीव्हीच्या ऑफिसात बसून रात्र रात्रभर चित्रपट पाहत बसणे. ह्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे तो एके रात्री ऑफिसमध्ये टीव्ही पाहत बसलेला असताना, घरी त्याची मोठी मुलगी व पत्नी ह्यांच्यासोबत एक धक्कादायक घटना घडते. साळगावकर कुटुंबाचं आयुष्य बदलून जातं. ह्या घटनेतून स्वत:च्या कुटुंबाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी विजय एक 'प्लान' बनवतो. तो एक कहाणी बनवतो, जगतो आणि इतरांनाही जगवतो. मात्र तरी पोलीस सहजासहजी पिच्छा सोडणार नसतातच. चुघांचीही चौकश्या, दबाव, मारहाण अशी सगळी ससेहोलपट सुरु होते. विजयचा प्लान आणि त्याने त्याच्या बायको-मुलींना केलेल्या सूचना हे सगळं कुठवर यशस्वी ठरतं ?
विजय कुटुंबाला वाचवतो का ? अश्या सगळ्या उत्कांठांनी नटलेलं नाट्य रंगतदार आहे.
घटना खूप वेगाने घडत जातात आणि लहान-मोठे धक्के देत राहतात. पण तरी काही तरी कमतरता जाणवत राहते. ती म्हणजे प्रमुख कलाकार जरा कमीच पडल्यासारखे वाटतात.

'हैदर'मध्ये एका आव्हानात्मक भूमिकेनंतर तब्बू 'दृश्यम'मध्ये 'आय.जी. मीरा देशमुख' च्या भूमिकेत दिसते. मात्र एका पोलीस अधिकाऱ्याला साजेशी आक्रमकता आणि कणखरपणा तिच्यात जाणवत नाही. ती पोलीस अधिकारी असली तरी मुलासाठी व्याकुळ झालेली आईसुद्धा आहे, असं म्हणता येईल. पण मग तिच्यातली आईच चित्रपटभर दिसत राहते, 'आय.जी.' दिसत नाही, हेच त्यातून नक्की होतं. तिचा आवाज आणि देहबोली गुळमुळीत वाटते आणि 'तब्बू'साठी चित्रपट पाहत असणाऱ्यांचा तिच्याकडून अपेक्षाभंगच होतो.

तिच्यापेक्षा कमी लांबीची भूमिका असलेल्या रजत कपूरने तिच्या पतीच्या व्यक्तिरेखेला चांगले वठवले आहे. एका दृश्यात जेव्हा तो विजयशी थेट संवाद साधतो तेव्हा एक हळवा बाप आणि खंबीर पती अशी त्याची ओढाताण तो खूप संयतपणे दाखवून देतो. मात्र 'रजत कपूर चांगला अभिनय करतो' ह्यात काही आश्चर्याची गोष्ट नसावीच ! तब्बू आणि तो समोरासमोर असताना काय होतं, हे पाहणं उत्कंठावर्धक होतं आणि लहान-लहान प्रसंगांत तो तिला अगदी सहजपणे पुरून उरला आहे.

आधीच म्हटल्याप्रमाणे 'अजय देवगण'ची तुलना दिग्गजांशी तुलना अपरिहार्यपणे होते. मात्र ते दाक्षिणात्य चित्रपट फार कमी लोकांनी पाहिलेले असावेत, त्यामुळे त्यांच्यासाठी 'विजय साळगावकर' फर्स्ट हॅण्डच आहे. त्याने नावातला एक 'A' कमी केला आहे. भारताचा तेज गोलंदाज उमेश यादवने त्याच्या आडनावात एक 'A' वाढवला आहे. देवगण आणि यादवच्या ह्या 'स्पेल-चेंज'मुळे त्यांच्यात विशेष फरक पडलेला नाही. देवगण आजही 'Director's Actor' आहे.

दिग्दर्शक निशिकांत कामत, जिथे अजय देवगणकडून समाधानकारक कामगिरी करून घेतात तिथे ते इतर पात्रांच्या बाबतीत मात्र थोडेसे कमीच पडतात. दोघी मुली व श्रिया सरनकडूनही काही 'मूल्यवर्धक' कामगिरी करवून घेता आली असती, पण तसं काही होत नाही. वेगवान कथेचा व पटकथेचा तोल ढळणार नाही, इतकीच खबरदारी त्यांनी घेतलेली आहे.

विशाल भारद्वाजच्या संगीताला फारसा वाव नाही. 'कार्बन कॉपी' आणि 'घुटता है दम' ही दोन गाणी लक्षात राहतात. गुलजार साहेबांचे शब्द एरव्हीप्रमाणे काही विशेष जादूभरे वाटत नाहीत, हा अजून एक अपेक्षा भंग.

मूळ कथा जीतू जोसेफ ह्यांची आहे. उपेंद्र शिधये ह्यांनी तिचं पुनर्लेखन केलं आहे. 'दृश्यम' चे खरे स्टार हे दोघं आहेत. जर अख्खा चित्रपट आपण श्वास रोखून पाहिला जाईल, तर तो ह्यांच्यामुळेच. चित्रपट सुरु असताना आपल्याला काही प्रश्न पडतात. थोड्या वेळाने त्या त्या प्रश्नांची उत्तरं आपसूकच मिळतात ! 'अमुक एक धागा सुटला', असं वाटत असतानाच अखेरीस सर्व धागे बरोब्बर जुळून येतात. लेखक हा बहुतेक वेळेस 'अनसंग हीरो' ठरत असतो. सलीम-जावेद ह्यांनी चित्रपटांसाठी लेखकाचं महत्व जगाला दाखवून दिलं. पण तरी आजही पडद्यावर दिसणाऱ्या 'दृश्यमा'लाच जास्त महत्व आहे आणि 'अदृश्य' लेखकांची कामगिरी म्हणावी तितकी वाखाणली जात नाही.

एकंदरीत दृश्यम हा 'एकदा पाहावाच' ह्या श्रेणीतला आहे.
जुलै महिना चित्रपट रसिकांसाठी पर्वणी (बाहुबली, बजरंगी, मसान, दृश्यम) ठरला आहे. 'दृश्यम' हा 'जुलै'चा विजयी चौकार म्हणवला जाऊ शकतो.
आता येणारा 'ऑगस्ट' वाढलेल्या अपेक्षांचं ओझं सांभाळतो की त्याची 'तब्बू' होते, ते पाहू !

रेटिंग - * * *

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज ०२ ऑगस्ट २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-


Related Posts Plugin for WordPress, Blogger...